प्रेरणा रिचार्जर – मला हितशत्रू हवे आहेत!

 

सगळ्यांना स्पष्टीकरण देत बसू नका. कारण जे तुमच्यावर मनापासून प्रेम करतात त्यांना त्याची गरज नसते आणि जे तुमचा तिरस्कार करतात त्यांचा तुमच्या सांगण्यावर कधीच विश्वास नसतो.

जेव्हा आपण चांगलं काहीतरी करायला लागतो, त्यात यश प्राप्त करायला लागतो, नकळत तुमच्या हितचिंतकांबरोबर हितशत्रूदेखील निर्माण होणारच. ते अटळ आहे. या हितशत्रूंचा तुमच्या प्रत्येक वागणुकीला, प्रत्येक कृतीला विरोध असेल. ते तुमच्यातलं चांगलं पाहण्यापेक्षा तुम्ही कुठे चुकता याकडे जास्त लक्ष केंद्रित करतील. त्यांच्या आयुष्यात काही वाईट घडलं तर त्याचं खापर तुमच्या माथी फोडतील. तुम्ही जे निर्माण करत आहात ते उध्वस्त करण्याच्या योजना आखत राहतील. तुमच्या पाठी तुमचं नाव खराब कसं करता येईल यासाठी जिवापाड मेहनत करतील.

लोक तुमच्यामागे बोलण्याची काही कारणे आहेत.

१. ते तुमच्यासारखं काही करण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांना जमत नाहीये.

२. ते तुमची पातळी गाठू शकत नाहीत.

३. तुमच्याकडे जे आहे ते त्यांच्याकडे नाही.

४. त्यांचं ‘लक्ष’ स्वतःच्या ‘लक्ष्या’कडे नसून तुम्ही काय करता त्याकडे आहे. त्यांचे आयुष्य ‘लक्ष’हीन आहे त्यामुळे त्यांच्याकडे पुष्कळ वेळ आहे.

याचा अर्थ या सर्व प्रकारात तुम्हीच उजवे आहात. त्यामुळे डोकं शांत ठेवा. ‘मी करतोय ते चांगलं आहे आणि त्यात माझ्यासोबत इतर बऱ्याच लोकांचं भलं अवलंबून आहे. त्याने कुणाचेही नुकसान होणार नाहीये. तर ते मी कोणत्याही परिस्थितीमध्ये करेन.’ ही धारणा ठेवा. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. आपल्यात दडलेल्या अपरंपार क्षमतांचा वापर करा. यश प्राप्त करा.

खरं म्हणायचं तर हे हितशत्रूच तुम्हाला अप्रत्यक्षपणे प्रेरणा देत असतात. ‘तुमच्याने होणार नाही’ ही त्यांची धारणा तुम्हाला काहीतरी चांगलं करण्याची स्वतःला सिद्ध करण्याची ऊर्जा देते. त्यासाठी हितशत्रू हवे आहेत. तुमच्या यशात त्यांचा खूप मोठा वाटा असतो.

हे लोक प्रथम तुम्हाला विरोध करतील, त्यानंतर यशस्वी होताना पाहतील आणि नंतर तेच लोक तुम्हाला विचारतील ‘कसं केलं भाऊ? आम्हाला पण सांग ना!’ आणि इतरांना सांगतील, ‘मी या व्यक्तिमत्वाला ओळखतो.’

येणारी पिढी तुमचे उदाहरण नजरेसमोर ठेवून भविष्यात काहीतरी अद्वितीय घडवेल.

‘मरून पण इतरांच्या विचारांत जर जगू शकलो’ तर खऱ्या अर्थाने आयुष्य जगलो. काय म्हणता?

सदैव आपला,

विनोद अनंत मेस्त्री लेखक, प्रशिक्षक, वक्ता

(९८१९४५३५३३/ www.vinodmestry.com)

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *