पालकत्व रिचार्जर

तुम्हांला काय वाटतं?

गेल्या महिन्यात घडलेला प्रसंग. कार्यक्रम आटपून नाशिकहून ट्रेनने येत हाेते. समाेर साताठ वर्षांचा एक मुलगा आईसाेबत प्रवास करत हाेता.  आईच्या कानाशी लागून खाण्यापिण्याच्या त्याच्या काही ना काही डिमांड्स सतत  चालू हाेत्या. आई त्याला हवं ते देत हाेती. त्याचे लाड करत हाेती. विणकाम चालू असताना त्याच्याकडे अधूनमधून माझं लक्ष जात हाेतं.

काय झालं कुणास ठाऊक, पाेरगं अचानक बिथरलं. मी चमकून पाहिलं. ताे आईला दम देत हाेता

“नही दाेगी ताे मैं गाडी के नीचे कूद जाऊँगा!”

आईने पडतं घेतलं, पर्स उघडून त्याच्यासमाेर शंभरच्या काही नाेटा धरल्या. हपापल्यासारख्या त्याने त्या नाेटा ताब्यात घेतल्या.

माझ्या काळजाचे ठाेके चुकले!हातातल्या विणकामाचे टाके उलटसुलट पडून क्षणात गुंता झाला!

मनातला गुंताही वाढत गेला. मुलापेक्षा आईचं समुपदेशन करण्याची गरज मला तीव्रतेने भासली. तिच्याशी समजुतीचं  काही बाेलावं असं फार मनात आलं, पण ती उतरायच्या तयारीला लागली हाेती.

या विषयावर पालकांसाठी आणि वि्द्यार्थ्यांसाठी शाळेने मुद्दाम सेमिनार घेतले पाहिजेत, असं प्रकर्षाने वाटलं. पालकांनी मुलांच्या अयोग्य  मागण्यांना नकार द्यायला हवा. उठसूट त्यांचे हट्ट पुरवू नयेत. मागितलं की मिळतंं, मिळालंच पाहिजे ही वृत्ती त्यामुळे बळावते.

त्याचा परिणाम–दुष्परिणाम असा होतोे की, आई अभ्यासासाठी रागावली, ट्रीपला जाऊ दिलं नाही, अशा कुठल्याही बाबतीतला नकार ही मुलं पचवू शकत नाहीत. परीक्षेतलं, प्रेमातलं  कुठलंही अपयश असाे, टाेकाची अविचारी पातळी ती गाठतात. नकार, अपयश सहन करणं, त्यावर मात करून यश मिळवणं ही कुवत त्यांच्यात निर्माण होत नाही. आईवडिलांचं आपल्यासाठी खस्ता खाणं, घरची परिस्थिती, किंवा प्रतिष्ठा ह्याची त्यांना पर्वा वाटत नाही. दुस-याच्या त्यागभावनेची कदर नाही आणि आपण  त्याग करण्याचं मनातसुद्धा येत नाही.

ह्याला पुष्कळ अंशी पालक जबाबदार ठरतात.’आम्हाला नाही मिळालं, आमची ऐपत आहे, मुलांना त्यांच्या नशिबाने मिळतंय तर करू द्या त्यांना एन्जॉय!’ ही पालकांची भूमिका मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला मारक ठरते.

समुपदेशन शेजा-यापाजा-यांनी केलेलं चालत नाही. दुस-या कुणी शहाणपणाचे, समजुतीचे बाेल ऐकवलेलं पुष्कळदा तरुण पिढीला आणि लहानांनाही रुचत नाही. म्हणून सेमिनार्सची गरज वाटते. साेनाराने कान टोचलेले बरे असतात. तुम्हांला काय वाटतं?

 

डॉ. अनुपमा उजगिरे

(सुप्रसिद्ध लेखिका)

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *