जीवनरंग – लाईफ रिचार्ज

आपलं जीवन रंगांशिवाय अधुरं आहे… फिकं आहे. निसर्ग आपल्या जीवनात मुक्त हस्ताने सप्तरंगांची उधळण करत असतो. विविध रंग तो आपल्या जीवनात भरत असतो. हे रंग म्हणजे आनंदाचे चैतन्याचे!

त्याला फक्त देणं माहीत असतं, घेणं नाही. निसर्गाच्या याच गुणांनी प्रभावित होऊन जीवरंगचे सवंगडी एकत्र आले. ‘राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक’ लाभलेले तसेच साहित्यिक आणि लेखक असलेले, पोलीस निरीक्षक श्री. संजय गोविलकर यांच्या प्रेरणेने जीवनरंग या संस्थेचे स्थापना २००७ साली झाली आणि जीवनरंगच्या मित्रांसोबत दुर्गम खेडयांत शवदाहिनी बसवण्यासाठी ‘अंतिम प्रवास’ हा सामाजिक उपक्रम चालू केला.

दर्जेदार व उपयुक्त पुस्तकांची निर्मिती हे स्वप्न जीवनरंग प्रकाशनाच्या माध्यमातून साकार झाले, मराठी साहित्य, संस्कृती टिकवण्याचा व वाढविण्याचा हा अल्पसा प्रयत्न. ‘भारतीय हीच आमची जात आणि मानवता हाच आमचा धर्म’ या विचाराने प्रेरित होउन ‘भारत जोडो’ हा उद्देश डोळयासमोर ठेवून जीवनरंगच्या मित्रांनी आपल्या मुलांची जात भारतीय ठेवली आहे. धर्म जात केवळ घरात. घराबाहेर केवळ भारतीय.

या उपक्रमांमधील एक अनोखा आणि दर्जेदार उपक्रम म्हणजे ‘लाईफ रिचार्ज’ जीवन यशस्वी रित्या जगणं हे प्रत्येकाच्या हातात असतं परंतु ते तसं जगण्याची कला मात्र खूप कमी जणांना अवगत असते.

माणूस एकदा जबाबदारीच्या गाडयाला जुंपला गेला की त्याची खरी परीक्षा चालू होते. इथे त्याला स्वतःचे करिअर, मुलांचे भवितव्य, आरोग्य, पैसा, स्नेहसंबंध, पती-पत्नी संबंध, अचानक उद्भवणाऱ्या कायद्याच्या अडचणी, तंत्रज्ञानातील बदल या जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांवर तोडगा शोधून या गोष्टीचं योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करणं अत्यंत आवश्यक असतं.

परंतु या धावपळीच्या आणि दगदगीच्या जीवनात करिअर आणि पैश्याच्या मागे धावताना आरोग्याची हेळसांड होते आणि नाती कुठेतरी दुरावताना दिसतात. तर कुठे कौटुंबिक समस्यांमध्ये अडकून राहिल्यामुळे करिअरवर परिणाम होताना दिसतो. अशा प्रकारे एक धरायला गेलो तर दुसरं सुटतं अशी गुंतागुंतीची अवस्था आपली होऊन जाते.

आपला जन्म या गुंत्यात अडकून राहण्यासाठी झालेला नाही. आपल्या जीवनातील या सर्व आवश्यक गोष्टींवर काम करता यायला हवेच पण त्याही पलीकडे जाऊन या समाजाला काहीतरी योगदान करता आलं तरच त्याला खरं यश म्हणता येईल. त्याचसाठी आपली जीवरंग संस्था ‘लाईफ रिचार्ज’ या कार्यक्रमांतर्गत दिग्गज व्यक्तिमत्त्वांचे मार्गदर्शन लाखो लोकांपर्यंत पोहचवत आली आहे.

मुलाखती किंवा चर्चासत्रांतून लोकांना भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे ‘लाईफ रिचार्ज’ मधून त्यांना मिळालेली आहेत आणि त्यांच आयुष्य सुखद आणि सुकर करण्यात लाईफ रिचार्ज यशस्वी झालं आहे. आपल्याही जीवनात आनंदाचे आणि चैतन्याचे रंग भरण्यास लाईफ रिचार्ज सज्ज झाले आहे. गरज आहे ती आपल्या प्रोत्साहनाची आणि पाठबळाची.

चला तर मग आपण सारे मिळून म्हणूया,
उगवतीच्या रविकिरणांनी
उजळून जाती दाही दिशा
आयुष्य ही आपुले उजळून जाई
घेऊनी ‘लाईफ रिचार्ज’ चा वसा

लाईफ रिचार्ज – जगण्याची उमेद जिंकण्याची ऊर्जा.