बाजीराव पेशवा मालिकेतून शिकण्यासारखे १० धडे – भाग १

सोनी वर प्रेक्षापित होणारी पेशवा बाजीराव हि मालिका मी अगदी पहिल्या एपिसोडपासून न चुकता बघतो. यु ट्यूब वर रात्री ११ वाजता एपिसोड अपलोड केला जातो. मालिका रंजक बनवाण्यासाठी दिग्दर्शकाने वापरलेल्या स्वातंत्र्याला जर नजरेआड करू शकलो तर खरच हि मालिका खूप चांगली आहे. याच्या प्रत्येक भागात काहीना काही शिकवण कसबीने पेरलेली आहे. चाणक्यनिती, कौटिल्यशास्त्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीती, यातून वेचून काढलेल्या शिकवणी या मालिकेत पेरण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. त्यातले काही महत्वाचे धडे इथे थोडक्यात मांडत आहे. मला खात्री आहे तुम्हाला ते निश्चितच आवडतील.

१. धाडस आणि भय:
धाडस आणि भय या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. धाडस शत्रूला मारण्यासाठी आवश्यक आहे आणि भय स्वतःचा जीव वाचवण्यासाठी! आणि लढाया जिवंत राहूनच जिंकता येतात. जर जिंकायचं असेल तर जगावं लागेल.

२. स्त्री- एक दासी कि सहकारणी:
यत्र नार्यस्तु पूज्यन्त, रमन्ते तत्र देवता:
अर्थात, जिथे स्त्रीची पूजा होते, देव तिथेच वास करतात. ज्या स्त्रीला आपल्या शास्त्रात एवढा सन्मान दिलाय त्या स्त्रीला आपण हिन समजणं योग्य नाही. स्त्री हि गुलाम नाही, तुमची सहकारणी आहे.

३. संस्कृतीचं रक्षण:
पुरुष आणि परंपरा जर स्त्रीचं रक्षण करू शकली नाही तर ते नष्ट होणंच योग्य आहे. संस्कृती विहीर नाही ती वाहती नदी आहे. नदीचं रक्षण तिला अडवून केलं जाऊ शकत नाही. तिला वेळेनुसार वाहू द्या. संस्कृतीचं रक्षण ती स्वतःच करेल.

४. स्वाभिमान वि. अहंकार:
स्वाभिमान हि दुधारी तलवार आहे. जो पर्यंत आत सामावलेला आहे तोपर्यंत स्वाभिमान. जर बाहेर आला तर अहंकार. लक्षात ठेव तुझ्यामध्ये स्वाभिमान भरभरून असू दे. अहंकार नाही.

५. राज्य जिंकायचंय तर मने जिंका:
देश मातीने नाही, लोकांनी बनतो. लोकांच्या हृदयाने त्यांच्या मनाने बनतो. तुम्ही राज्य जिंकण्यापेक्षा लोकांची मने जिंकण्यावर भर द्या. राज्य आपोआप तुमचं होईल.

६. आम्ही मराठी या गवतासारखे आहोत:
तुम्ही हे गवत पाहिलंत. आम्ही मराठी या गवतासारखे आहोत. कितीही मोठं वादळ येवू दे. आमच्यात सळसळ होईल पण आम्ही तुटणार नाही. कारण आमची मुळे आजून तिथेच आहेत. जी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी रुजवली आहेत. त्यांनी या मातीच्या कणाकणात स्वराज्य रुजवले होते….स्वराज्य.

७. भीती आणि समस्या:
मनात विश्वास असेल तर कोणी हारू शकत नाही आणि मनात शंका असेल तर कुणी जिंकू शकत नाही. जो पर्यंत भीती मनात आहे तो पर्यंत शत्रू/ समस्या तुम्हाला चिटकून राहतात. जर आपल्या मनातून भीती निघून गेली तर आपल्या भूमीतून शत्रू आणि जीवनातून समस्या निघून जायला वेळ लागत नाही.

८. भावशास्त्र:
भावशास्त्रात लिहिलं आहे कि आपल्या चेहऱ्यावर निरनिराळे ९ प्रकारचे भाव येत असतात. ते म्हणजे तिरस्कार, क्रोध, भय, सुख, दुःख, आश्चर्य, अपमान, विभात्स आणि शांत. हे भाव एका क्षणाच्या एक दशांश हिस्स्यामध्ये येवून जातात. ज्ञानी माणूस पुस्तके वाचतो आणि विद्वान माणूस माणसांना वाचतो.

९. कृतज्ञता:
ज्या व्यक्ती आपल्याशी चांगल्या वागतात, आपल्याला प्रेरित करतात, त्यांच्याशी आपण कृतज्ञ असतोच. जे तुमच्यावर टीका करतात, तुम्हाला कमी लेखतात, त्यांच्याशी कृतज्ञ रहा. कारण हेच लोक तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची प्रेरणा नकळतपणे देत असतात.

१०. उत्साह आणि हेतू:
आपण आपल्या दैनंदिन जीवनात जे काही करत असतो ते ‘करावं लागतं’ म्हणून करत असतो. त्या गोष्टींमध्ये आपल्याला उत्साह वाटत नाही किंवा सुरुवातीला असलेला उत्साह हळू हळू कमी होत जातो. उत्साह नसेल तर त्या गोष्टी करण्याला अर्थ उरत नाही. जबरदस्ती म्हणून एखादी गोष्ट केली कि करण्याचा आनंद तुम्हाला मिळत नाही आणि उत्कृष्ट परिणाम साधू शकत नाही. त्यामुळे एखादी गोष्ट जी करायचीच आहे ती जीवावर उदार होऊन करण्यापेक्षा तिला हेतूची जोड द्या. जेव्हा तुमच्या कृतीला हेतूची जोड मिळते तेव्हा उत्साह आपोआप येतो.

उदा. मी रोज जे काम करतोय ‘करावं लागतंय म्हणून करतोय’ हे बोलण्यापेक्षा,
‘हे काम मला करायचंय कारण या कामातून मिळणाऱ्या पैशाने माझ्या ………….(गरजा) पूर्ण होत आहेत.’
‘मला हे नातं जपायचं आहे कारण…………’
जेव्हा या हेतूची जोड कामाला मिळेल तेव्हा तुम्ही ते मनापासून कराल.

याचा भाग २ लवकरच घेवून येतो. हा भाग कसा वाटला निश्चितच प्रतिक्रिया कळवा. हि पोस्ट लाईक आणि शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी मदत करा.

 

धन्यवाद!
सदैव आपला,
विनोद अनंत मेस्त्री
लेखक, प्रशिक्षक आणि वक्ता
९८१९४५३५३३

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *