Thoughts Become Things

आनंद हा शोधण्याचा विषयच नाही पण लोक आनंदाचा शोध घेत असतात. मग आनंद मिळवण्यासाठी वस्तू पाहिजेत, comforts of life पाहिजे, पैसे पाहिजेत. त्यासाठी लोक पैशाच्या मागे धावताना दिसतात. पैशाच्या मागे लागून आनंद मिळतो का दुःख मिळतं ते पैसेवाल्याना  विचारा, तुम्हाला बाहेरून वाटेल हा पैसेवाला आहे, श्रीमंत आहे म्हणजे खूप आनंदात आहे परंतु त्यांची दुःख त्यालाच ठाऊक असतात. त्याला गुंडांची चिंता, शेजाऱ्यांची चिंता, आपल्या नातेवाईकांची चिंता सतत सतावत असते. कदाचित सर्वसामान्य माणूस त्याच्यापेक्षा अगदी सुखी जीवन जगत असतो.

चित्ता, चिता आणि चिंता या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. चित्ता म्हणजे वाघाची जात,तो माणसाला एकदा खाऊन टाकतो म्हणजे माणूस मोकळा आणि तोही मोकळा. चिता ही माणसाला जाळून टाकते म्हणजे काम झालं. परंतु चिंता ही अशी गोष्ट आहे की माणसाला सतत जिवंत असताना जाळीत असते. अगदी क्षणोक्षणी म्हणून चिंता म्हणजे-Tension,Stress ही सर्वात वाईट गोष्ट आहे.

चिंता आणि चिंतन असे दोन भाग आहेत, माणूस चिंता करण्यात पटाईत आणि सराईत आहे पण चिंतन करण्यामध्ये, चिंतन कशाचं करायचं हे त्याला ठाऊक नसतं. तो चिंतन करतो नको त्या गोष्टींचे. भविष्याची चिंता भूतकाळातील वाईट गोष्टींचे चिंतन. चिंता आणि चिंतन यात चिंता तर वाईटच आहे पण चिंतानाबद्दल ही माणूस अज्ञानीच आहे. सामान्यपणे आपला दररोज अनेक व्यक्तींशी संबंध येतो. यामधून काही व्यक्तींशी आपले विचार जुळतात तर काहींशी ते जुळत नाहीत. ज्या व्यक्तींशी आपले विचार  जुळत नाहीत त्यांच्याबरोबर आपलं पटतही नाही परिणामी अशा व्यक्तींबरोबर काम करत असताना मनात त्यांच्याबद्दलचे चिंतन फारच वाईट चालू असतं. परिणामी अशा माणसांना वाईट चिंतन करण्याची कालांतराने सवयच जडते.

विज्ञानाने आज जी प्रचंड प्रगती केली आहे त्यात शास्त्रज्ञांनी चांगले चिंतन करून नवीन शोध लावले परिणामी माणूस सुखी होण्यासाठीचा फायदाच झाला,परंतु दुसऱ्या बाजूने तोटाही झाला, कारण आज संपूर्ण जग विनाशाच्या उंबरठ्यावर उभं आहे. काही दिवसांपूर्वीच आपण ऐकत होतो, उत्तर कोरिया अमेरिकेला युद्धाची धमकी देते या गोष्टी चिंतनातूनच उदयाला येतात, परिणाम मात्र खूपच भयंकर कारण जर तसे झाले तर दोन्ही देशांकडे एवढी क्षेपणास्त्र आहेत की युद्धानंतर  विजय साजरा करावयास सुद्धा कोणी उरेल की नाही याची खात्री देणं कठीण.

सांगायचा मुद्दा असा की, तुम्ही भूताचा चिंतन केले तर भूत व्हाल, देवाचं चिंतन केलं देव व्हाल, पैशाचा चिंतन केले पैसेवाले व्हाल, म्हणजेच श्रीमंत व्हाल. थोडक्यात चांगल्या गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी आपले चिंतन सुधारणे अत्यंत महत्त्वाचे आहे . समोरची व्यक्ती कितीही वाईट असेल परंतु त्यांच्याबद्दल शुभ चिंतन करणे पूर्णपणे माझ्या हातात आहे. याची सुरुवात आपल्या प्रत्येकापासून व्हायला हवी.

आपण स्वतःला विचारून पाहू की घरात किंवा घराबाहेर आपला संपर्क ज्या व्यक्तींशी येतो त्या व्यक्तींबद्दल आपल्या मनात वाईट विचार तर येत नाहीत ना? कारण आपण जर वाईट चिंतन केले तर आपलयाकदे वाईटच येणार..

 

प्राध्यापक भास्कर पोखरकर

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *