मला कळू दे

नात्यामध्ये गैरसमज हा फार भयंकर असतो. नात्यामध्ये बऱ्याचदा आपण जे पाहतो किंवा ऐकतो ते संपूर्ण सत्य नसते. समोर जे घडेल त्याला आपण आपले अर्थ जोडतो आणि आपलं एक सत्य बनवतो. आपण बनवलेल्या या सत्यामधूनच आपण ते नातं पाहायला लागतो. चुकीच्या अर्थातून बनलेलं हे सत्य आपल्याला समोरच्या व्यक्तीमध्ये चांगलं पाहूच देत नाही. आपण फक्त चुका शोधात राहतो आणि त्या व्यक्ती हळूहळू आपल्या जीवनातून कायमच्या निघून जातात.

 

यावर आधारलेली माझी हि कविता, ‘मला कळू दे’

तुझ्या शब्दांनी  मी दुखावलो गेलो

मला तुझ्यापासून तुटल्यासारखं वाटलं

त्यावेळी मी निघून जाण्याआधी, दुरावण्याआधी

मला कळू दे, तुझ्या बोलण्याचा अर्थ तोच होता का?

मी बचावात्मक पवित्रा घेण्याआधी

दुखावून, चिडून किंवा घाबरून काही बोलण्याआधी

अर्थाच्या भिंती निर्माण करण्याआधी

मला कळू दे, मी खरोखरच ऐकलं आहे का?

मला बरंच काही बोलायचं आहे

जे आपल्या नात्यासाठी फार महत्त्वाचे आहे

जर माझ्या शब्दांमधून त्या भावना व्यक्त होत नसतील

तर प्लिज, मला मोकळं व्हायला मदत करशील का?

जर मी तुला कमी लेखतोय असं वाटलं

मला तुझी काळजी नाही असं वाटलं

मी तुला महत्व देत नाही असं वाटलं

तर मला व्यक्त करायच्या असलेल्या भावना

तुझ्या अर्थापालिकडे जाऊन, त्या ऐकण्याचा प्रयत्न करशील का?

 

विनोद अनंत मेस्त्री

लेखक, प्रशिक्षक, वक्ता

(आयलीड ट्रेनिंग्स, श्री कॉमर्स अकॅडमी, लाईफ रिचार्ज)

पाऊस निघुनी गेला

मंडळी,

मागे अचानक पडून गेलेल्या पावसाने वातावरण बदलून टाकलं. मी कामोठ्याला ट्रेन मधून उतरलो. पार्किंग मध्ये लावलेली बाईक घेवून रस्त्याला लागलो तसा थंड हवेचा शरीराला स्पर्श होऊ लागला. मातीच्या त्या नेहमीच हव्या वाटणाऱ्या सुगंधाने नवी चेतना माझ्यामध्ये भरली.  भिजलेले रस्ते, झाडे, पानांवर सर्व शक्ती एकवटून जिद्दीने टिकलेले पावसाचे थेंब, पागोळ्यांचे टीप टीप करत ओघळणारे पावसाचे उर्वरित थेंब,  ओथंबून रिते झालेले ढग, आजूबाजूची एकेक वस्तू अचानक डोळे वेडावल्यासारखे टिपायला लागले.    आणि त्या संमिश्र भावना निर्माण करणाऱ्या वातावरणात एक गझलरुपी कविता सुचली.

हि कविता वाचून, तुम्ही जीवापाड प्रेम करत असलेल्या परंतू आज तुमच्यापासून दुरावलेल्या व्यक्तीची आठवण तुम्हाला नक्की येईल.

 

पाऊस निघुनी गेला

ओल्या आठवाना आणखी भिजऊनी गेला

पाऊस निघुनी गेला

दवाच्या थेंबासम मी काळाच्या पाकळीवर टिकलेला

पडलो कधी, ओघळणार कधी, संपलेला…थकलेला

धरतीचा मोह संपला कधीचा, अभाळाने टाकलेला

पाऊस निघुनी गेला…

 चेहरा तुझा मेघांमधे, अस्पष्टसा पहातोय मी

भरला पाऊस तेव्हापासून मेघातच राहतोय मी

खाली देह खालीच सदा, मी मेघांशी झटलेला

पाऊस निघुनी गेला…

पागोळ्यांचे पाणी झेलतो, भरतो ओंजळीचा डोह मी

आठवांनी भरतो डोह, टाळतो डुंबण्याचा मोह मी

पाऊस पडतो सर्वांसाठी, माझ्यासाठी ‘तो’ रडलेला

पाऊस निघुनी गेला…

जगतो का? का न मरतो हा प्रश्नच मूळी न पडतो  आता

पाऊस गेला की राहिला, हृदयात साठला जाता जाता

 कापवेना दोर कालची, कापवेना दोर कालची

आजच्या उंबऱ्यावर अडलेला

पाऊस निघुनी गेला,

ओल्या आठवांना, आणखी भिजवूनी गेला

पाऊस निघुनी गेला

 

विनोद अनंत मेस्त्री

लेखक, प्रशिक्षक, वक्ता

(आयलीड ट्रेनिंग्स, श्री कॉमर्स अकॅडमी, लाईफ रिचार्ज)

कोण्या एका अनोळखी बेटावर जेव्हा फसलो मी

आपल्या जीवनात एक वेळ येते जेव्हा आपण परमोच्च सुख उपभोगत असतो, ‘जे चाललंय ते असंच चालू दे. हे बदलायला नको.’ असं आपल्याला वाटायला लागतं आणि अचानक काहीतरी घडतं आणि क्षणार्धात सगळं बदलून जातं. अत्यंत प्रयासाने घडवलेलं स्वप्नांचं जग आपल्या नजरेसमोर कोलमडून जातं. अशा परिस्थितीत काही लोक उध्वस्त होतात, तर काही लोक आपलं नवं जग घडवतात.

 

कोलमडलेल्या स्वप्नांना उभारी देणारी ही प्रेरणादाई कविता.

 

कोण्या एका अनोळखी, बेटावर जेव्हा फसलो मी

सुटल्या किनाऱ्याचा विचार येता, मनोमन हसलो मी

आठवणीही तयार नव्हत्या, जुन्या ठिकाणी परत फिरण्या

इतके विटले होते मन, स्थिरतेच्या रटाळ जिण्या

सगळं मिळाले याचं समाधान, भयंकर असतं कळलं मला

आभार मानले देवाचे, त्याने नवा किनारा दिला

“पुन्हा नव्याने सुरुवात, वा!” रोम रोम थरारले

नवनिर्मितीच्या विचारापुढे, स्थिरतेचे विचार हरले

कमावलेले सगळे सुटले, जरी जुन्या किनाऱ्यावर

एकच गोष्ट सोबत होती, हिम्मत मोठी आभाळभर

त्याच हिमतीच्या बळावर पुन्हा, नवं जग थाटायचं

जितक्या वेळा पाडेल नियती, दुप्पट आवेशाने उठायचं

लढण्याचा इतिहास माझा, हरणे माझ्या रक्तात नाही

जोवर मैदानात उभा मी, जिंकणे नियतीला शक्य नाही

तयार आहे नवी स्वप्ने, नव्या उमेदीने पूर्ण कराया

संकटांनो असेल हिंमत, तर या! तुमचे स्वागत तुम्ही या!!

 

आपला,

विनोद अनंत मेस्त्री (लेखक, प्रशिक्षक, वक्ता)

www.vinodmestry.com

इतिहासातून इतिहास घडवा…

उद्योजक मित्रांनो,

आपण खरोखरच अतिशय भाग्यशाली आहोत की आपण या पवित्र मातीत जन्म घेतला. आपल्या या मातीला अतिशय वैभवशाली आणि दैदीप्यमान इतिहास लाभलेला आहे. या ओठांनी चुंबूंन घ्यावी हजारदा ही माती, अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी… हे म्हणणं खरोखरच वावगं ठरू नये, इतका जबरदस्त वारसा या मातीचा आहे.

हीच ती माती जिथे एका महत्त्वकांक्षी सरदारच्या मुलाने अत्यंत कोवळया वयात आपल्या वडिलांचं स्वप्न आपलं स्वप्न बनवलं आणि 4 लाख कोटी इतकं वार्षिक उत्पन्न असलेलं, 260000 हजारांची फ़ौज, 50000 उच्च प्रतीचे घोड़े, आरमार उभरुन त्यात 640 लढावू नौका आणि 30 मोठी गलबते आणि 100 मैल समुद्रकिनाऱ्यावर आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं. पुणे आणि सुपे या छोट्याश्या जहागिरीचं रूपांतर, दक्षिणेपर्यंत पसरलेल्या साम्राज्यात केले. 12 देशांशी व्यापार सुरु केला…आणि हे सर्व अवघ्या 30 ते 35 वर्षांत!

मित्रांनो,  आपल्याला उद्योजकतेचे धड़े घेण्यासाठी कुठे बाहेर जाण्याची गरज नाही. ते महाराजांच्या इतिहासात भरभरुन आहेत.

महाराजांकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे आणि ते मी माझ्या ‘मला शिवाजी व्हायचंय!’ या प्रसिद्ध पुस्तकात मांडलेलं आहे. इथे या लेखामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मी नमूद करीत आहे आणि मला खात्री आहे की यांचा अवलंब उद्योगत झाला तर प्रगती निश्चित!

 

चारित्र्य:
आपल्या प्रत्येकाला माहित आहे कि महाराजांच्या काळात प्रत्येक मावळा स्वराज्यासाठी जीव द्यायला तयार होता. असं का होतं? माणूस एखाद्या गोष्टीसाठी जीव द्यायला केव्हा तयार होतो. ध्येय असेल तर? हो नक्कीच. ध्येय तर असावंच लागतं परंतु जर त्या ध्येयाला चारित्र्यवान नेत्याची जोड मिळाली तर आणि तरच एखाद्या गोष्टीसाठी जीवापाड झटण्याची ताकद निर्माण होते… आणि स्वराज्याला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा चारित्र्यवान नेता मिळाला होता आणि महाराजांचे चारित्र्य स्वराज्याचं चारित्र्य बनलं होतं. याच चारित्र्याच्या बळावर शून्यातून निर्माण झालेलं मराठा साम्राज्य १७३ वर्षे नुसतं टिकलंच नाही तर सुमारे ७०% भारत मराठ्यांच्या अधिपत्याखाली आला. चारीत्र्यामध्ये हि प्रचंड ताकद असते.

एखाद्या संस्थेचं चारित्र्य हे तिच्या संस्थापकाच्या चारित्र्याची सावली असते. एखादा उद्योग किती विस्तारावा आणि किती काळ टिकावा हे सर्वस्वी त्या संस्थेच्या नितिमत्तेवर अवलंबून असते. संस्थेचं चांगलं चारित्र्य हे त्या संस्थेचं भवितव्य ठरवत असतं.

उदाहरणार्थ, संस्थेचा हेतू फक्त नफा कमवणं असेल. तर फक्त नफा कमवण्यासाठी ती कोणत्याही टोकाला जाऊ शकते. ग्राहकाच्या गरजा न ओळखता आपल्याकडे जे उत्पादित होईल ते ग्राहकाच्या माथी मारण्याचा प्रयत्न करते. पण एक गोष्ट लक्षात ठेवयला हवी की ग्राहकांची फसवणूक तुम्ही वारंवार करू शकत नाही. एकदा आपली फसवणूक होत आहे हे ग्राहकांच्या लक्षात आल की तो तुमच्याकडे पाठ फिरवेल आणि याच कारणाने अशी संस्था जास्त काळ टिकाव धरु शकत नाही. जी संस्था ग्रहकाभिमुख असते, ग्राहकांचं समाधान आणि सेवेवर सतत भर देते, आपल्या संस्थेत काम करणाऱ्या व्यक्तींच्या विकासाचा सातत्याने विचार करते, कोणाचीही फसवणूक किंवा लुबड़वणुक करत नाही. ती संस्था बाजारात दीर्घ काळ तग धरु शकते.

 

लक्षात ठेवा, ‘नीती चांगली असेल तर गती प्राप्त होईल, नाहीतर अधोगती निश्चित!

वचनबद्धता
महाराजांनी स्वराज्यातील जनतेला, त्यांच्या सैन्याला आणि आपल्या मित्र राज्यांना दिलेली आश्वासने नेहमीच पार पाडली. त्यांनी बोलण्यापेक्षा कर्तृत्त्वावर भर दिला आणि त्यांनी दाखवलेल्या परिणामांमुळे लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास बळावत गेला.

लोकांचा विश्वास तुम्ही फक्त बोलून जिंकू शकत नाही तर तुमच्या बोलण्याला कर्तुत्वाची जोड़ हवी. तुम्ही तुमच्या ग्राहकांना आश्वासने देवून कदाचित तुमची सेवा किंवा उत्पादन विकालही परंतु ग्राहकांचा विश्वास हे दिलेली अश्वासने पूर्ण करुनच जिंकता येवू शकतो. हीच गोष्ट तुमच्या संस्थेत काम करणाऱ्या लोकांची! त्याना दिलेली आश्वासने जर पूर्ण केलीत तरच तुम्ही त्यांचा विश्वास संपादन करू शकता आणि ते दीर्घ काळ तुम्हाला साथ देवु शकतात.

‘बोले तैसा चाले’ या वृत्तीचा व्यवसायात अवलंब करणं अत्यंत गरजेचं आहे. ग्राहकांचा आणि तुमच्या कर्मचाऱ्यांचा विश्वास हा तुमच्या यशस्वी उद्योगाचा पाया आहे.

 

विस्तार:
महाराजांनी त्यांच्या अल्प कारकिर्दीत साधलेली अद्वितीय प्रगती मी सुरुवातीला नमूद केलेलीच आहे. महाराजांना दीर्घकाळ टिकणारं साम्राज्य उभं करायचं होतं आणि त्यासाठी वर्षांमागून वर्षे नेत्रदीपक प्रगती ते साधत गेले. महाराजांची हीच प्रगती पाहून आदिलशाहीचे ७०० पठाण, मुघलांची हजारोची घोडदळ, पूर्वप्रस्थापित शाह्यांच्या नोकऱ्या सोडून स्वराज्यात काम करण्यासाठी आले.  इतकेच नव्हे तर काही इंग्रज, पोर्तुगीज देखील स्वराज्यात नोकरी करत होते.

तुमची प्रगती लोकांना दिसली की लोक तुमच्यासोबत तसेच तुमच्याकडे काम करण्यासाठी, तुमच्याकडून वस्तू किंवा सेवा विकत घेण्यासाठी उत्सुक होतात.

‘विस्तारा नाहीतर मरा’ ही सद्य बाजारपेठेची परिस्थिती आहे. त्यामुळे संस्थेचा मानसिक आणि भौतिक विकास हा अत्यंत गरजेचा असतो. हा विकास खालील तीन पद्धतीने साधता येवू शकतो.

 

बदलांना आलिंगन:
आपल्या भोवतालचं जग झपट्यान बदलत आहे. प्रत्येक मिनिटाला इथे नवा शोध लागत आहे आणि आज घेतलेली वस्तु पुढच्या दहा दिवसांत कालबाह्य (out dated) होत आहे. जर या बदलत्या जगात टिकायचे असेल, प्रगती साधायची असेल तर तुम्हाला पुढे येणाऱ्या बदलांचा अभ्यास करुन त्यांना सामोरे जाण्याची तयारी दाखवायला हवी. लोकांची मानसिकता, तंत्रज्ञान, सरकारच्या निती, जागतिक बाजारपेठ यामध्ये होणाऱ्या बदलांवर आपले बारीक़ लक्ष असेल आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी लागणारी कौशल्ये आत्मसात करू शकलो आणि साधनसंपत्ती आपण उभी करू शकलो तर नक्कीच हे बदल प्रगतीसाठी पोषक ठरू शकतात.

 

ऑरगॅनिक ग्रोथ:
आपला उद्योग विस्तार करण्यासाठी एखाद्या नव्या ठिकाणी जाऊन संशोधन करुन, लागणारी आर्थिक गरज उभी करुन, मनुष्यबळ उभं करुन, संपूर्ण ढाचा उभा करणं हा विस्तार म्हणजे ऑरगॅनिक ग्रोथ.

परंतू ऑरगॅनिक ग्रोथ तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमच्याकडे आर्थिक पाठबळ मोठ्या प्रमाणावर असेल. जर आपली आर्थिक बाजू सक्षम नसेल तर त्याला दूसरा पर्याय म्हणजे इनऑरगॅनिक ग्रोथ.

 

इनऑरगॅनिक ग्रोथ:
एखाद्या नव्या ठिकाणी जावून तिथे पूर्वप्रस्थापित संस्थेशी संघटन करुन आपला उद्योग चालू करणं याला इनऑरगॅनिक ग्रोथ म्हणतात. या प्रकारामधे एकूण आर्थिक गरज ही फारच कमी असते. सुरुवतीच्या काळात उद्योजक या प्रकारचा अवलंब करु शकतात.

मित्रांनो, वाढण ही काळाची गरज आहे आणि उद्योगजगतात फार काळ टिकायचे असेल तर वाढावेच लागेल.

आरमारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला जंजिरा किल्ला प्रयत्नांची पराकाष्टा करूनही जिंकता येत नाही हे लक्षात आल्यावर  त्यावर  विसंबून न राहता;  सिंधुदुर्ग, खांदेरी,  उंदेरी यांसारखे नवे जलदुर्ग बांधणं हे उदाहरण ऑरगॅनिक ग्रोथचे आहे.

दक्षिण स्वारीमध्ये जिंजी किल्ला प्राप्त करून त्याची डागडुजी करून त्याचं रुपांतर अभेद्य किल्ल्यामध्ये करणं हे उदाहरण आहे इनऑरगॅनिक ग्रोथचे आहे.

 

कंधो से मिलते है कंधे, कदमो से कदम मिलते है:
मित्रांनो आजच्या या स्पर्धात्मक जगात टिकाव लागणं हे बऱ्याच उद्योग समुहांना कठीण जात आहे. याचं कारण म्हणजे स्पर्धक हा आपला शत्रू असण्याची भावना.

जर स्पर्धकालाच आपला सखा बनवता आल तर प्रगती अत्यंत वेगाने साधता येवू शकते. आजचा काळ एकत्रित पुढे जाण्याचा आहे. एकमेकांच्या मानेवर पाय देवून आपण यशाची ऊंची गाठू शकत नाही.  त्यामुळे संघटीत होऊन, एकमेकांना सहकार्य करून, एकत्रित आपण विस्तारू शकतो.

एक साधे उदाहरण घ्या. तुम्ही एखाद्या मारवाड्याच्या हार्डवेयरच्या दुकानात गेलात आणि एखादी वस्तू मागितली आणि समझा ती त्याच्या दुकानात उपलब्ध नसेल तर तो तुम्हाला त्याच्याकडे ती वस्तू नाही असे सांगणार नाही. ‘बाजूमे गोडाऊन है, वहां से मंगवाता हू” असं म्हणून मुलाला आजूबाजूच्या दुसऱ्या हार्डवेयरच्या दुकानात पाठवेल (तेदेखील मारवाड्याचं) आणि तिथून ती वस्तू आणून तो तुम्हाला विकेल. तो दुसरा हार्डवेयरवाला मारवाडी हा विचार करत नाही कि तो माझा स्पर्धक आहे, त्याला मी वस्तू का देवू? कारण साहजिकच आधीच्या दुकानदाराचा ग्राहक तिथे वस्तू मिळत नाही म्हटल्यावर याच्याच दुकानात जाणार, नाही का? परंतू इथे तो स्पर्धेची भावना मनात ठेवत नाही. याच सहकार्यामुळे हे मारवाडी उत्तम उद्योग करू शकतात. दुर्दैवाने सहकार्याची ही भावना आपल्या मराठी उद्योजकांमध्ये कमी दिसते.

उद्योगात मोठं नाव कमवण्यासाठी आणि हवी ती प्रगती साधण्यासाठी एकमेकांना सहकार्य करा. एकत्रित येवून मोठ-मोठाले प्रकल्प पार पाडा, एकत्रित जगा आणि एकत्रित प्रगती साधा.

महाराजांनी वेळोवेळी आदिलशाही, मुघलशाही, इंग्रज, पोर्तुगीजांशी तह केले. कुतुबशाहीशी कायम मैत्रीचे संबंध केले. शत्रूंशी ते शत्रूप्रमाणे वागले, परंतू मित्रांना दगा देण्याचं इतिहासात एकही उदाहरण नाही. उत्तरेकडून स्वराज्यात रुजू होण्याची इच्छा ठेवून आलेल्या छत्रसाल बुंदेला या राजपूत राजाला उत्तरेतच मुघालांविरुद्ध आपलं राज्य स्थापित करण्यासाठी प्रेरित करून परत पाठवलं आणि त्यासाठी जी मदत लागेल ती करण्याची तयारी दर्शवली. यातून शिवाजी महाराजांची सहकार्य, एकत्रित काम करणं आणि एकत्रित संवर्धन करण्याची वृत्ती स्पष्ट होते.

महाराजांविषयी सांगण्यासारखं, लिहिण्यासारखं आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखं पुष्कळ आहे. हा कधीही न संपणारा विषय आहे. तरीही त्यांच्या विषयी काही महत्त्वाची शिकवण मी या लेखात नमूद केलेली आहे. शिवाजी महाराजांविषयी अभिमान हा आपल्या रक्तातच आहे परंतू तो तेव्हाच सार्थकी लागेल जेव्हा आपण त्यांच्या इतिहासातून शिकून, त्याचा आपल्या वर्तमानात वापर करून, आपल उज्ज्वल भविष्य घडवू. आपलं उद्योगरुपी स्वराज्य स्थापन करू.

 

“टाकून काळाची कात

चढवूया आज साज नवा

का वाट उद्या परवाची

आयुष्य बदलणारा निर्णय आज हवा.”

 

विनोद अनंत मेस्त्री

लेखक, प्रशिक्षक, प्रेरणादायी वक्ता

स्वप्न ठरवताना आवश्यक ६ गोष्टी (तुमच्या जगण्याचा हेतू तुम्ही शोधलाय का?)

नमस्कार,

मंडळी, आपण खरच खूप भाग्यवान आहोत कि आपण अशा मातीत जन्म घेतलाय ज्या मातीला इतिहासाचा वैभवशाली वारसा लाभलेला आहे. हीच ती माती ज्यामध्ये एका महत्त्वकांक्षी सरदाराच्या मुलाने आपल्या वडिलांचं स्वप्न उराशी बाळगलं आणि त्याचं रुपांतर एका साम्राज्यात केलं. एक असं साम्राज्य ज्याचं वार्षिक उत्पन्न ४ लाख कोटी इतकं होतं. २६०००० ची फौज, ३६० किल्ले, ५०००० अरबी घोडे होते. आरमार बांधून १०० मैल समुद्रकिनाऱ्यावर साम्राज्य, त्यात ६४० लढाऊ नौका, ३० मोठी गलबते आणि १२ देशांशी यशस्वी व्यापार ज्या राजानं केला ते आपले छत्रपती शिवाजी महाराज…

 

आज मी व्हिजन बद्दल संवाद साधणार आहे.

आपण जगण्यासाठी जे काही करत आहात तेच तुमचं व्हिजन, तुमच्या जगण्याचा हेतू आहे का? हे आपण कसं ओळखणार? ते महाराजांच्या व्हिजनशी जोडून मी तुमच्यासमोर मांडतो आहे. आपण जे करतोय तेच योग्य व्हिजन आहे का हे ओळखण्यासाठी त्यामध्ये पुढच्या ६ गोष्टींचा समावेश असणं अत्यंत गरजेचं आहे.

 

१. बुद्धिमत्ता:

आपण जे काही करतोय त्यामध्ये आपली बुद्धिमता पणाला लागत आहे का? कि आपण तेच ठरलेलं काम रोज करत आहोत. महाराजांच्या बुद्धिमत्तेचं एकंच जबरदस्त उदाहरण मी तुम्हाला देईन. अफझलखानाने पहिला वार केला म्हणून महाराजांनी त्याला मारलं. आणि नसता केला तर? नसतं मारलं? अफझलखानाला मरायचंच होतं. कारण अफझल खान जगप्रसिद्ध योद्धा होता, त्याने काबुल पर्यंत आपली तलवार गाजवली होती आणि सगळीकडे त्याची दहशत होती. त्यावेळी महाराजांना लोकल एरिया बाहेर कोणी ओळखत नव्हतं आणि जो जगप्रसिद्ध आहे त्याला आपण  मारलं तर आपण पण वर्ल्ड फेमस होणार ना बॉस! शिवाय शत्रूंमध्ये दहशत वाढेल ते वेगळ….बुद्धिमत्ता. आपल्या उद्योगात्त आपली बुद्धिमता अशीच पणाला लागत आहे का?

 

२. वेड:

आपण जे करतोय ते आपलं वेड आहे का? वेंड किंवा passion म्हणजे आपण जे काम करतोय त्या साठी आपण वेळेचं बंधन ठेवत नाही. दिवसरात्र एक करून आपण ते काम करायला तयार असतो. विचारपूर्वक धोका पत्करायला आपण तयार असतो आणि नेहमीच पुढाकार घेतो. महाराजांनी कैक लढाया केल्या त्यातल्या १२५ लढाया शत्रूच्या गराड्यात जाऊन लढल्या आणि महत्त्वाच्या कित्येक लढायात ते स्वतः होते. अफझलखानाशी लढायला स्वतः गेले. शाहिस्तेखानावर छापा टाकायला स्वतः गेले, आग्र्यात जाणं म्हणजे मृत्यूच्या दाढेत जाणं हे माहित असताना सुद्धा आग्र्याला स्वतः गेले. “आज मला जरा बरं वाटत नाही, तानाजी तू जा, बाजी तू जा असं केलं नाही.” आपलं अखंड आयुष्य आपल्या स्वप्नासाठी वाहिल. सुट्टी घेतली नाही किंवा फिरायला गेले नाहीत. हे आहे passion. हे आपल्या उद्योगात आहे का?

 

३. गरज:

तिसरी गोष्ट महणजे गरज. तुम्ही जे करताय ती इतरांची गरज आहे का? कि तुम्ही जे करताय ते इतरांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करता आहात? महाराजांचं स्वप्न हि जनतेची गरज होती आणि त्याचं मुळे जनता यासाठी महाराजांच्या बाजूने उभी राहिली. महाराजांच्या निधनानंतर लाखोंची फौज घेवून स्वराज्य संपवण्यासाठी आलेल्या औरंगजेबाशी, कोणतेही स्थिर नेतृत्व नसताना तब्बल २७ वर्षे जनता लढत होती. शेवटी औरंगझेबाला हत्ताश होऊन याच मातीत मरावं लागलं. आज त्याचं औरंगाबादला छोटंसं थडग आहे जे पाहायला कुणी जात नाही आणि महाराजा करोडो लोकांच्या मनात प्रेरणा बनून धगधगत आहेत. कारण त्यांनी तेच केलं जे लोकांची गरज होती. आपण जे करताय ती लोकांची गरज आहे का?

 

४. सद्सद्विवेक:

सद्सद्विवेक म्हणजे काय? तर काय चांगलं आणि काय वाईट हे आपल्याला माहित असणं आणि जे चांगलं आहे ते कोणत्याही अवस्थेत करणं आणि जे वाईट आहे ते कोणत्याही परिस्थितीत न करणं. महाराजांनी जे केलं त्यामध्ये आपल्याच काय शत्रूच्या जनतेलाही हानी होऊ दिली नाही. कोणती मशीद पडल्याचं,शत्रूराज्यात जाळपोळ केल्याच उदाहरण नाही. शत्रूशी शत्रू प्रमाणे वागलो परंतु मित्रांना दगा दिल्याचं दाखवून द्या हे ते छातीठोकपणे सांगू शकत होते. आपण जे करतोय त्यामध्ये आपला सद्सद्विवेक वापरला जात आहे का?

 

५. आर्थिक इंजिन:

पाचवं आणि महत्वाचं…पण लक्षात ठेवा आपण त्याला पाचवं स्थान दिलय. तुमच्या स्वप्नात तुमचं आर्थिक इंजिन चालवण्याची क्षमता आहे का? कारण सर्व सोंग आणता येतात. माझ्याकडे भरपूर पैसा आहे अस सोंग आणता येत नाही. आणि तुमच्या स्वप्नाला मिळकतीची जोड असेल तर ते टिकेल. नाहीतर कुठेतरी जावून रस निघून जाण्याची शक्यता आहे आणि अर्थातच स्वराज्याचा आजच्या चालना नुसार ४ लाख कोटींचा annual turnover हे सांगतो कि स्वराज्य स्वप्नात आर्थिक इंजिन चालवण्याची क्षमता होती.

 

६. आपल्यानंतरही टाकणारं स्वप्न:

सगळ्यात शेवटच म्हणजे तुमचं स्वप्न तुमच्या नंतरही टिकणार हवं. आपला एक गैरसमज आहे कि महाराजांचं स्वप्न त्यांच्या नंतर १५-२० वर्षांत संपून गेलं पण नाही १८१८ पर्यंत टिकलं वाढलं ते महाराजांचं स्वप्न होतं आणि १८१८ ला जवळपास ७०% भारत मराठा साम्राज्याच्या अधिपत्याखाली आला होता. तब्बल १७३ वर्षे जगलं ते स्वप्न. व्हिजन तेच जे तुमच्या नंतरदेखील टिकेल.

तर मित्रांनो, तुमच्या या उद्योगात तुमची बुद्धिमत्ता पणाला लागत असेल, तुम्ही जे करता त्याचं तुम्हाला प्रचंड वेड असेल, ती लोकांची गरज असेल, ते सद्सदविवेकाला धरून असेल, त्यात तुमचं आर्थिक इंजिन चालवण्याची ताकद असेल आणि ते तुमच्या नंतर टिकणार असेल तरच ते तुमचं व्हिजन आणि जगण्याचा हेतू…हे सगळं सविस्तर ऐकायचं असेल तर मी माझी यूट्यूब व्हिडीओची लिंक दिली आहे.

 

झोप येत नाही आताशा स्वप्नच पडले असे

डोळे मिटावे वा उघडावे तितकेच स्पष्ट तर दिसे

 

धन्यवाद!

विनोद अनंत मेस्त्री

लेखक, प्रशिक्षक आणि वक्ता

खरा ‘पुरुषार्थ’

काल पनवेलवरून घरी जाताना गाडीचा टायर पम्चर झाला. हायवे शेजारी पेट्रोलपंपाला लागून असलेल्या एका पम्चर काढणाऱ्याजवळ गाडी घेवून आलो. तो वयानं तिशीतला असावा. त्याचं काम चालू होतं आणि मी देखरेख करण्यासाठी बाजूला उभा होतो. तो होता पक्का बोलबच्चन. तोंडाची सतत बड़बड़ चालू होती. माझ्याकड़े पर्याय नसल्यामुळे मीही गप्पा चालू केल्या. त्याच्याविषयी विचारपुस चालू केली आणि कळलं त्याचं लग्न झालंय. तो सांगत होता. “सर मेरी बीवी ग्रॅज्युएट है. वो भी सायन्समें. लेकिन शादी तय होते वक्त मैंने साफ़ कह दिया. शादी के बाद पढ़ाई छोड़नी पड़ेगी. और जॉब नही कर सकती. साब ये औरते अगर जॉब करे ना तो इनके तेवर बदल जाते है. ये आपकी नहीं सुनती. इन्हें अपने औकाद में रखना जरुरी है. औरत की तक़दीर में ही लिखा होता है, की वो शादी करे. बच्चे संभाले. पतीकी, सांस-ससुर की सेवा करे. इनको जितना दबाके रखो उतना अच्छा है।”

माझ्यासाठी हा संभाषणाचा शेवट होता. माझ्या समोर असलेला तो व्यक्ति एक आडाणी पम्चर काढणाराच  नव्हता तर स्त्रियांवर वर्चस्व गजवणाऱ्या ‘पुरुष प्रधान’ संकृतीचा एक खंदा कार्यकर्ता होता. आणि हे कार्यकर्ते केवळ या आडाणी लोकांमध्येच आहेत का? तर नाही या सुशिक्षित समाजात पण ते अभिमानानं वावरत आहेत. अशा लोकांची खरतर मला चीड़ येते.

एक मुलगी जी वेगळ्या वातावरणात वाढते. आयुष्याची कित्येक वर्षे ती आई-बाबांच्या लाडात जगते. आईच्या काळजाचा तुकड़ा आणि वडिलांचा श्वास. हे सगळ जग मागे सोडून ती एका अनोळखी घरी येते. तिकड़चं सगळं वातावरण तीला परकं. फ़क्त नवराच नाही तर त्या घरातील प्रत्येक व्यक्तिचं मन जिंकण्यासाठी जीवाचं रान करते ती. एक चांगली पत्नी, चांगली सुन, चांगली वहिनी, चांगली भावजय, कालांतराने चांगली आई…किती किती भूमिका यशस्वी रित्या पार पाडायच्या असतात. दिवसरात्र तारेवरची कसरत. पतिचं जग ती आपलं जग बनावण्याचा अटोकाट प्रयत्न करते.

जर जॉब करत असेल तर घर आणि जॉब दोन्ही जबाबदाऱ्या आणि जरी ती गृहिणी असेल तर ती जबाबदारीसुद्धा छोटी नव्हे.

हे सगळ ती करते…थकून जाते. पण तसं दाखवत नाही. कारण संध्याकाळी सो कॉल्ड थकून भागून आलेल्या नवऱ्याला तिच्या चेहऱ्यावर हसु हवं असतं. आश्चर्य म्हणजे  एवढी दगदग करून पण तीला ते शक्य होतं.

आणि या सगळ्या गोष्टींच्या मोबादल्यात तीला काय हवं असत. तर आपण करत असलेल्या जीवतोड़ मेहनतीचं कधीतरी कौतुक व्हावं. प्रेमाचे (वरवर दिखाव्याचे नव्हेत) चार शब्द ऐकायला मिळावेत. ती करत असलेलं काम देखील या घराच्या स्थिरतेसाठी तितकंच महत्त्वाचं आहे याची जाणीव कळत नकळत तीला करून दिली जावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिचा आत्मसन्मान शाबूत रहावा.

परंतू दुर्दैवानं बऱ्याच ठिकाणी हे चित्र दिसत नाही. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छाचे मेसेज पाठवणारे, स्त्री हक्कांविषयी जंगी चर्चा करणारे, घरी आल्यावर “जास्त शाहणपणा पाजळू नकोस. आपल्या मर्यादेत रहा.”, असं बजावणारे सुशिक्षित पुरुष, स्वतःच्या बहिनीचे सासरी होणारे हाल पाहून हळहळणारे आणि घरी आपल्या बायकोशी तसेच वागणारे ‘पुरुष’, हे सगळे एक गोष्ट कधी समजतील की स्त्रियांना जर त्यांचं अस्तित्व जपण्यात मदत केलीत तर त्या तुमचं अस्तित्व घडवायला आपलं जीव-प्राण एक करतील.

“स्त्रीला आपल्या दबावाखाली ठेवणं, तिच्यावर अधिकार गाजवणं म्हणजे ‘पुरुषार्थ’ नव्हे.

तीला समजून घेणं, तीला विचारात घेणं, तीला तिच्या अस्थित्वाची जाणीव करून देणं…ते जपणं, तिलाही आयुष्यात काहीतरी गाठण्यासाठी मदत करणं, तिचा आणि तिच्या भावनांचा आदर करणं, तिचंही मत विचारात घेणं म्हणजे खरा पुरुषार्थ!”

काढ़ा आठवड्यातून एखादा वेळ ख़ास तिच्यासाठी. करा तीलापण तिच्या कामात मदत. एक दिवस तीला म्हणा “तू आज आराम कर, मी बनवतो जेवण.”

शक्य तिथे, शक्य तितक्या वेळा तीला न्या तुमच्या सोबत, अभिमानानं सांगा सगळ्यांना की “हि माझी अर्धांगिनी आहे आणि आज मी जो कोणी आहे त्यात हिचा सुद्धा महत्त्वाचा वाटा आहे.”… आणि हे सगळं केल्याने जर तुमचे काही मित्र तुम्हाला ‘बायकोच्या बैल’ म्हणत असतील तर सोपं आहे…मित्र बदला!

 

सदैव आपला,

विनोद अनंत मेस्त्री

लेखक, प्रशिक्षक, प्रेरणादायी वक्ता

9819453533

कुछ इस तरह से मैंने अपनी जिंदगीको आसान कर दिया!

 

नमस्कार मित्रांनो,

आज धावपळीच्या आणि दगदगीच्या जिवनात सतत यशाच्या किंवा गरजा भागवण्याच्या धडपडीत आनंद हरवलेला दिसतो. जो आनंद आपण बाह्य गोष्टीमध्ये शोधण्याचा प्रयत्न करत असतो तो खरंतर आपल्या आतच दडलेला असतो परंतू त्यावर आपल्याच आतील बऱ्याच शत्रुंच वर्चस्व असतं आणि हे शत्रु त्या आनंदाला डोकं वर काढू देत नाहीत.

त्यापैकी दोन शत्रु म्हणजे- १) अपराधाची भावना आणि २) तिरस्कार

या दोन भावनांवर मात केला तर ‘आनंद’ बऱ्याप्रकारे मुक्त होऊ शकतो आणि आयुष्य कैक पटीने सोप्प होऊ शकतं. ते कसं करावं हे मांडण्याचा हा प्रमाणिक प्रयत्न. माझ्या ‘मस्त जगा’ सेमीनार मधला एक छोटासा भाग जो तुमच्या आयुष्यात मोठा फरक आणू शकतो.

सर्वप्रथम आपण अपराधाच्या भावनेवर बोलू. ही भावना आपल्या मनात कधी येते तर आपण कुणाच्या तरी बाबतीत चुकीचं वागलो, बोललो किंवा चुकीची कृती केली तर ही भावना आपल्या मनात घर करायला लागते आणि आतून आपल्याला पोखरायला सुरुवात करते.

ती व्यक्ति (जिच्या बाबतीत आपल्याकडून काही चुकीचं घडलंय) समोर आली किंवा तिचा विचार जरी आला की आपण अस्वस्थ होऊन जातो आणि कशात मन लागत नाही. त्याच साठी या अपराधाच्या भावनेवार मात करणं गरजेचं आहे.

ते कसं करायचं बुवा?

मित्रांनो, हे मानलं तर सोपं आहे आणि मानलं तर कठीण! त्याला धाडस नक्कीच लागेल. धाडस करा आणि त्या व्यक्तीची मनापासून माफ़ी मागा. तसं केल्याने दोन पैकी एक गोष्ट घडेल.

एक) जर त्या व्यकिने तुम्हाला माफ़ केलं तर तुमचं हरवलेलं एक नातं तुम्हाला परत सापडेल आणि

दोन) जरी माफ़ नाही केलं तरी माफ़ी मागितली म्हणून तुमच्या मनावरचा भार हलका होईल.

हे धाडस जर करु शकलात तर माफ़ी मागण्याची ताकद तुमच्या लक्षात येईल. हो मित्रांनो, माफ़ी मागण्यामध्ये फार ताकद आहे.

एकदा टिव्हायबीकॉमच्या बॅचवर मी हा सेशन घेतला. सेशन संपल्यावर गौरी नावाची माझी विद्यार्थिनी मला भेटायला आली. रडवेल्या आवाजात ती मला म्हणाली, “दादा, हा सेशन तू खुप उशीरा घेतलास. दोन दिवसांपूर्वी हा झाला असता तर….” आणि तिच्या डोळ्यातून अश्रु ओघळले.

“काय झालं गौरी.”

“दादा परवा माझ्या वडिलांशी माझं भांडण झालं. एकदम कडाक्याचं! कारणही तसंच होतं. माझे वडील म्हणजे एकदम ‘पत्थरदिल’ आहेत. त्यांना भावना नाहीतच मुळात. लहानपणापासून आजपर्यंत कधी माझ्याशी प्रेमानं दोन गोष्टी बोलल्याचं आठवत नाही आणि हा, चुकी झाली की ओरडायचं विसरत नाहीत ते. इतका कठोर हृदयाचा माणूस मी कधीच पाहिला नाही. त्यांचं त्यांच्या आईवर फार प्रेम होतं. ती जेव्हा वरली तरीदेखील त्यांच्या डोळ्यातून अश्रुचा एक थेंब ओघळला नाही. इतका कठोर. परवा किरकोळ कारणावरून माझं त्यांच्याशी भांडण झालं आणि मी त्यांना खुप उलट सुलट बोलले.”

मी शांतपणे सर्व ऐकत होतो.

“मग आता तुला काय वाटतंय?”

“दादा, खुप चुकल्यासारखं वाटतंय रे! मी असं बोलायला नको होतं.”

“मग आता काय करायला हवं”

“त्यांची माफ़ी मागायला हवी.”

“मग गौरी ती आजच माग. हे काम उद्यावर ढकलु नकोस. वाईटात वाईट काय होईल. ते माफ़ करणार नाहीत, बरोबर? पण गौरी तू त्यातून मोकळी होशील. आज हिम्मत करच आणि मला सांग काय झालं ते.”

गौरी निर्धारानं उठली आणि निघून गेली. माझ्या पुढच्या लेक्चरला मी मुलांचा फॉलोअप घेत होतो. गौरी सगळ्यात आधी पुढे आली.

“दादा, सगळ्यात आधी मी तुझे खुप आभार मानते. तू सल्ला दिल्याप्रमाणे मी त्या दिवशी पप्पांची माफ़ी मागायचं ठरवलं. त्या संध्याकाळी पप्पा कामावरुन आले. फ्रेश होऊन ते खुर्चीत बसले होते. मी त्यांच्या समोर गेले. गुढग्यावर बसले आणि हात जोडून त्यांची माफ़ी मागितली आणि मला रडु आवरलं नाही. दादा, तुझा विश्वास बसणार नाही. माझे पप्पा ज्यांना मी इतका कठोर हृदयाचा समजत होते, त्याचक्षणी त्यांनी मला मिठीत घेतलं आणि एखाद्या लहान मुलासारखे ओक्षीबोक्षी रडायला लागले. इथे अशा किती मूली आहेत माझ्या वयाच्या ज्यांना त्यांचे वडील मांडीवर बसवून जेवण भरवतात. माझ्या वडिलांनी मला कळायला लागल्यापासून पहिल्यांदाच मांडीवर बसवून मला जेवण भरवलं. दादा, तुझ्यामुळे मला २० वर्षांनंतर माझे बाबा सापडले.”

गौरीच्या या शब्दांनी माझ्यासकट त्या वर्गात सगळ्यांचेच डोळे पाणावले असतील तर नवल ते काय?

मित्रांनो, एक माफ़ी कित्येक वर्षांचं हरवलेलं नातं परत मिळवून देवू शकते. मग विचार कसला करता? बनवा त्या लोकांची यादि ज्यांना कळत नकळतपणे तुम्ही दुखावलं आहे. माफ़ी मागा त्यांची आणि अपराधाच्या भावनेवार मात करा.

आता आनंदाचा दुसऱ्या शत्रुवर बोलू. तो म्हणजे ‘तिरस्कार’. तिरस्कार आपल्याला सुखानं जगू देत नाही. आपल्याला तिरस्कार कधी वाटतो. दुसऱ्या कोण्या व्यक्तीने आपल्याबाबतीत काही चुकीचं केलं असेल तर. आता ही दूसरी व्यक्ती दोन प्रकारची असू शकते. एक, जी कधी काळी आपल्या फार जवळ होती. आपलं नातं फार घट्ट होतं. तिच्याकडून काही चूक झाली आणि आपण नातं तूटलं. जर ही व्यक्ती महत्त्वाची असेल तर ज्या मुद्द्यामुळे ते घडलं त्यापेक्षा त्या व्यक्तीला महत्त्व दया आणि माफ़ करा. ते नातं पुन्हा सापडेल आणि तुमच्या मनातील नाराजी संपून जाईल.

आणि हा! जर ती व्यक्ती मुळातच वाईट आहे, नकारात्मक आहे, तरीदेखील तीला माफ़ करा. असं का? तर जोवर तुम्ही तीला माफ़ करत नाही, ती व्यक्ती भाडं न देता तुमच्या डोक्यात घर करून असते. तुम्ही एखाद्या आनंदी प्रसंगी आहात, मस्त मजा करताय आणि ती व्यक्ती आली तर तुमचा मूड एका क्षणात खराब होतो आणि संपूर्ण कार्यक्रमावर त्याचा परिणाम होतो. अशा व्यक्तींना डोक्यातून काढून टाकण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांना माफ़ करा. तुमचा मनात आणि विचारात त्यांनाच जागा दया, जे तुमच्यावर प्रेम करतात.

माफ़ करा आणि तिरस्कारापासून स्वतःची सुटका करून घ्या.

मग बनवा यादि त्या लोकांची ज्यांना तुम्हाला माफ़ करायचंय आणि करुन टाका माफ़.

‘माफ़ी मागा’ आणि ‘माफ़ करा’ या दोन गोष्टी तुमच्या मनावरचा भार हलका करायला तुम्हाला निश्चितच मदत करेल आणि आनंद आपोआप मुक्त होईल.

“कुछ इस तरह से मैंने अपनी जिंदगीको आसान कर दिया

किसीसे माफ़ी मांग ली, किसी को माफ़ कर दिया।”

 

 

‘रास्ते कहा खत्म होते है जिंदगी के सफर मे’

 

एकदा गवतावर अनवाणी चालत होतो. रस्त्याने महागडे बूट घालून चालणारा माणूस बघितला. विचार आला, ‘पायात चप्पल असती तर किती मस्त झालं असतं!’

पुढे चप्पल मिळाली. रस्त्याने चालताना एक सायकल चालवणारा माणूस दिसला. विचार आला,

‘एक सायकल असती तर किती मस्त झालं असतं!’

एखाद वर्षात सायकल मिळाली. सायकल चालवताना एक मोटरर्बाईक  बाजूने गेली. विचार आला,

‘एक मोटर बाईक असती तर किती मस्त झालं असतं!’

पुढे मोटार बाईक घेतली. ती रस्त्याने चालवत असताना बाजूने एक कार गेली. विचार आला,

‘एखादी छोटी कार असती तर किती मस्त झालं असतं!’

काही वर्षांनी कार घेतली. कार चालवताना बाजूने एक महागडी आरामदाई कार गेली. विचार आला,

‘वा! हि माझी ड्रीम कार आहे. हि कार असती तर काय मस्त झालं असतं!’

काही वर्षांत त्या महागड्या कार मधून जाताना वर एक हेलिकॉप्टर जाताना दिसलं,

‘वा! या हेलिकॉप्टर मधून जाण्याची मजाच काही और आहे. असं एक हेलिकॉप्टर घेऊ शकलो असतो तर किती मस्त झालं असतं!’

आता खूप काळ लोटलाय. आयुष्याची कित्येक वर्षे जे हवं ते कमवण्यात निघून गेली. आज हेलिकॉप्टरमधून उंचावर उडत असताना, जमिनीवर गवतात चालणारा एक माणूस पाहिला. विचार आला, ‘असं गवतात अनवाणी चालायला मिळालं असतं तर किती मस्त झालं असतं!’

मित्रांनो, आपल्या इच्छा-आकांक्षांना अंत नाही. एक मिळवली कि दुसरी उत्पन्न होणार आणि ती मिळवली कि तिसरी.

“माणसाच्या जीवनातील सगळ्यात मोठी खंत ही आहे की स्वतःजवळ पैसे नसताना, त्याला आवडत नसलेल्या लोकांवर छाप पाडण्यासाठी त्याला नको असलेल्या वस्तू तो विकत घेत असतो.”

गरजा जेवढ्या वाढवणार तेवढ्या वाढतच जाणार. कुठे थांबायचं हे आपल्याला ठरवता यायला हवं.

मिर्झा गालिबची एक शायरी या निमित्ताने आठवते-

‘रस्ते कहा खत्म होते है जिंदगी कि सफर में

मंजिल तो वही है जहा ख्वाईशे थम जाये’

 

विनोद अनंत मेस्त्री – लेखक, प्रशिक्षक, वक्ता

९८१९४५३५३३/ www.vinodmestry.com

प्रेरणा रिचार्जर – मला हितशत्रू हवे आहेत!

 

सगळ्यांना स्पष्टीकरण देत बसू नका. कारण जे तुमच्यावर मनापासून प्रेम करतात त्यांना त्याची गरज नसते आणि जे तुमचा तिरस्कार करतात त्यांचा तुमच्या सांगण्यावर कधीच विश्वास नसतो.

जेव्हा आपण चांगलं काहीतरी करायला लागतो, त्यात यश प्राप्त करायला लागतो, नकळत तुमच्या हितचिंतकांबरोबर हितशत्रूदेखील निर्माण होणारच. ते अटळ आहे. या हितशत्रूंचा तुमच्या प्रत्येक वागणुकीला, प्रत्येक कृतीला विरोध असेल. ते तुमच्यातलं चांगलं पाहण्यापेक्षा तुम्ही कुठे चुकता याकडे जास्त लक्ष केंद्रित करतील. त्यांच्या आयुष्यात काही वाईट घडलं तर त्याचं खापर तुमच्या माथी फोडतील. तुम्ही जे निर्माण करत आहात ते उध्वस्त करण्याच्या योजना आखत राहतील. तुमच्या पाठी तुमचं नाव खराब कसं करता येईल यासाठी जिवापाड मेहनत करतील.

लोक तुमच्यामागे बोलण्याची काही कारणे आहेत.

१. ते तुमच्यासारखं काही करण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांना जमत नाहीये.

२. ते तुमची पातळी गाठू शकत नाहीत.

३. तुमच्याकडे जे आहे ते त्यांच्याकडे नाही.

४. त्यांचं ‘लक्ष’ स्वतःच्या ‘लक्ष्या’कडे नसून तुम्ही काय करता त्याकडे आहे. त्यांचे आयुष्य ‘लक्ष’हीन आहे त्यामुळे त्यांच्याकडे पुष्कळ वेळ आहे.

याचा अर्थ या सर्व प्रकारात तुम्हीच उजवे आहात. त्यामुळे डोकं शांत ठेवा. ‘मी करतोय ते चांगलं आहे आणि त्यात माझ्यासोबत इतर बऱ्याच लोकांचं भलं अवलंबून आहे. त्याने कुणाचेही नुकसान होणार नाहीये. तर ते मी कोणत्याही परिस्थितीमध्ये करेन.’ ही धारणा ठेवा. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. आपल्यात दडलेल्या अपरंपार क्षमतांचा वापर करा. यश प्राप्त करा.

खरं म्हणायचं तर हे हितशत्रूच तुम्हाला अप्रत्यक्षपणे प्रेरणा देत असतात. ‘तुमच्याने होणार नाही’ ही त्यांची धारणा तुम्हाला काहीतरी चांगलं करण्याची स्वतःला सिद्ध करण्याची ऊर्जा देते. त्यासाठी हितशत्रू हवे आहेत. तुमच्या यशात त्यांचा खूप मोठा वाटा असतो.

हे लोक प्रथम तुम्हाला विरोध करतील, त्यानंतर यशस्वी होताना पाहतील आणि नंतर तेच लोक तुम्हाला विचारतील ‘कसं केलं भाऊ? आम्हाला पण सांग ना!’ आणि इतरांना सांगतील, ‘मी या व्यक्तिमत्वाला ओळखतो.’

येणारी पिढी तुमचे उदाहरण नजरेसमोर ठेवून भविष्यात काहीतरी अद्वितीय घडवेल.

‘मरून पण इतरांच्या विचारांत जर जगू शकलो’ तर खऱ्या अर्थाने आयुष्य जगलो. काय म्हणता?

सदैव आपला,

विनोद अनंत मेस्त्री लेखक, प्रशिक्षक, वक्ता

(९८१९४५३५३३/ www.vinodmestry.com)

नातेसंबंध रिचार्जर

एकदा एक वृद्ध माणूस आपल्या २५ वर्षांच्या तरुण मुलाबरोबर अंगणातल्या बाकावर बसला होता. इतक्यात समोरच्या कुंपणावर एक कावळा येऊन बसला. वृद्धाने मुलाला विचारलं,

“बाळा ते काय आहे?”

मुलाच्या लक्षात आलं की वडील कावळ्याबद्दल विचारताहेत.

“कावळा आहे.” कपाळाला आट्या पाडत त्याने उत्तर दिलं.

काही सेकंदांच्या अंतराने वडिलांनी पुन्हा कापऱ्या आवाजात विचारलं, “बाळा, ते काय आहे?’

“कावळा आहे.” थोड्या चिडक्या स्वरात मुलाने उत्तर दिलं.

“बाळा, ते काय आहे?”

तिसऱ्यांदा विचारलेल्या या प्रश्नावर मुलगा भयंकर चिडला.

“तुम्हाला ना एकदा सांगून कळतच नाही. सांगितलं ना तो कावळा आहे म्हणून. कशाला छळताय उगाच.”

वडिलांचा सुरकुतलेला चेहरा एका क्षणात पडला. ते काहीच न म्हणता उठले. लटपट चालत घराच्या आत शिरले.  मजघरातल्या कपटातून एक जूनी धूळवटलेली डायरी काढली. ती चाळत एका पानावर येवून थांबले. बाहेर येवून मुलाच्या बाजूला बसले आणि त्या पानावर लिहिलेला मजकूर वाचायची त्याला विनंती केली.

वडिलांना डायरी लिहायची सवय होती आणि ती त्यांची २२ वर्षांपूर्वीची डायरी होती. त्या पानावर लिहिले होते…

“आज मी माझ्या ३ वर्षाच्या मुलासोबत अंगणात बसलो होतो. समोरच्या कुंपणावर एक कावळा आला. माझ्या मुलाने २५ वेळा विचारलं ते काय आहे आणि मी प्रत्येकवेळी त्याच उत्साहाने उत्तर दिलं की बाळा तो कावळा आहे.”

डायरी बंद झाली. रडवेल्या स्वरात वडील म्हणाले,

“आणि बाळा मी तुला फ़क्त तीन वेळा विचारलं तर तू इतका चिडलास.”

मुलाने वडिलांना घट्ट मीठी मारली. चुकी एका क्षणात लक्षात आली आणि अश्रु ओघळू लागले.

 

मित्रांनो, आपले आई वडील, वयाची साठी ओलंडली की पुन्हा बाल वयाकडे वळतात.

वडील ज्यांनी संपूर्ण कुटुंबचा भार अभिमानाने ज्या खांद्यांवर पेलावला होता ते खांदे आता कमजोर झालेले असतात. हे खांदे जरी कमजोर झाले असतील तरी त्यांचा अभिमान कमजोर होऊ देऊ नका.

ज्यांनी आपले बोट धरून एकेक पाऊल टाकायला शिकवलं , त्यांचे पाय आज उचलत नाहीत. चालताना लटपटतात.  तुम्ही त्यांचे पाय बना, आधार बना.

आपली आई, जी इतकी वर्षे दररोज १५-२० लोकांचा स्वयंपाक सहजतेनं बनवायची, तिच्याकडून आज स्वयंपाक एक तर आळणी होईल किंवा खारट होईल. तरिसुद्धा “आई तुझ्या हाताची चव इतर कुठेच नाही.” हा दिलासा तीला हवा असेल. तो तीला द्या. त्यांच्या बडबड़ीचा विट आला असं वाटत असेल तर तुम्ही लहान असताना  केलेली अमर्याद बड़बड़ त्यांनी कशी सहन केली असेल ते आठवा.

आपण एकदा विचार करु या. आपल्या जन्मानंतर ते किती वेळा आपल्याला सोडून पिक्चरला, नाटकाला किंवा पिकनिकला गेले. नाही ना! का? तेदेखील कधीतरुण होते.  त्यांना त्यांचं ‘पर्सनल लाईफ’ नव्हतं का? होतं ना! त्यांनादेखील ‘पर्सनल लाईफ’ होतं!  परंतु आपण त्या ‘लाईफ’चा एक अविभाज्य हिस्सा होतो. आणि आज आपल्या पर्सनल लाईफमध्ये त्यांना प्रवेश नाही. असं का?

इतकी वर्षे ते केवळ आपल्यासाठीच जगले. वडील त्यांना न आवडणारं काम करत राहिले. कशासाठी? तर १० तारखेला येणाऱ्या पगारावर घराच्या गरज अवलंबून आहेत. आणि आई! बिनपगारी, वर्षाचे बारा महीने, प्रत्येक दिवस, २४ तास राबत राहिली. तेदेखील पगार न घेता… फक्त आपल्यासाठी.

मित्रांनो, वेळ जाण्याआधी त्यांच्याविषयीचं तुमचं प्रेम आणि  कृतज्ञता व्यक्त करा. कारण वेळ निघून गेली तर उरेल तो फ़क्त पश्चाताप!

माझा एक मित्र परवा मला भेटला. खुप वर्षांनंतर अचानक भेट झाली. गप्पा झाल्या. त्याच्या आईचा विषय निघाल्यावर तो म्हणाला.

“विनोद, तुला माहितच आहे, माझ्या आईने माझ्यासाठी फार कष्ट घेतलेत. मी ४ वर्षांचा असताना माझे वडील वारले. तिने घरकाम केलं, काबाडकष्ट केले, राब राब राबली बिचारी पण मला कशाचीच कमी पडू दिली नाही. आणि मी थोडा बेपर्वाच राहिलोय. साधं तिच्याबद्दलचं प्रेमही व्यक्त करु शकलो नाही. मला खुप चुकल्यासारखं वाटतंय रे.” तो खुप भाऊक झाला होता.

“अरे एवढा का विचार करतोस. आजच बोलून टाक आईला.” मीआग्रहाने म्हणालो.

“ते आता शक्य नाही विन्या. गेल्या महिन्यातच माझी आई वारली.”

मित्राने दिलेल्या या धक्क्यातून मी अजूनही सावरु शकलो नाही. मित्रांनो, मनापासून सांगतो. तुमच्या आई-वडिलांसमोर, तुमच्या आवडत्या व्यक्तिंसमोर मनातल्या भावना व्यक्त करा. आजच. कारण बोलायचं राहून गेलं ही खंत खरच अतिशय भयंकर असते.

धन्यवाद!

 

 

सदैव आपला,

विनोद अनंत मेस्त्री

लेखक, प्रशिक्षक, वक्ता, स्नेहसंबंध समुपदेशक

 

मस्त जगा – इच्छामुक्त

रास्ते कहा खत्म होते है जिंदगी के सफर मे

 

एकदा गवतावर अनवाणी चालत होतो. रस्त्याने महागडे बूट घालून चालणारा माणूस बघितला. विचार आला, ‘पायात चप्पल असती तर किती मस्त झालं असतं!’

पुढे चप्पल मिळाली. रस्त्याने चालताना एक सायकल चालवणारा माणूस दिसला. विचार आला,

एक सायकल असती तर किती मस्त झालं असतं!’

एखाद वर्षात सायकल मिळाली. सायकल चालवताना एक मोटरर्बाईक  बाजूने गेली. विचार आला,

एक मोटर बाईक असती तर किती मस्त झालं असतं!’

पुढे मोटार बाईक घेतली. ती रस्त्याने चालवत असताना बाजूने एक कार गेली. विचार आला,

एखादी छोटी कार असती तर किती मस्त झालं असतं!’

काही वर्षांनी कार घेतली. कार चालवताना बाजूने एक महागडी आरामदाई कार गेली. विचार आला,

वा! हि माझी ड्रीम कार आहे. हि कार असती तर काय मस्त झालं असतं!’

काही वर्षांत त्या महागड्या कार मधून जाताना वर एक हेलिकॉप्टर जाताना दिसलं,

वा! या हेलिकॉप्टर मधून जाण्याची मजाच काही और आहे. असं एक हेलिकॉप्टर घेऊ शकलो असतो तर किती मस्त झालं असतं!’

आता खूप काळ लोटलाय. आयुष्याची कित्येक वर्षे जे हवं ते कमवण्यात निघून गेली. आज हेलिकॉप्टरमधून उंचावर उडत असताना, जमिनीवर गवतात चालणारा एक माणूस पाहिला. विचार आला,असं गवतात अनवाणी चालायला मिळालं असतं तर किती मस्त झालं असतं!’

मित्रांनो, आपल्या इच्छा-आकांक्षांना अंत नाही. एक मिळवली कि दुसरी उत्पन्न होणार आणि ती मिळवली कि तिसरी.

माणसाच्या जीवनातील सगळ्यात मोठी खंत ही आहे की स्वतःजवळ पैसे नसताना, त्याला आवडत नसलेल्या लोकांवर छाप पाडण्यासाठी त्याला नको असलेल्या वस्तू तो विकत घेत असतो.”

गरजा जेवढ्या वाढवणार तेवढ्या वाढतच जाणार. कुठे थांबायचं हे आपल्याला ठरवता यायला हवं.

मिर्झा गालिबची एक शायरी या निमित्ताने आठवते- रस्ते कहा खत्म होते है जिंदगी कि सफर में मंजिल तो वही है जहा ख्वाईशे थम जायेl’विनोद अनंत मेस्त्रीलेखक, प्रशिक्षक, वक्ता

 

विनोद अनंत मेस्त्री (लेखक, प्रशिक्षक, वक्ता)

सोशल मिडियावर टाळायच्या या १८ गोष्टी

आज सोशल मिडीयाचं प्रचंड वारं आहे. सोशल मिडीयावर नसणं म्हणजे अक्षरशः मागसल्याचे लक्षण मानले जाते. गेल्या १० वर्षांत आपल्या देशात सोशल मिडीयाचं वादळ उठलं आहे. या सोशल मिडियाचे फायदे आणि तोटे अशा दोन्ही बाजू आहेत. बरेच जण सोशल मिडीयाचा चुकीचा वापरच जास्त करताना बघत आलोय, म्हणून हा लेख लिहावासा वाटला. सोशल मिडीया काय करू नये अशा १७ गोष्टी मी इथे मांडतोय. काही राहिलं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सुचवा.

१. तुमच्या नातेसंबंधातील समस्या मांडणं:
तुमच्या नातेसंबंधांमध्ये काय समस्या आहेत हे जाणून घ्यायला कुणाला रस नसतो. कदाचित ज्यांना असेल ते त्याचा फायदा उचलण्याचा जास्त प्रयत्न करतील. त्यामुळे नवरा-बायको, प्रियकर-प्रियसी यांच्यातील समस्या त्यांनी आपापसात सोडवाव्यात. घरातल्या आणि वैयक्तिक जीवनातल्या नातेसंबंधाच्या समस्या घरातच ठेवा, त्या चव्हाट्यावर आणू नका.

२. शिवीगाळ करणे/ अपशब्दांचा वापर:
काही लोक सोशल मिडीयावर शिवीगाळ किंवा अपशब्दांचा वापर सर्रास करताना दिसतात. तुमच्या काही मित्रांना कदाचित ते रुचत असेल परंतु सगळ्यांनाच ते रुचेल असे नाही आणि एकंदरीत तुमच्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन नकारात्मक होऊ शकतो.

३. इतर धर्मांविषयी वाईट बोलणं:
इतर धर्मांविषयी वाईट बोलून आपला धर्म मोठा होत नसतो. दुसऱ्या धर्मांविषयी वाईट बोलून आपण दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करतोय, हे लक्षात ठेवा. त्यामुळे धार्मिक भावना दुखावणाऱ्या अशा गोष्टी सोशल मिडीयावर टाळायला हव्यात.

४. विनाकारण टॅग करणं:
आपण काढलेली सेल्फी कितीही भन्नाट असो, त्याचा स्टेटस कितीही भारी असो, त्यात संबंध नसलेल्या व्यक्तींना टॅग करू नका. आपण अपलोड केलेला फोटो दुसऱ्या व्यक्तीशी संबंधित नसेल तर त्याला टॅग करणं चुकीचं आहे. आपल्या सेल्फी, प्रोफाईल पिक्चर्स मध्ये विनाकारण इतरांना टॅग करू नका.

५. हिंसक फोटो किंवा व्हिडीओ अपलोड करणं:
अपघात, मारामारी, खून, रक्तपात संबंधित फोटो किंवा व्हिडीओ नकारात्मक भावना मनामध्ये निर्माण करतात. या नकळतपणे हिंसेचे संस्कार मनावर करत असतात. त्यामुळे अशा गोष्टी पोस्ट करणे किंवा शेअर करणे टाळावे.

६. बॉस किंवा ऑफिस सहकाऱ्यांविषयी वाईट बोलणं:
सोशल मिडीयावर चालू किंवा सोडलेल्या कामातील बॉस किंवा सहकारी यांच्याविषयी वाईट बोलणं तुमच्या प्रोफाईलवर नकारत्मक परिणाम साधू शकतं. त्यामुळे आपल्या भावना आवरत्या घ्या.

७. आक्षेपार्ह कमेंट्स:
एखाद्याच्या भावना दुखावणाऱ्या कमेंट्स टाळता यायला हव्यात. तुमचा विचार त्या व्यक्तीला वैयक्तिक मेसेजद्वारे पोहचवू शकता. ते जास्त योग्य आणि परिणामकारक राहील.

८. मी किती कमवतो:
तुम्ही कशातून किती पैसा कमवता हे सोशल मिडियावर मांडू नका. याने गुन्हेगारांना तुम्ही तुमच्याकडे वळवू शकता.

९. खोट्याचा आधार:
तुमची लाईफस्टाईल, आर्थिक परिस्थिती, यश याविषयी खोट्या गोष्टी पोस्ट करणं टाळा. हे खोटं जास्त काळ टिकणारं नसतं आणि एकदा खरं समोर आलं कि तुम्ही तुमचा आदर गमावून बसाल.

१०. देश किंवा सरकार विषयी नकारात्मक लिहिणं:
देश आणि चालू सरकार विषयी नकारात्मक किंवा वाईट लिहून आपण ती गोष्ट जगभर पोहचवत असतो. आपल्या देशाचं नाव नकळतपणे आपण संपूर्ण जगात खराब करतो. त्यामुळे ते टाळणं अत्यावश्यक आहे.

