बुद्धिबळ

नमस्कार मित्रांनो,

ऑफिसमध्ये एका विषयावर चर्चा रंगली… “कोणाला बुद्धिबळ खेळता येतो का ?” सुनिल दादा, मोहित दादा आणि मी. तिघांना बुद्धिबळ खेळता येतो पण मोहित आणि मी मोबाईल किंवा कॉम्पुटर वर खेळत असतो.

सुनिल दादाने आवाज उचलाला बस्स.. आता बुद्धिबळ खेळायचा पण बुद्धिबळ पटावर. सुनिल दादाने बुद्धिबळाचा पट काढला आणि एक वेगळाच उत्साह संचारला.

एका बाजूला सुनिल दादा दुसऱ्या बाजूला मी आणि हा गंमतीदार बुद्धिबळाचा संग्राम सुरु झाला. कधी त्याचे शिपाई कामी आले तर कधी माझे शिपाई. चहुबाजूने हल्ले करणारे वजीर तर पहिल्या पाच मिनिटांतच एक मेकांशी भांडून युद्ध करून पटाच्या बाहेर पडले. हत्ती, घोडे आणि उटांनी पटावर धुमाकूळ घातला होता त्यात ते शहिद होऊन कामी आले. खेळ विलक्षण पद्धतिने रंगला होता. कधी काय होईल काहीच सांगता येत नव्हते. हसत खेळत बुद्धिबळाच्या कुरुक्षेत्रात महाभारत घडत असल्याचा भास होत होता. कौरव कोण आणि पांडव कोण यावर मोहितचा आवाज उठला. बुद्धिबळाचा पट मोठ्या प्रमाणावर रिकामी झाला होता. फक्त राजा आणि काहीशे शिपाई लढत होते आणि आता खेळण्यात जास्त काही रस राहिला नव्हता. फक्त डाव संपवावा या हेतून पटावर चाल चालल्या होत्या. इतक्यात ग्रहण लागावा असा ऑफिस मध्ये एक क्लाइंट आला आणि या युद्धाला विराम द्यावा लागला. थोडा वेळ घेऊन तो क्लाइंट निघून गेला आणि मग एकच चर्चा सुरु झाली. युद्ध कोणी जिंकलं असतं? खेळाचा आनंद खऱ्या अर्थाने वाढला होता.

हल्ली खूप कमी व्यक्ती हा खेळ खेळताना दिसतात. मोठ्या प्रमाणात मोबाईल वर कॅन्डीक्रश किंवा टेम्पल रन खेळत असताना दिसतील.

बुद्धिबळ खेळ हा फक्त एक खेळ नसून खऱ्या आयुष्याचा सारं पटवून देतो, ते असे…

  1. सर्वांच सहकार्य आणि साथ घेऊन कसं काम केलं पाहिजे याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण बुद्धिबळाचा पट आपल्याला शिकतो.
  2. जीवनात पुढे जाताना कधी कधी दोन पावूल मागेसुद्धा यावं लागतं. मागे आलो म्हणजे हरलो असे नसून एक मोठी संधी पुढे दडली त्यासाठी योग्य ती तयारी वा त्यासाठी घेतलेला वेळ होय.
  3. सर्वात महत्वाचं म्हणजे आयुष्यात प्रत्येक माणूस महत्वाचा आहे. कोणता व्यक्ती कधी कामाला येईल काहीच सांगता येत नाही. त्यामुळे छोट्यात छोट्या व्याक्तीचासुद्धा आदर करा. बुद्धिबळाचा शिपाई छोटा असला तरी हत्ती, घोडा, उंट, वजीर वा राजा यांना मारण्याची ताकद ठेवतो.
  4. बुद्धिबळात पुढे जाण्यासाठी कधी कधी हत्ती, घोडा वा वाजीरचा त्याग करावा लागतो त्याचप्रमाणे जीवनात ज्या गोष्टीचा आपल्याला अति लळा लागलेला असतो त्या गोष्टीसुद्धा आपल्याला सोडाव्या लागतात.

सर्वाना विनंती अशी कि आपल्या प्रत्येकाने सहवासात येणाऱ्या मित्रांना वा आपल्या घरातील लहान मुलांना या खेळात सहभागी करा, आनंद लूटा आणि महत्वाचं म्हणजे या खेळातून आयुष्याच्या पटावरील गम्मत पटवून द्या.

काय मग.. करायचा का एक डाव सुरु ?

समीर दत्ताराम पडवळ
संपर्क : ८६५५८५००५६
मेल : sameer@arthvedh.in
वेबसाईट : www.arthvedh.in

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *