वाल्या कोळ्याची बायको

 रामायणा, रामा, लक्ष्मणा असे उच्चार करणाऱ्या नातीला परीक्षा सम्पल्या की शहाण करून सोडण्याचा आणि तीला समजतील अशा रामयणातल्या गोष्टी सांगायचा संकल्प मी ह्यावेळी पूर्ण केला. त्यासाठी माझी प्रचंड दमछाक झाली. वयाच्या जेमतेम सहाव्या, सातव्या वर्षी एव्हढे प्रश्न मुलांना पडू शकतात ह्या आश्चर्यातून मी अजूनही बाहेर आले नाहीये. इथे थातुरमातुर उत्तर देऊन चालणार नाही, हे लक्षात घेऊन, आधी नीट विचार करून, उत्तरांची तयारी करून मग गोष्टी सांगायचा शहाणपणा मला सुचला हे फार बरं झालं.

रामायण संपलं,सुट्ट्या सम्पल्या, शाळा सुरू झाल्या, आता रामरगाडा मागील पानावरुन पुढे सुरूही झाला पण मी मात्र एकाच जागेवर खिळल्या सारखी थांबले आहे. माझ्या नातीनी मला विचारलेल्या एका प्रश्नानी मला झपाटून टाकलेलं आहे,पछाडलेलं आहे. तो प्रश्न माझ्या मानगुटीवर बसलाय आणि माझं जगणं त्यानी अक्षरशः क्षुल्लक, क:पदार्थ करून टाकलेलं आहे.

काय होता तीचा प्रश्न? वरवर पाहता तो खूप साधा,सरळ कोणालाही पडेल असाच होता. निरागसपणे तीनी मला हा प्रश्न विचारला तेंव्हा मी तिला वाल्या कोळ्याची गोष्ट सांगत होते. त्याच्या वाटमारीची, लुटमरीची सुरसकथा ती रस घेऊन ऐकत होती. नारदमुनींनी कळ लावल्यावर तो घरी जातो,बायकामुलांना विचारतो, माझ्या ह्या पापात तुम्ही सहभागी आहात का? आणि ते नाही म्हणतात. ही गोष्ट अशीच पुढे जाते, तो मुनिवरांच्या सल्ल्यानुसार  राम नामाच्या जपाला बसतो आणि शेवटी वाल्याचा वाल्मिकी ऋषी होतो, तेच रामायणाचे कर्ते तिथुन पुढे सुरू होत ते महानाट्य रामायण.

मी ही गोष्ट सम्पली म्हणताच नातीनी विचारलं, आजी ग, बायकामुलं म्हणजे वाल्याला दोनतीन बायका होत्या का? एकच असेल तरी तीच नावं काय होत? त्याला किती मुलं होती? वाल्याच्या अंगावर वारूळ चढे पर्यंत त्यानी रामनाम घेतलं तेंव्हा हे सगळे कुठे गेले होते?

तुम्हाला सांगते,माझी खरच झोप उडाली. ह्या विषयावरची अनेक पुस्तकं धुंडाळून पाहिली, अनेक अधिकारी व्यक्तींशी चर्चा केली पण कुठेही समाधानकारक उत्तर मिळालं नाही. जितका विचार करू तितकं खोल जायला होतंय. म्हणजे बघा ना, त्याच नावं “वाल्या कोळी”, कोळी म्हणजे त्याचा व्यवसाय असायला हवा मासेमारीचा! मग अस काय घडलं असेल, की तो वाटमारी करायला लागला? पाऊसच नसेल का पडला त्यावेळी? की तो जास्तच पडला? ओला किंवा कोरडा दुष्काळ? नद्या, नाले, तळी अति कोरडी तरी पडली असतील किंवा अशी काही वाहत असतील की त्यात मासे कसे जगतील? मग त्यानी जगण्यासाठी आपला मोर्चा इकडे वळवला असेल का?

त्याच लग्न कधी झालं असेल? दुष्काळ पडण्या आधी की नंतर?नंतरची शक्यता जर कमीच वाटते, कारण कोणता बाप आपल्या लेकीला अशा खाईत लोटेल? लेकीची पाठवणी काय त्यानी अंगावरच्या कपड्यानी केली असेल का? तिला काही स्त्रीधन, गायवासरू, साडीचोळी साठी एखादा तुकडा जमीन काहीच दिल नसेल आंदण म्हणून?

कदाचित असावं,कदाचित नसावही. तीला मिळालेलं सगळं दोन वेळच्या भ्रांतीत हळूहळू संपुनही गेलं असेल. आवाज गमावलेल्या कोकिळे सारखी अवस्था झाली असावी तीची, नवऱ्याचा मान ठेवायच्या खटाटोपीत माहेरचं आंगण पारखं झालं असावं तिला, म्हणून तर निनावी राहिली” ती”.

किंवा तेंव्हाही असंच असेल का?कुटुंब प्रमुख हा पुरुषच!त्यानी ठरवायचं प्रत्येक गोष्ट केंव्हा, कोणी, कशी करायची किंवा नाही करायची हे. तो अनाठाई आवाज चढवणार, हात उचलणार, लाथाबुक्क्या घालणार, आजही काही बदललं आहे का?

आजतर दहा हातांनी लढतेय “ती”, नाती सांभाळणारी, नैतिकतेच्या चक्रात पिळवटून जाणारी आणि तरीही स्वतः च्या कमाईच्या रुपयावरही हक्क नसलेली. तो ठरवतो कसे गुंतवायचे, कुठे उधळायचे? ती फक्त एक चाक सतत अविरत चालणारं.

वाल्या कोळ्याच्या बायकोनीही हे सगळं भोगलं असेल का? त्याच्या एखादया फटकर्यांनी तीच्या नाकाचं हाडं मोडलं असेल का? एखादी लाथ जिव्हारी बसून तीची ओटी रिकामी झाली असेल का?वाहत्या दुधात भिजलेला पदर भरजरी होता की पटकूर, हा प्रश्नच उठत नाही ना?केसांचा बुचडा धरून थोबडवणारा हातच तिच्या वाटेला सतत येत होता का?

अशी काय वाटमारी मिळत असेल वाल्याकोळ्याला रोजच्यारोज? मग उगवता सूर्य मावळतांना तरी जठराग्नी आहुती मागतच असेल ना? तिच्या लेकरांच्या पोटाची ही आग ती माऊली कशी भागवत असेल? इथेही मोठा वाटा त्याचा,मग मुलांचा आणि मग उरला तर तिचा, वाल्याकोळ्यानी कधी मागे वळून पाह्यलं असेल का की तिला घासभर तरी अन्न मिळालं आहे की नाही हे?घटाघट पाण्या बरोबर आपली आसवं पिऊन पॉट भरणारी ती कधीतरी त्याच्या नजरेत भरली असेल का?

अशा अनंत प्रश्नांच्या मालिकेतुन माझ्यातली स्त्री आणखी एका विचारानी हादरून गेलेली आहे, तो जेंव्हा रामनामाचा जप करायला बसला तेंव्हा ह्या कुटुंबाच काय झालं? तो तर रावणाचा काळ! कुटुंबात पुरुषच नाही म्हटल्यावर,तो काळ किती अंदाधुंद झाला असेल? तिचा आक्रोश कोणी ऐकला असेल? विटंबना, अवहेलना ह्यांना ती कशी सामोरी गेली असेल?की

तीनी ते सगळं रित्या मनानी, उघड्या डोळ्यांनी स्वीकारलं असेल? आणि तिची मुलं?

गडे हो, विचार करा,साक्षात सगुणांची पुतळी असणाऱ्या गर्भाशी सीतामाईला वनवासात पठावणाऱ्या, अग्निपरिक्षे सारख्या सत्वपरीक्षेला बसवणाऱ्या वाल्मिकींनी आपल्या पत्नीला कुठे पाठवलं असेल? जागृती आल्यावर????

आपणं अस म्हणतो की,पूर्व जन्मीच्या सुकृतावर आपला जन्म बेतलेला असतो.मग,त्या वाल्याकोळ्याच्या निनावी बायकोच सुकृत किती मोठं असेल, विचार करा ना—-

तिचा एक नकार एका माणसाच उभंआडवं आयुष्य बदलवून गेला,तो एक नकार रामायण घडवून गेला आणि “त्याने”मात्र तीच आयुष्य,तीच अस्तित्व केवळ एक उपरोधिक उल्लेखानी अधोरेखित केलं.

तीच “असणं”इतकं नगण्य करून टाकलेल्या त्या वाल्याकोळ्याला तीच बसली असेल राखत त्याच वारूळ होतांना, खात्री आहे मला,कारण पाश सरला तरी पुन्हा पुन्हा रुजवून घेण्याची क्षमता फक्त मातीतच आहे ना?आपल्या तपोबळानी जन्माला घातला असेल तीनी नवा जीव,स्वतः ला मातीखाली गाडून वाल्मिकी नावाचा!!

अपमानानी, अवहेलनानी, उपरोधानी, नाकर्तेपणानी शिणून कधी एखादीनी चिणून टाकलं ना त्याला कशाचीही तमा नबाळगता,तर तिथे भेटेल “स्व”त्व गमावूनही “सत्वानी”सजलेली “मानिनी”वाल्याकोळ्याची बायको.

मुलांचं काय? ह्या प्रश्नाच उत्तर कदाचित माझी नातच शोधेल.आत्तापासून तिच्यातल्या स्त्रीत्वाला फुलवत रहाणं एवढचं माझ्या हातात आहे.

चित्कला नावं आहे तीच, वाल्याकोळ्याच्या मानिनी सारखी सोशिकताही तिच्यात रुजवी आणि संधी मिळताच एखाद्याला त्याची जागा दाखवण्याचं सामर्थ्यही,एव्हढीच श्रीराम चरणी प्रार्थना.

 

स्नेहल सारंग.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *