सोशल मिडियावर टाळायच्या या १८ गोष्टी (भाग २)

आज सोशल मिडीयाचं प्रचंड वारं आहे. सोशल मिडीयावर नसणं म्हणजे अक्षरशः मागसल्याचे लक्षण मानले जाते. गेल्या १० वर्षांत आपल्या देशात सोशल मिडीयाचं वादळ उठलं आहे. या सोशल मिडियाचे फायदे आणि तोटे अशा दोन्ही बाजू आहेत. बरेच जण सोशल मिडीयाचा चुकीचा वापरच जास्त करताना बघत आलोय, म्हणून हा लेख लिहावासा वाटला. सोशल मिडीया काय करू नये अशा १८ गोष्टींपैकी ९ मी पहिल्या भागात मांडल्या होत्या. बाकी ९ गोष्टी या भागात मांडतो आहे.

१०. देश किंवा सरकार विषयी नकारात्मक लिहिणं:
देश आणि चालू सरकार विषयी नकारात्मक किंवा वाईट लिहून आपण ती गोष्ट जगभर पोहचवत असतो. आपल्या देशाचं नाव नकळतपणे आपण संपूर्ण जगात खराब करतो. त्यामुळे ते टाळणं अत्यावश्यक आहे.

११. सातत्याने मेसेज पाठवणे:
एखाद्या अनोळखी व्यक्तीला परवानगी न घेता सातत्याने मेसेजेस पाठवणे हा गुन्हा आहे. ते टाळावे.

१२. अश्लील लिंक्स:
पॉर्न कंटेंट असलेल्या लिंक्स शेअर करणे किंवा एखाद्याच्या वॉलवर पोस्ट करणं हा देखील गुन्हा आहे. ते टाळावे.

१३. मी कुठे आहे?:
तुम्ही कुठे आहात? याबाबतीत पोस्ट करत राहणं छुप्या गुनेगारांना तुमच्याविषयी माहिती देत असतं त्यामुळे तसं करणं टाळा. ‘आमची संपूर्ण फॅमिली दहा दिवसांसाठी गावी किंवा टूर वर चाललेय…फिलिंग एक्साईटेड’ असं पोस्ट करणं चोरांना एक्साईट करू शकतं. म्हणजे हे चोरांना ‘आमच्या घरी येवून चोरी करा’ असं खुलं आमंत्रण देण्यासारखं आहे.

१४. फ्रेंड रिक्वेष्ट:
येणाऱ्या फ्रेंड रिक्वेष्ट आंधळेपणाने स्वीकारणे धोकादायक ठरू शकते. त्या व्यक्तीचा प्रोफाईल व्यवस्थित पडताळून, खात्री करूनच फ्रेंड रिक्वेष्ट स्वीकारा.

१५. वाद टाळा:
धर्म, देव, जात याविषयी सोशल मिडीयावर वाद घालणे टाळा. त्याने आपण एकंदरीत नकारात्मक वातावरण निर्माण करत आहोत याची जाण ठेवा.

१६. अंधाधुंदी शेअर:
आपल्याला आलेल्या पोस्ट विश्वसनीय आहे कि नाही याची खात्री करूनच ती फॉरवर्ड करा. उगाच भावनेचा भरात कोणतीही पोस्ट शेअर करू नका.

१७. दुःख व्यक्त करणे:
सोशल मिडीयावर आपलं दुःख व्यक्त करून आपण आपलं हसे उडवून घेत असतो. तुमच्या ‘फिलिंग सॅड’ला इथे कुणीच वाली नाही. त्यामुळे तुमचे हार्ट-ब्रेक वैगरेचे मेसेजेस त्यावर टाकून स्वतःचा तमाशा करून घेवू नका.

१८ . गेम रिक्वेस्ट:
आपल्यासारखे सगळेच रिकामी नसतात किंवा तुम्ही खेळत असलेला गेम सगळेच खेळत असतील असं नाही. त्यामुळे सातत्याने गेम रिक्वेस्ट पाठवून तुम्ही तुमच्या रिकामी असल्याची जाहीर जाहिरात करत असता. त्यामुळे फुकटच्या लाईफ मिळवण्यापेक्षा, गेम बंद करून खऱ्या लाईफशी जोडले जा.

 

धन्यवाद!

सदैव आपला,
समीर दत्ताराम पडवळ

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *