संजय गोविलकर

पोलीस निरीक्षक, राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक सन्मानित, पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्राप्त, साहित्य व शौर्य पुरस्कार (स्व. माधवरावजी सिंधिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मा. खासदार ज्योती आदित्यराजे सिंधिया यांच्याकडून प्रदान) व इतर अनेक पुरस्कार प्राप्त. स्टॉप वॉच, मित्राची गुंतवणूक, रिचार्ज अर्थात आयुष्याची पुनर्बांधणी या पुस्तकाचे लेखक.

संजय गोविलकर यांचे वडील पोलीस दलाल असल्याने लहानपणापासून पोलीस दलात सामील व्हायचं स्वप्न बाळगलं. पुढे त्याच दिशने वाटचाल सुरु केली. वाणिज्य शाखेतून पदवीधर झाल्यावर ते पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले. सध्या ते पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. पोलीस दलात विविध विभागांत काम करताना पोलीस दलाची प्रतिमा सदैव सकारात्मक राहावी याकरिता प्रयत्नशील आहेत. २६/११ च्या लढ्यात सहभागी होण्याची संधी त्यांची लाभली. या लढ्यात क्रूरकर्मी अतिरेकी अजमल कसाब यांस जखमी होऊनही जिवंत पकडण्यात मोलाची भूमिका बजावली. याकरिता ते पोलीस दलाचे व ईश्वराचे मनस्वी आभार मानतात.

पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य बजावताना अनियमित दिनचर्येला सामोरं जावं लागत असल्यामुळे त्यांनी स्वानुभवातून व आहारशास्त्राचा अभ्यास केलेल्या त्यांच्या पत्नी स्नेहलसह अनमोल माहिती संकलित करून अनियमित दिनचर्या असलेल्या घटकांकरिता स्टॉप वॉच हे पुस्तक लिहिलं.

गुन्हा घडल्यावर गुन्हेगाराला पकडणे तसेच गुन्ह्यास प्रतिबंध करणे, हे जसं पोलिसांचं कर्तव्य आहे; तसंच आपणही जीवन जगताना सजग राहण्याचं कर्तव्य बजावलं पाहिजे. आपली कष्टाची कमाई चुकीच्या मार्गाने न जाता योग्यरित्या गुंतवणूक करून ती वृद्धिंगत व्हावी याकरिता त्यांनी ‘मित्राची गुंतवणूक’ या पुस्तकाचे लेखन केले. अल्पावधीतच या पुस्तकाची चौथी आवृत्ती प्रसिद्ध झाली. हे पुस्तका मुंबई ग्राहक पंचायतीने ग्राहकांना व कॅमेलिन उद्योगसमूहाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना वितरित केले आहे.

‘रिचार्ज अर्थात आयुष्याची पुनर्बांधणी’ या पुस्तकात जीवन स्वच्छंदी व आनंदी जगताना आपलं ध्येयं, दृष्टिकोन, आरोग्य, अर्थ, सामाजिक जाणीव, मानवी स्नेहसंबंध या चौकटीवर ताबा मिळवून रिचार्ज करणारं अर्थपूर्ण पुस्तक प्रकाशित झालं. प्रथमच कल्पकतेचा वापर करून मुखपृष्ठावर वाचकांच्या फोटोसाठी जागा व वाचक सहलेखक असलेलं पहिलाच पुस्तक असावं.

वाचन, बौद्धिक गप्पा, उत्तम वक्ता, निसर्गात भटकंती, पौराणिक वस्तूंचा संग्रह या सह मित्र जोडणे, मैत्री वाढवणे हा छंद उपजत असल्यामुळे त्यांनी आणि त्यांच्या मित्रपरिवाराने मिळून ‘जीवनरंग’ या सेवाभावी संस्थेची स्थापना केली. दुसऱ्यासाठी काही केल्याने निर्मळ आनंद मिळतो, मन स्वच्छ राहातं आणि त्यातून जे प्रकटतं ते आपलं खरं व्यक्तिमत्व, अशी या ‘जीवनरंग’च्या सवंगड्यांची ठाम धारणा आहे आणि हीच भावना त्यांच्या विविध उपक्रमांमागील मुख्य प्रेरणा आहे. आपणही मित्र बनून त्यांच्या या मित्रपरिवारात सामील व्हाल, याची संजय गोविलकर यांना खात्री आहे.