वाघा बॉर्डर परेड … एक अविस्मणिय संध्याकाळ

भारतीय लष्कराविषयी असलेला सार्थ अभिमान आपण सर्व भारतीयांमध्ये ओतपोत भरलेला आहे… त्यात जर ती भारत पाकिस्तान सीमेवरील वाघा बॉर्डर असेल तर तो अजून ओसंडून बाहेर येतो…..

माझ्या आयुष्यात आलेला हा वाघा बॉर्डर स्टेडियमवरचा अतुलनीय, अभिमानास्पद क्षण………बॉर्डर,परेड, कवायती  व पलीकडले ‘ते’ लोक पाहण्यासाठी आम्ही खूप उत्सुक होतो मनात एक धाकधूक …..गाडीने जाताना लाहोर 23 किलोमीटर अशी पाटी वाचली व मन पुन्हा त्या कटू इतिहासात गेले …देशाला मिळालेलं स्वातंत्र्य,जाता जाता इंग्रजांनी केलेली फाळणी व एवढी वर्ष गुण्यागोविंदाने नंदणाऱ्या भारताचे झालेले 2 तुकडे व त्यानंतरचा रक्तरंजित इतिहास  हृदय हेलावून गेला…..खूप काही झेलले त्यावेळी आपल्या लोकांनी ..आठवूही नये असे वाटणारे…. त्यानंतर कायमस्वरूपी आलेली जहरी कटुता… लांबून दिसणाऱ्या 2 झेंड्यानी विचारांची तंद्री भंग केली …. उंच डौलाने फडकणार तिरंगा पाहून काय भावना दाटल्या शब्दात सांगणे कठीण ….समोरासमोर फडकणारा तिरंगा व पाकिस्तानी झेंडा बघून असेच वाटले की,

झंडा उंचा रहे हमारा

विजयी विश्व तिरंगा प्यारा…

स्टेडियम मधले वातावरण … अरे बापरे अगदी जत्राच जणू …हातात छोटे झेंडे,तिरंग्याच्या कॅप्स, गालाला तिरंगा अशा उत्साही वातावरणात अख्खे स्टेडियम भरून गेले होते… जिथून छान दिसेल अशी जागा पकडत आपले स्टेडियम न्याहळत आम्ही बसलो … नंतर हळूच ‘तिकडे’ नजर टाकली समोर पाकिस्तान गेट व  हिरव्या वेषातील पाकिस्तानी आर्मी .. आपले स्टेडियम भरलेले तर त्यांचे स्टेडीयम च्या मोजून 25 टक्के लोक आलेले…तिथून ते इकडे बघत होते व आम्ही सर्व तिकडे बघत होतो ….राग द्वेष तर नैसर्गिक होताच पण कधीतरी आपण एकत्र नंदलो आहोत ही आपलेपणाची भावना कुठेतरी नकळत डोकावून गेली……

अशा या ऐतिहासिक ठिकाणी आपल्याला सुद्धा काहीतरी परफॉर्म करता आले असते तर हा विचार मनात येऊन गेला … आणि भारताचा तिरंगा हातात घेऊन स्टेडीयमभर धावण्याची सुवर्णसंधी मिळाली…अभिमानाने व अत्यानंदाने ऊर भरून आला व आयुष्याचे सार्थक झाल्याचे समाधान मिळाले….अश्रू दाटले आले अवर्णनीय प्रसंग होता आयुष्यातला….

गणवेश धारी सीमा सुरक्षा दलाचे जवान व अधिकारी आले तेंव्हा उत्साहाची लाट आली जणू स्टेडियमवर…. वाह काय तो रुबाब… कवायती करून आपले जवान  जेंव्हा भारताच्या सीमा गेटजवळ गेले तेंव्हा आम्ही श्वास रोखले

त्वेषाने दरवाजे उघडले गेले दोन्हीकडून … त्यानंतरचा तो थरारक अनुभव … शेकहँड व  शक्ती प्रदर्शन ..सीमा सुरक्षा दलाचे जवान पाकिस्तानी जवानांसमो ज्या आक्रमकतेने परेड क कवायती करत होते त्याक्षणी स्टेडियम वरचा प्रत्येक भारतीय त्या जवानांमध्ये स्वतःला पहात होता…. भारत माता की जय, हिंदुस्तान झिंदाबाद, वंदे मातरम अशा घोषणा अगदी लाहोर  पर्यंत ऐकू गेल्या असतील…जवानांच्या  देहबोलीमध्ये काय राग आणि आवेष होता … कवायती संपल्यावर ध्वज उतरवून परेड ची सांगता झाली…

देशभक्तीने फुललेल्या व त्वेषाने घोषणा देणारा भारतीय परेड संपताच स्टेडियम सोडताना मात्र कचरा तसाच टाकून बेशिस्तपणे निघून गेला त्यावेळी मात्र कुठे गेले देशप्रेम ???देशप्रेम फक्त पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करण्यात ,क्रिकेट च्या सामन्यात… बाकी आम्ही आहे तसेच बेफिकीर आहोत हे सिद्ध करून गेले..

सलाम त्या जवानांना …भारतीय सीमा सुरक्षा दल काय काम करतात हे सर्व !!!!ज्यांच्यामुळे आपण आनंदी व सुरक्षित आयुष्य जगतोय..जवानांच्या बलिदानावर लिहिलेले एक वाक्य घायाळ करून गेले

शहिदोंकी चितांओ पर लगेंगे हरवर्ष मेले!!!!!

 

धनश्री परब

वाल्या कोळ्याची बायको

 रामायणा, रामा, लक्ष्मणा असे उच्चार करणाऱ्या नातीला परीक्षा सम्पल्या की शहाण करून सोडण्याचा आणि तीला समजतील अशा रामयणातल्या गोष्टी सांगायचा संकल्प मी ह्यावेळी पूर्ण केला. त्यासाठी माझी प्रचंड दमछाक झाली. वयाच्या जेमतेम सहाव्या, सातव्या वर्षी एव्हढे प्रश्न मुलांना पडू शकतात ह्या आश्चर्यातून मी अजूनही बाहेर आले नाहीये. इथे थातुरमातुर उत्तर देऊन चालणार नाही, हे लक्षात घेऊन, आधी नीट विचार करून, उत्तरांची तयारी करून मग गोष्टी सांगायचा शहाणपणा मला सुचला हे फार बरं झालं.

रामायण संपलं,सुट्ट्या सम्पल्या, शाळा सुरू झाल्या, आता रामरगाडा मागील पानावरुन पुढे सुरूही झाला पण मी मात्र एकाच जागेवर खिळल्या सारखी थांबले आहे. माझ्या नातीनी मला विचारलेल्या एका प्रश्नानी मला झपाटून टाकलेलं आहे,पछाडलेलं आहे. तो प्रश्न माझ्या मानगुटीवर बसलाय आणि माझं जगणं त्यानी अक्षरशः क्षुल्लक, क:पदार्थ करून टाकलेलं आहे.

काय होता तीचा प्रश्न? वरवर पाहता तो खूप साधा,सरळ कोणालाही पडेल असाच होता. निरागसपणे तीनी मला हा प्रश्न विचारला तेंव्हा मी तिला वाल्या कोळ्याची गोष्ट सांगत होते. त्याच्या वाटमारीची, लुटमरीची सुरसकथा ती रस घेऊन ऐकत होती. नारदमुनींनी कळ लावल्यावर तो घरी जातो,बायकामुलांना विचारतो, माझ्या ह्या पापात तुम्ही सहभागी आहात का? आणि ते नाही म्हणतात. ही गोष्ट अशीच पुढे जाते, तो मुनिवरांच्या सल्ल्यानुसार  राम नामाच्या जपाला बसतो आणि शेवटी वाल्याचा वाल्मिकी ऋषी होतो, तेच रामायणाचे कर्ते तिथुन पुढे सुरू होत ते महानाट्य रामायण.

मी ही गोष्ट सम्पली म्हणताच नातीनी विचारलं, आजी ग, बायकामुलं म्हणजे वाल्याला दोनतीन बायका होत्या का? एकच असेल तरी तीच नावं काय होत? त्याला किती मुलं होती? वाल्याच्या अंगावर वारूळ चढे पर्यंत त्यानी रामनाम घेतलं तेंव्हा हे सगळे कुठे गेले होते?

तुम्हाला सांगते,माझी खरच झोप उडाली. ह्या विषयावरची अनेक पुस्तकं धुंडाळून पाहिली, अनेक अधिकारी व्यक्तींशी चर्चा केली पण कुठेही समाधानकारक उत्तर मिळालं नाही. जितका विचार करू तितकं खोल जायला होतंय. म्हणजे बघा ना, त्याच नावं “वाल्या कोळी”, कोळी म्हणजे त्याचा व्यवसाय असायला हवा मासेमारीचा! मग अस काय घडलं असेल, की तो वाटमारी करायला लागला? पाऊसच नसेल का पडला त्यावेळी? की तो जास्तच पडला? ओला किंवा कोरडा दुष्काळ? नद्या, नाले, तळी अति कोरडी तरी पडली असतील किंवा अशी काही वाहत असतील की त्यात मासे कसे जगतील? मग त्यानी जगण्यासाठी आपला मोर्चा इकडे वळवला असेल का?

त्याच लग्न कधी झालं असेल? दुष्काळ पडण्या आधी की नंतर?नंतरची शक्यता जर कमीच वाटते, कारण कोणता बाप आपल्या लेकीला अशा खाईत लोटेल? लेकीची पाठवणी काय त्यानी अंगावरच्या कपड्यानी केली असेल का? तिला काही स्त्रीधन, गायवासरू, साडीचोळी साठी एखादा तुकडा जमीन काहीच दिल नसेल आंदण म्हणून?

कदाचित असावं,कदाचित नसावही. तीला मिळालेलं सगळं दोन वेळच्या भ्रांतीत हळूहळू संपुनही गेलं असेल. आवाज गमावलेल्या कोकिळे सारखी अवस्था झाली असावी तीची, नवऱ्याचा मान ठेवायच्या खटाटोपीत माहेरचं आंगण पारखं झालं असावं तिला, म्हणून तर निनावी राहिली” ती”.

किंवा तेंव्हाही असंच असेल का?कुटुंब प्रमुख हा पुरुषच!त्यानी ठरवायचं प्रत्येक गोष्ट केंव्हा, कोणी, कशी करायची किंवा नाही करायची हे. तो अनाठाई आवाज चढवणार, हात उचलणार, लाथाबुक्क्या घालणार, आजही काही बदललं आहे का?

आजतर दहा हातांनी लढतेय “ती”, नाती सांभाळणारी, नैतिकतेच्या चक्रात पिळवटून जाणारी आणि तरीही स्वतः च्या कमाईच्या रुपयावरही हक्क नसलेली. तो ठरवतो कसे गुंतवायचे, कुठे उधळायचे? ती फक्त एक चाक सतत अविरत चालणारं.

वाल्या कोळ्याच्या बायकोनीही हे सगळं भोगलं असेल का? त्याच्या एखादया फटकर्यांनी तीच्या नाकाचं हाडं मोडलं असेल का? एखादी लाथ जिव्हारी बसून तीची ओटी रिकामी झाली असेल का?वाहत्या दुधात भिजलेला पदर भरजरी होता की पटकूर, हा प्रश्नच उठत नाही ना?केसांचा बुचडा धरून थोबडवणारा हातच तिच्या वाटेला सतत येत होता का?

अशी काय वाटमारी मिळत असेल वाल्याकोळ्याला रोजच्यारोज? मग उगवता सूर्य मावळतांना तरी जठराग्नी आहुती मागतच असेल ना? तिच्या लेकरांच्या पोटाची ही आग ती माऊली कशी भागवत असेल? इथेही मोठा वाटा त्याचा,मग मुलांचा आणि मग उरला तर तिचा, वाल्याकोळ्यानी कधी मागे वळून पाह्यलं असेल का की तिला घासभर तरी अन्न मिळालं आहे की नाही हे?घटाघट पाण्या बरोबर आपली आसवं पिऊन पॉट भरणारी ती कधीतरी त्याच्या नजरेत भरली असेल का?

अशा अनंत प्रश्नांच्या मालिकेतुन माझ्यातली स्त्री आणखी एका विचारानी हादरून गेलेली आहे, तो जेंव्हा रामनामाचा जप करायला बसला तेंव्हा ह्या कुटुंबाच काय झालं? तो तर रावणाचा काळ! कुटुंबात पुरुषच नाही म्हटल्यावर,तो काळ किती अंदाधुंद झाला असेल? तिचा आक्रोश कोणी ऐकला असेल? विटंबना, अवहेलना ह्यांना ती कशी सामोरी गेली असेल?की

तीनी ते सगळं रित्या मनानी, उघड्या डोळ्यांनी स्वीकारलं असेल? आणि तिची मुलं?

गडे हो, विचार करा,साक्षात सगुणांची पुतळी असणाऱ्या गर्भाशी सीतामाईला वनवासात पठावणाऱ्या, अग्निपरिक्षे सारख्या सत्वपरीक्षेला बसवणाऱ्या वाल्मिकींनी आपल्या पत्नीला कुठे पाठवलं असेल? जागृती आल्यावर????

आपणं अस म्हणतो की,पूर्व जन्मीच्या सुकृतावर आपला जन्म बेतलेला असतो.मग,त्या वाल्याकोळ्याच्या निनावी बायकोच सुकृत किती मोठं असेल, विचार करा ना—-

तिचा एक नकार एका माणसाच उभंआडवं आयुष्य बदलवून गेला,तो एक नकार रामायण घडवून गेला आणि “त्याने”मात्र तीच आयुष्य,तीच अस्तित्व केवळ एक उपरोधिक उल्लेखानी अधोरेखित केलं.

तीच “असणं”इतकं नगण्य करून टाकलेल्या त्या वाल्याकोळ्याला तीच बसली असेल राखत त्याच वारूळ होतांना, खात्री आहे मला,कारण पाश सरला तरी पुन्हा पुन्हा रुजवून घेण्याची क्षमता फक्त मातीतच आहे ना?आपल्या तपोबळानी जन्माला घातला असेल तीनी नवा जीव,स्वतः ला मातीखाली गाडून वाल्मिकी नावाचा!!

अपमानानी, अवहेलनानी, उपरोधानी, नाकर्तेपणानी शिणून कधी एखादीनी चिणून टाकलं ना त्याला कशाचीही तमा नबाळगता,तर तिथे भेटेल “स्व”त्व गमावूनही “सत्वानी”सजलेली “मानिनी”वाल्याकोळ्याची बायको.

मुलांचं काय? ह्या प्रश्नाच उत्तर कदाचित माझी नातच शोधेल.आत्तापासून तिच्यातल्या स्त्रीत्वाला फुलवत रहाणं एवढचं माझ्या हातात आहे.

चित्कला नावं आहे तीच, वाल्याकोळ्याच्या मानिनी सारखी सोशिकताही तिच्यात रुजवी आणि संधी मिळताच एखाद्याला त्याची जागा दाखवण्याचं सामर्थ्यही,एव्हढीच श्रीराम चरणी प्रार्थना.

 

स्नेहल सारंग.

गेली ३३८ वर्षे दाबून ठेवलेल्या मनातील काही गोष्टी

रसिक वाचक,

सप्रेम नमस्कार ! आज छत्रपती शिवाजी महाराजांची ३३८ वी पुण्यतिथी ! या निमित्ताने , माझ्या आगामी *झंझावात* या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरीतील काही भाग इथे प्रस्तुत करत आहे.

“माणसात पण देवत्वाचा अंश असतो” हे ग.दि.मांं. नी आपल्या एका चारोळीत म्हणून ठेवले आहे :

 

ज्ञानियांचा वा तुक्याचा

तोच माझा वंश आहे,

माझिया रक्तात थोडा

ईश्वराचा अंश आहे !

 

आजच्या या रसातळाला चाललेल्या *आरक्षण* रूपी आमिषांनी आपली तुंबडी भरणार्‍या राजकारणी जमान्यात , शिवराय तुमची खूप कमतरता भासते !

तुमच्या पवित्र स्मृतीला त्रिवार वंदन !

 

जीवाशी खेळताना प्रत्येक क्षणी,

मातृभूमीसाठी लावताना बाजी

नसांनसांत दौडत जाते – ती वृत्ती

म्हणजेच छत्रपती शिवाजी !

 

माझ्या मावळ्यांनो, प्रजाजन हो, गेली ३३८ वर्षे दाबून ठेवलेल्या मनातील काही गोष्टी आज सांगाव्याशा वाटतायत् ! आम्हाला माहित आहे – “आत्मा बोलतो” यावर आजच्या बुध्दिवादी लोकांचा विश्वस बसणार नाही.पण जे काही तुम्ही ऐकणार आहात ते ऐकून पूर्ण झाल्यावर तुम्हाला त्यातील सुसूत्रता पटेल आणि लक्षांत येईल की आम्ही जे बोललो तो गेल्या ३८८ वर्षांतील म्हणजेच आमच्या जन्मापासून ते आमच्या शारीरीक निर्वाणा पर्यंतचा घटनाक्रम अर्थात् इतिहास आहे आणि इतिहास कधी खोटा असेल काय हे तुम्हीच ठरवा !

त्याआधी आम्ही तुम्हांस ३३८ वर्षे मागे नेतो…..

 

आज चैत्री पौर्णिमा – रामभक्त हनुमानाची जयंती – म्हणजे तुमच्या आजकालच्या “इंग्रजा”ळलेल्या भाषेत ३-एप्रिल ! गेल्या अकरा दिवसांत आम्ही आसन्नमरण अवस्थेत आहोत आणि आज वैद्यराजांच्या औषधाच्या मात्रा पण पोटात ठरत नाहियेत.अंगाचे नुसती काहिली होत्येय.सभोवताली काय चाललंय काही कळत नाही , अंतर्मनात जाणवत्येय ती फक्त गोमाजीबाबा पानसंबळ, महादेव आणि मनोहारी या सेवकांच्या

 

डोळ्यांतील आर्त भाव ! राजाराम तर गेल्या अकरा दिवसांपूर्वीच स्वतःला “पोरका” समजू लागलाय ! शेवटी त्यांनाही महाराणींचे आणि रायगडावरील वीषवल्लींचे फुत्कार ऐकू गेले असणारच !

 

ग्लानी येत्येय पण डोळ्यांसमोर दिसतोय दख्खनेत उतरण्याची तयारी करणारा आलम् गीर ! दक्षिणेत यायच्या तयारीत असलेला एक वेडा पीर ! सम्पूर्ण मुघल खानदान तैमूरलंगापासून इथे आलं.त्यांना फक्त ही भूमी जिंकायची जमीन वाटली , मातेच्या नाळेचा आणि बाळाचा संबंध जणु यांना ठावेच नाही ! आम्ही ही भूमीच आमची माता मानली ! बहुसंख्य हिंदू असलेल्या या भूमीत हिंदुंची देवळे पाडली गेली, इथल्या मुसलमानांना सुध्दा मुघलांनी दुय्यमच वागणूक दिली, स्त्रियांची अब्रू चव्हाट्यावर येत होती ! हे सर्व थांबविण्याच्या निर्धाराने आम्ही वयाच्या पंधराव्या वर्षी रायरेश्वरी स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली ! फक्त शपथ घेतली – काही लेखकांनी लिहिल्याप्रमाणे “करंगळी” वगैरे काही कापली नाही – वृथा रक्त सांडण्याची शिकवण आम्हांस ना जिजाऊ माँसाहेबांनी दिली ना आम्ही “गनिमी कावा” ज्यांच्याकडून शिकलो त्या आमच्या महाराजसाहेबांनी आम्हाला ही शिकवण दिली !

 

कफल्लक अवस्थेतून सुरुवात करून गेल्या पस्तीस वर्षांत जे कमावलं ते एव्हढ्याचसाठी की आज ना उद्या दिलीश्वर दक्षिणेत येणार आणि त्याला तोंड द्यायचं तर पदरी पुरेसे सैन्य, मुबलक शस्त्रं, धन आणि किल्ले हवेत ! आजमितीस ३६० किल्ले राज्यास जोडले.”एक एक किल्ला एक एक वर्ष लढवला तरी आलम् गीर ला ३६० वर्षे लागतील दख्खन जिंकायला”हा आत्मविश्वास होता अगदी गेल्या अकरा दिवसांपूर्वीपर्यंत्.पण राज्य लालसेने जे मुघल राज्यकर्त्यांनी केले ते प्रत्यक्ष रायगडावर महाराणींनी करताना पाहून कलेजा फाटून गेला, येणार्‍या काळात उद्याच्या छत्रपतींना-म्हणजेच पर्यायाने शंभुराजांना एक शत्रु घरात आणि एक दारात असे युध्द खेळावे लागणार असे दिसते.राजारामांच्या लग्नानंतर आठ नहाणाच्या “मेजवानी” ने आम्हाला हा “दृष्टांत” दिला आहे …..

 

राजारामाच्या लग्नाचं आमंत्रण अभिषिक्त राणी असूनदेखील ज्यांना “राजमाता” बनता आलं नाही त्या सोयराबाई राणीसाहेबांनी युवराज संभाजी आणि येसुबाई यांना मुद्दाम दिलं नाही ! अर्थात् यातही आम्ही युवराजांसाठी नियतीने लिहून ठेवलेला धोक्याचा इशाराच पाहिला.दूरदृष्टी आताशा आम्हास एक शापच वाटते ती याच कारणाने – कारण जे आम्ही बघतो ते आमच्या अष्टप्रधान मंडळातील एकालाही आमच्या बरोबरीने दिसत नाही.

 

युवराज शंभुराजे वयाच्या आठव्या वर्षी मोंगली मनसबदार झाले, आग्र्याहून सुटका झाल्यावर आम्ही पुढे निघून आलो तेंव्हा ते धैर्याने कृष्णाजीपंतांकडे मथुरेस राहिले ! त्यांच्या जीवंतपणी आम्हास त्यांचे दिवस घालावे लागले आलम् गीर ची दिशाभूल करण्यासाठी , पण ह्यांनी त्याबध्दल एका शब्दानेही आम्हास आजतागायत काही म्हटले नाही.त्यांची बुध्दी तेज आहे, आम्ही रायगडी असता रामराजांच्या-होय्-राजारामास ते रामराजेच म्हणतात्-तर रामराजांच्या लग्नाला बोलावणे नाही यामागचा “ना” बोलविता धनी कोण हे ओळखण्याइतकी त्यांची बुध्दी नक्कीच तेज आहे.प्रत्यक्ष आमची आज्ञा

 

डावलली जाते यामागचे राजकारण त्यांच्या नकीच लक्षात येईल्.कारण आम्ही कितीही रागावलो असलो तरी राम-भरता प्रमाणे असणार्‍या या बंधूंच्या जोडीस आमचे नेहेमीच आशीर्वाद असतील हे युवराज जाणतात !

 

हे “श्रीं”चं राज्य – स्वराज्य निर्माण करत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कार्यरत असणार्‍या माणसांना आमचा राज्याभिषेक होताच यशातील आपला हिस्सा व हक्क दिसू लागला.बाळाजी आवजी,अणाजी दत्तो ते मोरोपंतांपर्यंत सर्वांनी – एक हंबीरराव वगळता , सिंहासनाची पिढीजात सेवा आमच्याकडून मंजूर करून घेतली.

 

आमच्या राज्याभिषेकानंतर खुद्द महाराणी साहेबांना सुध्दा “अभिषिक्त”पणाची धुंदी चढली.दहा वर्षाच्या अशक्तम् दुर्बलम् पोराकडे राज्याचा भावी छत्रपती म्हणून बघण्याएव्हढी त्या धुंदीमुळे त्यांची नजर वहावत गेली.आणि यासाठी पठिंबा कुणाचा ? – तर राज्याचे सुरनवीस – अण्णाजी दत्तो यांचा ! अण्णाजींसारखा मुरब्बी राजकारणी सुध्दा जनानी राजकारणाला बळी पडावा ना?

 

अण्णाजींकडे माहेरपणाला आलेल्या त्यांच्या मुलीच्या – गोदावरीच्या “न” गेलेल्या अब्रूबध्दल युवराजांनी ती अब्रू घेतली असे संशयाचे भूत अण्णाजी आणि त्यांचे कुटुंब सरस्वतीबाई यांच्या मनात भरवून देण्याची थोर कूट्नीती महाराणींनी वापरली.युवराजांचा न्याय करण्यासाठी केलेल्या चौकशीचा दिवस अजून आठवतो …..

 

हातीपायी बेड्या घातलेले युवराज आरोपानंतर बेडरपणे आमच्या डोळ्यांस डोळा भिडवून आम्हांस म्हणाले,”आम्ही बाईंना आमच्या अखत्यारीत लिंगाण्यावर कैदेत ठेवले आहे.कारण प्रत्यक्ष आमच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न या रायगडावरील काही प्रतिष्ठित मंडळी करीत आहेत याचा सुगावा आम्हांस लागला होता.आमच्या निरपराध पणाची साक्ष आपण बाईंना इथे बोलावून आणून घ्यावी एव्ह्ढीच आमची आपल्या पायाशी विनंती आहे !”आम्ही मोरोपंतांस लिंगाण्यावर धाडले बाईंना सन्मानपूर्वक घेवून येण्यासाठी.पण तत्पूर्वी आम्ही जेंव्हा विचारले ,”कोण प्रतिष्ठित मंडळी हा प्रयत्न करताहेत?” , तेंव्हा राणीवशाकडे एकवार जळजळीत नजर टा़कून युवराजांनी मान खाली घालत एव्हढेच म्हटले,”माफी असावी पण , ती नावे या भर सभेत घेण्याएव्हढी आमची पायरी नाही!”

 

तिकडे ती निष्पाप पोर- “निरपराध युवराजांवर आपली “न” घेतलेली अब्रू घेतल्याचा खोटा आरोप करावा तर आपलीच अब्रू चव्हाट्यावर येते आणि न करावा तर प्रत्यक्ष जन्मदात्या आई-बापांवर खोटे आरोप्-ते ही प्रत्यक्ष युवराजांवर केल्याचे पातक लागते!” या द्वीधा मनःस्थितीत सापडली आणि तिने लिंगाण्यावरून स्वतःस खाली लोटून देऊन यातून सुटका करून घेतली.पण न केलेल्या गुन्ह्याबध्दलचा युवराजांवरील संशय लोकांच्या मनात दृढ करून आणि आंधळ्या पुत्रप्रेमाची वावटळ आमच्या विरुध्द इतिहासात कायमची नोंद करुन गोदावरी गेली ! या धक्क्यातून पुढे सरस्वतीबाई पण सावरु शकल्या नाहित आणि त्या ही गोदावरीपाठोपाठ काहि दिवसांतच निजधामांस गेल्या ! या सगळ्यांमुळे अण्णाजींच्या मनांत मात्र युवराजांच्याविरुध्द कायमची अढी निर्माण झाली .

 

ज्या “स्त्री” च्या शीलाचे रक्षण करण्यासाठी आम्ही हे स्वराज्य निर्माण केले, त्याच स्वराज्याच्या सिंहासनासाठी प्रत्यक्ष महाराणींनी-एका स्त्रीनेच एका स्त्रीच्या शीलाचे भांडवल करून युव्राजांचे चारित्र्यहनन केले आणि प्रत्यक्ष छत्रपतींची निष्कलंक न्यायाची कारकीर्द कलंकीत केली – इतकी की तो अविश्वास अण्णाजींच्या नजरेत

 

आम्हांस आमरण पहावा लागला ! यापेक्षा मोठे दु:ख ते कोणते?

 

आम्ही आजारी पडल्यावर आणि आम्हांस आमचे भवितव्य दिसावयास लागताच आम्ही बाळाजी आवजींना पन्हाळ्यावर युवराजांना आमच्या आजारपणाबध्दल कळवायला सांगून बुलावा धाडण्याचा खलिता लिहावयास सांगितला होता. पण मधे आठ दिवस जाऊन पण युवराज आले का नाहित असे विचारताच महाराणी साहेबांचे ठसक्यात उत्तर आले,”इकडच्या स्वारींबध्दल इतकी काळजी असती तर गेलेच असते कशाला ते दिलेरखानाकडे निघून?”.

 

आम्ही पुतळाबाईसाहेबांना पालखी पाठवून गडाखालून बोलावून घेण्यास सांगितले होते, त्याही आल्या नाहित , यावर पण महाराणी साहेबांनी सांगितले,”इकडचा महालच आजारी आहे !”

 

“आदिलशाही, कुतुबशाही आणि मोघल आलम् गीर या सारख्या बलाढ्य सत्तांना काबूत ठेवणार्‍या छत्रपतींना आपल्या लोणकढी थापा कळल्या नाहित” या भ्रमात रहाणार्‍या अतिसामान्य बुध्दीच्या बाईस महाराणीपद मिळावे यासाठीच का परमेश्वरा तू सईबाईंना आमच्यापासून दूर नेलेस?

 

हंबीरराव, राजाराम, युवराज आणि येसुबाई यांचा अपवाद वगळता सर्वच लोकांची निष्ठा राज्याच्या ऐवजी राजाच्या – आमच्याच ठायी असावी? य सार्‍या लोकांना आमचे अफझल वधाच्या वेळी भेटीस जातानाची आमचे निर्वाणीचे बोल का आठवले नाहित , कधीच? आम्हास आजही लख्ख आठवते, आम्ही म्हणालो होतो, *आम्ही तो खानाच्या भेटीस निघालो, खानांस मारूनच स्वराज्य तरणे आहे ! पण ये कामी जर आम्ही नाकामयाब होऊन मारले जातो, तर मरता मरता हे समाधान असेल की स्वराज्य रक्षणासाठी जीव जातो आहे.मागे उरलेल्यांनी शोक करू नये, छोट्या शंभुबाळास मॉसाहेबांच्या मांडीवर ठेवून त्यांच्या सल्ल्याने स्वराज्य राखणे ! एक शिवाजी गेला तरी चालेल , पण स्वराज्य संपता नये, तुमच्या निष्ठा स्वराज्याशी ठेवा शिवाजीशी नाही!*

 

हंबीरराव्-एक नि:स्पृह सेनापती-सरनौबत ! नेसरीच्या खिंडीत जेंव्हा प्रतापराव मारले गेले तेंव्हा सरनौबत पदासाठी आनंदरावांचे नांव पुढे आले.पण सैन्य निर्नायकी राहू नये म्हणून धैर्याने सैन्याची देखरेख करत थांबलेले “हंसाजी मोहिते” हेच सरनौबत पदासाठी अधिक योग्य आहेत असे ठामपणे फक्त आम्हां व्यतिरिक्त युवराजांनीच सांगितले होते. हंसाजी मामा – हंबीरराव या किताबासहीत सरनौबत झाले ! वास्तविक होऊ घातलेल्या भावी महाराणींचा भाऊ म्हणून त्यांनी कधीच लाळघोटेपणा केला नाही , आणि आमची खात्री आहे – त्यांच्या निष्ठा स्वराज्याशी आहेत !

 

राजाराम – तो तर एक अशक्त मुलगा ! महाराणींच्या वटारलेल्या डोळ्यांत विरघळून जाणारे त्यांचे धैर्य आलम् गीर ला थोपवू शकेल काय?नि:संशय नाही, त्रिवार नाही ! हां एक मात्र खरं की राजारामाच्या निष्ठा सत्याच्या बाजूने आहेत – महाराणी नसताना ती चमक आम्ही त्यांच्या डोळ्यांत पाहिली अहे ! त्यांना सत्तेची हाव नाहे, नव्हे तेव्हढी आपली कुवतच नाही हे ही ते जाणतात ! या “राम्”राजाचे हे “भरत”प्रेम त्यांच्या दादामहाराज अर्थात् शंभुराजांसाठी असेच कायम राहो हीच “श्रीं”च्या चरणी प्रार्थना !

 

शंभुराजे – एक निर्भीड – लखलखतं धारदार अस्र ! पण राज्याच्या जनानी हव्यासापायी रक्तबंबाळ झालेले एक दुर्दैवी युवराज ! आमच्या ज्या अष्टप्रधानांना वंशपरंपरागत “सेवा” हवी आहे त्यांनाच “केवळ मोठे युवराज म्हणून काही भावी छत्रपती म्हणून योग्यता सिध्द होत नाही, वंशपरंपरेने का राजाचे अधिकार द्यायचे असतात?” म्हणून युवराज भावी छत्रपती म्हणून नको आहेत.

 

येसुबाई- ही एकच पोर अशी आहे की जी मॉसाहेबांनंतर “राजमाता” होण्याची योग्यता आणि वकूब अंगी बाळगून आहे.आणि म्हणूनच आमची “शिक्के कट्यार” तिच्या हाती सुपूर्द करताना आम्हांस जराही संदेह वाटला नाहे.पण या शिक्के कट्यारीनेच महाराणी साहेबांचा स्त्री मत्सर जागा केला आणि वेळप्रसंगी कट्यार पण काय करील अश्या वाग्बाणांनी महाराणींनी तुम्हांस आणि पुतळाबाई राणीसाहेबांस बेजार केले, कारण त्या एकट्याच तुम्हांस समजावून घेऊ शकतात ! या शंभुबाळासारखा धगधगता “अंगार” पदरात बाळगण्याचं आणि सांभाळण्याचं धैर्य आई भवानी तुम्हांस देवो !

 

दिलेरखानाला जाऊन मिळालेले शंभुराजे स्वराज्यात परत आले पण भूपाळगडाच्या सातशे निरपराध लोकांच्या थोट्या केलेल्या उजव्या हातांचा आणि अथणीच्या शेकडो निरपराध लोकांच्या गेलेल्या जीवांचा कलंक माथी घेवूनच ! आयुष्यात केलेल्या या एकमेव मोठ्ठ्या चुकीने वयाच्या आठव्या वर्षांपासून केलेले पराक्रम आणि दाखवलेले धैर्य आणि शौर्य एका क्षणांत हे अष्टप्रधान मंडळ विसरले ! या सार्‍या लोकांच्या अक्षम्य चुका आम्ही कायम पदरात घातल्या, पण “शंभुबाळ, राजाला चुकून पण चुकता नाही येत हे ध्यानी धरा !”वेळ पडली तर एकच कांय पण असले छप्पन्न आलम् गीर या दख्खनमधे गाडण्याचं सामर्थ्य तुझ्या मनगटात आहे रे पोरा ! पण राजाने भावनाप्रधान , कवी मनाचे असून नाही चालत ! राजाला धूर्त आणि कावेबाजच असावं लागतं ! “तळे राखी तो पाणी चाखी” या उक्तीप्रमाणे अण्णाजी वा इतर मंत्र्यांनी केलेले गैरव्यवहार नजर अंदाज करण्याचं धोरणीपण जे आमच्याकडे आहे ते तुमच्याकडे नाही, मनांत आलेले विचार चेहेर्‍यावर दिसू न देण्याचं धोरणीपण तुमच्याकडे नाही,आवडेल त्यावर जान निछावर करणारे जिगर घेवून तुम्ही जन्माला आलात पण तुमचं जन्म घेण्याचं घराणंच चुकलं युवराज ! कुठल्या सरदाराच्या घरी जन्मांस येतात तर आम्हांसकट सगळ्यांनीच तुम्हांस डोईवर घेण्याचेच बाकी ठेवले असते इतके उच्च प्रतीचे तुमचे सर्व गुण, पण आमच्या – या छत्रपतींच्या पोटी जन्मलात आणि तेही थोरले होऊन हाच तुमचा सर्वांत मोठा अवगुण युवराज !

 

सगळं काळंबेरं ओळखून पण शांतपणे आणि धोरणीपणे वागता यायला वयाची पन्नाशी यावी लागते युवराज ! पण दुर्दैवाने तुम्हासं तेव्हढा अवधी नाही, कारण आलम् गीर दाराशी उभा ठाकेल तेंव्हा दारांत एक आणि घरातच अनेक अश्या शत्रूंशी तुम्हांस लढावं लागेल आणि आमचं दुर्दैव की आम्ही अश्या वेळी तुमच्या पाठीशी रहाण्यासाठी या जगांत नसू !

तरूणपणी संतापाच्या भरांत जावळीच्या चंद्रराव मोर्‍यांच्या मुलांना मारण्याचे असंयमी कृत्य आम्हीही केलंच की ! आग्र्यास “आम्हांस जास्तीत जास्त भडकावून कैदेत डांबण्याएव्हढी आगळीक आमच्याकडून घडावी “यासाठी आलम् गीर प्रयत्नशील आहे हे ओळखून पण आम्ही भर दरबारांतून पाठ फिरवून येण्याची घोडचूक केलीच ना? “श्रीं”

 

च्या कृपेने आपण सारेच यातून सुटलो पण कित्येक निरपराध जीवांची गुंतवणूक त्यावेळी आम्ही नाहक केल्याची रुखरुख अजून मनातून जात नाही !

 

आज बाहेर जगदीश्वराच्या मंदिरात महा मृत्युंजयाच्या जपांस ब्राह्मण बसलेत ! यांना कसे समजावणार की आज हनुमान जयंती- रामाच्या दासाची जयंती- आजच रामाच्या दासाच्या – समर्थ रामदासांचे कृपाभिलाषी छत्रपतींनी हा नश्वर देह टाकून निर्वाण करावे हे योग्य नव्हे कांय?आणि अशा जपांनी जर मृत्यू थांबता , तर आज सईबाईसाहेब “महाराणी” नसत्या काय? दादोजी – महाराज साहेब्-बाजी काका पासलकर्-कान्होजी जेधे -बाजीप्रभू देशपांडे-मुरारबाजी-तानाजी-काशीबाई राणीसाहेब्-मॉसाहेब यांना आम्ही जाऊ दिले असते कांय? “आयुष्याची दोरी बळकट करण्यासाठी जपाच्या माळेचा नव्हे तर धनुष्याचा दोराच सहाय्य करील” हे या देवभोळ्या माणसांना कळले पण वळले मात्र कधीच नाही !

 

आमचा लढा मानवता विरोधी हर एक दुष्टाशी होता , कुठल्याही धर्माशी आम्ही कधीच वैर केले नाही ! सामान्य माणूस मानाने जगू शकेल असा त्याच्या “स्व”तःच्या मनात विश्वास उत्पन्न करेल तेच ना स्वराज्य?नपेक्षा आम्ही याकूतबाबा , शहा शरीफ्,मौनी बाबा,रामदास स्वामी,तुकाराम महाराज या सार्‍या संतांच्या चरणी लीन झालो असतो काय? आणि नपेक्षा धर्माने “इस्लाम” चे बंदे असलेले सिद्दी हिलाल, सिद्दी इब्राहीम्,नूर बेग, काझी साहेब या सार्‍यांनी स्वराज्याशी ईमान वाहिलं असतं का?

 

पैलतीर दिसत असताना याक्षणी जगायची ही ऊर्मी का मनात दाटून येत्येय? जगायची हाव म्हणून्?निश्चीतच नाही ! तर आलम् गीर सारख्या बलाढ्य शत्रूला नामोहरम करणार्‍या माझ्या या बछड्याची -युवराज संभाजी ची कीर्ती दिगदिगंत पोचलेली पहाण्यासाठी आणि विजयी होवून आलेल्या त्या वीराला आमच्या नेत्रांनी औक्षण करण्यासाठी ! त्या क्षणी आमच्या तेजाळलेल्या नेत्रांत बघून या सार्‍या अलम् दुनियेला खात्री पटेल की शिवाजीने फक्त स्वराज्य नाहे घडवलं तर ते स्वराज्य राखण्यासाठी दैदिप्यमान धगधगत्या अंगाराची मशाल आपल्या युवराजांच्या रूपाने या हिंदवी स्वराज्यासाठी-या राष्ट्रासाठी जळत ठेवली आहे !

 

वडिलांचा अंत्यसमयी पुत्र पित्याच्या जवळ नसावा हा “भोसले” घराण्याला शापच आहे ! हे राज्य व्हावे ही “श्रीं” ची इच्छा होती आणि ती टिकवणारा भवानीचा भुत्या भविष्यात स्वराज्याचा पोत पाजळत जग उजळून टाकेल ! पण आजमितीस , अंगाची लाही लाही होत असताना शेवटचा श्वास घेण्यासाठी स्वराज्याच्या छत्रपतींना तुझ्यासारख्या महापराक्रमी आणि निर्मळ मनाच्या युवराजाची मांडी नसावी, ही पण “श्रीं” ची च इच्छा ! जे स्वराज्य निर्माण करण्यासाठी हजारो जीवांची गुंतवणूक झाली, त्या जीवांचा सौदागर आपल्या सग्या सोयर्‍यांकडे भेटीला निघाला असताना, त्याची गुंतवणूक ज्या जीवात झाली आहे त्या स्वराज्याचा भावी तारणहार, राखणदार – आलम् गीर ला आव्हान देऊ शकणारा आणि ते समर्थ्पणे पेलण्याची ताकद अंगी बाणून असणारा “छावा” नजरेआड असावा आणि त्याची वाट पहाणारे हे दोन डोळे पन्हाळ्याकडे पहात पहात निष्प्राण व्हावेत ही पण श्रींची च इच्छा!

 

उदय गंगाधर सप्रे म — ठाणे

 

पहिला पाऊस

व्रुत्तपत्रातील त्या बातम्या. आज या भागात’वीज कपात’,’पाणी कपात’ तर उद्या त्या भागातील. गरम्यामुळे जीव नकोसा होत होता. बरं एवढी उष्णता वाढत होती की,घरात नुसतं बसणंही असह्य होत होतं. पण या सगळ्याचा रामबाण उपाय म्हणजे ‘पाऊस’ आणि त्याचीच तर कमतरता होती.

 

त्रुषार्त वसुधा डोळे वटारलेल्या भगवान सहस्त्र रश्मीकडे काकुळतीने पहात होती. निसर्गात एक प्रकारचा रुक्षपणा आलेला होता. सगळी कडे कोरडेपणा.आकाशात भरून येणाऱ्या ढगांना पाहण्यासाठी माणूस चातक झाला होता. जमीन तापून -तापून तडे गेले होते बिचारीला! एरवी शांत-शीतल म्रुण्मयी उन्हाळ्याने होरपळून गेली होती. वर्षानुवर्षे अन्नपाणी न मिळालेल्या निर्वासितासारखी.आकाशातल्या क्रुष्णमेघाकडे ती टक लावून पहात होती. एखाद्या प्रेयसीने प्रियकराची वाट पहावी अगदी तश्शीच!सुखाच्या वर्षावाची वाट!रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची तर त्रेधातिरपीटच होत होती. सर्व माणसे अगतिक होवून आतुरतेने त्या पाहुण्याची वाट पहात होती.

 

मानव आकाशातील चैतन्याची आठवण करीत होता. सारी स्रुष्टी द्रुष्टीहीन. होमहवन- मंत्रजागर झाले पण तो लबाड पाऊस कुठे दडून बसला होता कोण जाणे?नेहमी सर्वज्ञतेचा टेंभा मिरवणाऱ्या माणसाला नाकदुऱ्या काढावयास लावताना त्याला खदखदून हसू येत असावं.अगदी लहान मुलेही त्याची वाट बघत होती. पाऊस पडावा म्हणून म्हणत होती, ‘ये रे ये रे पावसा….’   सर्वत्र दुष्काळाचा अक्राळविक्राळ राक्षस विकट हास्य दाखवत होता.

 

एवढ्यात कुठेतरी दूरवर एक अगदी लहानसा काळा ठिपका दिसायला लागला. लहान मुलाच्या हनुवटीवर तीळ लावावा तस्सा!वडाच्या झाडाचे बी मोहरी एवढेच असते पण त्याचा व्रुक्ष व्हावा तसे बघता-बघता ह्या एवढ्याश्या काळ्या ठिपक्याने सगळे आकाश व्यापून टाकले होते. एखादी आवडती व्यक्ती घरी यावी आणि घर भरून जावे तसे या काळ्या ढगांनी साऱ्या स्रुष्टीला आनंद आवरेनासा झाला होता. दाही दिशा कुंद झाल्या होत्या. धुंद वारा वाहू लागला. काय घडतंय काही कळायच्या आतच एकदम प्राजक्ताच्या टपोऱ्या फुलांसारखे थेंब मातीवर कोसळू लागले. वरुणराजाने आपली सारी दौलत वसुधेवर अशी उधळून दिली की,

“अनंत हस्ते कमलावराने

देता किती घेशील दो कराने”

अशी बिचारीची अवस्था झाली होती.

 सौ. प्राजक्ता हर्डीकर

नाते

असणं आणि माननं , दोन खरंच खूप वेगळ्या गोष्टी आहेत. जेव्हा एखादी गोष्ट आहे किंवा एखादे नाते आहे असे आपण मानतो तेव्हा तिथे असतो फक्त विश्वास, तो ही एकतर्फी. कारण, हे तुमचे मत आहे. प्रत्यक्ष वस्तुस्थिती तशी असेलच असे नाही. आणि असणं हे निसर्गतः किंवा जन्मतः मिळालेलं असतं. इथे सुद्धा विश्वास असतो पण त्या जोडीला असतो एक अधिकार , जो जन्मतः मिळालेलं असतो किंवा सामाजिक बांधिलकीने आलेला असतो.

जिथे आपण एखादे नाते आहे असे मानतो, तिथे असतो आदर, विश्वास!.. हो पण तिथे अंतर मात्र असतेच असते. तूम्ही माना अगर नका मानू. जसे हे माझे आई-वडील आहेत अथवा हे माझ्या आई-वडीलां सारखे आहेत. फरक   काय ? , की असण आणि नसणं!! एकॆ ठिकाणी आदर आहे, श्रद्धा आहै, आपलेपणाही आहे.पण जो स्वतःच्या आई- वडीलां विषयी वाटतो तो असेल का हो?… मला विचाराल तर नाही.

असे बर्याच नात्यामध्ये पहायला मिळते. बर्याचदा ती ओढ असते रक्ताच्या नात्याची, तर बर्याचदा ती असते सामाजिक,नैतिक. प्रत्यक्ष वस्तुस्थिती स्विकारने गरजेचे आहे नाहीतर पदरात निराशेशिवाय काहीच पडणार नाही. आणि मग आपण दोष देतो त्या व्यक्तीला,नशिबाला, प्रसंगाना . पण जर का धोडा विचार करून , सुरक्षित अंतर ठेवून या नात्यांकडे आपण पाहिले तर न गुरफटता एका सुरक्षित ठिकाणी तुम्ही असाल.
वेळ धावतेय, ती कोणासाठी धांबते का? नात्यांचही असेच असते. तीही काळानुसार बदलतात, बदलू शकतात.मग,  आपणही हे स्वीकारले तर त्रास नाही होणार.मृगगजळामागे धावण्यात काही अर्थ नाही. तहान तर भागणार नाहीच पण हवा आहे तो ओलावा , आत्ता मिळेल, आता मिळेल म्हणत म्हणत कोठे जाऊन पोहोचू कळणार ही नाही. मात पदरी पडेल फक्त निराशा आणि अपेक्षाभंगाचे दुःख. या सार्यांमध्ये वेळ जाईल तो वेगळाच.
मला वाटते, जर का प्रत्येकाने असा विचार करून एखाद्या नात्याकडे पाहिले…म्हणजेच जर का माननं महत्त्वाचे आहे असे वाटले तर तिथे अपेक्षा करून चालणारच नाही.आणि जर का हे माननं दोन्ही बाजूंनी तेवढ्याच तोडीचे असेल तर तिथे काही तरी नाते आहे असे म्हणता येईल.

पण, आपण मन नाही वाचू शकत. मग का विषाची परिक्षा घ्या? त्यापेक्षा जे आहे त्याचा स्वीकार करा.आणि आनंदी व्हा. आणि ते ही जमत नसेल तर नवीन नाते निर्माण करायला जाऊच नका.

हे प्रत्येकालाच जमेल असे नाही. पण वस्तुस्थिती जी आहे ती आहेच.स्वीकार करा. आणि आपले जीवन एक ध्येयपूर्ण बनवा. मृगगजळामागे धावण्यापेक्षा आपल्या ध्येयाच्या मागे धावा व आपले जीवन तर प्रकाशमय कराच!! आणि तोच प्रकाश इतरांच्याही कसा उपयोगी पडेल याकडे लक्ष द्या.

 

 

मानसी कोयंडे

नेरूळ

 

तेजोनिधी लोहगोल

अमरावतीतील कर्‍हाडे ब्राह्मणांचं एक सुखवस्तू घराणं— त्यातील रंगनाथचा एक मुलगा — श्रीधर — डाॅक्टर झाला.पण तो बहिरा होता.आणि दुसरा मुलगा वेडा होता.

श्रीधरचं लग्न झालं.बायको शांता ही अतिशय मनमिळाऊ होती.तिला कवितांची खूप आवड.रंगनाथ—शांताला लग्नानंतर १५ एप्रिल १९३२ रोजी मुलगा झाला.उभयतांनी मुलानं सूर्यासारखं चमकावं म्हणून हौशीनं नांव ठेवलं सुरेश ! हळूहळू सुरेश मोठा होत होता.पण तो अडीज वर्षांचा झाल्यावर त्याला पोलिओची बाधा झाली व त्यात त्याचा उजवा पाय अधू झाला.श्रीधर स्वत: डाॅक्टर असूनही काहीही करू शकले नाहीत कारण त्याकाळी पोलिओवर रामबाण उपायाची लस वा औषधंच उपलब्ध नव्हती !

अधू पायामुळे सुरेश शालेय जीवनात कुठलेही मैदानी खेळ खेळू शकला नाही ! शालेय शिक्षण संपता संपता मॅट्रिकला पण नापास झाला. डाॅ.श्रीधर हताश झाले व नकळत सुरेशला घरात दुय्यम दर्जाची वागणूक सुरू झाली.मग दुसर्‍यांदा मॅट्रिकला बसून पास झाला , तर पुढे इंटरमिजिएटला पण नापास झाला.तिथेही परत परिक्षेला बसून पास झाला तर बी.ए. ला चक्क दोनदा नापास झाला ! तिसर्‍यांदा परिक्षेला बसून तिसर्‍या श्रेणीत पास झाला व मग पोटासाठी खेड्यापाड्यातील शिक्षकाची नोकरी धरली.पण तीही एकामागून एक सुटतंच होती.पण एक गोष्ट मात्र सुरेशकडे कायम टिकून होती : जिद्द आणि आईकडून आलेली कवितांची आवड ! लहानपणी पाठ केलेले भा.रा.तांबे …. कुठेतरी आत कविता रुजली व फुलत होती ! समकालीन मित्रांचे सुखेनैव संसार फुलत असताना लोखंडी पेटीवर वही ठेऊन कंदीलाच्या पिवळ्या प्रकाशात सुरेश तळपत होता….. असेच एकदा अमरावतीला सुरेश गेला असताना प्रा.मधुकर केचे त्याला स्टेशनवर भेटले व स्वत: यशस्वी वाटेवर आरूढ असल्याने उपहासाने सुरेशला म्हणाले , कवी म्हणून तू संपलास ! आता फक्त मास्तरकीच कर! पण सुरेश मोठ्या आत्मविश्वासाने म्हणाला , ते अजून ठरायचंय !

आणि १९६१ साली , सुरेश २९ वर्षांचा असताना नागपूरच्या नागविदर्भ प्रकाशनाकडून  त्याचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला रूपगंधा व त्याला दिलीप चित्रे यांच्यासोबत विभागून राज्यशासनाचे दुसरे पारितोषिक मिळाले आणि पहिलं पारितोषिक कुसुमाग्रजांना ! यानंतर मात्र दांभिक नातेवाईक , हिणवणारे समकालीन सुरेशला ओळख देऊ लागले ! यानंतर पुढचा काव्यसंग्रह मौज प्रकाशनातर्फे प्रकाशित व्हायला मधे १३ वर्षांचा काळ जावा लागला व त्यातही सुरेशने रंग माझा वेगळा हे दाखवून देत केशवसुत पारितोषिक पटकावले ! बी.ए. ला दोनदा नापास झालेल्या सुरेशचा रंग माझा वेगळा नंतर ३ विद्यापिठांत एम.ए.साठी अभ्यासक्रमात क्रमिक पुस्तक म्हणून ठेवला गेला !

१९८३ साली सुरेशने स्वत:च प्रकाशक व्हायचं ठरवलं व एल्गार हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला !

शिक्षणात गती नसलेल्या सुरेशने आईकडून काव्याप्रमाणेच संगीताची आवड पण उचलली होती.मैदानी खेळ पायाच्या अधूपणाने न खेळू शकणार्‍या मुलाला डाॅ.श्रीधरनी बाजाची पेटी आणून दिली.पुढे त्याची संगीतातील आवड व प्रगती बघून संगीतातील शिक्षणासाठी प्रल्हादपंतांकरवी घरी त्याला संगीत शिकवणी सुरु केली.

पुढे शालेय जीवन संपता संपता पायातील कमजोरीवर मात करण्यासाठी सुरेश जिद्दीने  व्यायाम करू लागला.वेळ बराच लागला पण दंड—बैठका—डिप्स यासारख्या व्यायामामुळे तो हाडापेराने मजबूत झाला.नंतर नंतर तर पायात पण चांगलीच शक्ती आल्याने सुरेश सायकल पण चालवू लागला. वडिलांनी मग त्याला रॅले कंपनीची सायकल महाविद्यालयात जाण्यासाठी आणून दिली.

अभ्यासात गती नसलेला सुरेश आकाशदिवा, पतंग, कॅलिडोस्कोप, पेरिस्कोपसारख्या हस्तकलेच्या वस्तू बनवण्यात वाकबगार होता! तसंच तो काचा कुटून पतंगाचा मांजा बनवी !सुरेशला बेचकी छान बनवता येई व त्यातही त्याचा नेम अचूक असे.

या व्यायामाचा फायदा पुढे जेंव्हा सुरेशने काव्यगायनाच्या मैफिली करायला सुरुवात केली तेंव्हा मांडी ठोकून तासन् तास बसण्यासाठी झाला ! सुरेशने केवळ शारीरीकंच नव्हे तर शैक्षणिक कमतरतेमुळे त्याला दिल्या गेलेल्या दूय्यम वागणुकीला आपल्या जिद्दीच्या बळावर मात केली आणि तथाकथित साहित्यिकांना व दांभिकांना आपल्या कवितांद्वारे चोख उत्तर दिले !

कधीतरी पंडित ह्रृदयनाथ मंगेशकर यांना सुरेशचा काव्यसंग्रह एका खोपटवजा दुकानात सापडला.तो वाचून प्रभावीत होऊन त्यांनी सुरेशला शोधून काढलं आणि त्याच्या अनेक गाण्यांना चाली लावून अजरामर केलं ! मालवून टाक दीप ते पार केंव्हातरी पहाटे पर्यंत…..

मंडळी अशा या तळपत्या सूर्याचा — सुरेशचा म्हणजेच *कवीवर्य सुरेश भट*  मसगळं आठवण्याचं व सांगण्याचं कारण !

रूपगंधा , रंग माझा वेगळा , एल्गार यानंतर भटसाहेबांनी गझलेची बाराखडी , काफिला , झंझावात , रसवंतीचा मुजरा , सप्तरंग , निवडक सुरेश भट आणि हिंडणारा सूर्य ही पुस्तकं प्रसिद्ध केली.

त्यांना मानाचा सप्रे म मुजरा ! त्यांच्याबाबत बोलायचं तर ओठी असं येतं :

 

कंठी स्वरेश होता , शब्दी सुरेश होता

उलटवून हरती बाजी , तो जगला नरेश होता !

 

भटसाहेब , वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा आणि तुम्हाला त्रिवार वंदन!

 

© उदय गंगाधर सप्रे म — ठाणे

शांती अंखडीत राहो… जगाचा भेद लयाला जावो ।।

राष्ट्र संत तुकडोजी महाराज राष्ट्र उभारणीच्या कार्यात स्वतःला वाहून घेतले होते. लहानपणापासूनच त्यांना ईश्वरभक्तीची पण आवड होती. भक्तीच्या माध्यमातून , मानवतेच्या दृष्टीकोनातून त्यांनी राष्ट्रभक्तीचे धडे समाजात रुजविली .

माझ्या वडिलांनी संत तुकडोजी महाराजांची कांही भजनं डायरीत लिहून ठेवलेली आहेत.  आमच्याकडे श्रावण मासात एक महिना पूर्ण भजन करायचो.  त्यात  सर्व संतांची भजनं असायची.  चालीवर म्हणायचो.    ते दिवसच वेगळे होते. सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक/सर्वधर्मीय प्राथनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला. आज 30 एप्रिल , श्री संत तुकडोजी महाराजांची जयंती .   या निमित्ताने त्यांचं एक भजन आठवलं.  त्यांच्या या भजनातून मानवता धर्म आपल्या मनातून निर्माण व्हावयास पाहिजे. जात धर्म पंथ विरहित आणि एकमेकांच्या धर्माबद्दल आदर असावा द्वेषाचा लवलेशही नसावा .निसर्गनिर्मित वृत्ती म्हणजे निर्मळ प्रफुल्लित चित्तवृत्ती असावी या सगळ्या गोष्टी आपल्यात असल्या तर आपल्या देशाला

अखण्ड शांती लाभेल आणि असेच निरंतर असावे अशी मागणी श्री संत तुकडोजी महाराज आपल्या भजनातून भगवंताच्या चरणी करतात.

 

शांती अंखडीत राहो

जगाचा भेद लयाला जावो  ।।

खलनिंदक हे निर्मळ होऊनी ।

द्वेषपणाचा लेश न राहूनी   ।

सकल प्रभूगुण गावो     ।।

जगाचा भेद लयाला जावो …1

मानव धर्म मनाने लाभो  ।

निसर्गमय वृत्ती हरी शोभो।

अखिल जगा सुख होवो  ।।

जगाचा भेद लयाला जावो  ..2

पंथ मतांतर दूर रहावे  ।

तत्वज्ञान सर्वांतरी यावे ।

देवसमानची राहो   ।।

जगाचा भेद लयाला जावो …3

तुकड्यादास म्हणेही आशा ।

पुरवावी अमुची जगदीशा  ।

झणी उदयाला येवो  ।।

जगाचा भेद लयाला जावो..4

 

ज्या वयात बालसुलभ गोष्टी कराव्या त्या वयात त्यांनी ग्रामोद्धार राष्ट्रविकास समाजपरिवर्तन स्वातंत्र्य चळवळीत सहभाग विश्व हेच आपले कुटुंब थोडक्यात विश्व मानवत्वाची संकल्पना उरी बाळगून समर्पित असे जीवन तुकडोजी महाराज जगले.

त्यांच्या जयंतीनिमित्य श्री संत तुकडोजी महाराजांना विनम्र अभिवादन!!!

त्यांच्या कार्याची ओळख ही आजच्या काळाची गरज आहे.

 

“जनी हासती काय मला जन हे ,

ही लाज मनी तिळमात्र नको ।।

कार्य करा प्रभूला स्मरुनी ।

निःस्वार्थ पणे  प्रियता धरूनी  …

 

हे विश्वमकान खरे अपुले समजोनी  करी मग जीवदया …

मग वानो कुणी निंदोही कुणी ।

अभिमान मनी तिळमात्र नको।।

त्यांच्या भजनातल्या ओळी!!. खरंच कोणीही नतमस्तक  व्हावं

आयुष्य

मंडळी ,

आपल्यापैकी काही जणांना माझ्यासारखं सिनेमाचं आणि त्यातल्या त्यात संगीतकार , गायक व सिनेकलाकारांचं वेड असतं. आणि कधी कधी ते इतकं असतं की आयुष्याशी पण अशा सिनेकलाकारांची सांगड घातली जाते ! अशीच सांगड घालणारी एक कल्पना मांडली आहे ( ५ सप्टेंबर २००५ ला ! ) खालील कवितेत , बघा पटते का…..

 

आयुष्य

आयुष्य तेंव्हा सायरा बानो सारखं असतं

इकडून तिकडे उंडारण्याचं, चकाट्या पिटत फिरण्याचं

जेंव्हा आपलं वय एक ते चार असतं ! ॥१॥

आयुष्य मग गीता बाली सारखं होतं

पुष्कळ वेळ बागडण्याचं

मग पुस्तकांशी झगडण्याचं

जेंव्हा आपलं वय पाच ते आठ असतं ! ॥२॥

आयुष्य झटकन डोलणार्‍या वहिदा सारखं होतं

क्षणांत गिरकी घेण्याचं

बर्‍याचदा फिरकी घेण्याचं

जेंव्हा आपलं वय नऊ ते बारा असतं ! ॥३॥

आयुष्य आता नूतन सारखं होतं

प्रसंग कित्येक हसण्याचे

अपुऱ्या प्रयत्नांनी फसण्याचे

जेंव्हा आपलं वय तेरा ते सोळा असतं ! ॥४॥

आयुष्य आपसुक रसाळ , शर्मिला सारखं होतं

क्षण न् क्षण आवडण्याचं

कशाचीही भुरळ पडण्याचं

जेंव्हा आपलं वय सतरा ते वीस असतं ! ॥५॥

आयुष्य आता विद्या सिन्हा सारखं होतं

प्रत्येक गोष्टीत गुरफटण्याचं

कुठेतरी टिकायला धडपडण्याचं

जेंव्हा आपलं वय एकवीस ते पंचवीस असतं ! ॥६॥

यानंतरचं आयुष्य मात्र मधुबाला सारखं होतं

कधी अवखळ — कधी शांत

कधी काय होईल? याची भ्रांत

कधी हौसे—मौजेनं मुरडण्याचं

तर कधी हौस गरजेपाई खुरडण्याचं !

जेंव्हा आपलं वय सव्वीस ते “कितीही” असतं ! ॥७॥

~ उदय गंगाधर सप्रे ~

 आयुर्वेद चिकित्सेनुसार षड्रिपू

या अखिल चराचर जगतामधे   प्रत्येक जीवंत प्राणिमात्रांमधे काही स्वाभाविक इच्छा दिसून येतात. ज्या वेळोवेळी आपल्याला जाणवतात. त्यांचे वेळेवर निराकरण करायलाच पाहिजे.उदा-भुक लागल्यावर जेवण करणे, तहान लागल्यावर पाणी पिणे, त्याचप्रकारे शिंका येणे, जांभई, झोप, वमन, अश्रू येणे, मल मुत्र वेग, श्वास वगैरे  हे झाले शारीरिक वेग. यांचे निराकरण वेळेवर न झाल्यास अनेक शारीरिक रोगांन ते कारणीभूत होतात. म्हणूनच त्यांना अधारणीय वेग असे म्हणतात.

 

धारणीय वेग : आपलै शरीर निरोगी, निकोप राहण्याकरिता शरिराच्या काही इच्छांवर ताबा ठेवणे आवश्यक आहे. त्या इच्छांवर ताबा नाही ठेवता आला तर त्याव्यक्तिला स्वताला, समाजाला त्या हानिकारक ठरू शकतात. यांनाच मानसिक वेग  वा षड्रिपू असे म्हणतात. या वेग प्रव्रूत्तीमुळे ती व्यक्ती भावनेच्या आहारी जाऊन तिच्या हातून अनुचित कार्य घडू शकते. प्रत्येक व्यक्तीला शांत, समाधानी, सुखी जीवनाकरीता या अविचारी, अनुचित इच्छांवर ताबा मिळविणे आवशयक आहे. म्हणून उपचार करतांना निरोगी, स्वस्थ शरीर संपदा कायम राहण्याकरिता या सर्व गोष्टींचा विचार करायलाच हवा. हेच ते षड्रिपू, निरोगी शरीराचेसहा शत्रू.

  1. काम- वाईट इच्छा, वासना.
  2. क्रोध-हिंसा, कठोरता, संताप, अविवेक.
  3. लोभ – मोह, ईर्षा, अधिकाधिक जमा करणे.
  4. मद-मूजोरी,अहंभाव,उन्माद
  5. मत्सर-दुसर्‍याला दुःखी पाहून आनंदी होणे, चुगलू चहाडी करणे.
  6. अभिध्या-दुसऱ्याच्या मालकीची वस्तू, संपत्ती लुबाडून घेणे. चोरी करणे.

 

हे सर्व षड्रिपू स्वास्थ्याला हानिकारकच. त्यातील क्रोध हा रिपू बुध्दीला झाकोळून टाकतो. नेहमी अविवेकी असतो. आपला क्रोध म्हणजे दुसर्‍या च्या चुकीची शिक्षा  स्वतः घेण.

 

राग, हिंसेच्या वेळी श्वासांची गती वाढते. श्वास गती जितकी जास्त तितकी शारिरीक, मानसिक आरोग्यास हानिकारकच.

 

भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगतांना या षड्रिपूंचे छान वर्णन केलेले आहे,

ध्यायतो विषयान् पूंसः

सञ्गस्तेषूप जायते

सडःगात् सञजायते कामः

कामात क्रोधोऽभिजायते

क्रोधात् भवती संमोहः

संमोहात स्मृती विभ्रम

स्मृती भ्रंशाद बुध्दिनाशः

बुध्दिनाशात् प्रणश्यति.

 

भावार्थ : फळाची आशा केल्यास असंतोष, असमाधान दिसून येते. आणि इच्छा चा स्वभावच आहे असमाधानी. इच्छा अशी विचित्र गोष्ट आहे की  पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो आणि पूर्ण झाली तर मोह वाढतो. (लालसा). आणि एकदा का मोह उत्पन्न झाला की ती व्यक्ती सामाजीक नितीनियम सारं काही विसरुन जाते. त्याची बुद्धी, सारासार विचार शक्ति योग्य तर्‍हेने कामे करु शकत नाही. होणारी कामे चांगली होत नाहीत.

त्यामुळे समाजात त्या व्यक्तीला मान सन्मान मिळत नाही. समाज त्याला शत्रु सारखी वागणूक देते. आणि शेवटी त्या व्यक्तीचे  सर्वार्थाने विनाश झालेला दिसून येतो. म्हणूनच या 6ही इच्छांना षड्रिपू म्हटले जाते.

ह्या रिपूंमूळे मनावर खूप ताण येतो. त्यामुळे घरी-दारी, कामावर  लक्ष केंद्रीत होत नाही. परिवारातील मानसिक स्वास्थ्य विचलीत होते. हा तणाव दूर करण्याकरिता मेंदू, बुध्दी आणि मन ही 3ही इंद्रीय शांत असून त्यांच्यात संतूलन हवे. बुध्दी आणि मनामधे संघर्ष  झाला तर त्याचा परिणाम शरीरावर दिसून येतो. या संघर्षांतून अनेक प्रकारच्या शारीरिक व मानसिक विकार सुरू होतात.

 

निरोगी, शांत, समाधानपूर्वक जीवन जगण्यासाठी “आयुर्वेद”

================

सहज वाचनात आले आणि आवडले म्हणून खाली देत आहे,

क्रोध या आपल्या शत्रु चे एक छान खानदान आहे. ते असे,

  1. भय – क्रोधाचा  बाप.
  2. उपेक्षा – ची माता.
  3. जिद्द- बहीण
  4. अहंकार – क्रोधाचा मोठा भाऊ
  5. हिंसा – ची पत्नी.
  6. निंदा- मुलगी.
  7. वैर- मुलगा.
  8. ईर्षा – नकचढी सून
  9. तिरस्कार – क्रोधाची नात.

आहे ना क्रोधाचा भरा, पूरा, खानदानी परीवार.

आता त्याला किती साथ द्यायची ते तुम्ही ठरवायचं.

 

– डॉ. निलिनी चौधरी

समजूतदारपणा (सबमिसिव्ह लेव्हल)

आपल्या सर्वांमध्ये आपण कधीतरी एक वाक्य असतेच की अमक्या माणसाने एवढा तरी समजूतदारपणा दाखवायला हवा  होता?  आता  मला असा प्रश्न पडतो  की त्या माणसाने किंवा त्या व्यक्तीने नक्की काय करणे अपेक्षित होते. बरं  हे जरी बाजूला ठेवले तरी  समजूतदारपणा म्हणजे नक्की काय? तो कसा दाखवायचा ? म्हणजे नक्की काय करायचं हयाचा सगळया प्रश्नाचा फार बारकाईने विचार केला मला एक जाणवले की समजूतदारपणा म्हणजे दुस-याच्या कोणत्याही बोलण्याला व वागण्याला होकार दयायचा म्हणजे समजूतदारपणा म्हणजे सबमिसिव्ह लेव्हल  मेटेंन करणे असा होय?  पण त्यामध्ये माझ्या स्वभावाला काही जणानी गृहित धरले आणि काही जणानी तर त्यांच्या आवडी-निवडीप्रमाणे किंवा स्वभावाचा उद्रेक किंवा   गळा चेपेपर्यत वागविले यांची  खात्री झाली हे असे म्हणजे मी समजूतदारपणा दाखविला असे होते का ? नाही समजूतदारपणा  हा वेगळा असतो आता तो प्रत्येकाच्या, प्रत्येक घराच्या, प्रत्येकाच्या संस्कारांच्या, आजू बाजूच्या परिस्थितीने तो सूचकपर असतो व  होतो

 

ब-याच व्यक्तींना स्वत:चे कुटूंबियआपल्याला सबमिसिव्ह वाटत नाहीत पंरतू एखादा मित्र किंवा एखादा लांबचा संबंधित तो कधीतरी कोणत्या तरी कारणाने जवळचा / सबमिसिव्ह वाटतो कारण तो तुमच्या आवडी निवडीला प्रोत्साहन देतो तुमच्या हो हो म्हणतो तुम्हाला आवडेल असे बोलतो म्हणजे तो ख-या अर्थाने तो सबमिसिव्ह आहे का ? याची गणितं आपण मांडतो.

 

समजूतदारपणा म्हणजे दुस-या वागण्याचा आपल्याला त्रास न होईपर्यत त्याच्यासारखे वागणे असा होय पंरतू त्यालाही काही बाजू आहेत वाईट सवयी /वाईट गोष्टी या होकार देणे असा होत नाही. जे चुकीचे आहे ते चुकीचेच आहे हे मान्य करणे परंतू ते योग्य वेळी, योग्य कोप-यात बसवून समोरच्याला सांगणे ( चार माणसांत नाही तर त्याची मनस्थिती ओळखून त्याला समजविणे) असा आहे. त्याचा आवडेल तसे वागणे हे जरी खरे असले तरी पंरतू त्याला ते कितपर्यत करु देणे तर त्याचे जास्त नुकसान न होईपर्यत त्याला समजून घेणे असा होय.

 

थोडक्यात म्हणजे सबमिसिव्ह लेव्हल म्हणजे त्या आपल्याशी संबंधित व्यक्तीला त्याला हवे तसे करु देणे शिवाय त्याला  जश्या पध्दतीने काम करायचे तसे करु दयावे त्याच्या काही गोष्टीत त्याच्या काही अडचण आहे का ? म्हणजे ते ओळखा पण ज्यावेळी  एखादया गोष्टीचा त्याने प्रथम उच्चार किंवा विषय काढेल त्यावेळी  त्याची  त्या गोष्टीचे कौतुक करा. (चुकीची असली तरी  Don’t React )  सर्वात महत्वाचे त्याच्या मतांचा आदर करणे, नंतर हळूहळू त्याला त्याबाबतचे काळ व वेग महत्वाचे त्या विचाराचे होणारे आर्थिक व कौटूंबिक परिणाम काय होणार याची जाणिव करुन दयावी. जर त्याला काही अडचणी असतील आणि  प्रथम त्या ऐकून समजून घ्याव्यात आणि त्याची ती मते लक्षात ठेवून त्याच्या आपले आवडी निवडीचे वागणे / बोलणं सुरु ठेवावे आणि सर्वात महत्वाचे हे सर्व त्याला ते जाणवू दयायचे नाही   शिवाय आपलीही  प्रत्यक्षात तीच आवड निवड आहे हे त्याला पटणे ही प्रथम पायरी आहे. सबमिसिव्ह लेव्हलच्या पायाभरणी नंतर आपल्याला ते कसे जमणार नाही किंवा असे का करु नये वा कसा चुकीची शिकवण / संस्कार किंवा चुकीची  सवय आहे हे त्याला पटेल अशा भाषेत हळूच सांगा किंवा तुमच्यापुढे उपलब्ध असलेले पर्याय  आहेत का? ते तपासून पहा…असल्यास त्याला ते मान्य आहेत का? हेही तपासून पहा,तशी त्याला वाट दयावी म्हणजे तुमच्या प्रती त्याच्या मनातील आदर / विचार बदलणार नाही. त्याच्या प्रति तुम्हाला सबमिसिव्ह लेवल मेंटेंन करता येईल. सबमिसिव्ह लेवल upgrade होण्यासाठी दोन दिवस ते  प्रसंगानुरुप  व पात्रानुरुप कालावधी लागू शकतो,

 

(भरत दशरथ सरगर ) अन्ना

जे जे विदेशी आणि इंग्रजी ते ते उत्तम?

साधारण 70 ते 80 च्या दशकापासून सुरुवात झाली एक पिढी परदेशात जायला आणि मग हळू हळू विदेशी वस्तुंचा भारतात वापर वाढू लागला. जी गोष्ट अगोदर चैन म्हणून बघितली जायची ती आता गरज झाली किंवा त्याची गरज निर्माण केली गेली.

 

मग त्यानंतर या विदेशी वस्तूंची फॅशन झाली. एखाद्याने आश्चर्याने विचारले अरे नवीन घड्याळ! की त्यावर उत्तर मिळायचे ‘imported आहे’.  अगदी शाळेतील मुलेही मग एकमेकांना भेटली की या इंपोर्टेड वस्तूंच्या आकर्षणातून गप्पा मारायला लागतात.मुलाचं सोडा पण पालकांच्या मनातही जे जे विदेशी ते ते उत्तम हेच ठासून भरलेल दिसतंय. विदेशी आकर्षणातून इंग्रजीतून शिक्षण देणाऱ्या संस्था आल्या या इंग्रजी माध्यमातील संस्था इंग्रजी विषयांपेक्षा इंग्रजी पद्धतीचे शिक्षण देऊ लागल्या आणि आपण आपल्याच मुलांना इंग्रज बनवू लागलो. अशी शिक्षणपद्धती आपली मुले शिकू लागलीत ज्यात त्यांच्यातील नेतृत्वगुण तर वाढीस ह नाहीत पण कारकून मानसिकता मात्र प्रचंड वाढू लागली आहे.

 

खर तर प्रत्येक मुलगा हा वेगळा आहे आणि त्याला आवडणारा विषयही वेगळा मग असे असताना आपली शिक्षणपद्धती का या मुलांना सर्व विषय शिकवण्याच्या जोखडात बांधून टाकते आणि मुलगा हुशार असण्याचा बेस त्याचे परीक्षेतील मार्कच असतात. जरा नीट विचार करून २/२/१८३५ रोजी लॉर्ड  मॅकोलेने त्यांच्या ब्रिटीश पार्लमेंटमध्ये केलेले वरील चित्रातील भाषण नीट वाचले तर नक्की लक्षात येईल की ज्या शिक्षणपद्धतीत आपण शिक्षण घेतले व आता आपली मुले घेत  आहेत  ते  गुलामगिरी  मानसिकता वाढवणारे शिक्षण . आपण संपूर्ण शिक्षणव्यवस्था बदलू शकत नाही पण आपल्या मुलापुरते तरी त्याला आवडणारे, ज्यात त्याला गती आहे ते देणारे, पालकांची आवड (३ IDIOTS मधील फरहान कुरेशीचे  बाबा हिटलर  कुरेशी सारखी ) न लादणारे शिक्षण दिले तर आपली पुढील पिढी   ही उत्तम नेत्यांची असेल अशी आशा करूया. आणि त्यासाठी जे जे विदेशी ते ते  उत्तम  म्हणण्यापेक्षा आपल्याकडेच जे जे आहे ते ते उत्तम आहे हे मानूया….

आलो मी हितगूज कराया

आदरणीय अण्णा ,

 

आज ५ जानेवारी २०१८…… तुम्हाला जाऊन आज बरोबर ३६ वर्षं झाली ! एका गोष्टीचं मला नवल वाटतं की तुम्हि स्वरांचे जादुगार म्हणून १२ जानेवारी १९१८ ला जन्म घेऊन आयुष्याच्या पटावरुन Exit पण घेताना बरोबर ७ दिवस आधी घेतलीत — हा निव्वळ योगायोग की भैरवीत ठरवून सात दिवसरुपी सात सूर कमीच लावलेत ?

 

आणि म्हणून तुमच्यावर लेख लिहिताना मी ठरवल की ७ लेख लिहायचे , पण मग गोंधळलो की रामचंद्र नरहर चितळकर ऊर्फ सी.रामचंद्र या थोर संगीतकाराचं जन्मशताब्दि वर्ष जे १२ जानेवारी २०१८ ला बरोब्बर शतक पूर्ण करेल त्यादिवशी किंवा आदल्या दिवशी मी समारोप कसा करणार लेखमालेचा ? आणि मग मार्ग सापडला…..अख्खं आयुष्य फिल्मी दुनियेतील वाटावं असं काढणार्‍या तुमच्यासारख्या कलाकाराचा कर्तृत्वपट आपण FLASHBACK या पद्धतीनेच उलगडून दाखवायला हवा , नव्हे , कॅलेंडरप्रमाणे तुम्हीच तसं करायला आम्हाला भाग पाडलंय….. मग सुरुवात करतो अण्णा — आशीर्वाद द्या की तुम्हि जसं कुणालाही न दुखावता आयुष्य जगलात तशीच ही लेखमालाही कुणाला न दुखावता पूर्ण व्हावी! …..

 

…..अण्णा, अमेरिका आणि इंग्लंडचा दौरा करुन तुम्हि भारतात परतलात आणि काही दिवसांनी आजारी पडलात.मोरारजींच्या काळात दारूबंदी असल्याने तुमची एक सांकेतिक भाषा होती ज्यात दूध हा शब्द असायचा.

 

तुमच्या कुठल्याहि गाण्याचं रेकाॅर्डिंग संपल्यावर तुम्हि म्हणायचात , “दुधाचा रतीब काय म्हणतोय ? आज कुणाची टर्न आहे?” आणि मग तुमची दुधाची बाटली आल्यावर मैफिल मध्यरात्रीपर्यंत यथेच्छ रंगायची.त्या मैफिलितले तुमचे सहकलाकार केरसी लाॅर्ड तुमच्या अखेरच्या आजारपणात तुम्हाला भेटायला आले होते.तेंव्हाहि तुमची मिश्किल वृत्ती तुमची साथ करतंच होती! ग्लास उंचावून तुम्हि केरसीला म्हणालात , ” आओ आओ केरसी , आज सचमुच मैं दूधही पी रहा हूँ ! Come and join me… ”

 

५ जानेवारी १९८२ ….. तुम्हि अखेरचा श्वास घेतलात आणि तुमच्या पश्चात् पण मरणांतराणी वैराणी या श्लोकाला धाब्यावर बसवून तुमच्या हितशत्रूंनी तुम्हि गेल्याची बातमी पण क्रश केली ! तुमच्या अंत्ययात्रेला हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच माणसं होती.पण अण्णा , तुमच्यासारख्या रगेल आणि रंगेल व दिलखुलास कलावंताने आयुष्यभर जिवंत असताना इतकी कोट्यावधी माणसं जोडली की आपल्यापश्चात् किती जण शेवटच्या स्थानकात सोडायला आले होते याने काय मोठासा फरक पडणार होता ? एरवी माझ्यासारखा एक य:कश्चित् कानसेन उदय गंगाधर सप्रे पण आज तुम्हि गेल्यावर ३६ वर्षांनी हा लेख लिहितोय म्हणजेच आजहि त्याला त्या यात्रेत आपण जाऊ न शकल्याची अश्वत्थाम्यासारखी ठुसठुसती जखम शोकविव्हल करत असणारंच ना!

 

अण्णा , तुमच्या वक्तृत्व आणि विद्वत्तेचा एक प्रसंग सांगतो आणि आजचा हा Flashback थांबवतो…..

 

सन १९६२ ….. कधीकाळी एकेका दिवशी ५—५ गाणी रेकाॅर्ड केलेले तुम्हि , या अख्ख्या वर्षात एकहि पिक्चर केलं नव्हतंत.चीनच्या आक्रमणाची जखम ताजी होती.युद्धाची गाणी फिल्म साप्ताहिकात यायला लागलेली.नेहेमीच्या साहित्यातील रुचीने तुम्हि साप्ताहिकं चाळत असता एक गीत हेरलं होतंत.७ डिसेंबर १९६२ : समरसंगीत नावाचा कार्यक्रम होता.सचिनदेव बर्मन ,

 

शंकर—जयकिशन , नौशाद आणि तुम्हि असे ४ संगीतकार हा कार्यक्रम करणार होतात.तुम्हि वगळता सगळ्यांची गाणी त्यावर्षी चलतीत होती.आणि पैसा मोजून आलेल्यांच्या मनोरंजनाचा कार्यक्रम असल्याने देशभक्तिपर गीतांनी ते होणार नाहि याची त्यांना खात्री होती ( ? ). तुमच्याकडे एकहि चित्रपट नसल्याने ” आज अन्ना कौनसा गाना देगा ? ” असं कुत्सित हास्य चेहेर्‍यावर मिरवत ते वावरत होते.शंकर—जयकिशनची पाठराखण करंत एका गाण्यावर राज कपूर बॅगपाईप घेऊन स्टेजवर धागडधिंगा घालून गेलेला ! नौशादसाठी दिलीपकुमार व बर्मनदांसाठी बिमल राॅय सारखे दिग्गज स्टेजशोभा वाढवून गेलेले.तुम्हाला ठरवून शेवटचा क्रम दिलेला. आशा पारेखने तुमची ओळख करुन दिली ….. अगदी बुळचट ओळख ….. पण त्यांना व लोकांना अजून तुमचं वक्तृत्व आणि प्रसंगावधान ( आणि अर्थातंच संगीतकौशल्य ! ) हे माहित नव्हतं….. तुम्हि स्टेजवर आलात.डझनभर वाद्य , अर्धा डझन समूहगायक….. कुत्सित हास्ये करत काही ओठांच्या कडा कानाला भिडलेल्या ….. आणि माईक समोर ओढत तुम्हि म्हणालात , ” आशाबाई अभी मेरी पहचान कराके चली गईं । आजका कार्यक्रम समरसंगीत का है और अबतक आपनें ईश्क और प्यारके गाने सुनें! (हशा आणि टाळ्या….. कुत्सित हास्ये एकदम रोडावलेली….. एरंडेल प्यायल्यासारखे चेहेरे झालेले!) दोस्तों , मैं तो यार तीनों गाने देशभक्तिकेही देनेवाला हूँ , तो सुनिये….” असं म्हणंत अण्णा , तुम्हि २ गाणी महेंद्र कपूरकडून म्हणवून घेतलीत : तलाक मधील तुमच्याच संगीतातील संभलके रहना अपने घरमें छुपे हुए गद्दारोंसे आणि दुसरं जागृती मधील कवी प्रदीपचं *साबरमती के संत* जे मूळ चालीत बांधलं होतं हेमंतकुमारनी व जे तुम्ही पूर्णपणे चाल बदलून पेश केलंत महेंद्र कपूरद्वारा!

