धमन्यातल्या रुधिरास या खल भेदण्याची आस दे

जयहिंद,

सध्या वर्तमानपत्रात कथुआ, उन्नाव व अशा अनेक अशा बातम्या वाचल्या की मन विषण्ण होत. असं वाटत की यावर आपल्या देशात जी कारवाई होते ती बऱ्याचदा राजकारणी हेतूंमुळे तशी कमीच होते किंवा न्यायदानाच्या या संपूर्ण प्रक्रियेत अनेकदा इतका वेळ जातो की आरोपी मोकाट सुटूनही जातो पण ज्या घरावर ही परिस्थिती ओढवलेली असते त्यांच काय?

अनेकदा मेणबत्या हातात घेऊन मोर्चे काढले जातात. पेपर मध्ये पुढील काही दिवस ती बातमी पहिल्या पानावर असते मग जसजसं समाजाचं विसरलेपण वाढत तशी ती बातमी आत संक्षिप्तपणे मांडली जाते आणि कालौघात नाहीशी होते. एकूणच आज २१ व्या शतकातील पुढारलेल्या भारताच्या बाता मारणाऱ्या आम्हा सर्वांची लाज वाटते आणि त्या पालकांची काळजी ज्यांना मुली आहेत.

अनेक पालक जेव्हा समुपदेशनासाठी भेटायला येतात तेव्हा आपल्या मुलीने तिच्या मुलगी या जातीला शोभेल असे करिअर तिने निवडावे असा आग्रह करताना आढळतात. त्यांच्यासाठी मला सांगायचंय, करिअर तर त्या नक्कीच चांगलं करतील पण जेव्हा आयुष्यात असा एखादा प्रसंग येईल तेव्हा त्याला सामोरे जाण्यासाठी लागणाऱ्या धाडसाला तुम्ही तुमच्या मुलीला तयार केलंय का?

आज नाक्यावर बसणाऱ्या टपोरीगिरी करणाऱ्या मुलांची मजल फार पुढे गेली आहे, त्यात त्यांच्या मोबाईलमध्ये असणाऱ्या क्लिप्स त्यांना चुकीचे वर्तन करण्यास उद्युक्त करतात. मग कधी राजकारणी यांची बाजू सावरून धरतात तर कधी मुलांची मानसिकता ठीक नसल्याने अशी कृत्य घडतात असा एक आधार मुलांना मिळतो. मुलीसाठी मात्र घटना घडून गेल्यानंतर मिळणाऱ्या आधाराची किंमत ही फुटलेल्या काचेच्या बरणीला फेविक्विकने जोडण्यासारखीच असते.

आज या माध्यमातून विशेषकरून मुली असणाऱ्या पालकांना मला सांगायचे आहे मुलगी वाढवताना ती एखाद्या  विषयात मागे राहिली तरी चालेल, नाच, गाणे, चित्र काढणे हे सर्व आयुष्यात महत्वाचे आहे पण आयुष्याचे गाणे बहारदार करायचे असेल आणि जीवनाचे सुंदर चित्र काढायचे असेल तर तिला आत्मसंरक्षणासाठी सज्ज करा. तिचे सगळे कलागुण जोपासताना तिच्यातील हिम्मत व वेळ पडलीच तर चार जणांना लोळवण्याची क्षमता कशी वाढेल याकडे कटाक्षाने लक्ष द्या.

मला याठिकाणी मुद्दाम आमच्या डोंबिवलीतील एका मुलीचा उल्लेख करायचा आहे पूर्वा मॅथ्यु  जी स्वतः नामवंत ज्युडो व कुराश खेळाडू आहे, भारताच्या आंतरराष्ट्रीय संघाची ती एक खेळाडू आहे. बेस्ट प्लेयर ऑफ आशिया हा किताब तिच्या नावावर आहे तसेच २७ नॅशनल रेकॉर्ड तिच्या नावावर आहेत. आणि सर्वात महत्वाचे त्रास देणाऱ्या कोणासोबतही चार हात करण्याची तिची जिद्द आहे. आणि आज परिसरातील कित्येकांची ती कोचदेखील आहे. अनेक मुली तिच्या हाताखाली समाजातील हे जे पाशवी वृत्तीचे खल आहे ते भेदण्यास तयार होत आहेत. पोलीस, महानगर पालिका तसेच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघटनांनी तिच्या या धाडसीवृत्तीची दखल घेतली आहे.

या माध्यमातून सर्व पालकांना पुन्हा एकदा एकच सांगतो, आपलं मुल वाढवण्याची आपली प्रत्येकाची एक पद्धत आहे त्यात स्व-संरक्षण यालाही तितकेच महत्व द्या. हा लेख वाचणारे आपण जर शाळा व महाविद्यालयातील शिक्षक असाल तर आपल्या संस्थामध्ये असे उपक्रम घ्या व समाजातील उपेक्षित घटक ज्यांच्यापर्यंत बऱ्याचदा कोणताही संस्कार पोचवता येत नाही तिथे निदान स्व-संरक्षणाच्या पद्धती/युक्त्या आपण पोचवू शकलो तर ही नराधमी कृत्य करणारी जमात एक पाउल देखील पुढे टाकायला धजावणार नाही.

विवेकानंद नेहमी म्हणत जर एक सुदृढ समाज घडवायचा असेल तर ‘मेंदू व मन याचबरोबर मनगटात ताकत हवी.’ शाळा व महाविद्यालये मुलांच्या मेंदूवर काम करतच आहेत चांगल्या संस्कारांनी त्यांचे मनही सुदृढ होईल पण मनगटातली ताकत त्यांना भीषण प्रसंगांना सामोरे जायला मदत करेल.

आजच विचार करा कसं करायचं? मग का झालं यावर विचार करायची वेळ येणार नाही……

 

आपला

अतिश कुलकर्णी

लेखक, प्रशिक्षक, आय लीड ट्रेनिंग, जीवनरंग

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *