खरा ‘पुरुषार्थ’

काल पनवेलवरून घरी जाताना गाडीचा टायर पम्चर झाला. हायवे शेजारी पेट्रोलपंपाला लागून असलेल्या एका पम्चर काढणाऱ्याजवळ गाडी घेवून आलो. तो वयानं तिशीतला असावा. त्याचं काम चालू होतं आणि मी देखरेख करण्यासाठी बाजूला उभा होतो. तो होता पक्का बोलबच्चन. तोंडाची सतत बड़बड़ चालू होती. माझ्याकड़े पर्याय नसल्यामुळे मीही गप्पा चालू केल्या. त्याच्याविषयी विचारपुस चालू केली आणि कळलं त्याचं लग्न झालंय. तो सांगत होता. “सर मेरी बीवी ग्रॅज्युएट है. वो भी सायन्समें. लेकिन शादी तय होते वक्त मैंने साफ़ कह दिया. शादी के बाद पढ़ाई छोड़नी पड़ेगी. और जॉब नही कर सकती. साब ये औरते अगर जॉब करे ना तो इनके तेवर बदल जाते है. ये आपकी नहीं सुनती. इन्हें अपने औकाद में रखना जरुरी है. औरत की तक़दीर में ही लिखा होता है, की वो शादी करे. बच्चे संभाले. पतीकी, सांस-ससुर की सेवा करे. इनको जितना दबाके रखो उतना अच्छा है।”

माझ्यासाठी हा संभाषणाचा शेवट होता. माझ्या समोर असलेला तो व्यक्ति एक आडाणी पम्चर काढणाराच  नव्हता तर स्त्रियांवर वर्चस्व गजवणाऱ्या ‘पुरुष प्रधान’ संकृतीचा एक खंदा कार्यकर्ता होता. आणि हे कार्यकर्ते केवळ या आडाणी लोकांमध्येच आहेत का? तर नाही या सुशिक्षित समाजात पण ते अभिमानानं वावरत आहेत. अशा लोकांची खरतर मला चीड़ येते.

एक मुलगी जी वेगळ्या वातावरणात वाढते. आयुष्याची कित्येक वर्षे ती आई-बाबांच्या लाडात जगते. आईच्या काळजाचा तुकड़ा आणि वडिलांचा श्वास. हे सगळ जग मागे सोडून ती एका अनोळखी घरी येते. तिकड़चं सगळं वातावरण तीला परकं. फ़क्त नवराच नाही तर त्या घरातील प्रत्येक व्यक्तिचं मन जिंकण्यासाठी जीवाचं रान करते ती. एक चांगली पत्नी, चांगली सुन, चांगली वहिनी, चांगली भावजय, कालांतराने चांगली आई…किती किती भूमिका यशस्वी रित्या पार पाडायच्या असतात. दिवसरात्र तारेवरची कसरत. पतिचं जग ती आपलं जग बनावण्याचा अटोकाट प्रयत्न करते.

जर जॉब करत असेल तर घर आणि जॉब दोन्ही जबाबदाऱ्या आणि जरी ती गृहिणी असेल तर ती जबाबदारीसुद्धा छोटी नव्हे.

हे सगळ ती करते…थकून जाते. पण तसं दाखवत नाही. कारण संध्याकाळी सो कॉल्ड थकून भागून आलेल्या नवऱ्याला तिच्या चेहऱ्यावर हसु हवं असतं. आश्चर्य म्हणजे  एवढी दगदग करून पण तीला ते शक्य होतं.

आणि या सगळ्या गोष्टींच्या मोबादल्यात तीला काय हवं असत. तर आपण करत असलेल्या जीवतोड़ मेहनतीचं कधीतरी कौतुक व्हावं. प्रेमाचे (वरवर दिखाव्याचे नव्हेत) चार शब्द ऐकायला मिळावेत. ती करत असलेलं काम देखील या घराच्या स्थिरतेसाठी तितकंच महत्त्वाचं आहे याची जाणीव कळत नकळत तीला करून दिली जावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिचा आत्मसन्मान शाबूत रहावा.

परंतू दुर्दैवानं बऱ्याच ठिकाणी हे चित्र दिसत नाही. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छाचे मेसेज पाठवणारे, स्त्री हक्कांविषयी जंगी चर्चा करणारे, घरी आल्यावर “जास्त शाहणपणा पाजळू नकोस. आपल्या मर्यादेत रहा.”, असं बजावणारे सुशिक्षित पुरुष, स्वतःच्या बहिनीचे सासरी होणारे हाल पाहून हळहळणारे आणि घरी आपल्या बायकोशी तसेच वागणारे ‘पुरुष’, हे सगळे एक गोष्ट कधी समजतील की स्त्रियांना जर त्यांचं अस्तित्व जपण्यात मदत केलीत तर त्या तुमचं अस्तित्व घडवायला आपलं जीव-प्राण एक करतील.

“स्त्रीला आपल्या दबावाखाली ठेवणं, तिच्यावर अधिकार गाजवणं म्हणजे ‘पुरुषार्थ’ नव्हे.

तीला समजून घेणं, तीला विचारात घेणं, तीला तिच्या अस्थित्वाची जाणीव करून देणं…ते जपणं, तिलाही आयुष्यात काहीतरी गाठण्यासाठी मदत करणं, तिचा आणि तिच्या भावनांचा आदर करणं, तिचंही मत विचारात घेणं म्हणजे खरा पुरुषार्थ!”

काढ़ा आठवड्यातून एखादा वेळ ख़ास तिच्यासाठी. करा तीलापण तिच्या कामात मदत. एक दिवस तीला म्हणा “तू आज आराम कर, मी बनवतो जेवण.”

शक्य तिथे, शक्य तितक्या वेळा तीला न्या तुमच्या सोबत, अभिमानानं सांगा सगळ्यांना की “हि माझी अर्धांगिनी आहे आणि आज मी जो कोणी आहे त्यात हिचा सुद्धा महत्त्वाचा वाटा आहे.”… आणि हे सगळं केल्याने जर तुमचे काही मित्र तुम्हाला ‘बायकोच्या बैल’ म्हणत असतील तर सोपं आहे…मित्र बदला!

 

सदैव आपला,

विनोद अनंत मेस्त्री

लेखक, प्रशिक्षक, प्रेरणादायी वक्ता

9819453533

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *