सर्वधर्म समदृष्टी होई सुजलाम सुफलाम सृष्टी

२१व शतक भारत आर्थिक महासत्तांच्या शर्यतीत पहिल्या पाच राष्ट्रात नक्कीच कुठेतरी आहे. या पहिल्या काही नंबरात येण्यात आपली अनेक वर्ष गेलीत तसेच येणारी अनेक वर्ष यात तग धरून राहणेही कठीण असणार आहे. अशातच संपूर्ण जगाला लागलेली वाळवी म्हणजे स्वधर्माचा अभिमान बाळगताना परधर्मियांचे चालू असलेले शरसंधान. वेगवेगळ्या अतिरेकी व धर्मवेड्या संघटना जगाच्या पाठीवर सगळीकडेच आहेत तशा त्या भारतात देखील आहेत. सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र घेऊन एका धर्मनिरपेक्ष राष्ट्राची स्थापना हा उद्देश अजून तरी दिवा स्वप्नंच आहे.

 

फार लहान वयातच मुलांना हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, शीख, बौद्ध अशा अनेक धर्मांविषयी सांगण्यात येत. जे काही सांगितलं जात ते इतर धर्मांविरुद्ध असत. राम सेना, रहीम सेना, भीम सेना, आणि काही दले आपापल्या धार्मिक गोष्टींच इतकं अवडंबर माजवताना दिसत आहेत की या धर्मातील लहान मुलांनादेखील त्यांच्या धर्माची परमोच्च शिकवण माहित नाही. अशा मुलांना हे माहितही नसतं की माझा धर्म हा मानवता वादाची शिकवणूक देतो. दुर्जनांचा नाश हे जरी धर्मग्रंथात सांगितले असेल तरी दुर्जन हा प्रत्येक वेळी परधर्मातील नसतो हे मुलांना कोणी सांगत नाही. त्याच वेळी जातीयतेच विष हे तर आता सर्वत्र भिनलं आहे. माणूस म्हणून एकदा जन्म घेतल्यावर त्याची वेगळी जात असू शकते का? कारण या जातींचा एकमेकांना फायदा होण्या ऐवजी राजकारण व राजकारण्यांना फायदा होताना मात्र नेहमीच दिसतो. एक पालक म्हणून आता तुम्हालाच ही विषवल्ली आपल्या घरातून तरी काढून टाकायची आहे.

 

याला अनुसरून आपण सर्व मराठी जनता ज्या शिवरायांवर आपण आपल्या ३३ कोटी देवांपेक्षा जास्त प्रेम करतो त्याच शिवाजी महाराजांपुर्वी एकंदर जनतेची स्थिती कशी होती हे आपणासर्वांना ठाऊक आहेच. अशा निद्रिस्त समाजाला जागे करण्यासाठी महाराष्ट्र धर्माची मुहूर्तमेढ शिवबांनी रोवली. त्यात कोण्या एका धर्मा विरुद्ध आवाज उठवण्यासाठी केलेली पुंडाई नव्हती तर स्व धर्मीयांसोबत इतर धर्मियांनाही सन्मान व न्यायाने वागवले गेले पाहिजे हा एक विचार होता. हा विचार त्यांच्या पर्यंत जाणीवपूर्वक पद्धतीने पोचवणाऱ्या होत्या त्या म्हणजे आऊसाहेब जिजामाता. यात काहीच संदेह नाही कि स्वराज्याची उमेद जिजाउंच्या मनात होती याला कारण त्या काळच्या मुस्लीम राजवटींना कंटाळलेली जनता पण त्याही पेक्षा महत्वाचे कारण म्हणजे जिजाउंचे वडील व भावंड यांचा खून निजामाच्या दरबारात कट करून करण्यात आला. संपूर्ण माहेर संपले असे जरी असले तरी स्वराज्यात परधर्माचा अनादर कधीही केला गेला नाही.

 

जिजामातेच्या शिकवणुकीमुळे शिवबांच्या सैन्याने गरीब रयतेस मग ती आपली असो कि शत्रूची पण विनाकारण कधीही त्रास दिला नाही. परस्त्रिया मातेसमान मानल्या इतकेच काय तर स्व-सैन्यातील कोणी त्यांचा अपमान केला तर प्रसंगी देहांत शासन केले. परधर्मियांच्या देवळांचा, मशिदींचा कधीही नाश केला नाही किंवा धर्मग्रंथांचा अपमान केला नाही. शिवबांनी मशिदींचे रक्षण करून व मशिदींना व फकिरांना पूर्वी दिलेल्या देणग्या, इनामे इ. कायम ठेवले व प्रसंगी नवीन देणग्या देऊन परधर्माचा आदर केला. असल्याप्रकारची शिस्त असल्यामुळे महाराजांविषयी परकीय शत्रूच्या मनात देखील आदरभाव होता.

 

स्वराज्यातही मदारी मेहतर, आरमार प्रमुख – दौलत खान, वकील – काझी हैदर, तोफखाना प्रमुख – इब्राहिम खान, अफझलखानच्या फौजेतील सिद्दी हिलाल, रुस्तमे जमान – महाराजांचा मित्र ज्याने अफझलखान वधाच्या वेळीस वाघनखे पाठवली,  घोड दलातील सरदार – सिद्दी वाहवाह (सिद्दी हिलाल चा मुलगा), फोंड्याचा किल्लेदार व महाराजांचा अंगरक्षक – सिद्दी इब्राहिम, दर्यासारंग – मायनाक भंडारी, शिवा न्हावी, स्वराज्याचा पहिला सरनौबत – नूरखान बेग, हवालदार सिद्दी अंबर वहाब, लष्करी अधिकारी हुसेनखान मियाना, सुलतान खान व दाउत खान – आरमार सुभेदार, आणि इतर अनेक.  शिवबांच्या सैन्यापैकी ३५ टक्के सैन्य मुस्लीमांच होत. घोडदलातील १,०५,००० पैकी ६०,००० मुस्लिम सैनिक होते.  त्यांच्या २७ अंगाराक्षाकांपैकी १० मुसलमान होते. त्यांचे पहिले चित्र रेखाटणारा मीर मोहम्मद हा देखील मुस्लिम होता. राजमाता जिजाउंकडून झालेल्या भगवद्गीतादी धर्मग्रंथातील तत्वांच्या शिकवणुकीमुळे परधर्माचा आदरही महराजांच्या मनात कायम राहिला.

 

धर्म रक्षणाचे कार्य महाराजांनी अगदी उत्तम केले म्हणून रामदास म्हणतात –

या भूमंडळाचे ठायी | धर्मरक्षी ऐसा नाही |

‘महाराष्ट्रधर्म’ राहिला काहीं | तुम्हां कारणे ||

 

कौटिल्याने धर्मविजयी, लोभविजयी आणि असुरविजयी  असे तीन प्रकारचे राजे सांगितले आहेत त्यात छत्रपती शिवाजी महाराज हे प्रभू रामचंद्राप्रमाणेच धर्मविजयी होत. कारण ते स्व-धर्माभिमानी तर होतेच पण त्यांना पर धर्माचा तिटकारा नव्हता. म्हणूनच तर इतिहास तज्ञ श्री. राजवाडे म्हणतात, “अलेक्झांडर, सीझर किंवा नेपोलियन या दिग्विजयी पुरुषांशी शिवाजीची तुलनाच करणे अयोग्य आहे. कारण शिवाजीचे वर्तन न्यायचे, नीतीचे, पराक्रमाचे, स्वधर्मपरायणतेचे व परधर्मसहिष्णुतेचे होते.” हाच खरा समर्थ रामदासांनी सांगितलेला महाराष्ट्र धर्म होय.

 

माझ्या पालक मित्रांनो, आपणही आपल्या पाल्यास कधीतरी राजा म्हणाला असलाच ना! मग हा राजा पर धर्माविषयी आदरभाव असणारा बनवण्याची जबाबदारीही तुमचीच आहे. खरे तर आपापल्या देवाची व्याख्या करून त्याला अपेक्षित असलेल्या योग्य-अयोग्य आचरणाचे नीतीनियम ज्या पुस्तकांत लिहिले गेले त्यांना धर्मग्रंथ म्हणतात व त्या प्रमाणे वागणाऱ्यांना एका विशिष्ट धर्माचे लेबल लावले गेले. मग या निरनिराळ्या लोकांनी त्यांना समजलेला धर्माचा अर्थ लावला व त्याप्रमाणे कृती केली. त्यामुळे आजही आपापल्या धर्मांचे अर्थ शोधण्यासाठी कित्येकांचे खून पडतायत.

 

माझ्या प्रिय पालक मित्रांनो अनादिकालात जेव्हा धर्म संस्थापकांनी हे धर्मग्रंथ लिहिले तेव्हाची सामाजिक, राजकीय, आर्थिक, निसर्गाचे अवलोकन, सुख-दु:ख हे सर्व आजच्या तुलनेने खूप वेगळे होते. सर्व जगाने विज्ञानाची कास धरून केलेली प्रगती लक्षात घेता आजच्या काळाशी सुसंगत असा एकच धर्म तो म्हणजे मानवता हाच असावा म्हणजे हिंसेचे कारणच उरणार नाही.

 

पण हे बऱ्याच लोकांच्या पचनी पडणार नाही तेव्हा जे धर्म ज्ञात आहेत त्यांचा अजून अभ्यास करून वर्तमानकाळाशी त्याची सांगड घालताना त्यात आवश्यक ते बदल करण्याची. सर्वसमावेशक प्रगती साधण्यासाठी आजच्या काळात हे खूप गरजेचे आहे. म्हणजे पालाकानो घरात वा खाजगीत तुमचे वर्तन हे धार्मिक असूद्यात पण जेव्हा तुम्ही सर्वांमध्ये असाल तेव्हाचे सामाजिक वर्तन हे धर्मनिरपेक्ष असुदेत. पालकांनी आपली धार्मिक कृत्ये आपल्या घरात मुलांना शिकवावी पण जेव्हा आपण समाजात वावरत असतो तेव्हा हा सर्व धर्मांचा आदर करावा हेही आपल्या धर्मात सांगितले आहे हे मुलांना समजावून त्याप्रमाणे इतरांशी वागण्यास सांगणेही गरजेचे आहे.

 

आपली मुले अनुकरणप्रिय असतात. अशाप्रकारचे वर्तन स्वीकारून तेही सामाजिक शांतता राखण्यात मोलाची भूमिका बजावतील. एक पालक म्हणून तुम्ही सुद्धा भगवद्गीता, बायबल, कुराण, गुरुग्रंथ साहिब, बुद्धांची शिकवण अशा अनेक धर्मांचा अभ्यास करून त्यातून शिकवलेली मानवता वादाची शिकवण तुमच्या मुलांना देऊ केली तर ते नक्कीच परधर्माचा आदर ठेवण्यास शिकतील. मानवता वा भारतीयत्व याच एका धर्माची मुलांना लहानपणापासून शिकवण द्या. आणि ही मानवता टिकवण्यासाठी लागणारी मानसिकता पालकांनी मुलांमध्ये तयार करा. तसेच तुमचे इतर धर्माविषयी काही कलुषित मत असेल तर ते मुलांसमोर मांडू नका. त्यांना त्यांच्या अनुभवातून शिकू द्या.

 

आपल्या भारत देशात अनेक वंचित आहेत ज्यांच्या मुलभूत गरजा देखील पूर्ण होऊ शकत नाहीत. आपल्या मुलांना अगदी लहानपणापासूनच बहुजनांच्या हितासाठी काहीतरी करायला लावा. यातून मुलांची जातीधर्मांची वसने गळून पडतील व सर्वधर्मसमभावीवृत्तीने ते सर्वांशी वागतील. अशा गरजू समाजाला कोणत्याही जाती वा धर्माचं लेबल लावून त्यांना अजून वंचित करू नका. विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने पुढे जाणाऱ्या या जगात जर आता तुमची वा तुमच्या मुलाची कोणती जात वा धर्म असेल तर तो त्याचे कर्म असुद्या.

 

‘मी भारतीय’

अभिमान असू दे धर्माचा अपुल्या

पर घृणा नको परधर्माची

जग जिंकूया मिळूनी सारे

साद देऊ भारतीयत्वाची||१||

दंग्या ढोप्यामध्ये जळती सारे

कित्येक पाडे, गावे अन शहरे

मुले बापडी अगतिकतेने म्हणती

नक्की माझा धर्म कोणता रे ||२||

मानवतेची शिकवण देण्या जन्मले

या भारतभूवर अनेक तारे

त्यांच्या विचारांस अग्नी देऊनी

धर्म जपतात हे अस्तानितले निखारे ||३||

कोणताही धर्म सांगत नाही

करण्या परधर्मीयांची खांडोळी

कोणत्या उन्मादातून होते मनुष्याकडूनच

मनुष्य देहाची अन त्याच्या संसाराची राखरांगोळी ||४||

माणूस म्हणून जन्माला आलात तेव्हा आता

जग जिंकताना माणसेही जोडत जगा

याच एका मार्गाने बनवा परकीयानाही स्वकीय

जग तेव्हा म्हणेल गर्वाने हाच खरा भारतिय ||५||

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *