तुम्हांला काय वाटतं?

परवा काही खाऊ घ्यायला बेकरीत गेले होते. माझ्या आधीच्या ग्राहकांची खरेदी होईपर्यंत मी शांत उभी राहिले. थाेड्यावेळाने एक बाई आली—“मी रिक्षा थांबवलाय, मला लवकर दे” म्हणू लागली. मी सेल्समनला म्हटलं, “माझ्याआधीच्या ग्राहकांचं घेऊन झालंय, तेव्हा आता मला दे.”  त्या बाईने पुन्हा “रिक्षा उभी केलीय, मला आधी दे” म्हटलं.

सेल्समनने मला हवे ते पदार्थ बांधून दिले, तसा  त्या बाईचा पारा चढला.

आज xerox च्या दुकानातही माझ्यानंतर आलेल्या तरुणाने असाच रेटा लावला.

माझ्या मनात प्रश्न: 1 : ‘माझ्यावर असलेल्या संस्कारांमुळे किंवा मी फार धीर धरणारी, संयमी वगैरे म्हणून मी आपसूक रांगेत उभी राहते का?’

प्रश्न 2 : की ‘इतर लोक खूप कामात-घाईत नि मीच निवांत आहे?’

प्रश्न 3 : ‘मी त्यांच्या जागी असते, घाईत असते तर मी काय बरं केलं असतं?’

 

पहिल्या दोन प्रश्नांची उत्तरं मला देता येईनात पण -शेवटच्या प्रश्नाचं उत्तर माझ्या मनाने तत्परतेने  दिलं—

मी माझ्याआधी उभ्या असलेल्या व्यक्तीला माझ्या घाईचं कारण सांगून माझं काम त्यांच्या आधी करू देण्याची परवानगी विनम्रपणे मागितली असती. ‘रिक्षाचं बिल वाढतं, म्हणून माझा नंबर आधी’हे कारण होऊ शकत नाही. असं कारण कुणी दिलं तर मला ते मुळीच  पटणार नाही!

मला माझ्या वेळेची किंमत वाटते तर मीही दुस-याच्या वेळेची कदर केली पाहिजे. दुस-याने नियम पाळावेत, अशी मी अपेक्षा करते तेव्हा मी लिखित/अलिखित, लहान/मोठ्या ऩियमांचं उल्लंघन करता कामा नये, हे मी लक्षात घ्यायला हवं. जीवनमान गतिमान झालंय म्हणताना असं वागून दुस-याच्या मार्गात आपण गतिरोधक होत नाही ना, हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.

आपण सतत ‘घोड्यावर असलो’ तरी आपलं काम लवकर पूर्ण करण्यासाठी दुस-याची अडवणूक करत आपलं घोडं दामटू नये,असं मला वाटतं. यावर तुम्हांला काय वाटतं?

 

डॉ. अनुपमा निरंजन उजगरे

(सुप्रसिद्ध लेखिका)

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *