धमन्यातल्या रुधिरास या खल भेदण्याची आस दे

जयहिंद,

सध्या वर्तमानपत्रात कथुआ, उन्नाव व अशा अनेक अशा बातम्या वाचल्या की मन विषण्ण होत. असं वाटत की यावर आपल्या देशात जी कारवाई होते ती बऱ्याचदा राजकारणी हेतूंमुळे तशी कमीच होते किंवा न्यायदानाच्या या संपूर्ण प्रक्रियेत अनेकदा इतका वेळ जातो की आरोपी मोकाट सुटूनही जातो पण ज्या घरावर ही परिस्थिती ओढवलेली असते त्यांच काय?

अनेकदा मेणबत्या हातात घेऊन मोर्चे काढले जातात. पेपर मध्ये पुढील काही दिवस ती बातमी पहिल्या पानावर असते मग जसजसं समाजाचं विसरलेपण वाढत तशी ती बातमी आत संक्षिप्तपणे मांडली जाते आणि कालौघात नाहीशी होते. एकूणच आज २१ व्या शतकातील पुढारलेल्या भारताच्या बाता मारणाऱ्या आम्हा सर्वांची लाज वाटते आणि त्या पालकांची काळजी ज्यांना मुली आहेत.

अनेक पालक जेव्हा समुपदेशनासाठी भेटायला येतात तेव्हा आपल्या मुलीने तिच्या मुलगी या जातीला शोभेल असे करिअर तिने निवडावे असा आग्रह करताना आढळतात. त्यांच्यासाठी मला सांगायचंय, करिअर तर त्या नक्कीच चांगलं करतील पण जेव्हा आयुष्यात असा एखादा प्रसंग येईल तेव्हा त्याला सामोरे जाण्यासाठी लागणाऱ्या धाडसाला तुम्ही तुमच्या मुलीला तयार केलंय का?

आज नाक्यावर बसणाऱ्या टपोरीगिरी करणाऱ्या मुलांची मजल फार पुढे गेली आहे, त्यात त्यांच्या मोबाईलमध्ये असणाऱ्या क्लिप्स त्यांना चुकीचे वर्तन करण्यास उद्युक्त करतात. मग कधी राजकारणी यांची बाजू सावरून धरतात तर कधी मुलांची मानसिकता ठीक नसल्याने अशी कृत्य घडतात असा एक आधार मुलांना मिळतो. मुलीसाठी मात्र घटना घडून गेल्यानंतर मिळणाऱ्या आधाराची किंमत ही फुटलेल्या काचेच्या बरणीला फेविक्विकने जोडण्यासारखीच असते.

आज या माध्यमातून विशेषकरून मुली असणाऱ्या पालकांना मला सांगायचे आहे मुलगी वाढवताना ती एखाद्या  विषयात मागे राहिली तरी चालेल, नाच, गाणे, चित्र काढणे हे सर्व आयुष्यात महत्वाचे आहे पण आयुष्याचे गाणे बहारदार करायचे असेल आणि जीवनाचे सुंदर चित्र काढायचे असेल तर तिला आत्मसंरक्षणासाठी सज्ज करा. तिचे सगळे कलागुण जोपासताना तिच्यातील हिम्मत व वेळ पडलीच तर चार जणांना लोळवण्याची क्षमता कशी वाढेल याकडे कटाक्षाने लक्ष द्या.

मला याठिकाणी मुद्दाम आमच्या डोंबिवलीतील एका मुलीचा उल्लेख करायचा आहे पूर्वा मॅथ्यु  जी स्वतः नामवंत ज्युडो व कुराश खेळाडू आहे, भारताच्या आंतरराष्ट्रीय संघाची ती एक खेळाडू आहे. बेस्ट प्लेयर ऑफ आशिया हा किताब तिच्या नावावर आहे तसेच २७ नॅशनल रेकॉर्ड तिच्या नावावर आहेत. आणि सर्वात महत्वाचे त्रास देणाऱ्या कोणासोबतही चार हात करण्याची तिची जिद्द आहे. आणि आज परिसरातील कित्येकांची ती कोचदेखील आहे. अनेक मुली तिच्या हाताखाली समाजातील हे जे पाशवी वृत्तीचे खल आहे ते भेदण्यास तयार होत आहेत. पोलीस, महानगर पालिका तसेच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघटनांनी तिच्या या धाडसीवृत्तीची दखल घेतली आहे.

या माध्यमातून सर्व पालकांना पुन्हा एकदा एकच सांगतो, आपलं मुल वाढवण्याची आपली प्रत्येकाची एक पद्धत आहे त्यात स्व-संरक्षण यालाही तितकेच महत्व द्या. हा लेख वाचणारे आपण जर शाळा व महाविद्यालयातील शिक्षक असाल तर आपल्या संस्थामध्ये असे उपक्रम घ्या व समाजातील उपेक्षित घटक ज्यांच्यापर्यंत बऱ्याचदा कोणताही संस्कार पोचवता येत नाही तिथे निदान स्व-संरक्षणाच्या पद्धती/युक्त्या आपण पोचवू शकलो तर ही नराधमी कृत्य करणारी जमात एक पाउल देखील पुढे टाकायला धजावणार नाही.

विवेकानंद नेहमी म्हणत जर एक सुदृढ समाज घडवायचा असेल तर ‘मेंदू व मन याचबरोबर मनगटात ताकत हवी.’ शाळा व महाविद्यालये मुलांच्या मेंदूवर काम करतच आहेत चांगल्या संस्कारांनी त्यांचे मनही सुदृढ होईल पण मनगटातली ताकत त्यांना भीषण प्रसंगांना सामोरे जायला मदत करेल.

आजच विचार करा कसं करायचं? मग का झालं यावर विचार करायची वेळ येणार नाही……

 

आपला

अतिश कुलकर्णी

लेखक, प्रशिक्षक, आय लीड ट्रेनिंग, जीवनरंग

जे जे विदेशी आणि इंग्रजी ते ते उत्तम?

 

साधारण 70 ते 80 च्या दशकापासून सुरुवात झाली एक पिढी परदेशात जायला आणि मग हळू हळू विदेशी वस्तुंचा भारतात वापर वाढू लागला. जी गोष्ट अगोदर चैन म्हणून बघितली जायची ती आता गरज झाली किंवा त्याची गरज निर्माण केली गेली.

मग त्यानंतर या विदेशी वस्तूंची फॅशन झाली. एखाद्याने आश्चर्याने विचारले अरे नवीन घड्याळ! की त्यावर उत्तर मिळायचे ‘imported आहे’.  अगदी शाळेतील मुलेही मग एकमेकांना भेटली की या इंपोर्टेड वस्तूंच्या आकर्षणातून गप्पा मारायला लागतात.मुलाचं सोडा पण पालकांच्या मनातही जे जे विदेशी ते ते उत्तम हेच ठासून भरलेल दिसतंय. विदेशी आकर्षणातून इंग्रजीतून शिक्षण देणाऱ्या संस्था आल्या या इंग्रजी माध्यमातील संस्था इंग्रजी विषयांपेक्षा इंग्रजी पद्धतीचे शिक्षण देऊ लागल्या आणि आपण आपल्याच मुलांना इंग्रज बनवू लागलो. अशी शिक्षणपद्धती आपली मुले शिकू लागलीत ज्यात त्यांच्यातील नेतृत्वगुण तर वाढीस ह नाहीत पण कारकून मानसिकता मात्र प्रचंड वाढू लागली आहे.

खर तर प्रत्येक मुलगा हा वेगळा आहे आणि त्याला आवडणारा विषयही वेगळा मग असे असताना आपली शिक्षणपद्धती का या मुलांना सर्व विषय शिकवण्याच्या जोखडात बांधून टाकते आणि मुलगा हुशार असण्याचा बेस त्याचे परीक्षेतील मार्कच असतात. जरा नीट विचार करून २/२/१८३५ रोजी लॉर्ड  मॅकोलेने त्यांच्या ब्रिटीश पार्लमेंटमध्ये केलेले वरील चित्रातील भाषण नीट वाचले तर नक्की लक्षात येईल की ज्या शिक्षणपद्धतीत आपण शिक्षण घेतले व आता आपली मुले घेत  आहेत  ते  गुलामगिरी  मानसिकता वाढवणारे शिक्षण . आपण संपूर्ण शिक्षणव्यवस्था बदलू शकत नाही पण आपल्या मुलापुरते तरी त्याला आवडणारे, ज्यात त्याला गती आहे ते देणारे, पालकांची आवड (३ IDIOTS मधील फरहान कुरेशीचे  बाबा हिटलर  कुरेशी सारखी ) न लादणारे शिक्षण दिले तर आपली पुढील पिढी   ही उत्तम नेत्यांची असेल अशी आशा करूया. आणि त्यासाठी जे जे विदेशी ते ते  उत्तम  म्हणण्यापेक्षा आपल्याकडेच जे जे आहे ते ते उत्तम आहे हे मानूया…

 

श्री. अतिश कुलकर्णी

(लेखक, प्रशिक्षक, वक्ता)

८१०८१०८४९२

ना – त्यांना गृहीत धरताना

आकाशातील ग्रह बघण्यासाठी आपण दुर्बीण वापरतो, ते आहेत तसे पाहतो, ते जसे दिसतात तशीच त्यांच्या रंगावर आणि गुणधर्मांवर चर्चा करतो. आता हे झाले लांबचे पाहणे. जे लांब आहे ते आपण आहे तसे पाहतो पण जे जवळ आहे ते म्हणजे आपली मुले व त्यांच्या सोबतचे आपले नाते-संबंध यानाही आपण तेच परिमाण वापरतो का? उलटपक्षी जे जवळ आहे त्यांना आपण गृहीत धरतो आणि त्यांनी आपण जे गृहीत धरलंय त्यानुसार वागले नाही म्हणजे आपल्या जवळच्या ग्रहांना आपण नावे ठेवतो आणि आकसाने म्हणतो, ‘ कसला शनीग्रहासारखा माझ्या मानगुटीवर बसलाय’.

माझी मुलं मला हवी तशी वागत नाहीत… अशी अनेक पालकांची तक्रार असते. यात एक महत्वाची मेख आहे ती म्हणजे मला हवी तशी यातच आली ‘अपेक्षा’. म्हणजे त्याने किंवा तिने इतक्याच वाजता उठाव, हेच कराव, तेच करू नये, इतका वेळ अभ्यास करावा, मोबाईलवर जास्त राहू नये, मित्र-मैत्रिणींसोबत जास्त वेळ घालवू नये, नातेवाईकांना भेटण्यास आपल्यासोबत नेहमी यावे, वेगवेगळे कार्यक्रम आपल्यासोबत राहून अटेंड करावेत, असेच कपडे घालावेत, तसे घालू नये, चारचौघात असेच बोलावे ते पुढे मग हेच करिअर निवडावे पासून ते याच मुला किंवा मुलीसोबत असाच संसार करावा पर्यंत आपण त्यांना जे गृहीत धरतो त्याची पाळमुळ ही आयुष्यभर ‘अपेक्षा’ नावाच्या एकाच शब्दाची अनेक रूपं.

आणि जिथे अपेक्षा आल्या तिथे अपेक्षाभंग अपेक्षितच असतो नाही का? पण त्याचा सामना पालकांना करता येत नाही म्हणून जे दुख त्यांच्या पदरी पडते ते असते अपेक्षाभंगाचे दुख. मग साहजिकच एक प्रश्न पडतो तो म्हणजे यावर उत्तर काय? किंवा काही आईवडील, ‘मग आम्ही काय आपल्या मुलांकडून अपेक्षाच करायची नाही का?’ असे देखील म्हणतील.

यावर एक सोपा मार्ग म्हणजे घरातलं वातावरण हे प्रश्न विचारणार असाव तेही कोर्टात आरोपीला विचारले जातात तसे नाही तर अफजलखानाला धडा शिकवायला निघालेल्या शिवाजीराजांना त्यांच्या जिजामातेने विचारले तसे प्रश्न असावेत. ज्यात काळजीही असेल आणि मुलाला पुढे जाण्याचा हुरूपही मिळेल. घरातील एखादा ज्वलंत विषय जो अपेक्षांच्या मुळांवर वाढलेला असतो तो अशा प्रश्नांमुळे योग्य दिशेला वळवता येतो न पेक्षा त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याची घरातील प्रत्येकाची तयारी होते. आई-बाबांनी प्रश्न तयार करताना सकारात्मक संभाषणावर भर द्यावा. मुले ही अनुकरणप्रिय असतात त्यामुळे तुमचे प्रश्न नकारात्मक उर्जा देत असतील तर उत्तरातून तीच उर्जा परत मिळेल याची खात्री बाळगा. व्यवस्थितपणे आणि सकारात्मक प्रश्न विचारल्याने वाद विकोपाला न जाता संवादाच्या माध्यमातून सोडवता येतात.

आजचा प्रश्न – आपल्या मुलांसोबतचा असा एखादा प्रसंग आठवा जो अपेक्षा वा अपेक्षाभंगामुळे (नात्यांना गृहीत धरल्यामुळे) विकोपाला गेला होता आणि कोणते प्रश्न विचारून तो हाताळता जाऊ शकला असता वा भविष्यात असा प्रसंग हाताळता येईल.

 

धन्यवाद!

अतिश कुलकर्णी

प्रशिक्षक, वक्ता व लेखक – ‘जिजाऊंची पालकनीती आजच्या पालकांसाठी’

संपर्क – ८१०८१०९४९२

इमेल – atishaspa@gmail.com

सर्वधर्म समदृष्टी होई सुजलाम सुफलाम सृष्टी

नमस्कार,

गेले बरेच दिवस WHATSAPP वर जातीयवादीमुद्द्यावरून अनेक मेसेजेस गाजतायत. समाजातील प्रत्येक स्तर आपली जात श्रेष्ठ कशी हे पटवून देताना इतर जातींना खाली दाखवणारे अनेक मेसेज बनवत आहेत व सोशल मिडियाचा वापर करताना दिसत आहेत. दुर्दैवाने ‘आम्ही सारे भारतीय आहोत’ हे फक्त आणि फक्त प्रतिज्ञेपुरतेच मर्यादित राहिले आहे. ही प्रतिज्ञा आपण म्हणतो तेव्हा आपण शाळेत असतो तेव्हा आपण कोणत्याही जातीचे नसतो आणि जसजसे मोठे होतो अनुभवांचे गाठोडे वाहायला शिकतो तसतसे आपल्याला या जाती-धर्मांची आठवण होते. ‘UNITY IN DIVERSITY’  (विविधतेत एकता) असे आपण अभिमानाने म्हणायचो पण न जाणे ‘DIVIDE AND RULE’ या पायावर आधारलेले इंग्रजकालीन विचार आता मूळ रोवू पाहत आहेत आणि आपण सगळे वेगवेगळ्या जातींनी एकमेकांना ओळखू लागलोय. हा ब्राम्हणांचा, हा मराठ्यांचा, हा महारांचा अशी एकमेकांची ओळख सांगताना मी भारताचा भारत माझा  हेच आपण विसरलो तर नाही ना?

भारतीय सैन्याने मागे शत्रूराष्ट्रात घुसून अतिरेकी तळांवर हल्ला केला तेव्हा मात्र प्रत्येकाने भारताचा राष्ट्रध्वज मना मनातून, रस्त्यारस्त्यावरून ते अगदी  WHATSAPP पर्यंत सर्व ठिकाणी अभिमानाने फडकवला. सुदैवाने आम्हा सर्वाना एकाचवेळी आम्ही भारतीय असल्याची आठवण झाली. देशासाठी लढणारे आमचे सैन्यदल असो वा देशांतर्गत आम्हाला सांभाळणारे आमचे पोलीस असोत. खरं तर आम्ही अमूक एका जातीचे आहोत म्हणून ते कधीच त्यांच्या छातीची ढाल करून आमच्या संरक्षणासाठी उभे रहात नाहीत. आपापसातही त्यांची जातीची बंधने गळून गेलेली असतात. भारतमाता हीच त्यांची आई आणि भारतीय हीच त्यांची जात. किमान या खरोखरीच्या हिरोंसाठी आपण इतर जातींवर होणारी चिखलफेक थांबवायला नको का?

आणि हो आपल्याला जर आपली जात आणि धर्म याचा अभिमान आहे आणि वाटत असेल तर तो आपल्या चार भिंतीत असुदे. आपल्या दाराबाहेर सभोवताली वावरणाऱ्या अठरापगड जाती या आपल्याच भारतीय माणसांच्या आहेत तेव्हा तिथे आपल्या जातीचे मग ती कोणतीही असो अवडंबर माजवणे किती बर योग्य? आपण सारे सुज्ञ आहात. तेव्हा नीट विचार करून सर्वधर्म व जाती यांना सामावून घेईल अशी समाजव्यवस्था आपण तयार करूया. निदान आपल्या मुलांसाठी तरी, आपल्या पुढच्या पिढीसाठी तरी भारतीय हीच एकमेव जात आहे हाच संदेश देऊया.

हा संदेश मी माझ्या पुढील कवितेतून मांडत आहे. विचार आवडल्यास इतराना सांगा.

 

अभिमान असू दे धर्माचा अपुल्या

पर घृणा नको परधर्माची

जग जिंकूया मिळूनी सारे

साद देऊ भारतीयत्वाची|

दंग्या ढोप्यामध्ये जळती सारे

कित्येक पाडे, गावे अन शहरे

मुले बापडी अगतिकतेने म्हणती

नक्की माझा धर्म कोणता रे |

मानवतेची शिकवण देण्या जन्मले

या भारतभूवर अनेक तारे

त्यांच्या विचारांस अग्नी देऊनी

धर्म जपतात हे अस्तानितले निखारे |

कोणताही धर्म सांगत नाही

करण्या परधर्मीयांची खांडोळी

कोणत्या उन्मादातून होते मनुष्याकडूनच

मनुष्य देहाची अन त्याच्या संसाराची राखरांगोळी |

माणूस म्हणून जन्माला आलात तेव्हा आता

जग जिंकताना माणसेही जोडत जगा

याच एका मार्गाने बनवा परकीयानाही स्वकीय

जग तेव्हा म्हणेल गर्वाने हाच खरा भारतीय  |

आजचा प्रश्न – पालक म्हणून तुमच्या मुलांच्या मुळांवर जात-धर्म या  विषयानुरूप तुम्ही कसे संस्कार करतात/करायला हवेत?

 

आपला,

अतिश अ. कुलकर्णी- लेखक,प्रशिक्षक व वक्ता