कुछ इस तरह से मैंने अपनी जिंदगीको आसान कर दिया!

 

नमस्कार मित्रांनो,

आज धावपळीच्या आणि दगदगीच्या जिवनात सतत यशाच्या किंवा गरजा भागवण्याच्या धडपडीत आनंद हरवलेला दिसतो. जो आनंद आपण बाह्य गोष्टीमध्ये शोधण्याचा प्रयत्न करत असतो तो खरंतर आपल्या आतच दडलेला असतो परंतू त्यावर आपल्याच आतील बऱ्याच शत्रुंच वर्चस्व असतं आणि हे शत्रु त्या आनंदाला डोकं वर काढू देत नाहीत.

त्यापैकी दोन शत्रु म्हणजे- १) अपराधाची भावना आणि २) तिरस्कार

या दोन भावनांवर मात केला तर ‘आनंद’ बऱ्याप्रकारे मुक्त होऊ शकतो आणि आयुष्य कैक पटीने सोप्प होऊ शकतं. ते कसं करावं हे मांडण्याचा हा प्रमाणिक प्रयत्न. माझ्या ‘मस्त जगा’ सेमीनार मधला एक छोटासा भाग जो तुमच्या आयुष्यात मोठा फरक आणू शकतो.

सर्वप्रथम आपण अपराधाच्या भावनेवर बोलू. ही भावना आपल्या मनात कधी येते तर आपण कुणाच्या तरी बाबतीत चुकीचं वागलो, बोललो किंवा चुकीची कृती केली तर ही भावना आपल्या मनात घर करायला लागते आणि आतून आपल्याला पोखरायला सुरुवात करते.

ती व्यक्ति (जिच्या बाबतीत आपल्याकडून काही चुकीचं घडलंय) समोर आली किंवा तिचा विचार जरी आला की आपण अस्वस्थ होऊन जातो आणि कशात मन लागत नाही. त्याच साठी या अपराधाच्या भावनेवार मात करणं गरजेचं आहे.

ते कसं करायचं बुवा?

मित्रांनो, हे मानलं तर सोपं आहे आणि मानलं तर कठीण! त्याला धाडस नक्कीच लागेल. धाडस करा आणि त्या व्यक्तीची मनापासून माफ़ी मागा. तसं केल्याने दोन पैकी एक गोष्ट घडेल.

एक) जर त्या व्यकिने तुम्हाला माफ़ केलं तर तुमचं हरवलेलं एक नातं तुम्हाला परत सापडेल आणि

दोन) जरी माफ़ नाही केलं तरी माफ़ी मागितली म्हणून तुमच्या मनावरचा भार हलका होईल.

हे धाडस जर करु शकलात तर माफ़ी मागण्याची ताकद तुमच्या लक्षात येईल. हो मित्रांनो, माफ़ी मागण्यामध्ये फार ताकद आहे.

एकदा टिव्हायबीकॉमच्या बॅचवर मी हा सेशन घेतला. सेशन संपल्यावर गौरी नावाची माझी विद्यार्थिनी मला भेटायला आली. रडवेल्या आवाजात ती मला म्हणाली, “दादा, हा सेशन तू खुप उशीरा घेतलास. दोन दिवसांपूर्वी हा झाला असता तर….” आणि तिच्या डोळ्यातून अश्रु ओघळले.

“काय झालं गौरी.”

“दादा परवा माझ्या वडिलांशी माझं भांडण झालं. एकदम कडाक्याचं! कारणही तसंच होतं. माझे वडील म्हणजे एकदम ‘पत्थरदिल’ आहेत. त्यांना भावना नाहीतच मुळात. लहानपणापासून आजपर्यंत कधी माझ्याशी प्रेमानं दोन गोष्टी बोलल्याचं आठवत नाही आणि हा, चुकी झाली की ओरडायचं विसरत नाहीत ते. इतका कठोर हृदयाचा माणूस मी कधीच पाहिला नाही. त्यांचं त्यांच्या आईवर फार प्रेम होतं. ती जेव्हा वरली तरीदेखील त्यांच्या डोळ्यातून अश्रुचा एक थेंब ओघळला नाही. इतका कठोर. परवा किरकोळ कारणावरून माझं त्यांच्याशी भांडण झालं आणि मी त्यांना खुप उलट सुलट बोलले.”

मी शांतपणे सर्व ऐकत होतो.

“मग आता तुला काय वाटतंय?”

“दादा, खुप चुकल्यासारखं वाटतंय रे! मी असं बोलायला नको होतं.”

“मग आता काय करायला हवं”

“त्यांची माफ़ी मागायला हवी.”

“मग गौरी ती आजच माग. हे काम उद्यावर ढकलु नकोस. वाईटात वाईट काय होईल. ते माफ़ करणार नाहीत, बरोबर? पण गौरी तू त्यातून मोकळी होशील. आज हिम्मत करच आणि मला सांग काय झालं ते.”

गौरी निर्धारानं उठली आणि निघून गेली. माझ्या पुढच्या लेक्चरला मी मुलांचा फॉलोअप घेत होतो. गौरी सगळ्यात आधी पुढे आली.

“दादा, सगळ्यात आधी मी तुझे खुप आभार मानते. तू सल्ला दिल्याप्रमाणे मी त्या दिवशी पप्पांची माफ़ी मागायचं ठरवलं. त्या संध्याकाळी पप्पा कामावरुन आले. फ्रेश होऊन ते खुर्चीत बसले होते. मी त्यांच्या समोर गेले. गुढग्यावर बसले आणि हात जोडून त्यांची माफ़ी मागितली आणि मला रडु आवरलं नाही. दादा, तुझा विश्वास बसणार नाही. माझे पप्पा ज्यांना मी इतका कठोर हृदयाचा समजत होते, त्याचक्षणी त्यांनी मला मिठीत घेतलं आणि एखाद्या लहान मुलासारखे ओक्षीबोक्षी रडायला लागले. इथे अशा किती मूली आहेत माझ्या वयाच्या ज्यांना त्यांचे वडील मांडीवर बसवून जेवण भरवतात. माझ्या वडिलांनी मला कळायला लागल्यापासून पहिल्यांदाच मांडीवर बसवून मला जेवण भरवलं. दादा, तुझ्यामुळे मला २० वर्षांनंतर माझे बाबा सापडले.”

गौरीच्या या शब्दांनी माझ्यासकट त्या वर्गात सगळ्यांचेच डोळे पाणावले असतील तर नवल ते काय?

मित्रांनो, एक माफ़ी कित्येक वर्षांचं हरवलेलं नातं परत मिळवून देवू शकते. मग विचार कसला करता? बनवा त्या लोकांची यादि ज्यांना कळत नकळतपणे तुम्ही दुखावलं आहे. माफ़ी मागा त्यांची आणि अपराधाच्या भावनेवार मात करा.

आता आनंदाचा दुसऱ्या शत्रुवर बोलू. तो म्हणजे ‘तिरस्कार’. तिरस्कार आपल्याला सुखानं जगू देत नाही. आपल्याला तिरस्कार कधी वाटतो. दुसऱ्या कोण्या व्यक्तीने आपल्याबाबतीत काही चुकीचं केलं असेल तर. आता ही दूसरी व्यक्ती दोन प्रकारची असू शकते. एक, जी कधी काळी आपल्या फार जवळ होती. आपलं नातं फार घट्ट होतं. तिच्याकडून काही चूक झाली आणि आपण नातं तूटलं. जर ही व्यक्ती महत्त्वाची असेल तर ज्या मुद्द्यामुळे ते घडलं त्यापेक्षा त्या व्यक्तीला महत्त्व दया आणि माफ़ करा. ते नातं पुन्हा सापडेल आणि तुमच्या मनातील नाराजी संपून जाईल.

आणि हा! जर ती व्यक्ती मुळातच वाईट आहे, नकारात्मक आहे, तरीदेखील तीला माफ़ करा. असं का? तर जोवर तुम्ही तीला माफ़ करत नाही, ती व्यक्ती भाडं न देता तुमच्या डोक्यात घर करून असते. तुम्ही एखाद्या आनंदी प्रसंगी आहात, मस्त मजा करताय आणि ती व्यक्ती आली तर तुमचा मूड एका क्षणात खराब होतो आणि संपूर्ण कार्यक्रमावर त्याचा परिणाम होतो. अशा व्यक्तींना डोक्यातून काढून टाकण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांना माफ़ करा. तुमचा मनात आणि विचारात त्यांनाच जागा दया, जे तुमच्यावर प्रेम करतात.

माफ़ करा आणि तिरस्कारापासून स्वतःची सुटका करून घ्या.

मग बनवा यादि त्या लोकांची ज्यांना तुम्हाला माफ़ करायचंय आणि करुन टाका माफ़.

‘माफ़ी मागा’ आणि ‘माफ़ करा’ या दोन गोष्टी तुमच्या मनावरचा भार हलका करायला तुम्हाला निश्चितच मदत करेल आणि आनंद आपोआप मुक्त होईल.

“कुछ इस तरह से मैंने अपनी जिंदगीको आसान कर दिया

किसीसे माफ़ी मांग ली, किसी को माफ़ कर दिया।”

 

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *