पहिला पाऊस

व्रुत्तपत्रातील त्या बातम्या. आज या भागात’वीज कपात’,’पाणी कपात’ तर उद्या त्या भागातील. गरम्यामुळे जीव नकोसा होत होता. बरं एवढी उष्णता वाढत होती की,घरात नुसतं बसणंही असह्य होत होतं. पण या सगळ्याचा रामबाण उपाय म्हणजे ‘पाऊस’ आणि त्याचीच तर कमतरता होती.

 

त्रुषार्त वसुधा डोळे वटारलेल्या भगवान सहस्त्र रश्मीकडे काकुळतीने पहात होती. निसर्गात एक प्रकारचा रुक्षपणा आलेला होता. सगळी कडे कोरडेपणा.आकाशात भरून येणाऱ्या ढगांना पाहण्यासाठी माणूस चातक झाला होता. जमीन तापून -तापून तडे गेले होते बिचारीला! एरवी शांत-शीतल म्रुण्मयी उन्हाळ्याने होरपळून गेली होती. वर्षानुवर्षे अन्नपाणी न मिळालेल्या निर्वासितासारखी.आकाशातल्या क्रुष्णमेघाकडे ती टक लावून पहात होती. एखाद्या प्रेयसीने प्रियकराची वाट पहावी अगदी तश्शीच!सुखाच्या वर्षावाची वाट!रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची तर त्रेधातिरपीटच होत होती. सर्व माणसे अगतिक होवून आतुरतेने त्या पाहुण्याची वाट पहात होती.

 

मानव आकाशातील चैतन्याची आठवण करीत होता. सारी स्रुष्टी द्रुष्टीहीन. होमहवन- मंत्रजागर झाले पण तो लबाड पाऊस कुठे दडून बसला होता कोण जाणे?नेहमी सर्वज्ञतेचा टेंभा मिरवणाऱ्या माणसाला नाकदुऱ्या काढावयास लावताना त्याला खदखदून हसू येत असावं.अगदी लहान मुलेही त्याची वाट बघत होती. पाऊस पडावा म्हणून म्हणत होती, ‘ये रे ये रे पावसा….’   सर्वत्र दुष्काळाचा अक्राळविक्राळ राक्षस विकट हास्य दाखवत होता.

 

एवढ्यात कुठेतरी दूरवर एक अगदी लहानसा काळा ठिपका दिसायला लागला. लहान मुलाच्या हनुवटीवर तीळ लावावा तस्सा!वडाच्या झाडाचे बी मोहरी एवढेच असते पण त्याचा व्रुक्ष व्हावा तसे बघता-बघता ह्या एवढ्याश्या काळ्या ठिपक्याने सगळे आकाश व्यापून टाकले होते. एखादी आवडती व्यक्ती घरी यावी आणि घर भरून जावे तसे या काळ्या ढगांनी साऱ्या स्रुष्टीला आनंद आवरेनासा झाला होता. दाही दिशा कुंद झाल्या होत्या. धुंद वारा वाहू लागला. काय घडतंय काही कळायच्या आतच एकदम प्राजक्ताच्या टपोऱ्या फुलांसारखे थेंब मातीवर कोसळू लागले. वरुणराजाने आपली सारी दौलत वसुधेवर अशी उधळून दिली की,

“अनंत हस्ते कमलावराने

देता किती घेशील दो कराने”

अशी बिचारीची अवस्था झाली होती.

 सौ. प्राजक्ता हर्डीकर

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *