पाऊस निघुनी गेला

मंडळी,

मागे अचानक पडून गेलेल्या पावसाने वातावरण बदलून टाकलं. मी कामोठ्याला ट्रेन मधून उतरलो. पार्किंग मध्ये लावलेली बाईक घेवून रस्त्याला लागलो तसा थंड हवेचा शरीराला स्पर्श होऊ लागला. मातीच्या त्या नेहमीच हव्या वाटणाऱ्या सुगंधाने नवी चेतना माझ्यामध्ये भरली.  भिजलेले रस्ते, झाडे, पानांवर सर्व शक्ती एकवटून जिद्दीने टिकलेले पावसाचे थेंब, पागोळ्यांचे टीप टीप करत ओघळणारे पावसाचे उर्वरित थेंब,  ओथंबून रिते झालेले ढग, आजूबाजूची एकेक वस्तू अचानक डोळे वेडावल्यासारखे टिपायला लागले.    आणि त्या संमिश्र भावना निर्माण करणाऱ्या वातावरणात एक गझलरुपी कविता सुचली.

हि कविता वाचून, तुम्ही जीवापाड प्रेम करत असलेल्या परंतू आज तुमच्यापासून दुरावलेल्या व्यक्तीची आठवण तुम्हाला नक्की येईल.

 

पाऊस निघुनी गेला

ओल्या आठवाना आणखी भिजऊनी गेला

पाऊस निघुनी गेला

दवाच्या थेंबासम मी काळाच्या पाकळीवर टिकलेला

पडलो कधी, ओघळणार कधी, संपलेला…थकलेला

धरतीचा मोह संपला कधीचा, अभाळाने टाकलेला

पाऊस निघुनी गेला…

 चेहरा तुझा मेघांमधे, अस्पष्टसा पहातोय मी

भरला पाऊस तेव्हापासून मेघातच राहतोय मी

खाली देह खालीच सदा, मी मेघांशी झटलेला

पाऊस निघुनी गेला…

पागोळ्यांचे पाणी झेलतो, भरतो ओंजळीचा डोह मी

आठवांनी भरतो डोह, टाळतो डुंबण्याचा मोह मी

पाऊस पडतो सर्वांसाठी, माझ्यासाठी ‘तो’ रडलेला

पाऊस निघुनी गेला…

जगतो का? का न मरतो हा प्रश्नच मूळी न पडतो  आता

पाऊस गेला की राहिला, हृदयात साठला जाता जाता

 कापवेना दोर कालची, कापवेना दोर कालची

आजच्या उंबऱ्यावर अडलेला

पाऊस निघुनी गेला,

ओल्या आठवांना, आणखी भिजवूनी गेला

पाऊस निघुनी गेला

 

विनोद अनंत मेस्त्री

लेखक, प्रशिक्षक, वक्ता

(आयलीड ट्रेनिंग्स, श्री कॉमर्स अकॅडमी, लाईफ रिचार्ज)

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *