स्वप्न ठरवताना आवश्यक ६ गोष्टी (तुमच्या जगण्याचा हेतू तुम्ही शोधलाय का?)

नमस्कार,

मंडळी, आपण खरच खूप भाग्यवान आहोत कि आपण अशा मातीत जन्म घेतलाय ज्या मातीला इतिहासाचा वैभवशाली वारसा लाभलेला आहे. हीच ती माती ज्यामध्ये एका महत्त्वकांक्षी सरदाराच्या मुलाने आपल्या वडिलांचं स्वप्न उराशी बाळगलं आणि त्याचं रुपांतर एका साम्राज्यात केलं. एक असं साम्राज्य ज्याचं वार्षिक उत्पन्न ४ लाख कोटी इतकं होतं. २६०००० ची फौज, ३६० किल्ले, ५०००० अरबी घोडे होते. आरमार बांधून १०० मैल समुद्रकिनाऱ्यावर साम्राज्य, त्यात ६४० लढाऊ नौका, ३० मोठी गलबते आणि १२ देशांशी यशस्वी व्यापार ज्या राजानं केला ते आपले छत्रपती शिवाजी महाराज…

 

आज मी व्हिजन बद्दल संवाद साधणार आहे.

आपण जगण्यासाठी जे काही करत आहात तेच तुमचं व्हिजन, तुमच्या जगण्याचा हेतू आहे का? हे आपण कसं ओळखणार? ते महाराजांच्या व्हिजनशी जोडून मी तुमच्यासमोर मांडतो आहे. आपण जे करतोय तेच योग्य व्हिजन आहे का हे ओळखण्यासाठी त्यामध्ये पुढच्या ६ गोष्टींचा समावेश असणं अत्यंत गरजेचं आहे.

 

१. बुद्धिमत्ता:

आपण जे काही करतोय त्यामध्ये आपली बुद्धिमता पणाला लागत आहे का? कि आपण तेच ठरलेलं काम रोज करत आहोत. महाराजांच्या बुद्धिमत्तेचं एकंच जबरदस्त उदाहरण मी तुम्हाला देईन. अफझलखानाने पहिला वार केला म्हणून महाराजांनी त्याला मारलं. आणि नसता केला तर? नसतं मारलं? अफझलखानाला मरायचंच होतं. कारण अफझल खान जगप्रसिद्ध योद्धा होता, त्याने काबुल पर्यंत आपली तलवार गाजवली होती आणि सगळीकडे त्याची दहशत होती. त्यावेळी महाराजांना लोकल एरिया बाहेर कोणी ओळखत नव्हतं आणि जो जगप्रसिद्ध आहे त्याला आपण  मारलं तर आपण पण वर्ल्ड फेमस होणार ना बॉस! शिवाय शत्रूंमध्ये दहशत वाढेल ते वेगळ….बुद्धिमत्ता. आपल्या उद्योगात्त आपली बुद्धिमता अशीच पणाला लागत आहे का?

 

२. वेड:

आपण जे करतोय ते आपलं वेड आहे का? वेंड किंवा passion म्हणजे आपण जे काम करतोय त्या साठी आपण वेळेचं बंधन ठेवत नाही. दिवसरात्र एक करून आपण ते काम करायला तयार असतो. विचारपूर्वक धोका पत्करायला आपण तयार असतो आणि नेहमीच पुढाकार घेतो. महाराजांनी कैक लढाया केल्या त्यातल्या १२५ लढाया शत्रूच्या गराड्यात जाऊन लढल्या आणि महत्त्वाच्या कित्येक लढायात ते स्वतः होते. अफझलखानाशी लढायला स्वतः गेले. शाहिस्तेखानावर छापा टाकायला स्वतः गेले, आग्र्यात जाणं म्हणजे मृत्यूच्या दाढेत जाणं हे माहित असताना सुद्धा आग्र्याला स्वतः गेले. “आज मला जरा बरं वाटत नाही, तानाजी तू जा, बाजी तू जा असं केलं नाही.” आपलं अखंड आयुष्य आपल्या स्वप्नासाठी वाहिल. सुट्टी घेतली नाही किंवा फिरायला गेले नाहीत. हे आहे passion. हे आपल्या उद्योगात आहे का?

 

३. गरज:

तिसरी गोष्ट महणजे गरज. तुम्ही जे करताय ती इतरांची गरज आहे का? कि तुम्ही जे करताय ते इतरांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करता आहात? महाराजांचं स्वप्न हि जनतेची गरज होती आणि त्याचं मुळे जनता यासाठी महाराजांच्या बाजूने उभी राहिली. महाराजांच्या निधनानंतर लाखोंची फौज घेवून स्वराज्य संपवण्यासाठी आलेल्या औरंगजेबाशी, कोणतेही स्थिर नेतृत्व नसताना तब्बल २७ वर्षे जनता लढत होती. शेवटी औरंगझेबाला हत्ताश होऊन याच मातीत मरावं लागलं. आज त्याचं औरंगाबादला छोटंसं थडग आहे जे पाहायला कुणी जात नाही आणि महाराजा करोडो लोकांच्या मनात प्रेरणा बनून धगधगत आहेत. कारण त्यांनी तेच केलं जे लोकांची गरज होती. आपण जे करताय ती लोकांची गरज आहे का?

 

४. सद्सद्विवेक:

सद्सद्विवेक म्हणजे काय? तर काय चांगलं आणि काय वाईट हे आपल्याला माहित असणं आणि जे चांगलं आहे ते कोणत्याही अवस्थेत करणं आणि जे वाईट आहे ते कोणत्याही परिस्थितीत न करणं. महाराजांनी जे केलं त्यामध्ये आपल्याच काय शत्रूच्या जनतेलाही हानी होऊ दिली नाही. कोणती मशीद पडल्याचं,शत्रूराज्यात जाळपोळ केल्याच उदाहरण नाही. शत्रूशी शत्रू प्रमाणे वागलो परंतु मित्रांना दगा दिल्याचं दाखवून द्या हे ते छातीठोकपणे सांगू शकत होते. आपण जे करतोय त्यामध्ये आपला सद्सद्विवेक वापरला जात आहे का?

 

५. आर्थिक इंजिन:

पाचवं आणि महत्वाचं…पण लक्षात ठेवा आपण त्याला पाचवं स्थान दिलय. तुमच्या स्वप्नात तुमचं आर्थिक इंजिन चालवण्याची क्षमता आहे का? कारण सर्व सोंग आणता येतात. माझ्याकडे भरपूर पैसा आहे अस सोंग आणता येत नाही. आणि तुमच्या स्वप्नाला मिळकतीची जोड असेल तर ते टिकेल. नाहीतर कुठेतरी जावून रस निघून जाण्याची शक्यता आहे आणि अर्थातच स्वराज्याचा आजच्या चालना नुसार ४ लाख कोटींचा annual turnover हे सांगतो कि स्वराज्य स्वप्नात आर्थिक इंजिन चालवण्याची क्षमता होती.

 

६. आपल्यानंतरही टाकणारं स्वप्न:

सगळ्यात शेवटच म्हणजे तुमचं स्वप्न तुमच्या नंतरही टिकणार हवं. आपला एक गैरसमज आहे कि महाराजांचं स्वप्न त्यांच्या नंतर १५-२० वर्षांत संपून गेलं पण नाही १८१८ पर्यंत टिकलं वाढलं ते महाराजांचं स्वप्न होतं आणि १८१८ ला जवळपास ७०% भारत मराठा साम्राज्याच्या अधिपत्याखाली आला होता. तब्बल १७३ वर्षे जगलं ते स्वप्न. व्हिजन तेच जे तुमच्या नंतरदेखील टिकेल.

तर मित्रांनो, तुमच्या या उद्योगात तुमची बुद्धिमत्ता पणाला लागत असेल, तुम्ही जे करता त्याचं तुम्हाला प्रचंड वेड असेल, ती लोकांची गरज असेल, ते सद्सदविवेकाला धरून असेल, त्यात तुमचं आर्थिक इंजिन चालवण्याची ताकद असेल आणि ते तुमच्या नंतर टिकणार असेल तरच ते तुमचं व्हिजन आणि जगण्याचा हेतू…हे सगळं सविस्तर ऐकायचं असेल तर मी माझी यूट्यूब व्हिडीओची लिंक दिली आहे.

 

झोप येत नाही आताशा स्वप्नच पडले असे

डोळे मिटावे वा उघडावे तितकेच स्पष्ट तर दिसे

 

धन्यवाद!

विनोद अनंत मेस्त्री

लेखक, प्रशिक्षक आणि वक्ता

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *