बुद्धिबळ

नमस्कार मित्रांनो,

ऑफिसमध्ये एका विषयावर चर्चा रंगली… “कोणाला बुद्धिबळ खेळता येतो का ?” सुनिल दादा, मोहित दादा आणि मी. तिघांना बुद्धिबळ खेळता येतो पण मोहित आणि मी मोबाईल किंवा कॉम्पुटर वर खेळत असतो.

सुनिल दादाने आवाज उचलाला बस्स.. आता बुद्धिबळ खेळायचा पण बुद्धिबळ पटावर. सुनिल दादाने बुद्धिबळाचा पट काढला आणि एक वेगळाच उत्साह संचारला.

एका बाजूला सुनिल दादा दुसऱ्या बाजूला मी आणि हा गंमतीदार बुद्धिबळाचा संग्राम सुरु झाला. कधी त्याचे शिपाई कामी आले तर कधी माझे शिपाई. चहुबाजूने हल्ले करणारे वजीर तर पहिल्या पाच मिनिटांतच एक मेकांशी भांडून युद्ध करून पटाच्या बाहेर पडले. हत्ती, घोडे आणि उटांनी पटावर धुमाकूळ घातला होता त्यात ते शहिद होऊन कामी आले. खेळ विलक्षण पद्धतिने रंगला होता. कधी काय होईल काहीच सांगता येत नव्हते. हसत खेळत बुद्धिबळाच्या कुरुक्षेत्रात महाभारत घडत असल्याचा भास होत होता. कौरव कोण आणि पांडव कोण यावर मोहितचा आवाज उठला. बुद्धिबळाचा पट मोठ्या प्रमाणावर रिकामी झाला होता. फक्त राजा आणि काहीशे शिपाई लढत होते आणि आता खेळण्यात जास्त काही रस राहिला नव्हता. फक्त डाव संपवावा या हेतून पटावर चाल चालल्या होत्या. इतक्यात ग्रहण लागावा असा ऑफिस मध्ये एक क्लाइंट आला आणि या युद्धाला विराम द्यावा लागला. थोडा वेळ घेऊन तो क्लाइंट निघून गेला आणि मग एकच चर्चा सुरु झाली. युद्ध कोणी जिंकलं असतं? खेळाचा आनंद खऱ्या अर्थाने वाढला होता.

हल्ली खूप कमी व्यक्ती हा खेळ खेळताना दिसतात. मोठ्या प्रमाणात मोबाईल वर कॅन्डीक्रश किंवा टेम्पल रन खेळत असताना दिसतील.

बुद्धिबळ खेळ हा फक्त एक खेळ नसून खऱ्या आयुष्याचा सारं पटवून देतो, ते असे…

  1. सर्वांच सहकार्य आणि साथ घेऊन कसं काम केलं पाहिजे याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण बुद्धिबळाचा पट आपल्याला शिकतो.
  2. जीवनात पुढे जाताना कधी कधी दोन पावूल मागेसुद्धा यावं लागतं. मागे आलो म्हणजे हरलो असे नसून एक मोठी संधी पुढे दडली त्यासाठी योग्य ती तयारी वा त्यासाठी घेतलेला वेळ होय.
  3. सर्वात महत्वाचं म्हणजे आयुष्यात प्रत्येक माणूस महत्वाचा आहे. कोणता व्यक्ती कधी कामाला येईल काहीच सांगता येत नाही. त्यामुळे छोट्यात छोट्या व्याक्तीचासुद्धा आदर करा. बुद्धिबळाचा शिपाई छोटा असला तरी हत्ती, घोडा, उंट, वजीर वा राजा यांना मारण्याची ताकद ठेवतो.
  4. बुद्धिबळात पुढे जाण्यासाठी कधी कधी हत्ती, घोडा वा वाजीरचा त्याग करावा लागतो त्याचप्रमाणे जीवनात ज्या गोष्टीचा आपल्याला अति लळा लागलेला असतो त्या गोष्टीसुद्धा आपल्याला सोडाव्या लागतात.

सर्वाना विनंती अशी कि आपल्या प्रत्येकाने सहवासात येणाऱ्या मित्रांना वा आपल्या घरातील लहान मुलांना या खेळात सहभागी करा, आनंद लूटा आणि महत्वाचं म्हणजे या खेळातून आयुष्याच्या पटावरील गम्मत पटवून द्या.

काय मग.. करायचा का एक डाव सुरु ?

समीर दत्ताराम पडवळ
संपर्क : ८६५५८५००५६
मेल : sameer@arthvedh.in
वेबसाईट : www.arthvedh.in

कुठलंही काम सोपं करण्यासाठी वापरात येणारे सात ‘R’

जीवनरंगचे सवंगडी जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा विचारांची देवाण-घेवाण झालीच पाहिजे. अशाच एका मीटिंग नंतर भाईने एक पुस्तक माझ्या हातात ठेवलं आणि नक्की वाच असा आग्रह केला. (भाई म्हणजे आपली लाडकी सुनायना ताई. आम्ही एकमेकांना भाई नावाने हाक मारतो.)

“फोकल पॉईंट” अतिशय सुंदर आणि उपयुक्त असं पुस्तक आणि या पुस्तकाचे लेखक ब्रायन ट्रेसी हे वैयक्तिक आणि व्यावसायिक विकास या विषयावरील जगातील एक प्रभावी वक्ते आणि सल्लागार आहेत. टाईम पॉवर, व्हिक्टरी, टर्बो स्ट्रॅटेजी आणि द लॉज ऑफ बिझनेस सक्सेस या बेस्ट सेलर पुस्तकाचे ते लेखक आहेत.

या पुस्तकात कुठलंही काम सोपं करण्यासाठी वापरात येणारे सात ‘R’ ही संकल्पना मांडली आहे. यापैकी एखादा-दुसरा किंवा सातही ‘R’ तुमच्या कार्यामध्ये किंवा वैयक्तिक कामांमध्येही वापरू शकाल.

पहिला ‘R’ – रिथिंकींग अर्थात पुनर्विचार
केव्हा तुम्हाला वाटेल की, तुम्हाला खूप काम करायचं आहे. पण काम करायला वेळ पुरत नाहीये, खूप कमी वेळ आहे आणि जास्त काम आहे, त्यावेळी थोडसं थांबा आणि तुमच्या कामाविषयी पुन्हा एकदा विचार करा.
स्वतःला प्रश्न विचारा की, हे काम करण्याचा यापेक्षा चांगला मार्ग असू शकेल का ? खासकरून तुम्हाला जे आंतरिक विरोध जाणवतो, अडचणी असतील, स्वतःची ओढाताण होत असेल त्या वेळी वेगळं होऊन स्वतःकडे एखाद्या सल्लागाराप्रमाने पाहा. असा विचार करा की, तुम्ही सल्लागार आहात आणि तुमच्या समोर ती परिस्थिती आहे, जिथे मूल्यमापन करून अशी कामं काशी हाताळावी याचा सल्ला द्यायचा आहे. हे करताना ओपन राहा आणि आपला दृष्टिकोन चुकीचा असू शकतो हे स्वीकारायला तयार राहा.

 

दुसरा ‘R ‘ – रिव्हॅल्युएटिंग अर्थात पुनर्मूल्यांकन
जेव्हा तुम्हाला कुठलीही नवीन माहिती मिळते तेव्हा तुमचं घड्याळ थोड्या वेळासाठी बंद करा. जसं फुटबॉलमध्ये टाईमआऊट करतात ना तसं! आणि मग तुमच्या परिस्थितीचं मूल्यांकन करा. अर्थात हे मूल्यांकन आज परिस्थिती काय आहे याच्यावर आधारित असावं. जनरल इलेक्ट्रॉनिक्सचे प्रेसिडेंट जॅक वेल्च, या गोष्टीला रियालिटी प्रिंसिपल असं म्हणतात.
रियालिटी प्रिंसिपलची सगळ्यात मोठी आवश्यकता म्हणजे, तुम्ही स्वतःशी पूर्णपणे प्रामाणिक असायला हवं आणि परिस्थितीजन्य गोष्टीवर मूल्यांकन करायला हवं! म्हणजे आज सद्यपरिस्थिती काय आहे यावर मूल्यांकन असायला हवं, तुम्हाला ती कशी हवी आहे किंवा पूर्वी कशी होती यावर नाही.

 

तिसरा ‘R ‘ – रिऑर्गनायझिंग अर्थात पुनर्रचना
त्याच इनपुटमध्ये जास्त चांगल्या पातळीचा आऊटपुट घेणं हा तुमचं जीवन किंवा काम यांची पुनर्रचना करण्यामागचा मुख्य हेतू आहे. या वेगाने बदलणाऱ्या काळामध्ये तुम्ही स्वतःला सततच रिऑर्गनाईझ करत राहिलं पाहिजे. जसं एका मोठ्या तंत्रज्ञाने म्हटलं आहे की, व्यवसायामध्ये तुमच्या धारणा दार तीन आठवड्याला फेकून द्याव्या लागतात.
तुमची काम करण्याची जागा रिऑर्गनाईझ करण्यासाठी नेहमी तयार राहा. तुमच्या दिवसभराच्या वेळापत्रकाची पुर्रचना करण्यासाठी नेहमी तयार राहा. तुम्ही जे काम करता ते काम करण्याचा अजून चांगला मार्ग असू शकतो हे स्वीकारण्यासाठी नेहमी तयार राहा आणि नेहमीच नवनवीन, चांगल्या मार्गाच्या शोधात राहा.

 

चौथा ‘R’ – रिस्ट्रक्चर अर्थात पुनर्बांधणी
रिस्ट्रक्चर किंवा पुनर्बांधणी करणं म्हणजे, तुमचा जास्तीत जास्त वेळ, पैसा, ऊर्जा आणि साधनं हि तुम्हाला सर्वात जास्त उत्पन्न आणि नफा मिळवून देणाऱ्या
२०% कामांवर केंद्रित करणं. सामान्यतः कंपन्या पुनर्बांधणी करताना, त्यांच्या ग्राहकांच्या दृष्टीने सर्वात जास्त महत्व असणारी उत्पादने किंवा सेवांवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करतात. आणि त्याच वेळी कमी महत्वाची किंवा फारशी फायदेशीर नसणारी कामं इतरांवर सोपवतात किंवा बंद करतात.

 

पाचवा ‘R ‘ – रिइंजिनिअरिंग
तुमचं काम आणि जीवन सोपं करण्यासाठी हा एक अतिशय शक्तिशाली मार्ग आहे. रिइंजिनिअरिंगमध्ये तुम्ही तुमचा पूर्ण फोकस प्रक्रियेच्या विकासासाठी लावता. तुम्ही सतत तुम्हाला अपेक्षित परिणाम साधणाऱ्या नवनवीन, जास्त वेगवान, कमी खर्चाच्या आणि सोप्या अशा मार्गाच्या शोतात राहा. तुमच्या कामाच्या रिइंजिनिअरिंगमध्ये सुरुवात ही तुमच्या वर्क प्रोसेसच्या सगळ्या पायऱ्यांची यादी करून करा. ती यादी अगदी सुरुवातीच्या कामांपासून ते अगदी शेवटच्या कामापर्यंत असावी. एकदा सर्व पायऱ्या कागदावर आल्या की, मग त्या पायऱ्या कमी करण्याचं ध्येय समोर ठेवा. पूर्वीच्या तुलनेत ३० टक्क्यांपर्यंत पायऱ्या कशा कमी करता येतील हे ध्येय स्वतःसमोर घ्या. जेव्हा तुम्ही हे पहिल्यांदा कराल तेव्हा तुम्हाला फार आश्चर्य वाटेल की, हे किती सोपं आहे.

 

सहावा ‘R ‘ – रिइन्व्हेस्टिंग
आजच्या ये वेगवान जगामध्ये तुम्ही दर सहा महिन्यांनी किंवा बारा महिन्यांनी स्वतःच्या कामाचं परीक्षण करायला हवं. झिरो बेस्ड थिंकींगवर सतत काम करा आणि स्वतःला विचारत राहा की, मी या पद्धतीने काम करत नसतो आणि आज जे माहिती आहे ते सर्व माहिती असतं तर मी हे काम परत याच मार्गाने केलं असतं का?
कल्पना करा की, तुम्हाला तुमचं करिअर, तुमचा जॉब पुन्हा एकदा सुरु करायचा आहे आणि मग स्वतःला प्रश्न विचारा की, मला पूर्वीपेक्षा नवीन काही करण्याजोगं आहे का ? आत्ता जे करतो आहे, त्यातलं काही कमी करता येईल का ? आणि असं काही आहे का की, जे करणं पूर्णपणे बंद करायला हवं ?
तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं, नोकऱ्या, पद मिळतील. नेहमी पुढे चालत राहा आणि हा विचार नक्की करा की, तुम्हाला काय करायला आवडलं असतं. स्वतःला विचार की, माझा पुढचा जॉब, पुढची नोकरी कोणती असेल, मला काय करायला आवडेल ?
त्यानंतर स्वतःला विचारा, यानंतरचं माझं करिअर कोणत्या क्षेत्रात असणार आहे ? मला काय करायला आवडेल ? जर तुम्ही हे प्रश्न स्वतःला विचारले नाहीत, त्यावर विचार केला नाही तर दुसरं कोणीतरी तुमच्या आयुष्यातील हे निर्णय त्यांच्या सोयीनुसार घेईल. जे तुम्ही स्वतःचं नियोजन केलं नसेल तर तुम्हाला इतरांच्या नियोजनानुसार चालावं लागेल.

 

सातवा ‘R ‘ – रिगेनिंग कंट्रोल अर्थात पुन्हा एकदा नियंत्रण मिळवणं
या पायरीमध्ये तुम्ही नवीन ध्येय समोर घेता आणि नवीन योजना आखता. तुम्ही नवीन निर्णय घेता आणि त्यावर कृती करण्यासाठी कटिबद्ध होता. तुम्ही तुमच्या जीवनाची धुरा सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी स्वतःवर घेता. तुमच्या बरोबर काहीतरी चांगलं घडेल याची वाट न पाहता तुम्ही तुमच्या जीवनाचे नियंत्रण स्विकारता. तुमच्याबरोबर काहीतरी चांगलं घडेल याची तुम्ही वाट पाहत नाही, तर तुम्ही पुढे जाऊन त्या गोष्टी घडवून आणता. तुम्ही तुमच्या वेळेचा आणि जीवनाचा चार्ज घेता.


धन्यवाद,
आपला लाडका
समीर दत्ताराम पडवळ

भावनिक बुद्धिमत्ता – भाग १

आपण जर पाहिले तर व्यक्तिमत्व विकासाचे स्वरूप भावनात्मक (Emotional), बोधात्मक (Intellectual) आणि क्रियात्मक (Practical) या  क्षेत्रांशी संबंधित असते. आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा समतोल विकास होण्यासाठी व या तीन क्षेत्रातील विकासासाठी योग्य प्रमाणात प्रयत्न होणे आवश्यक आहे. आज आपण भावनात्मक म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ताच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहोत.

 

यासाठी सर्वप्रथम समजून घेऊया कि भावना‘(Emotion) म्हणजे नक्की तरी काय?

‘भावना’ या शब्दाला इंग्रजीमध्ये ‘Emotion’ म्हटले जाते. मुळ लॅटीन शब्द “Emovere” या पासून Emotion केले. ज्याचा अर्थ उत्तेजित करणे असा होतो. त्यावरून असे म्हणता येते की, ‘भावना’ हे व्यक्तीच्या उत्तेजित अवस्थेचे नाव आहे.

 

भावनांची काही वैशिष्ट्ये आहेत त्यापैकी चार खालीलप्रमाणे.

१. भावना विकीर्ण आहेत (Emotion is diffused)

२. भावना सतत असते (Emotion is persistent)

३. भावना संचयी असते (Emotion is cumulative)

४. भावनेचे स्वरूप प्रेरणात्मक असते (Emotion is inspirational)

 

भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय ?

डॅनियल गोलमन एक आंतरराष्ट्रीय मानसशास्त्रज्ञ आहेत जे भावनिक बुद्धिमत्ता या विषयावर व्याख्यान देतात. त्यांनी भावनिक बुद्धिमत्तची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे.

“Defined emotional intelligence as the capacity to recognize our own feeling and those of others for motivating ourselves and in our relationships.”

 

“स्वतःच्या भावनांवर आणि त्यांच्या अभिव्यक्तीवर नियंत्रण ठेवता येणे, आजूबाजूच्या व्यक्तींशी सुसंवाद साधता येणे, वागण्यात लवचिकता असणे, स्वयंप्रेरणेनुसार व जीवन उद्दिष्टानुसार काम करता येणे या सर्व गुणांच्या मिश्रणाला भावनिक बुद्धिमत्ता म्हणतात.”

 

भावनिक बुद्धिमत्ता असणाऱ्या व्यक्तीमध्ये दोन घटक अप्रत्यक्ष कार्यरत असतात. भावनिकदृष्ट्या स्थैर्य (Emotional Stability) आणि भावनिक परिपक्वता (Emotional Maturity) असणाऱ्या व्यक्ती आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून वर्तन करतात. या व्यक्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये समायोजन (Adjustment) साधण्यास प्रवृत्त असतात. या व्यक्ती स्वयंप्रेरणेनुसार कार्य करीत असतात.

 

व्यक्तीचे व्यक्तिमत्व घडविण्यात भावनिक बुद्धिमत्तेची महत्वाची भूमिका आहे. वयापरत्वे भावनिक पक्वता येते. आजच्या या स्पर्धेच्या युगात अनेक ताणतणावांचे प्रसंग येतात. समस्या उभ्या राहतात. त्या सोडविण्याकरिता ‘स्व समायोजन (Self Adjustment) क्षमता अंगी असावी लागते. व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा समतोल विकास हा मोठ्या प्रमाणावर त्याच्या भावनिक बुद्धिमत्तेवर अवलंबून असतो. प्रत्येक व्यक्तीत काम करण्याची शक्ती, ऊर्जा, उत्साह असतो. तो भावनिक बुद्धिमत्तेमुळे मजबूत होतो.

 

धन्यवाद

समीर दत्ताराम पडवळ 

अर्थवेध वेल्थ संस्थापक

आर्थिक योजनांची आखणी न करण्याची सर्वसामान्य कारणे/बहाणे

आर्थिक नियोजन करताना सामान्यतः गुंतवणुकीची उद्दिष्ट्ये, गुंतवणुकीचा कालावधी, धोका पत्करण्याची क्षमता, सुरक्षितता आणि बऱ्याच गोष्टींचा समावेश होतो. मी आत्तापर्यंत अनेक गुंतवणूकदारांना आर्थिक नियोजन करताना पाहिलंय आणि काहींना आर्थिक नियोजन करण्यास सांगितले असता त्यांची काही कारणे वा बहाणे ऐकायला मिळतात. आज आपल्या या लेखामध्ये आपण “आर्थिक योजनांची आखणी न करण्याची सर्वसामान्य कारणे/बहाणे” पाहणार आहोत.

 

कारण १. माझ्याजवळ गुंतवण्याकरता पुरेसा पैसा नाही
गुंतवणूक करण्यासाठी आपल्याकडे खूप सारा पैसा अथवा मोठा व्यवसाय करण्याची आवश्यकता नाही. ‘Investing is not about waiting till you have money to invest.’ आपण लहान पैशाची बचत करुन सुरुवात करू शकता. छोट्या रक्कमेपासून गुंतवणूक सुरू करा आणि ती पद्धतशीरपणे करा.

 

कारण २. मला जीवन विम्याची गरज नाही
जर आपल्याकडे कर्ज असेल किंवा कोणी आपल्यावर अवलंबून असेल तर आपल्याला जीवन विमा आवश्यक आहे. आपल्यासोबत अपरिचित काहीच होऊ शकत नाही असा विश्वास बाळगू नका. कोणत्याही वेळी काही अप्रिय घटना घडल्यास, विम्याचे पैसे आपल्या उर्वरित कर्जाची परतफेड, अंत्य संस्कार खर्च आणि मुलांच्या शिक्षणासाठी पैसे भरण्यास मदत करतील. आपल्या मृत्यू नंतर कुटुंब आर्थिक दृष्टीने सक्षम राहील इतका विमा असावा.

 

कारण ३. सेवानिवृत्तीच्या नियोजनाबद्दल विचार करण्यासाठी मी खूपच लहान आहे
एखाद्याने नोकरीला वा उद्योगधंद्याला लागताच जी काही मिळकत मिळेल त्यातील थोडासा भाग बाजूला काढून सेवानिवृत्ती नियोजन करणे आवश्यक आहे. आपण बचत आणि गुंतवणूक करण्यास लवकर प्रारंभ केल्यास, तो आपल्या जीवनामध्ये नंतरच्या आर्थिक वाढीचा स्तर स्थापन करेल.

 

कारण ४. ‘माझ्या सेवानिवृत्तीच्या नियोजनापेक्षा माझ्या मुलाचे शिक्षण अधिक महत्वाचे आहे
आपल्या मुलाच्या शालेय फीची भरपाई करण्यासाठी आपल्या सेवानिवृत्ती निधीचा वापर करणे ही सर्वात वाईट चूक आहे जी आपण करू शकता. निवृत्ती निधी निवृत्तीनंतर आपल्या जीवनाची तरतूद करण्यासाठी असतो. आपल्या मुलाच्या शुल्काचा भरणा करणे ही आपत्ती आहे. तुमच्या वृद्धत्वात तुमच्या मुलाची काळजी घेण्यावर अवलंबून राहणे यापेक्षा अधिक मूर्खपणा असेल.

फी भरण्याचे इतर साधन शोधा. एक स्वतंत्र निधी तयार करा आणि त्यास ‘बाल शिक्षण निधी’ असे नाव द्या. परंतु आपल्या सेवानिवृत्ती निधीमधून पैसे काढू नका. आपण पैसे गोळा करू देत नसल्यास आपण पुरेसा निधी उभारण्यासाठी सक्षम होऊ शकणार नाही.

 

कारण ५. केवळ श्रीमंत व्यक्तीला इच्छापत्र बनवणे आवश्यक आहे
आपण इच्छापत्र सोडल्याशिवाय मरलात तर आपल्या मालमत्तेला विभाजित कसे करावे हे ठरविण्याकरिता आपल्या कुटुंबाला विशिष्ट वारसाहक्कांचे पालन करावे लागेल. आणि आपल्या मालमत्तेला मोठे व्यवसाय किंवा गुणधर्म असणे आवश्यक नाही. प्रॉव्हिडंट फंड खात्याप्रमाणे पेन्शन मनी, शेअर्स, म्युच्युअल फंड, तुमची इन्शुरन्स पॉलिसी आणि तुमची बॅंक फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे संपत्ती आहे.

हे समजण्यासाठी एक गैरसमज आहे की सर्व संपत्ती आपोआप पती / पत्नीला दिली जाते. मुले आणि नातेवाईक देखील मालमत्तेवर हक्क धारण करू शकतात. वारसा आणि वारसाचे नियम हे वैविध्यपूर्ण आणि गुंतागुंतीचे आहेत. एक इच्छापत्र निर्माण करणे गरजेचे आहे कारण आपल्या संपत्तीचे वाटप कसे करायचे हे ठरविण्यास मदत करते. पण दुर्दैवाने, बहुतेक भारतीय फक्त एक इच्छापात्र करण्याचे दुर्लक्ष करतात.

 

आपण अशा कारणांना न जुमानता आर्थिक नियोजन करा आणि समृद्धीसाठी सज्ज व्हा.

 

– समीर दत्ताराम पडवळ

निड आणि स्पीड

आज विषयाला सुरु करण्याआधी खाली दिलेला तक्ता बघूया.

Maggi 2-minute noodles
Domino’s Pizza 30 minutes or free
New Horlicks Dissolves in two seconds
Amazon Prime Single day delivery option
Meru Cabs Book a cab in less than 60 seconds
Good Knight Xpress 9 minutes mein macchar gayab
Fewikwick Chutki mein chipkaye
Lifebuoy Liquid Handwash Protects the user by removing 99.9 per cent germs within 10 seconds
Eno Fruit Salt Gets to work in 6 seconds

लक्षात घ्या की या ब्रँडने वचन दिलेली गती दिवस ते मिनिटांमध्ये आणि सेकंदांमध्ये कशी बदलते आहे. कारण प्रत्येक स्तरावरील ग्राहक अधीर झाला आहे आणि जलद कृतीची इच्छा दर्शवतो आहे.

या स्पर्धात्मक युगात उद्योगाला वाढवण्यासाठी आपण जीव पणाला लावून काम करत आहोत. प्रत्येक ग्राहकाची मागणी, त्यांची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

“गरज आणि वेग” (Need and Speed) या दोन गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. ज्या उद्योजकाने ग्राहकाची गरज पूर्ण केली आणि तीसुद्धा ग्राहकाच्या वेळेमध्ये तो व्यवसाय या स्पर्धेत जिंकेल. “गरज आणि वेग” का महत्वाचे याची ३ करणे खाली दिलेली आहेत.

१. तुम्ही वेगवान नसाल तर तुमचा प्रतिस्पर्धी वेगाने पुढे जाईल
आज ग्राहक त्यांची गरज त्वरित पूर्ण व्हावी अशी इच्छा बाळगतात. तुम्ही ग्राहकाची गरज ओळखण्यात आणि ती गरज पूर्ण करण्यात वेळ लावलात तर तुमचा प्रतिस्पर्धी तुमच्या आधी पुढे जाऊन त्या ग्राहकाची गरज पूर्ण करेल.

“In a world where everything is moving so rapidly, simply being fast isn’t enough; you have to be faster than anyone and everyone. Accelerate until you’re at the front and move fast to stay there.”

२. ग्राहकांच्या अपेक्षा 
ग्राहकांच्या अपेक्षा वाढत आहेत, त्यांना काहीतरी अधिक हवे आहे. त्यांना आत्ता आणि झटपट ते हवे आहे. व्यावसायिकांनी त्यांची भूक कमी करण्यासाठी त्वरीत काम करणे आवश्यक आहे कारण तसे झाले नाही तर ग्राहकांना दुसऱ्या उत्पादनाकडे किंवा सेवेकडे वळायला वेळ लागणार नाही. तुम्ही नाही तर दुसरे कोणी…!

३. जितक्या जलद गतीने शिकाल तितक्या लवकर विकसित व्हाल
प्रत्येक जण व्यवसाय वृद्धीसाठी जलद गतीने निरनिराळे ज्ञान आत्मसात करत आहेत, बदलत्या बाजारपेठेला तसेच बदललेल्या ग्राहकांच्या मनःस्तिथीला स्वीकारून स्वतःमध्ये लवकरात लवकर बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणूनच जितक्या जलद गतीने शिकाल तितक्या लवकर तुमचा व्यवसाय आणि तुम्ही विकसित व्हाल.

“निड आणि स्पीड”चा नियम केवळ उद्योजकांनाच नाही तर वैयक्तिक पातळीवर आपल्या सर्वांनाच लागू होतो. त्यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात आपण इतरांच्या आपल्याकडून असलेल्या गरजा त्यांच्या अपेक्षित वेळेत पूर्ण करण्यासाठी, आवश्यक गती आपल्या कामाला देऊ शकत आहोत का?

समीर पडवळ
संचालक : अर्थवेध वेल्थ, प्राध्यापक, प्रेरणादायी वक्ते

 

सोशल मिडियावर टाळायच्या या १८ गोष्टी (भाग २)

आज सोशल मिडीयाचं प्रचंड वारं आहे. सोशल मिडीयावर नसणं म्हणजे अक्षरशः मागसल्याचे लक्षण मानले जाते. गेल्या १० वर्षांत आपल्या देशात सोशल मिडीयाचं वादळ उठलं आहे. या सोशल मिडियाचे फायदे आणि तोटे अशा दोन्ही बाजू आहेत. बरेच जण सोशल मिडीयाचा चुकीचा वापरच जास्त करताना बघत आलोय, म्हणून हा लेख लिहावासा वाटला. सोशल मिडीया काय करू नये अशा १८ गोष्टींपैकी ९ मी पहिल्या भागात मांडल्या होत्या. बाकी ९ गोष्टी या भागात मांडतो आहे.

१०. देश किंवा सरकार विषयी नकारात्मक लिहिणं:
देश आणि चालू सरकार विषयी नकारात्मक किंवा वाईट लिहून आपण ती गोष्ट जगभर पोहचवत असतो. आपल्या देशाचं नाव नकळतपणे आपण संपूर्ण जगात खराब करतो. त्यामुळे ते टाळणं अत्यावश्यक आहे.

११. सातत्याने मेसेज पाठवणे:
एखाद्या अनोळखी व्यक्तीला परवानगी न घेता सातत्याने मेसेजेस पाठवणे हा गुन्हा आहे. ते टाळावे.

१२. अश्लील लिंक्स:
पॉर्न कंटेंट असलेल्या लिंक्स शेअर करणे किंवा एखाद्याच्या वॉलवर पोस्ट करणं हा देखील गुन्हा आहे. ते टाळावे.

१३. मी कुठे आहे?:
तुम्ही कुठे आहात? याबाबतीत पोस्ट करत राहणं छुप्या गुनेगारांना तुमच्याविषयी माहिती देत असतं त्यामुळे तसं करणं टाळा. ‘आमची संपूर्ण फॅमिली दहा दिवसांसाठी गावी किंवा टूर वर चाललेय…फिलिंग एक्साईटेड’ असं पोस्ट करणं चोरांना एक्साईट करू शकतं. म्हणजे हे चोरांना ‘आमच्या घरी येवून चोरी करा’ असं खुलं आमंत्रण देण्यासारखं आहे.

१४. फ्रेंड रिक्वेष्ट:
येणाऱ्या फ्रेंड रिक्वेष्ट आंधळेपणाने स्वीकारणे धोकादायक ठरू शकते. त्या व्यक्तीचा प्रोफाईल व्यवस्थित पडताळून, खात्री करूनच फ्रेंड रिक्वेष्ट स्वीकारा.

१५. वाद टाळा:
धर्म, देव, जात याविषयी सोशल मिडीयावर वाद घालणे टाळा. त्याने आपण एकंदरीत नकारात्मक वातावरण निर्माण करत आहोत याची जाण ठेवा.

१६. अंधाधुंदी शेअर:
आपल्याला आलेल्या पोस्ट विश्वसनीय आहे कि नाही याची खात्री करूनच ती फॉरवर्ड करा. उगाच भावनेचा भरात कोणतीही पोस्ट शेअर करू नका.

१७. दुःख व्यक्त करणे:
सोशल मिडीयावर आपलं दुःख व्यक्त करून आपण आपलं हसे उडवून घेत असतो. तुमच्या ‘फिलिंग सॅड’ला इथे कुणीच वाली नाही. त्यामुळे तुमचे हार्ट-ब्रेक वैगरेचे मेसेजेस त्यावर टाकून स्वतःचा तमाशा करून घेवू नका.

१८ . गेम रिक्वेस्ट:
आपल्यासारखे सगळेच रिकामी नसतात किंवा तुम्ही खेळत असलेला गेम सगळेच खेळत असतील असं नाही. त्यामुळे सातत्याने गेम रिक्वेस्ट पाठवून तुम्ही तुमच्या रिकामी असल्याची जाहीर जाहिरात करत असता. त्यामुळे फुकटच्या लाईफ मिळवण्यापेक्षा, गेम बंद करून खऱ्या लाईफशी जोडले जा.

 

धन्यवाद!

सदैव आपला,
समीर दत्ताराम पडवळ