११. सातत्याने मेसेज पाठवणे:
एखाद्या अनोळखी व्यक्तीला परवानगी न घेता सातत्याने मेसेजेस पाठवणे हा गुन्हा आहे. ते टाळावे.

१२. अश्लील लिंक्स:
पॉर्न कंटेंट असलेल्या लिंक्स शेअर करणे किंवा एखाद्याच्या वॉलवर पोस्ट करणं हा देखील गुन्हा आहे. ते टाळावे.

१३. मी कुठे आहे?:
तुम्ही कुठे आहात? याबाबतीत पोस्ट करत राहणं छुप्या गुनेगारांना तुमच्याविषयी माहिती देत असतं त्यामुळे तसं करणं टाळा. ‘आमची संपूर्ण फॅमिली दहा दिवसांसाठी गावी किंवा टूर वर चाललेय…फिलिंग एक्साईटेड’ असं पोस्ट करणं चोरांना एक्साईट करू शकतं. म्हणजे हे चोरांना ‘आमच्या घरी येवून चोरी करा’ असं खुलं आमंत्रण देण्यासारखं आहे.

१४. फ्रेंड रिक्वेष्ट:
येणाऱ्या फ्रेंड रिक्वेष्ट आंधळेपणाने स्वीकारणे धोकादायक ठरू शकते. त्या व्यक्तीचा प्रोफाईल व्यवस्थित पडताळून, खात्री करूनच फ्रेंड रिक्वेष्ट स्वीकारा.

१५. वाद टाळा:
धर्म, देव, जात याविषयी सोशल मिडीयावर वाद घालणे टाळा. त्याने आपण एकंदरीत नकारात्मक वातावरण निर्माण करत आहोत याची जाण ठेवा.

१६. अंधाधुंदी शेअर:
आपल्याला आलेल्या पोस्ट विश्वसनीय आहे कि नाही याची खात्री करूनच ती फॉरवर्ड करा. उगाच भावनेचा भरात कोणतीही पोस्ट शेअर करू नका.

१७. दुःख व्यक्त करणे:
सोशल मिडीयावर आपलं दुःख व्यक्त करून आपण आपलं हसे उडवून घेत असतो. तुमच्या ‘फिलिंग सॅड’ला इथे कुणीच वाली नाही. त्यामुळे तुमचे हार्ट-ब्रेक वैगरेचे मेसेजेस त्यावर टाकून स्वतःचा तमाशा करून घेवू नका.

१८ . गेम रिक्वेस्ट:
आपल्यासारखे सगळेच रिकामी नसतात किंवा तुम्ही खेळत असलेला गेम सगळेच खेळत असतील असं नाही. त्यामुळे सातत्याने गेम रिक्वेस्ट पाठवून तुम्ही तुमच्या रिकामी असल्याची जाहीर जाहिरात करत असता. त्यामुळे फुकटच्या लाईफ मिळवण्यापेक्षा, गेम बंद करून खऱ्या लाईफशी जोडले जा.

धन्यवाद!
सदैव आपला,
विनोद अनंत मेस्त्री (लेखक, प्रशिक्षक, वक्ता)

बाजीराव पेशवा मालिकेतून शिकण्यासारखे १० धडे – भाग १

सोनी वर प्रेक्षापित होणारी पेशवा बाजीराव हि मालिका मी अगदी पहिल्या एपिसोडपासून न चुकता बघतो. यु ट्यूब वर रात्री ११ वाजता एपिसोड अपलोड केला जातो. मालिका रंजक बनवाण्यासाठी दिग्दर्शकाने वापरलेल्या स्वातंत्र्याला जर नजरेआड करू शकलो तर खरच हि मालिका खूप चांगली आहे. याच्या प्रत्येक भागात काहीना काही शिकवण कसबीने पेरलेली आहे. चाणक्यनिती, कौटिल्यशास्त्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीती, यातून वेचून काढलेल्या शिकवणी या मालिकेत पेरण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यातले काही महत्वाचे धडे इथे थोडक्यात मांडत आहे. मला खात्री आहे तुम्हाला ते निश्चितच आवडतील.

१. धाडस आणि भय:
धाडस आणि भय या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. धाडस शत्रूला मारण्यासाठी आवश्यक आहे आणि भय स्वतःचा जीव वाचवण्यासाठी! आणि लढाया जिवंत राहूनच जिंकता येतात. जर जिंकायचं असेल तर जगावं लागेल.

२. स्त्री- एक दासी कि सहकारणी:
यत्र नार्यस्तु पूज्यन्त, रमन्ते तत्र देवता:
अर्थात, जिथे स्त्रीची पूजा होते, देव तिथेच वास करतात. ज्या स्त्रीला आपल्या शास्त्रात एवढा सन्मान दिलाय त्या स्त्रीला आपण हिन समजणं योग्य नाही. स्त्री हि गुलाम नाही, तुमची सहकारणी आहे.

३. संस्कृतीचं रक्षण:
पुरुष आणि परंपरा जर स्त्रीचं रक्षण करू शकली नाही तर ते नष्ट होणंच योग्य आहे. संस्कृती विहीर नाही ती वाहती नदी आहे. नदीचं रक्षण तिला अडवून केलं जाऊ शकत नाही. तिला वेळेनुसार वाहू द्या. संस्कृतीचं रक्षण ती स्वतःच करेल.

४. स्वाभिमान वि. अहंकार:
स्वाभिमान हि दुधारी तलवार आहे. जो पर्यंत आत सामावलेला आहे तोपर्यंत स्वाभिमान. जर बाहेर आला तर अहंकार. लक्षात ठेव तुझ्यामध्ये स्वाभिमान भरभरून असू दे. अहंकार नाही.

५. राज्य जिंकायचंय तर मने जिंका:
देश मातीने नाही, लोकांनी बनतो. लोकांच्या हृदयाने त्यांच्या मनाने बनतो. तुम्ही राज्य जिंकण्यापेक्षा लोकांची मने जिंकण्यावर भर द्या. राज्य आपोआप तुमचं होईल.

६. आम्ही मराठी या गवतासारखे आहोत:
तुम्ही हे गवत पाहिलंत. आम्ही मराठी या गवतासारखे आहोत. कितीही मोठं वादळ येवू दे. आमच्यात सळसळ होईल पण आम्ही तुटणार नाही. कारण आमची मुळे आजून तिथेच आहेत. जी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी रुजवली आहेत. त्यांनी या मातीच्या कणाकणात स्वराज्य रुजवले होते….स्वराज्य.

७. भीती आणि समस्या:
मनात विश्वास असेल तर कोणी हारू शकत नाही आणि मनात शंका असेल तर कुणी जिंकू शकत नाही. जो पर्यंत भीती मनात आहे तो पर्यंत शत्रू/ समस्या तुम्हाला चिटकून राहतात. जर आपल्या मनातून भीती निघून गेली तर आपल्या भूमीतून शत्रू आणि जीवनातून समस्या निघून जायला वेळ लागत नाही.

८. भावशास्त्र:
भावशास्त्रात लिहिलं आहे कि आपल्या चेहऱ्यावर निरनिराळे ९ प्रकारचे भाव येत असतात. ते म्हणजे तिरस्कार, क्रोध, भय, सुख, दुःख, आश्चर्य, अपमान, विभात्स आणि शांत. हे भाव एका क्षणाच्या एक दशांश हिस्स्यामध्ये येवून जातात. ज्ञानी माणूस पुस्तके वाचतो आणि विद्वान माणूस माणसांना वाचतो.

९. कृतज्ञता:
ज्या व्यक्ती आपल्याशी चांगल्या वागतात, आपल्याला प्रेरित करतात, त्यांच्याशी आपण कृतज्ञ असतोच. जे तुमच्यावर टीका करतात, तुम्हाला कमी लेखतात, त्यांच्याशी कृतज्ञ रहा. कारण हेच लोक तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची प्रेरणा नकळतपणे देत असतात.

१०. उत्साह आणि हेतू:
आपण आपल्या दैनंदिन जीवनात जे काही करत असतो ते ‘करावं लागतं’ म्हणून करत असतो. त्या गोष्टींमध्ये आपल्याला उत्साह वाटत नाही किंवा सुरुवातीला असलेला उत्साह हळू हळू कमी होत जातो. उत्साह नसेल तर त्या गोष्टी करण्याला अर्थ उरत नाही. जबरदस्ती म्हणून एखादी गोष्ट केली कि करण्याचा आनंद तुम्हाला मिळत नाही आणि उत्कृष्ट परिणाम साधू शकत नाही. त्यामुळे एखादी गोष्ट जी करायचीच आहे ती जीवावर उदार होऊन करण्यापेक्षा तिला हेतूची जोड द्या. जेव्हा तुमच्या कृतीला हेतूची जोड मिळते तेव्हा उत्साह आपोआप येतो.

उदा. मी रोज जे काम करतोय ‘करावं लागतंय म्हणून करतोय’ हे बोलण्यापेक्षा,
‘हे काम मला करायचंय कारण या कामातून मिळणाऱ्या पैशाने माझ्या ………….(गरजा) पूर्ण होत आहेत.’
‘मला हे नातं जपायचं आहे कारण…………’
जेव्हा या हेतूची जोड कामाला मिळेल तेव्हा तुम्ही ते मनापासून कराल.

याचा भाग २ लवकरच घेवून येतो. हा भाग कसा वाटला निश्चितच प्रतिक्रिया कळवा. हि पोस्ट लाईक आणि शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी मदत करा.

 

धन्यवाद!
सदैव आपला,
विनोद अनंत मेस्त्री
लेखक, प्रशिक्षक आणि वक्ता
९८१९४५३५३३