आयुर्वेद- समजुती व गैरसमजूती – भाग 1

 

आयुर्वेद म्हणजे काय हे जाणून घेण्यापूर्वी आपण आधी त्याच्याशी मैत्री करूया . आयुर्वेद म्हणलं की सर्वात आधी डोक्यात विषय येतो तो म्हणजे पथ्य . आणि पथ्य म्हणलं की लगेच आपल्या अंगावर काटा येतो. कुठल्याही आईला असं कधी वाटेल का, की आपल्या बाळाने चुकीचे खावे चुकीचे वागावे  …… मुळीच नाही… कारण प्रत्येक आईला आपल्या बाळाचं फक्त कल्याण व्हावं असंच वाटत… असंच काहिस आपल्या आयुर्वेदाचं सुद्धा आहे. म्हणूनचआयुर्वेदात पथ्य अपथ्य ही संकल्पना आहे.

आयुर्वेद या शास्त्राचा उद्देशच हा आहे की , “स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम्… आतुरस्य विकारप्रशमनंच । ” (संदर्भ : चरक सूत्रस्थान ३०/ २६ )

म्हणजे मुळात तुम्ही निरोगी असाल स्वस्थ असाल तर आजारी पडू नये याची काळजी घेणे व रोगी असाल तर तुम्हाला व्याधी तून मुक्त करणे……  केवळ हाच मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून या शास्त्राची निर्मिती झाली . आयुर्वेदातील पथ्य अपथ्य या संकल्पनेविषयी सर्वाधिक गैरसमजुती आणि भीती असल्यामुळे या विषयात सर्वप्रथम हात घातला . एकादा का ही भीती गेली , की आपोआप हे शास्त्र आपले वाटू लागेल . आपण अगदी सोपे आणि व्यवहारातील काही उदाहरणांनी हे समजून घेऊ या .

आपण जे खातो; ज्या प्रकारचा आहार घेतो त्या प्रकारचेच शरीरात भाव निर्माण होत असतात जसे; रोज दूध पिणारे बाळ जो पर्यंत त्याला काही शारीरिक व्याधी होत नाहीत तोपर्यंत केवळ हसते खेळते .  उगीच कुणाला मारणे ओरडणे चिडणे हे भाव मूळात त्याच्यात निर्माणच होत नाहीत; तेच रोज अतिशय तिखट तेलकट खाणारी माणसे ही सर्वाधिक कोपीष्ट असतात . आणि तेच रोज शिळे सडके अन्न खाणारी माणसे ही निद्राळू, रोगी असतात . हिच अनुक्रमे सात्विक राजासिक व तामसिक आहाराची उदाहरणे होय. आपल्या सर्वांन्ना आवडणारे चीज हे तिसऱ्या प्रकारातच मोडते बरं का!  आपल्याला कशा स्वरूपाचे आयुष्य जगायचय हे आपल्यालाच ठरवायचय आणि हे जर आपल्या खाण्यापिण्यावर अवलंबून असेल तर निरोगी रहाण्यासाठी ह्यात आपण नक्कीच बदल करू शकतो . नाही का? ह्यालाच पथ्य म्हणतात .

पथ्ये सति गदार्तस्य किम् औषध निषेवणैः।

या श्लोकात पथ्या चे महत्व सांगताना लेखक म्हणतो, पथ्य हेच रोगी व्यक्ति चे औषध आहे नियमित पथ्य पालन करणा-या व्यक्ति ला तर औषधाची सुद्धा गरज नाही…

कारण जर आपण खाताना किंवा वागताना चुकलो नाही तर मग आपले शरीर सुद्धा आजाराच्या दिशेला वाट चुकत नाही…

मला वाटत आता तरी पथ्य म्हणलं, की नक्कीच आपल्या भुवया उंचावणार नाहीत.

 ” आयुर्वेद जगा आणि निरोगी रहा“! 

डॉ .गौरी सहस्रबुद्धे – साबळे ( एम्.डी.- आयु)

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *