ना – त्यांना गृहीत धरताना

आकाशातील ग्रह बघण्यासाठी आपण दुर्बीण वापरतो, ते आहेत तसे पाहतो, ते जसे दिसतात तशीच त्यांच्या रंगावर आणि गुणधर्मांवर चर्चा करतो. आता हे झाले लांबचे पाहणे. जे लांब आहे ते आपण आहे तसे पाहतो पण जे जवळ आहे ते म्हणजे आपली मुले व त्यांच्या सोबतचे आपले नाते-संबंध यानाही आपण तेच परिमाण वापरतो का? उलटपक्षी जे जवळ आहे त्यांना आपण गृहीत धरतो आणि त्यांनी आपण जे गृहीत धरलंय त्यानुसार वागले नाही म्हणजे आपल्या जवळच्या ग्रहांना आपण नावे ठेवतो आणि आकसाने म्हणतो, ‘ कसला शनीग्रहासारखा माझ्या मानगुटीवर बसलाय’.

माझी मुलं मला हवी तशी वागत नाहीत… अशी अनेक पालकांची तक्रार असते. यात एक महत्वाची मेख आहे ती म्हणजे मला हवी तशी यातच आली ‘अपेक्षा’. म्हणजे त्याने किंवा तिने इतक्याच वाजता उठाव, हेच कराव, तेच करू नये, इतका वेळ अभ्यास करावा, मोबाईलवर जास्त राहू नये, मित्र-मैत्रिणींसोबत जास्त वेळ घालवू नये, नातेवाईकांना भेटण्यास आपल्यासोबत नेहमी यावे, वेगवेगळे कार्यक्रम आपल्यासोबत राहून अटेंड करावेत, असेच कपडे घालावेत, तसे घालू नये, चारचौघात असेच बोलावे ते पुढे मग हेच करिअर निवडावे पासून ते याच मुला किंवा मुलीसोबत असाच संसार करावा पर्यंत आपण त्यांना जे गृहीत धरतो त्याची पाळमुळ ही आयुष्यभर ‘अपेक्षा’ नावाच्या एकाच शब्दाची अनेक रूपं.

आणि जिथे अपेक्षा आल्या तिथे अपेक्षाभंग अपेक्षितच असतो नाही का? पण त्याचा सामना पालकांना करता येत नाही म्हणून जे दुख त्यांच्या पदरी पडते ते असते अपेक्षाभंगाचे दुख. मग साहजिकच एक प्रश्न पडतो तो म्हणजे यावर उत्तर काय? किंवा काही आईवडील, ‘मग आम्ही काय आपल्या मुलांकडून अपेक्षाच करायची नाही का?’ असे देखील म्हणतील.

यावर एक सोपा मार्ग म्हणजे घरातलं वातावरण हे प्रश्न विचारणार असाव तेही कोर्टात आरोपीला विचारले जातात तसे नाही तर अफजलखानाला धडा शिकवायला निघालेल्या शिवाजीराजांना त्यांच्या जिजामातेने विचारले तसे प्रश्न असावेत. ज्यात काळजीही असेल आणि मुलाला पुढे जाण्याचा हुरूपही मिळेल. घरातील एखादा ज्वलंत विषय जो अपेक्षांच्या मुळांवर वाढलेला असतो तो अशा प्रश्नांमुळे योग्य दिशेला वळवता येतो न पेक्षा त्याच्या परिणामांना सामोरे जाण्याची घरातील प्रत्येकाची तयारी होते. आई-बाबांनी प्रश्न तयार करताना सकारात्मक संभाषणावर भर द्यावा. मुले ही अनुकरणप्रिय असतात त्यामुळे तुमचे प्रश्न नकारात्मक उर्जा देत असतील तर उत्तरातून तीच उर्जा परत मिळेल याची खात्री बाळगा. व्यवस्थितपणे आणि सकारात्मक प्रश्न विचारल्याने वाद विकोपाला न जाता संवादाच्या माध्यमातून सोडवता येतात.

आजचा प्रश्न – आपल्या मुलांसोबतचा असा एखादा प्रसंग आठवा जो अपेक्षा वा अपेक्षाभंगामुळे (नात्यांना गृहीत धरल्यामुळे) विकोपाला गेला होता आणि कोणते प्रश्न विचारून तो हाताळता जाऊ शकला असता वा भविष्यात असा प्रसंग हाताळता येईल.

 

धन्यवाद!

अतिश कुलकर्णी

प्रशिक्षक, वक्ता व लेखक – ‘जिजाऊंची पालकनीती आजच्या पालकांसाठी’

संपर्क – ८१०८१०९४९२

इमेल – atishaspa@gmail.com

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *