कुठलंही काम सोपं करण्यासाठी वापरात येणारे सात ‘R’

जीवनरंगचे सवंगडी जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा विचारांची देवाण-घेवाण झालीच पाहिजे. अशाच एका मीटिंग नंतर भाईने एक पुस्तक माझ्या हातात ठेवलं आणि नक्की वाच असा आग्रह केला. (भाई म्हणजे आपली लाडकी सुनायना ताई. आम्ही एकमेकांना भाई नावाने हाक मारतो.)

“फोकल पॉईंट” अतिशय सुंदर आणि उपयुक्त असं पुस्तक आणि या पुस्तकाचे लेखक ब्रायन ट्रेसी हे वैयक्तिक आणि व्यावसायिक विकास या विषयावरील जगातील एक प्रभावी वक्ते आणि सल्लागार आहेत. टाईम पॉवर, व्हिक्टरी, टर्बो स्ट्रॅटेजी आणि द लॉज ऑफ बिझनेस सक्सेस या बेस्ट सेलर पुस्तकाचे ते लेखक आहेत.

या पुस्तकात कुठलंही काम सोपं करण्यासाठी वापरात येणारे सात ‘R’ ही संकल्पना मांडली आहे. यापैकी एखादा-दुसरा किंवा सातही ‘R’ तुमच्या कार्यामध्ये किंवा वैयक्तिक कामांमध्येही वापरू शकाल.

पहिला ‘R’ – रिथिंकींग अर्थात पुनर्विचार
केव्हा तुम्हाला वाटेल की, तुम्हाला खूप काम करायचं आहे. पण काम करायला वेळ पुरत नाहीये, खूप कमी वेळ आहे आणि जास्त काम आहे, त्यावेळी थोडसं थांबा आणि तुमच्या कामाविषयी पुन्हा एकदा विचार करा.
स्वतःला प्रश्न विचारा की, हे काम करण्याचा यापेक्षा चांगला मार्ग असू शकेल का ? खासकरून तुम्हाला जे आंतरिक विरोध जाणवतो, अडचणी असतील, स्वतःची ओढाताण होत असेल त्या वेळी वेगळं होऊन स्वतःकडे एखाद्या सल्लागाराप्रमाने पाहा. असा विचार करा की, तुम्ही सल्लागार आहात आणि तुमच्या समोर ती परिस्थिती आहे, जिथे मूल्यमापन करून अशी कामं काशी हाताळावी याचा सल्ला द्यायचा आहे. हे करताना ओपन राहा आणि आपला दृष्टिकोन चुकीचा असू शकतो हे स्वीकारायला तयार राहा.

 

दुसरा ‘R ‘ – रिव्हॅल्युएटिंग अर्थात पुनर्मूल्यांकन
जेव्हा तुम्हाला कुठलीही नवीन माहिती मिळते तेव्हा तुमचं घड्याळ थोड्या वेळासाठी बंद करा. जसं फुटबॉलमध्ये टाईमआऊट करतात ना तसं! आणि मग तुमच्या परिस्थितीचं मूल्यांकन करा. अर्थात हे मूल्यांकन आज परिस्थिती काय आहे याच्यावर आधारित असावं. जनरल इलेक्ट्रॉनिक्सचे प्रेसिडेंट जॅक वेल्च, या गोष्टीला रियालिटी प्रिंसिपल असं म्हणतात.
रियालिटी प्रिंसिपलची सगळ्यात मोठी आवश्यकता म्हणजे, तुम्ही स्वतःशी पूर्णपणे प्रामाणिक असायला हवं आणि परिस्थितीजन्य गोष्टीवर मूल्यांकन करायला हवं! म्हणजे आज सद्यपरिस्थिती काय आहे यावर मूल्यांकन असायला हवं, तुम्हाला ती कशी हवी आहे किंवा पूर्वी कशी होती यावर नाही.

 

तिसरा ‘R ‘ – रिऑर्गनायझिंग अर्थात पुनर्रचना
त्याच इनपुटमध्ये जास्त चांगल्या पातळीचा आऊटपुट घेणं हा तुमचं जीवन किंवा काम यांची पुनर्रचना करण्यामागचा मुख्य हेतू आहे. या वेगाने बदलणाऱ्या काळामध्ये तुम्ही स्वतःला सततच रिऑर्गनाईझ करत राहिलं पाहिजे. जसं एका मोठ्या तंत्रज्ञाने म्हटलं आहे की, व्यवसायामध्ये तुमच्या धारणा दार तीन आठवड्याला फेकून द्याव्या लागतात.
तुमची काम करण्याची जागा रिऑर्गनाईझ करण्यासाठी नेहमी तयार राहा. तुमच्या दिवसभराच्या वेळापत्रकाची पुर्रचना करण्यासाठी नेहमी तयार राहा. तुम्ही जे काम करता ते काम करण्याचा अजून चांगला मार्ग असू शकतो हे स्वीकारण्यासाठी नेहमी तयार राहा आणि नेहमीच नवनवीन, चांगल्या मार्गाच्या शोधात राहा.

 

चौथा ‘R’ – रिस्ट्रक्चर अर्थात पुनर्बांधणी
रिस्ट्रक्चर किंवा पुनर्बांधणी करणं म्हणजे, तुमचा जास्तीत जास्त वेळ, पैसा, ऊर्जा आणि साधनं हि तुम्हाला सर्वात जास्त उत्पन्न आणि नफा मिळवून देणाऱ्या
२०% कामांवर केंद्रित करणं. सामान्यतः कंपन्या पुनर्बांधणी करताना, त्यांच्या ग्राहकांच्या दृष्टीने सर्वात जास्त महत्व असणारी उत्पादने किंवा सेवांवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करतात. आणि त्याच वेळी कमी महत्वाची किंवा फारशी फायदेशीर नसणारी कामं इतरांवर सोपवतात किंवा बंद करतात.

 

पाचवा ‘R ‘ – रिइंजिनिअरिंग
तुमचं काम आणि जीवन सोपं करण्यासाठी हा एक अतिशय शक्तिशाली मार्ग आहे. रिइंजिनिअरिंगमध्ये तुम्ही तुमचा पूर्ण फोकस प्रक्रियेच्या विकासासाठी लावता. तुम्ही सतत तुम्हाला अपेक्षित परिणाम साधणाऱ्या नवनवीन, जास्त वेगवान, कमी खर्चाच्या आणि सोप्या अशा मार्गाच्या शोतात राहा. तुमच्या कामाच्या रिइंजिनिअरिंगमध्ये सुरुवात ही तुमच्या वर्क प्रोसेसच्या सगळ्या पायऱ्यांची यादी करून करा. ती यादी अगदी सुरुवातीच्या कामांपासून ते अगदी शेवटच्या कामापर्यंत असावी. एकदा सर्व पायऱ्या कागदावर आल्या की, मग त्या पायऱ्या कमी करण्याचं ध्येय समोर ठेवा. पूर्वीच्या तुलनेत ३० टक्क्यांपर्यंत पायऱ्या कशा कमी करता येतील हे ध्येय स्वतःसमोर घ्या. जेव्हा तुम्ही हे पहिल्यांदा कराल तेव्हा तुम्हाला फार आश्चर्य वाटेल की, हे किती सोपं आहे.

 

सहावा ‘R ‘ – रिइन्व्हेस्टिंग
आजच्या ये वेगवान जगामध्ये तुम्ही दर सहा महिन्यांनी किंवा बारा महिन्यांनी स्वतःच्या कामाचं परीक्षण करायला हवं. झिरो बेस्ड थिंकींगवर सतत काम करा आणि स्वतःला विचारत राहा की, मी या पद्धतीने काम करत नसतो आणि आज जे माहिती आहे ते सर्व माहिती असतं तर मी हे काम परत याच मार्गाने केलं असतं का?
कल्पना करा की, तुम्हाला तुमचं करिअर, तुमचा जॉब पुन्हा एकदा सुरु करायचा आहे आणि मग स्वतःला प्रश्न विचारा की, मला पूर्वीपेक्षा नवीन काही करण्याजोगं आहे का ? आत्ता जे करतो आहे, त्यातलं काही कमी करता येईल का ? आणि असं काही आहे का की, जे करणं पूर्णपणे बंद करायला हवं ?
तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं, नोकऱ्या, पद मिळतील. नेहमी पुढे चालत राहा आणि हा विचार नक्की करा की, तुम्हाला काय करायला आवडलं असतं. स्वतःला विचार की, माझा पुढचा जॉब, पुढची नोकरी कोणती असेल, मला काय करायला आवडेल ?
त्यानंतर स्वतःला विचारा, यानंतरचं माझं करिअर कोणत्या क्षेत्रात असणार आहे ? मला काय करायला आवडेल ? जर तुम्ही हे प्रश्न स्वतःला विचारले नाहीत, त्यावर विचार केला नाही तर दुसरं कोणीतरी तुमच्या आयुष्यातील हे निर्णय त्यांच्या सोयीनुसार घेईल. जे तुम्ही स्वतःचं नियोजन केलं नसेल तर तुम्हाला इतरांच्या नियोजनानुसार चालावं लागेल.

 

सातवा ‘R ‘ – रिगेनिंग कंट्रोल अर्थात पुन्हा एकदा नियंत्रण मिळवणं
या पायरीमध्ये तुम्ही नवीन ध्येय समोर घेता आणि नवीन योजना आखता. तुम्ही नवीन निर्णय घेता आणि त्यावर कृती करण्यासाठी कटिबद्ध होता. तुम्ही तुमच्या जीवनाची धुरा सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी स्वतःवर घेता. तुमच्या बरोबर काहीतरी चांगलं घडेल याची वाट न पाहता तुम्ही तुमच्या जीवनाचे नियंत्रण स्विकारता. तुमच्याबरोबर काहीतरी चांगलं घडेल याची तुम्ही वाट पाहत नाही, तर तुम्ही पुढे जाऊन त्या गोष्टी घडवून आणता. तुम्ही तुमच्या वेळेचा आणि जीवनाचा चार्ज घेता.


धन्यवाद,
आपला लाडका
समीर दत्ताराम पडवळ

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *