सर्वधर्म समदृष्टी होई सुजलाम सुफलाम सृष्टी

नमस्कार,

गेले बरेच दिवस WHATSAPP वर जातीयवादीमुद्द्यावरून अनेक मेसेजेस गाजतायत. समाजातील प्रत्येक स्तर आपली जात श्रेष्ठ कशी हे पटवून देताना इतर जातींना खाली दाखवणारे अनेक मेसेज बनवत आहेत व सोशल मिडियाचा वापर करताना दिसत आहेत. दुर्दैवाने ‘आम्ही सारे भारतीय आहोत’ हे फक्त आणि फक्त प्रतिज्ञेपुरतेच मर्यादित राहिले आहे. ही प्रतिज्ञा आपण म्हणतो तेव्हा आपण शाळेत असतो तेव्हा आपण कोणत्याही जातीचे नसतो आणि जसजसे मोठे होतो अनुभवांचे गाठोडे वाहायला शिकतो तसतसे आपल्याला या जाती-धर्मांची आठवण होते. ‘UNITY IN DIVERSITY’  (विविधतेत एकता) असे आपण अभिमानाने म्हणायचो पण न जाणे ‘DIVIDE AND RULE’ या पायावर आधारलेले इंग्रजकालीन विचार आता मूळ रोवू पाहत आहेत आणि आपण सगळे वेगवेगळ्या जातींनी एकमेकांना ओळखू लागलोय. हा ब्राम्हणांचा, हा मराठ्यांचा, हा महारांचा अशी एकमेकांची ओळख सांगताना मी भारताचा भारत माझा  हेच आपण विसरलो तर नाही ना?

भारतीय सैन्याने मागे शत्रूराष्ट्रात घुसून अतिरेकी तळांवर हल्ला केला तेव्हा मात्र प्रत्येकाने भारताचा राष्ट्रध्वज मना मनातून, रस्त्यारस्त्यावरून ते अगदी  WHATSAPP पर्यंत सर्व ठिकाणी अभिमानाने फडकवला. सुदैवाने आम्हा सर्वाना एकाचवेळी आम्ही भारतीय असल्याची आठवण झाली. देशासाठी लढणारे आमचे सैन्यदल असो वा देशांतर्गत आम्हाला सांभाळणारे आमचे पोलीस असोत. खरं तर आम्ही अमूक एका जातीचे आहोत म्हणून ते कधीच त्यांच्या छातीची ढाल करून आमच्या संरक्षणासाठी उभे रहात नाहीत. आपापसातही त्यांची जातीची बंधने गळून गेलेली असतात. भारतमाता हीच त्यांची आई आणि भारतीय हीच त्यांची जात. किमान या खरोखरीच्या हिरोंसाठी आपण इतर जातींवर होणारी चिखलफेक थांबवायला नको का?

आणि हो आपल्याला जर आपली जात आणि धर्म याचा अभिमान आहे आणि वाटत असेल तर तो आपल्या चार भिंतीत असुदे. आपल्या दाराबाहेर सभोवताली वावरणाऱ्या अठरापगड जाती या आपल्याच भारतीय माणसांच्या आहेत तेव्हा तिथे आपल्या जातीचे मग ती कोणतीही असो अवडंबर माजवणे किती बर योग्य? आपण सारे सुज्ञ आहात. तेव्हा नीट विचार करून सर्वधर्म व जाती यांना सामावून घेईल अशी समाजव्यवस्था आपण तयार करूया. निदान आपल्या मुलांसाठी तरी, आपल्या पुढच्या पिढीसाठी तरी भारतीय हीच एकमेव जात आहे हाच संदेश देऊया.

हा संदेश मी माझ्या पुढील कवितेतून मांडत आहे. विचार आवडल्यास इतराना सांगा.

 

अभिमान असू दे धर्माचा अपुल्या

पर घृणा नको परधर्माची

जग जिंकूया मिळूनी सारे

साद देऊ भारतीयत्वाची|

दंग्या ढोप्यामध्ये जळती सारे

कित्येक पाडे, गावे अन शहरे

मुले बापडी अगतिकतेने म्हणती

नक्की माझा धर्म कोणता रे |

मानवतेची शिकवण देण्या जन्मले

या भारतभूवर अनेक तारे

त्यांच्या विचारांस अग्नी देऊनी

धर्म जपतात हे अस्तानितले निखारे |

कोणताही धर्म सांगत नाही

करण्या परधर्मीयांची खांडोळी

कोणत्या उन्मादातून होते मनुष्याकडूनच

मनुष्य देहाची अन त्याच्या संसाराची राखरांगोळी |

माणूस म्हणून जन्माला आलात तेव्हा आता

जग जिंकताना माणसेही जोडत जगा

याच एका मार्गाने बनवा परकीयानाही स्वकीय

जग तेव्हा म्हणेल गर्वाने हाच खरा भारतीय  |

आजचा प्रश्न – पालक म्हणून तुमच्या मुलांच्या मुळांवर जात-धर्म या  विषयानुरूप तुम्ही कसे संस्कार करतात/करायला हवेत?

 

आपला,

अतिश अ. कुलकर्णी- लेखक,प्रशिक्षक व वक्ता

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *