धावण्याच्या एका शर्यतीत एकदा,  एकाने थांबायचे ठरवले

धावण्याच्या एका शर्यतीत एकदा,  एकाने थांबायचे ठरवले

वेडा, मूर्ख म्हणून, इतर धावणाऱ्यांनी त्याला हिणवले

अरे धाव नाहीतर मागे रहाशील,

मग भविष्याची तरतूद केव्हा करशील

आभाळ कोसळले म्हणून धावणाऱ्या सशामागे आम्ही निघालो

लोटून दे स्वतःला नाहीतर फुकटचा मरशील

धावणाऱ्या एकाला, मग नि धावतच विचारले?

आभाळ कोसळताना तू रे कधी पाहिले

लगेच तो म्हणाला ‘मी नाही हो पाहिले!’

मोठा श्वास घेत त्याने, दुसऱ्याकडे बोट दाखवले

दुसऱ्याने तिसऱ्या कडे आणि तिसऱ्याने चौथ्याकडे

पाहता पाहता गणितातले आकडेच संपले

धापा टाकणाऱ्या एकाने मग, मला निट समजावले

‘गाढवा इथे काही विचारायचे नसते, इथे नुसतेच धावायचे असते

कुठे जायचे? कुठली दिशा? कसली आवड आणि कसा छंद?

धावण्याच्या आमच्या शर्यतीत, आम्ही विचारच केलाय बंद

यशाच्या मोजमापाची पट्टी, आम्ही खिशातच घेवून फिरतो

दुसरा पुढे गेला, की अंतर मोजून काढतो

हे अंतर आणि आमच्या दुःखांचा, ‘समप्रमाण सिद्धांत’ आम्ही मांडतो

परत ते कापायला, ऊर फुटेस्तो धावतो

तू पण धाव कारण हे कठीण गणित, न्युटनच्यापण टाळक्यात शिरणार नाही

आणि लक्षात घे, नाही धावलास तर, औषधालापण तू उरणार नाही

न कळता पाळायचे हे गणित, आता मलाही कळू लागले

मीही मग पळू लागलो, थांबणाऱ्या एखाद्यावर हसू लागलो

अकल्पित भविष्याच्या काळजीने

अवघे वर्तमान जाळू लागलो

तेव्हापासून नुसता मी धावतोय

थांबणाऱ्या प्रत्येकावर मी कावतोय

दमलोय आता, पण अंतर काही सरत नाही

पगार, घर, गाडी आणि बँक balance

याशिवाय कोणीच काही बोलत नाही

पण खरं सांगू

थांबून निवांत श्वास घ्यायलासुद्धा

वेळ आताशा मिळत नाही

वेळ आताशा मिळत नाही

आनंद वामनसे