यानंतरचं ते साप्ताहिकातील गाणं होतं :

वाह रे चाऊ एन लाई, तुझको शरम न आईभूल गया क्या अपना वादा, हिंदीचिनी भाई भाई

तू है चिन, तो हम प्राचिनकिसी बातमें कम नहीं, बात मान जा नेहरूजी कीक्यूँ रे अकल गवाई? , वाह रे…..

 

आधी तुम्ही ऐकवलेल्या या शब्दांना तुम्ही अशा काही विडंबन व उपहासात्मक शैलीत ऐकवलंत की श्रोत्यांमधे हास्याच्या लाटाच आल्या! आणि मग तुम्हि ” राॅक—अँड—रोल ” शैलीत बांधलेलं गाणं तुमच्या आवाजात सुरु केलंत! एनाॅक डॅनियल्स अॅकाॅर्डियन व मनोहारी ट्रंपेटवर भरधाव सुटलेले , तुमचं हे—हूँ—हो चं रिधम् व कोरसच्या टाळ्या ! तमाम पब्लिकला अजय गोगावलेनं म्हटल्याप्रमाणे  येड लागलं येड लागलं रं असं झालेलं…..

 

गाणं संपल्यावर पहिल्या रांगेतील सफेद चुणीदार व काळी अचकन् घातलेले दस्तुरखुद्द भाई  ऊर्फ पु.ल.देशपांडे धावत मंचाकडे आले व अण्णा , ते तुम्हाला म्हणाले , ” राम , पुन्हा म्हण ते गाणं आणि श्रोत्यांनाही म्हणायला लाव ! ”

 

त्या रात्री अण्णा , तुम्हि ३—३ वेळा वन्स मोअर घेतलात ! हजारो श्रोते घरी जाताना तुमच्या चालीतंच गुणगुणंत गेले. बर्मनदा आधीच निघून गेले होते. उरलेल्या ” त्या ” लोकांची व त्यांच्या चमच्यांची मनं खट्टू झाली होती ! फिल्मलाईनबाहेर फेकल्या गेलेल्या तुम्हाला श्रोत्यांनी दिग्विजयी घोषित केलं होतं !

 

आणि हा प्रसंग लिहिताना आलेले आनंदाश्रू आणि गहिवराने माझ्या ओठी मात्र अण्णा , एका अण्णांनी गायलेले दुसर्‍या अण्णा जोशींचे नीळकंठ अभ्यंकरांच्या संगीतातील भक्तिरसाने ओथंबलेले शब्द आले आहेत ….

 

आलो मी हितगूज कराया ,  जाऊ नको रे विठू

पळभर थांब जरा रे विठू , विठू रे…..

 

तुमचा वेडा व निस्सीम चाहता ,

उदय गंगाधर सप्रे म — ठाणे

आयुर्वेद समजूती आणि ग़ैरसमज़ूती – भाग ५

भाकरी… निरोगी आयुष्याची गुरूकिल्ली…

अरे संसार संसार… जसा तवा चूल्ह्या वर… आधी हाताले चटके… तवा मियते भाकर।।(बहीणाबाई चौधरी)

तसा diet विषयाचा आणि या कवितेचा direct संबंध नाहीं… पण असं वाटत ज़र भाकरीच नसती तर बहीणा बाईंच्या या सुंदर ओळींना आपण मूकलो असतो का..?..म्हणजे हे सुद्धा एक भाकरीचे महत्वच म्हणलं पाहिजे…

आता मूळ विषयाकड़े येवूया..

असा ब-याच जणांचा ग़ैरसमज आहे की ,भाकरी हे गरिबाचं जेवण आहे… पण असा विचार ही आपली वैचारिक ग़रीबी आहे., उलट अतिश्रीमंत व्यक्तिंना खूप पैसे घालवून जे आजार होतात… त्याचे हे अतिशय स्वस्त औषध आहे..

थोडक्यात भाकरीचे उपयोग:

१. उत्तम diet फ़ूड आहे,( low calories)

२. शिवाय स्वस्तात उपलब्ध आहे आणि

३. वजन कमी करण्याचा सुद्धा सोपा उपाय आहे

४. सहज पचते त्यामूळे रुग्णाचा उत्तम आहार

५. ज्वारीची  भाकरी हे acidity, मधुमेह, आमवात ,अपचनाचा त्रास असणा-या रुग्णांच औषध आहे

६. ज्वारीची  भाकरी पित्त कफ विकार कमी करते

७. थंड असल्यामूळे उष्णता कमी करते

८. ज्वारी च्या लाह्यांचा काढ़ा घाम आणण्यास उपयुक्त आहे त्यामुळे तापही कमी करतो

… कदाचित हे मिळवण्यासाठी आपल्याला फ़ार कष्ट पडत नाही आणि हजारोंची फी.. मोजावी लागत नाही..म्हणून आपल्याला तीचे महत्व वाटत नाही, पण भाकरी हे आपल्या भारतीय आहार शास्त्रातील एक वरदान आहे.

 

पथ्याचे जेवण म्हणजे प्रत्येक वेळेला बेचवच असले पाहिजे असं काही नाही.. भाकरी च्या पीठाच्या सुद्घा चविष्ट recipes बनवून खाता येतात..

१. भाकरी- जी पारंपारिक पद्धतीने बनवली जाते

२. ज्वारीच्या पीठाची घावने

३. त्याचे भाज्या घालून cutlets बनवणे..

४. ज्वारीच्या पीठाची उकड

५ . ज्वारीच्या पीठाच थालिपीठ…

६.  ज्वारीच्या लाह्या.. व त्याचे पदार्थ … etc

गावाकडच्या शेतक-यां च्या आरोग्याचं आणि सड़पातळ बांध्याचं रहस्य यातच दडलेल आहे…ते महत्व आपण समजून आपल्या आरोग्यासाठी याचा फ़ायदा क़रुन घेतला पाहिजे .

म्हणूनच ….’भाकरी खाओ और ख़ुद जान ज़ाओ … !!’

 

आयुर्वेद जगा आणि निरोगी रहा…

डॉ. गौरी सहस्रबुद्धे – साबळे ( एम डी आयुर्वेद, पुणे)

आयुर्वेद समजुती आणि गैरसमजूती भाग -३

पृथिव्याम्  त्रीणि रत्नानि जलम् अन्नं सुभाषितम्…।

मूढै: पाषाणखण्डेषु रत्न संज्ञा विधीयते ..।

( अर्थ: पृथ्वी वर केवळ तीनच रत्न आहेतजल, अन्न आणि सुभाषित परंतु सामान्यव्यक्ती मात्र दगड़ान्नाच रत्न समजतो)

 

केवळ आपल्या आयुष्यातच नाहीं तर साहित्यात सुद्धा पाण्याला अनन्य साधारण महत्व आहें.. वरील सुभाषितात तर पाण्याला रत्नाची उपमा दिलेली आहें.. म्हणून हा विषय निवड़त आहें.

खरंतर पाणी म्हणजे जीवन … पण हेच पाणी जसे प्रमाणात घेतल्यावर अमृताप्रमाणे आहे तसेच ते अति किंवा अत्यल्प प्रमाणत घेतले तर विषसमान ठरू शकते. त्याच पाण्याविषयीचे विवेचन आता करत आहे.  पाणी या विषयाबद्दल सुद्धा असेच अनेक ग़ैरसमज आहेत. पाणी किती प्यावे, जेवणाच्या आधी प्यावे की नंतर प्यावे , की जेवतना मधे मधे प्यावे, उठल्या उठल्या अनशापोटी किती पाणी प्यावे …इ.. या सम्बन्धी अगदी सोपा नियम म्हणजे जेव्हा तहान लागते तेव्हा पाणी पीणे, जेव्हा तहानेची जाणिव होत नाहीं तेव्हा पाणी पीऊ नये. अती तहान लाग़णे किंवा अजीबात तहान न लाग़णे हि आजाराची लक्षणे आहेत. त्याविषयी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असते.

 

  1. जेवताना पाणी पिण्यासंबंधीचे नियमजेवणाच्या आधी पाणी प्यायल्याने माणूस कृश होतों. तसेच आम निर्मितीचे कारण होऊ शकते (indigestion) जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने माणूस स्थूल होतों त्यामुळे निरोगी माणसाने निरोगी राहण्यासाठी जेवताना मधे मधे थोड़ेथोड़े पाणी प्यावे या साठीचा अगदी साधासोपा दाखला.. मिक्सर मधे चटणी बारीक करताना अधिच खूप पाणी घातल की त्यातिल घटक पदार्थ नीट बारीक होतच नाहीत. तेच नंतर पाणी घातले तरी ती नीटशी मिळून येत नाहीं, पण तेच ज़र  बारीक क़रताना मधेमधे पाणी घातल तर ती एक सारखी बारीक होते. त्यामुळे निरोगी राहण्यसाठी जेवताना मधे मधेच पाणी प्यावे. अजूनहीं असेच काही ग़ैरसमज आहेत

 

  1. खूप पाणी प्यायल्याने त्वचा ताज़ेलदार दिसते..body detoxify होते ..या साठी अज़ून एक दाखला: कुंडित आपण जेव्हा एखादं रोप लावतो, तेव्हा रोज़ थोड थोड पाणी घालतो. एकदम तजेलदार दिसावं म्हणून पहिल्याच दिवशी खूप पाणी घातलं तर काय होईल. ते झाड़ सडून जाईल. तसंच आपल्या शरीराचं सुद्धा आहें, म्हणून तहान लागलेली असेल तेव्हा आणि तहान भागेल इतकेच पाणी प्यावे. कारण पाणी प्यायल्या नंतर देखिल त्याचे पचन व्हावे लागते. अधिक पाणी घेतल्यामुळे पचन संस्थेवर अधिक ताण येतो आणि पचन संस्थेचे आज़ार उद्भवतात.

 

  1. अति पाणी प्यायल्याने बॉडी डीटॉक्सिफ़ाई होण्याऐवजी आपण अपचनामूळे निर्माण होणारे आमविष मात्र ओढावून घेतो.

 

  1. अत्यल्प पाणी प्यायल्याचे सुद्धा असेच तोटे आहेत बरं का? : तहान लागलेली असताना सुद्धा पाणी न प्यायल्याने शरीरशोष (dehydration), अंगासाद (अशक्तपणा), बधिर्य (कमी ऐकू येणे), मुर्छा, चक्कर येणे, हृदयरोगापर्यन्तचे सुद्धा दुष्परिणाम दिसू शकतात..

 

अजूनही पाणी आणि त्याचे उपयोग या विषयावर सांगण्यासारखे खूप आहें.. त्यामुळे पाणी प्यायलेच पाहिजे पण प्रमाणातच!

 

तुमची आता पर्यंतची पाणी पिण्याची पद्धत काय होती?

यापुढे या पद्धतीत काय बदल कराल?

 

आयुर्वेद जगा आणि निरोगी रहा

डॉ. गौरी साबळे ( एम डी आयुर्वेद, पुणे)

देणाऱ्या साऱ्या या  जवानांना

जिल्हा ..लातूर चा कृष्णकांत कुलकर्णी  शहीद झाला  तो दिवस  मी  कधीच विसरणार नाही.   अंतःकरण हेलावून  सोडणारा  हा दिवस!!!  आजही हे लिहीत असताना  डोळ्यात अश्रू आले आहेत.  कुठंलं अदृश्य नातं हे?  आणि प्रत्येक सुजाण  सुसंस्कृत  नागरीकांमधे हे असावंच आणि असतंच!!!   कृष्णकांत आमच्यातला, आमच्या गावातला, आमच्या मुलांचा मिञ.

आमच्या मुलांच्या मिञांबरोबर च्या ग्रूप फोटोमधे  असलेला त्याचा फोटो  आणि तिरंगी झेंड्यात लपेटून आलेल्या शहीदकृष्णकांतचा अचेतन पण अभिमानाने बघायला लावणारा त्याचा चेहरा!!  तो दिवस  आजही   जसाच्या तसा माझ्या डोळ्यासमोर येतो.  मन हेलावून जातं!!   आत्ताही  देशासाठी  प्राणाची आहूती  देणाऱ्या साऱ्या  जवांनाच्या   वीर मातापित्यांना , त्यांच्या कुंटुंबियांना माझा मानाचा मुजरा. आमच्या  काॅलेज मधे    कारगील युध्दात शहीद झालेल्या  कृष्णकांतच्या आईवडीलांचा  सत्कार समारंभ झाला तेंव्हा आणि पहिल्या पुण्यस्मृत्तीदिनी मी लिहिलेली  कविता.

 देणाऱ्या साऱ्या या  जवानांना

दिन असे जुलैचा सात  ।

शञूंवर करुनी मात  ।

गोळ्या घालीत आणि झेलीत  ।

झालास शहीद तू कृष्णा  ।।

पलपल मोजते आई ।

अश्रूंची फुले तूज वाही ।

किती वर्णावी थोरवी कृष्णा ।

नजरेस तिच्या तुझीच रे तृष्णा  ।।

दिन सरले तिनशे पासष्ठ ।

वाटे  तिस नियती खाष्ट ।

परी समज घालीते मनाला ।

“कृष्णा”  तर  “चिरायू ” झाला   ।।

म्हणविते आई “वीरमाता” ।

बाबा तव “वीरपिता” ।

परि अंतरी जळते आठवणींची “चित्ता” ।

 आठवणींची “चित्ता” ।।

हा भारतमातेचा  “सुपूञ” ।

वीर जवान , उदयगारीचा मिञ ।

ञिवार नमन!!! अर्पितो श्रध्दासुमनं!!

“सरोजिनी ” वाहते “शब्दसुमनं ।।

“विजय  दिना”निमित्त देशातल्या  साऱ्या  जवानांना  समर्पण  

– सरोजिनी धनुरे

मलाही सैनिक व्हावंसं वाटतं

कारगिलची बातमी ऐकताच असंच होतं काही

कधी कधी स्वतःचं स्वतःलाच कळत नाही

वीरपुत्रांचे पराक्रम ऐकून येतो मनात विचार

की आपणही तेथे जावून द्यावा पाकिस्तानला मार

 

शाळेत समरगीते ऐकून अंगावर येतात शहारें

एवढ्या थंडीत जवान कसे रहात असतील बिचारे

एकदा तिथं जावून पहावसं वाटतं

म्हणूनच मला सैनिक व्हावसं वाटतं….

टि.व्ही.वर द्रुश्य पहावत नाही

क्षणभर मनात येते की जगात देवच नाही

शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी मदत जमवतात सारे

पण पैसे देऊन जीव परत मिळणार आहे का रे..?

 

तोंडात घास घेताना आठवण होते जवानांची

 अरे ,आपण इकडे जेवतो

ते तिकडे उपाशीच!

मात्रुभूमीच्या रक्षणासाठी अन्नपाणी सोडले

 

पण तरीही प्राण पणाला लावून लढले

घरच्या आठवणी मनाशी बाळगून ठेवतात

पत्रांतील दोन शब्दांनी मनाचं सांत्वन करतात

व्रुत्तपत्र वाचताना रडायला येतं भरपूर

 

पाकिस्तानला विचारावसं वाटतं तुम्ही एवढे कसे निष्ठुर?

मात्रुभूमीच्या रक्षणासाठी मलाही लढावसं वाटतं

एवढं सगळं अनुभवावसं वाटतं..

म्हणूनच मला सैनिक व्हावसं वाटतं….

– सौ. प्राजक्ता प्रसन्न हर्डीकर

सर्वधर्म समदृष्टी होई सुजलाम सुफलाम सृष्टी

२१व शतक भारत आर्थिक महासत्तांच्या शर्यतीत पहिल्या पाच राष्ट्रात नक्कीच कुठेतरी आहे. या पहिल्या काही नंबरात येण्यात आपली अनेक वर्ष गेलीत तसेच येणारी अनेक वर्ष यात तग धरून राहणेही कठीण असणार आहे. अशातच संपूर्ण जगाला लागलेली वाळवी म्हणजे स्वधर्माचा अभिमान बाळगताना परधर्मियांचे चालू असलेले शरसंधान. वेगवेगळ्या अतिरेकी व धर्मवेड्या संघटना जगाच्या पाठीवर सगळीकडेच आहेत तशा त्या भारतात देखील आहेत. सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र घेऊन एका धर्मनिरपेक्ष राष्ट्राची स्थापना हा उद्देश अजून तरी दिवा स्वप्नंच आहे.

 

फार लहान वयातच मुलांना हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, शीख, बौद्ध अशा अनेक धर्मांविषयी सांगण्यात येत. जे काही सांगितलं जात ते इतर धर्मांविरुद्ध असत. राम सेना, रहीम सेना, भीम सेना, आणि काही दले आपापल्या धार्मिक गोष्टींच इतकं अवडंबर माजवताना दिसत आहेत की या धर्मातील लहान मुलांनादेखील त्यांच्या धर्माची परमोच्च शिकवण माहित नाही. अशा मुलांना हे माहितही नसतं की माझा धर्म हा मानवता वादाची शिकवणूक देतो. दुर्जनांचा नाश हे जरी धर्मग्रंथात सांगितले असेल तरी दुर्जन हा प्रत्येक वेळी परधर्मातील नसतो हे मुलांना कोणी सांगत नाही. त्याच वेळी जातीयतेच विष हे तर आता सर्वत्र भिनलं आहे. माणूस म्हणून एकदा जन्म घेतल्यावर त्याची वेगळी जात असू शकते का? कारण या जातींचा एकमेकांना फायदा होण्या ऐवजी राजकारण व राजकारण्यांना फायदा होताना मात्र नेहमीच दिसतो. एक पालक म्हणून आता तुम्हालाच ही विषवल्ली आपल्या घरातून तरी काढून टाकायची आहे.

 

याला अनुसरून आपण सर्व मराठी जनता ज्या शिवरायांवर आपण आपल्या ३३ कोटी देवांपेक्षा जास्त प्रेम करतो त्याच शिवाजी महाराजांपुर्वी एकंदर जनतेची स्थिती कशी होती हे आपणासर्वांना ठाऊक आहेच. अशा निद्रिस्त समाजाला जागे करण्यासाठी महाराष्ट्र धर्माची मुहूर्तमेढ शिवबांनी रोवली. त्यात कोण्या एका धर्मा विरुद्ध आवाज उठवण्यासाठी केलेली पुंडाई नव्हती तर स्व धर्मीयांसोबत इतर धर्मियांनाही सन्मान व न्यायाने वागवले गेले पाहिजे हा एक विचार होता. हा विचार त्यांच्या पर्यंत जाणीवपूर्वक पद्धतीने पोचवणाऱ्या होत्या त्या म्हणजे आऊसाहेब जिजामाता. यात काहीच संदेह नाही कि स्वराज्याची उमेद जिजाउंच्या मनात होती याला कारण त्या काळच्या मुस्लीम राजवटींना कंटाळलेली जनता पण त्याही पेक्षा महत्वाचे कारण म्हणजे जिजाउंचे वडील व भावंड यांचा खून निजामाच्या दरबारात कट करून करण्यात आला. संपूर्ण माहेर संपले असे जरी असले तरी स्वराज्यात परधर्माचा अनादर कधीही केला गेला नाही.

 

जिजामातेच्या शिकवणुकीमुळे शिवबांच्या सैन्याने गरीब रयतेस मग ती आपली असो कि शत्रूची पण विनाकारण कधीही त्रास दिला नाही. परस्त्रिया मातेसमान मानल्या इतकेच काय तर स्व-सैन्यातील कोणी त्यांचा अपमान केला तर प्रसंगी देहांत शासन केले. परधर्मियांच्या देवळांचा, मशिदींचा कधीही नाश केला नाही किंवा धर्मग्रंथांचा अपमान केला नाही. शिवबांनी मशिदींचे रक्षण करून व मशिदींना व फकिरांना पूर्वी दिलेल्या देणग्या, इनामे इ. कायम ठेवले व प्रसंगी नवीन देणग्या देऊन परधर्माचा आदर केला. असल्याप्रकारची शिस्त असल्यामुळे महाराजांविषयी परकीय शत्रूच्या मनात देखील आदरभाव होता.

 

स्वराज्यातही मदारी मेहतर, आरमार प्रमुख – दौलत खान, वकील – काझी हैदर, तोफखाना प्रमुख – इब्राहिम खान, अफझलखानच्या फौजेतील सिद्दी हिलाल, रुस्तमे जमान – महाराजांचा मित्र ज्याने अफझलखान वधाच्या वेळीस वाघनखे पाठवली,  घोड दलातील सरदार – सिद्दी वाहवाह (सिद्दी हिलाल चा मुलगा), फोंड्याचा किल्लेदार व महाराजांचा अंगरक्षक – सिद्दी इब्राहिम, दर्यासारंग – मायनाक भंडारी, शिवा न्हावी, स्वराज्याचा पहिला सरनौबत – नूरखान बेग, हवालदार सिद्दी अंबर वहाब, लष्करी अधिकारी हुसेनखान मियाना, सुलतान खान व दाउत खान – आरमार सुभेदार, आणि इतर अनेक.  शिवबांच्या सैन्यापैकी ३५ टक्के सैन्य मुस्लीमांच होत. घोडदलातील १,०५,००० पैकी ६०,००० मुस्लिम सैनिक होते.  त्यांच्या २७ अंगाराक्षाकांपैकी १० मुसलमान होते. त्यांचे पहिले चित्र रेखाटणारा मीर मोहम्मद हा देखील मुस्लिम होता. राजमाता जिजाउंकडून झालेल्या भगवद्गीतादी धर्मग्रंथातील तत्वांच्या शिकवणुकीमुळे परधर्माचा आदरही महराजांच्या मनात कायम राहिला.

 

धर्म रक्षणाचे कार्य महाराजांनी अगदी उत्तम केले म्हणून रामदास म्हणतात –

या भूमंडळाचे ठायी | धर्मरक्षी ऐसा नाही |

‘महाराष्ट्रधर्म’ राहिला काहीं | तुम्हां कारणे ||

 

कौटिल्याने धर्मविजयी, लोभविजयी आणि असुरविजयी  असे तीन प्रकारचे राजे सांगितले आहेत त्यात छत्रपती शिवाजी महाराज हे प्रभू रामचंद्राप्रमाणेच धर्मविजयी होत. कारण ते स्व-धर्माभिमानी तर होतेच पण त्यांना पर धर्माचा तिटकारा नव्हता. म्हणूनच तर इतिहास तज्ञ श्री. राजवाडे म्हणतात, “अलेक्झांडर, सीझर किंवा नेपोलियन या दिग्विजयी पुरुषांशी शिवाजीची तुलनाच करणे अयोग्य आहे. कारण शिवाजीचे वर्तन न्यायचे, नीतीचे, पराक्रमाचे, स्वधर्मपरायणतेचे व परधर्मसहिष्णुतेचे होते.” हाच खरा समर्थ रामदासांनी सांगितलेला महाराष्ट्र धर्म होय.

 

माझ्या पालक मित्रांनो, आपणही आपल्या पाल्यास कधीतरी राजा म्हणाला असलाच ना! मग हा राजा पर धर्माविषयी आदरभाव असणारा बनवण्याची जबाबदारीही तुमचीच आहे. खरे तर आपापल्या देवाची व्याख्या करून त्याला अपेक्षित असलेल्या योग्य-अयोग्य आचरणाचे नीतीनियम ज्या पुस्तकांत लिहिले गेले त्यांना धर्मग्रंथ म्हणतात व त्या प्रमाणे वागणाऱ्यांना एका विशिष्ट धर्माचे लेबल लावले गेले. मग या निरनिराळ्या लोकांनी त्यांना समजलेला धर्माचा अर्थ लावला व त्याप्रमाणे कृती केली. त्यामुळे आजही आपापल्या धर्मांचे अर्थ शोधण्यासाठी कित्येकांचे खून पडतायत.

 

माझ्या प्रिय पालक मित्रांनो अनादिकालात जेव्हा धर्म संस्थापकांनी हे धर्मग्रंथ लिहिले तेव्हाची सामाजिक, राजकीय, आर्थिक, निसर्गाचे अवलोकन, सुख-दु:ख हे सर्व आजच्या तुलनेने खूप वेगळे होते. सर्व जगाने विज्ञानाची कास धरून केलेली प्रगती लक्षात घेता आजच्या काळाशी सुसंगत असा एकच धर्म तो म्हणजे मानवता हाच असावा म्हणजे हिंसेचे कारणच उरणार नाही.

 

पण हे बऱ्याच लोकांच्या पचनी पडणार नाही तेव्हा जे धर्म ज्ञात आहेत त्यांचा अजून अभ्यास करून वर्तमानकाळाशी त्याची सांगड घालताना त्यात आवश्यक ते बदल करण्याची. सर्वसमावेशक प्रगती साधण्यासाठी आजच्या काळात हे खूप गरजेचे आहे. म्हणजे पालाकानो घरात वा खाजगीत तुमचे वर्तन हे धार्मिक असूद्यात पण जेव्हा तुम्ही सर्वांमध्ये असाल तेव्हाचे सामाजिक वर्तन हे धर्मनिरपेक्ष असुदेत. पालकांनी आपली धार्मिक कृत्ये आपल्या घरात मुलांना शिकवावी पण जेव्हा आपण समाजात वावरत असतो तेव्हा हा सर्व धर्मांचा आदर करावा हेही आपल्या धर्मात सांगितले आहे हे मुलांना समजावून त्याप्रमाणे इतरांशी वागण्यास सांगणेही गरजेचे आहे.

 

आपली मुले अनुकरणप्रिय असतात. अशाप्रकारचे वर्तन स्वीकारून तेही सामाजिक शांतता राखण्यात मोलाची भूमिका बजावतील. एक पालक म्हणून तुम्ही सुद्धा भगवद्गीता, बायबल, कुराण, गुरुग्रंथ साहिब, बुद्धांची शिकवण अशा अनेक धर्मांचा अभ्यास करून त्यातून शिकवलेली मानवता वादाची शिकवण तुमच्या मुलांना देऊ केली तर ते नक्कीच परधर्माचा आदर ठेवण्यास शिकतील. मानवता वा भारतीयत्व याच एका धर्माची मुलांना लहानपणापासून शिकवण द्या. आणि ही मानवता टिकवण्यासाठी लागणारी मानसिकता पालकांनी मुलांमध्ये तयार करा. तसेच तुमचे इतर धर्माविषयी काही कलुषित मत असेल तर ते मुलांसमोर मांडू नका. त्यांना त्यांच्या अनुभवातून शिकू द्या.

 

आपल्या भारत देशात अनेक वंचित आहेत ज्यांच्या मुलभूत गरजा देखील पूर्ण होऊ शकत नाहीत. आपल्या मुलांना अगदी लहानपणापासूनच बहुजनांच्या हितासाठी काहीतरी करायला लावा. यातून मुलांची जातीधर्मांची वसने गळून पडतील व सर्वधर्मसमभावीवृत्तीने ते सर्वांशी वागतील. अशा गरजू समाजाला कोणत्याही जाती वा धर्माचं लेबल लावून त्यांना अजून वंचित करू नका. विज्ञान व माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने पुढे जाणाऱ्या या जगात जर आता तुमची वा तुमच्या मुलाची कोणती जात वा धर्म असेल तर तो त्याचे कर्म असुद्या.

 

‘मी भारतीय’

अभिमान असू दे धर्माचा अपुल्या

पर घृणा नको परधर्माची

जग जिंकूया मिळूनी सारे

साद देऊ भारतीयत्वाची||१||

दंग्या ढोप्यामध्ये जळती सारे

कित्येक पाडे, गावे अन शहरे

मुले बापडी अगतिकतेने म्हणती

नक्की माझा धर्म कोणता रे ||२||

मानवतेची शिकवण देण्या जन्मले

या भारतभूवर अनेक तारे

त्यांच्या विचारांस अग्नी देऊनी

धर्म जपतात हे अस्तानितले निखारे ||३||

कोणताही धर्म सांगत नाही

करण्या परधर्मीयांची खांडोळी

कोणत्या उन्मादातून होते मनुष्याकडूनच

मनुष्य देहाची अन त्याच्या संसाराची राखरांगोळी ||४||

माणूस म्हणून जन्माला आलात तेव्हा आता

जग जिंकताना माणसेही जोडत जगा

याच एका मार्गाने बनवा परकीयानाही स्वकीय

जग तेव्हा म्हणेल गर्वाने हाच खरा भारतिय ||५||

जीवन माझे संगीत

संगीताची व्याख्या काय असू शकते हो?

संगीत म्हणजे कर्ण मधुर आणि जनरंजन करणाऱ्या अतिप्राचीन भारतीय परंपरा लाभलेल्या गायन, वादन आणि नृत्य यांचा अंतर्भाव असलेल्या श्रेष्ठ कलेस ‘संगीत’ असे म्हणतात.

गायन, वादन आणि नृत्य यांचा जेंव्हा सुरेख मिलाप होतो, तेंव्हा ती एक अप्रतिम कलाकृती तयार होते व मनाचा ठाव घेते आणि नेमके त्यालाच आपण ‘हे मला खुप आवडले’ असे म्हणतो.

परंतु आवडण्याच्याही पायऱ्या आहेत.

  • पहिली पायरी : आकर्षित होणे.
  • दुसरी पायरी : ती कलाकृती पूर्णपणे ऐकणे.
  • तिसरी पायरी : ती कलाकृती मनात घोळत राहणे.
  • चौथी पायरी : ती कलाकृती मनाच्या तळाशी जाऊन बसणे.
  • पाचवी व शेवटची पायरी : त्या कलाकृतीमुळे निर्गुण किंवा सांगीतिक सुखाचा अनुभव येणे.

 

आता सांगीतिक सुख किंवा निर्गुण आनंद म्हणजे काय?

तर नादब्रम्हापासून मिळालेल्या मनःशांतीचा अनुभव करणे. विकार आणि विचारांपासून दूर जाऊन मनात परम सुखाचा वर्षाव होणे.

जे संगीत मला मनःशांती देते, जगण्यात उमेद निर्माण करते, रोजच्या तणावपूर्ण वातावरणापासून सुटका करते, मनात आशेची नवपालवी फुलविते, सकारात्मक विचार करण्याचे सामर्थ्य देते मग यात माध्यम महत्वाचे नाही, माध्यम कुठलेही असले तरी चालेल.

 

उदाहरणार्थ:-

गायनामध्ये भक्तीगीत, भावगीत, नाट्यगीत, लोकसंगीत इत्यादी वादनामध्ये तबला, पखवाज, ढोलकी, सतार, हार्मोनियम, सनई, बासरी इत्यादी यामधून जर मला मनःशांती मिळत असेल तर मला ते संगीत किंवा वाद्य आवडेल.

 

अखिल मानवजातीमध्ये मग ते कोणत्याही क्षेत्रातील असो सर्वांसाठी एखादे वाद्य वाजविता येणे गरजेचे आहे.

याचा आपल्या दैनंदिन जीवनात होणारे फायदे.

  • सततच्या रियाजाने स्मरणशक्ती वाढते.
  • गायन किंवा वादनाच्या रियाजमुळे पालक आणि पाल्य असे दोघेही कम्प्युटर, लॅपटॉप, आयपॅड आणि मोबाईल या सततच्या वापरातून आणि त्यांच्या विळख्यातून बाहेर पडण्यास खूप मदत होते.
  • गायन, वादन किंवा नृत्य यांचा प्रत्यक्ष संबंध संगीताशी जोडला जातो संगीताचा संबंध मेंदूशी जोडला जातो व आनंद प्राप्त होतो आणि तोच आनंद जेंव्हा हृदयात पोहोचतो तेंव्हा परमानंद प्राप्त होतो.
  • संगीत हे मनाची अध्यात्मिक बैठक बसविण्यासाठी एक अनमोल साधन आहे,म्हणूनच प्राचीन काळापासून आजच्या खऱ्या संत महापुरुषांनी संगीताच्या आधाराने अध्यात्मिक उन्नती साधली.
  • एक कलाकार म्हणून जेंव्हा चारचौघात जो सन्मान मिळतो तो प्रेरणादायक असतो.

 

लिहिण्यासारखे खूप काही असले तरीही आपल्या ग्रुपच्या नियमाप्रमाणे ह्या लेखाची थोडक्यातच सांगता करतो.

मंडळी तुमचं सगळ्यात आवडतं गाणं/वाद्य कोणतं? या गाण्याशी/वाद्याशी निगडित काही आठवणी आहेत का?

मी संजय दादानी लेख लिहायला प्रोत्साहन दिल्याने पहिल्यांदाच लिहण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या प्रोत्साहनाची गरज आहे.

 

DJ सुनिल भोसले

आयुर्वेद- समजुती व गैरसमजूती – भाग 2

दही… अगदी प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आणखी एक विषय.. दह्याच्या बाबतीत देखिल खूप गैरसमजूती आहेत.. उदाहरणार्थ.. दही थंड आहे.. रोज जेवणानंतर खाल्लच पाहीजे..अदमुरे दही हे तर फारच उत्तम  इ. हे सर्वच गैरसमज आहेत.. आणि या गैरसमजूती मुळं आपण अनेकदा अनेक आजारांना बळी पडतो..

दही हे थंड नसून उष्ण आहे.. व पचनानंतर अम्लता उत्पन्न करणारे आहे..दही जेवणाबरोबर खाल्ल्यास जेवनाची रूची वाढवते, भूक वाढवते, शक्ति व स्नेहवर्धक स्थूलता उत्पन्न करणारे आहे.

दही हे उष्ण असल्याने उष्णऋतूंमधे म्हणजे शरद (october heat), ग्रीष्म (उन्हाळा), वसंत (January, February), या काळात खाऊ नये. अन्यथा ते उष्णता व रक्तदोष तसेच कफविकार वाढवणारे ठरते.

पूर्णतः लागलेले दही.. हे वात कमी करते (आमवात नाही), वीर्यवर्धक आहे..

अदमुरे दही तीनही दोष वाढवणारे आहे त्यामुळे हे मुळीच खाऊ नये..

(संदर्भः – च.सू.२७/२२५-२२८)

 

नीरोगी व्यक्ति ने देखिल दही खाताना खालिल नियम पाळावेत…

ते रात्री खाऊ नये, दिवसा देखिल खावयाचे झाल्यास तूप, साखर, मुगाचे कढण, मध किंवा आवळा यापैकी आपल्याला अनुकूल अशा गोष्टी बरोबर खाव्यात. तसेच ते कधीही तापवून खाऊ नये..

वरील नियम न पाळता खाणा-या व्यक्तीस ताप, उष्णतेचे विकार, रक्तदोष, त्वचा विकार , चक्कर येणे, कावीळ यासारखे आजार होण्याची शक्यता असते.

(संदर्भः- च.सू. ७/६१-६२)

 

दही आणि ताक यांचे गुणधर्म पूर्णतः भिन्न आहेत.. दह्यात नुसते पाणी मिसळून हालवले  म्हणजे ताक होत नाही, ते जेव्हा पूर्णतः घुसळून लोणी काढले जाते त्यावेळी शिल्लक राहीलेला द्रव पदार्थ म्हणजे ताक होय.( मला आलेल्या रूग्णानुभवानुसार सांगत आहे..)

त्यामुळे दही खा.. पण प्रमाणात आणि वरील नियम पाळूनच..

“आयुर्वेद जगा आणि निरोगी रहा”

 

 डॉ .गौरी सहस्रबुद्धे- साबळे ( एम्.डी.- आयु.)

Thoughts Become Things

आनंद हा शोधण्याचा विषयच नाही पण लोक आनंदाचा शोध घेत असतात. मग आनंद मिळवण्यासाठी वस्तू पाहिजेत, comforts of life पाहिजे, पैसे पाहिजेत. त्यासाठी लोक पैशाच्या मागे धावताना दिसतात. पैशाच्या मागे लागून आनंद मिळतो का दुःख मिळतं ते पैसेवाल्याना  विचारा, तुम्हाला बाहेरून वाटेल हा पैसेवाला आहे, श्रीमंत आहे म्हणजे खूप आनंदात आहे परंतु त्यांची दुःख त्यालाच ठाऊक असतात. त्याला गुंडांची चिंता, शेजाऱ्यांची चिंता, आपल्या नातेवाईकांची चिंता सतत सतावत असते. कदाचित सर्वसामान्य माणूस त्याच्यापेक्षा अगदी सुखी जीवन जगत असतो.

चित्ता, चिता आणि चिंता या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. चित्ता म्हणजे वाघाची जात,तो माणसाला एकदा खाऊन टाकतो म्हणजे माणूस मोकळा आणि तोही मोकळा. चिता ही माणसाला जाळून टाकते म्हणजे काम झालं. परंतु चिंता ही अशी गोष्ट आहे की माणसाला सतत जिवंत असताना जाळीत असते. अगदी क्षणोक्षणी म्हणून चिंता म्हणजे-Tension,Stress ही सर्वात वाईट गोष्ट आहे.

चिंता आणि चिंतन असे दोन भाग आहेत, माणूस चिंता करण्यात पटाईत आणि सराईत आहे पण चिंतन करण्यामध्ये, चिंतन कशाचं करायचं हे त्याला ठाऊक नसतं. तो चिंतन करतो नको त्या गोष्टींचे. भविष्याची चिंता भूतकाळातील वाईट गोष्टींचे चिंतन. चिंता आणि चिंतन यात चिंता तर वाईटच आहे पण चिंतानाबद्दल ही माणूस अज्ञानीच आहे. सामान्यपणे आपला दररोज अनेक व्यक्तींशी संबंध येतो. यामधून काही व्यक्तींशी आपले विचार जुळतात तर काहींशी ते जुळत नाहीत. ज्या व्यक्तींशी आपले विचार  जुळत नाहीत त्यांच्याबरोबर आपलं पटतही नाही परिणामी अशा व्यक्तींबरोबर काम करत असताना मनात त्यांच्याबद्दलचे चिंतन फारच वाईट चालू असतं. परिणामी अशा माणसांना वाईट चिंतन करण्याची कालांतराने सवयच जडते.

विज्ञानाने आज जी प्रचंड प्रगती केली आहे त्यात शास्त्रज्ञांनी चांगले चिंतन करून नवीन शोध लावले परिणामी माणूस सुखी होण्यासाठीचा फायदाच झाला,परंतु दुसऱ्या बाजूने तोटाही झाला, कारण आज संपूर्ण जग विनाशाच्या उंबरठ्यावर उभं आहे. काही दिवसांपूर्वीच आपण ऐकत होतो, उत्तर कोरिया अमेरिकेला युद्धाची धमकी देते या गोष्टी चिंतनातूनच उदयाला येतात, परिणाम मात्र खूपच भयंकर कारण जर तसे झाले तर दोन्ही देशांकडे एवढी क्षेपणास्त्र आहेत की युद्धानंतर  विजय साजरा करावयास सुद्धा कोणी उरेल की नाही याची खात्री देणं कठीण.

सांगायचा मुद्दा असा की, तुम्ही भूताचा चिंतन केले तर भूत व्हाल, देवाचं चिंतन केलं देव व्हाल, पैशाचा चिंतन केले पैसेवाले व्हाल, म्हणजेच श्रीमंत व्हाल. थोडक्यात चांगल्या गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी आपले चिंतन सुधारणे अत्यंत महत्त्वाचे आहे . समोरची व्यक्ती कितीही वाईट असेल परंतु त्यांच्याबद्दल शुभ चिंतन करणे पूर्णपणे माझ्या हातात आहे. याची सुरुवात आपल्या प्रत्येकापासून व्हायला हवी.

आपण स्वतःला विचारून पाहू की घरात किंवा घराबाहेर आपला संपर्क ज्या व्यक्तींशी येतो त्या व्यक्तींबद्दल आपल्या मनात वाईट विचार तर येत नाहीत ना? कारण आपण जर वाईट चिंतन केले तर आपलयाकदे वाईटच येणार..

 

प्राध्यापक भास्कर पोखरकर

तुम्हांला काय वाटतं?

परवा काही खाऊ घ्यायला बेकरीत गेले होते. माझ्या आधीच्या ग्राहकांची खरेदी होईपर्यंत मी शांत उभी राहिले. थाेड्यावेळाने एक बाई आली—“मी रिक्षा थांबवलाय, मला लवकर दे” म्हणू लागली. मी सेल्समनला म्हटलं, “माझ्याआधीच्या ग्राहकांचं घेऊन झालंय, तेव्हा आता मला दे.”  त्या बाईने पुन्हा “रिक्षा उभी केलीय, मला आधी दे” म्हटलं.

सेल्समनने मला हवे ते पदार्थ बांधून दिले, तसा  त्या बाईचा पारा चढला.

आज xerox च्या दुकानातही माझ्यानंतर आलेल्या तरुणाने असाच रेटा लावला.

माझ्या मनात प्रश्न: 1 : ‘माझ्यावर असलेल्या संस्कारांमुळे किंवा मी फार धीर धरणारी, संयमी वगैरे म्हणून मी आपसूक रांगेत उभी राहते का?’

प्रश्न 2 : की ‘इतर लोक खूप कामात-घाईत नि मीच निवांत आहे?’

प्रश्न 3 : ‘मी त्यांच्या जागी असते, घाईत असते तर मी काय बरं केलं असतं?’

 

पहिल्या दोन प्रश्नांची उत्तरं मला देता येईनात पण -शेवटच्या प्रश्नाचं उत्तर माझ्या मनाने तत्परतेने  दिलं—

मी माझ्याआधी उभ्या असलेल्या व्यक्तीला माझ्या घाईचं कारण सांगून माझं काम त्यांच्या आधी करू देण्याची परवानगी विनम्रपणे मागितली असती. ‘रिक्षाचं बिल वाढतं, म्हणून माझा नंबर आधी’हे कारण होऊ शकत नाही. असं कारण कुणी दिलं तर मला ते मुळीच  पटणार नाही!

मला माझ्या वेळेची किंमत वाटते तर मीही दुस-याच्या वेळेची कदर केली पाहिजे. दुस-याने नियम पाळावेत, अशी मी अपेक्षा करते तेव्हा मी लिखित/अलिखित, लहान/मोठ्या ऩियमांचं उल्लंघन करता कामा नये, हे मी लक्षात घ्यायला हवं. जीवनमान गतिमान झालंय म्हणताना असं वागून दुस-याच्या मार्गात आपण गतिरोधक होत नाही ना, हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.

आपण सतत ‘घोड्यावर असलो’ तरी आपलं काम लवकर पूर्ण करण्यासाठी दुस-याची अडवणूक करत आपलं घोडं दामटू नये,असं मला वाटतं. यावर तुम्हांला काय वाटतं?

 

डॉ. अनुपमा निरंजन उजगरे

(सुप्रसिद्ध लेखिका)

माझं आभाळ हरवलंय!

माझं आभाळ हरवलंय

रितं मन  शोधंत भरकटलं  आता

ईथे उंचावर  पोहोचण्यासाठी

उंच उंच इमारतीकङे साकङे  घातले

किती आर्जवं केलीत

या ताठर  खुनशी सुळक्याच्या लोकांनी

आणि धारदार टोकांनीच घायाळ  केलय

माझ्या  निर्मल निळ्या आकाशाचे अस्तित्व

हरवलंय हो आकाश माझं

माझ्या इवल्या इवल्या  चांदण्याची

थाळी देखील पारखी  झाली  आता

जगतोय आभाळाविना  पोरकं झालेलं रितं ….हृदय,

भरून घेतलाय एक  घुसमटलेला हताश  श्वास ……!

 – शरद बरडे

सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक

अंकज्योतिष एक चमत्कार -भाग 2 | प्रारब्ध अंक 1-9 असेल तर काय ?

  1. दिर्घकालीन महत्वकांक्षा पूर्ण होते. ज्या गोष्टी हातात घ्याल त्यात यश मिळते. आर्थिक फायदा व बढती असा चढता आलेख असतो. परंतु अहंकाराने बोलणे टाळावे.
  2. भांडण किंवा वाद आवडत नाहीत. जाहिरात न करता शांतपणे काम करणे ही त्यांची पध्दत असते.बाहेरील जग व वातावरण या बद्दलही खूप संवेदनशील असतात. लहान मुले फार आवडतात. या लोकांना सामाजिक कार्याची आवड असते. हे पडद्या मागचे सुत्रधार असतात.
  3. जीवनात पैशांना महत्व दिले जाते. आर्थिक बाजू समाधान कारक असते. आपल्या व्यवसायाशी संबंधीत व्यक्तींमध्ये वावर जास्त असतो. यांना यशस्वी लोक मित्र म्हणून आवडतात.
  4. जीवनात पेच प्रसंग येतात त्यांना ते धाडसाने तोंड देतात. त्यामुळे कार्यक्षमता व आत्मविश्वास वाढतो. स्वतंत्रबाणा असतो. या लोकांच्या व्यक्तीमत्वात पॉझिटीव बदल होतात. या लोकांच्या विचारांना चांगली दिशा आणि मार्ग मीळतो मात्र या लोकांनी योजनेमध्ये लवचिकता ठेवावी.
  5. जीवनात सतत बदल होतात . अति बोलका स्वभाव नेहमी करार , कागदपत्रे , औद्योगिक व्यवहार यांच्याशी संबंध येतो. प्रवासामुळे आर्थिक फायदा होतो. अनेक गोष्टींची माहिती असते पण सखोलपणा कमी असतो. आपल्यापेक्षा लहान वयाच्या लोकांमध्ये वेळ घालवायला आवडतो.
  6. जीवनाचा पाया मैत्री ऐक्य भावनिक आपुलकी यांच्यावर आधारित असतो. भागीदारीत व्यवसाय केल्यास जास्त यश मिळते. सहकार्यांमध्ये लोकप्रिय असतात.
  7. या लोकांना आयुष्यात ध्येय असणे आवश्यक असते. ही मंडळी जास्त विचार करणारी असतात . यांनी पैशासाठी प्लॅनींग करावे.
  8. सतत कामातील व्यग्रता व चिकाटी याचा परिणाम दिसतो. असंख्य जबाबदारी आणि कष्ट करावे लागते. यांना उशीरा फळ मिळते परंतु कष्टाचे चीज होते. यांना वयस्कर लोकांपासून फायदा होतो.
  9. धाडसी स्वभाव असल्याने कोणताही परिस्थितीत न डगमगता काम करणे यांना जमते. महत्वकांक्षी योजनांचे पालन करणे व ते अंमलात आणणारे . यांच्यामध्ये शारीरीक व मानसिक दोन्ही ताकद असते. स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावर दुसर्यांचे आजार बरे करू शकतात. परंतु तोंडावर ताबा ठेवल्यास प्रगती चांगली होते.

 

अंकशास्र विशारद सौ निताशा मोरे

फोन नंबर 9324680888

पहिली उड्डाण

आज मला एका मित्राचा फोन आला. म्हणाला उद्या आई बाबा पहिल्यांदा विमानाने बाहेरगावी जाणार आहेत. तू ज्या एयरलाइन मधे आहेस, त्याच एयरलाइनच बुकिंग आहे. ते उत्साहित आहेत पण पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे थोड़े नर्वस आहेत. विमानपर्यंत जाताना तू जर त्यांच्यासोबत असलास तर थोड़े रिलैक्स होतील आणि आम्हालाही चिंता लागून राहणार नाही.

ठरल्या प्रमाणे त्याना विमानतळावर भेटलो. त्यांची विचारपूस केली आणि त्यांना घेऊन गेट न. ७ ने आत शिरलो. त्यांच्या चेहऱ्यावर नर्वसपणा पाहून मी म्हटलं की इंग्लिश ही आंतरराष्ट्रीय भाषा असली तरी विमानतळावर हिंदी भाषेतले सुद्धा साईन बोर्ड लावले आहेत. जेणेकरून प्रवाशांचा गोंधळ होत नाही. चालता चालता प्रत्येक टप्प्याची माहिती देत होतो आणि पहिल्या टप्प्यावर आलो.

 

Check-in counter –

या ठिकाणी प्रवाशांचे तिकीट, ओळखपत्र, ( आंतरराष्ट्रीय प्रवास असल्यास ,पासपोर्ट आणि व्हिसा ) तपासून बोर्डिंग कार्ड व बैगेज टॅग दिला जातो. त्यावर प्रवाशांचे नाव, फ्लाइट नंबर, तारीख, सीट नंबर, बोर्डिंग गेट नंबर, आणि वेळ दिलेला असतो. आपल्या सामनाला बैगेज टॅग लावला जातो. त्यावर प्रवाशांचे नाव, फ्लाइट नंबर, तारीख व यूनिक बैगेज टॅग नंबर दिलेला असतो. त्याची एक प्रत बोर्डिंग कार्ड सोबत प्रवाशांना दिली जाते.

 

Immigration counter –

येथे प्रवाशांचे वीसा व पासपोर्ट तपासून पासपोर्ट वर immigration शिक्क्का दिला जातो. दुसऱ्या देशात जाण्यासाठी ही एक प्रकारची शासनाकडून अनुमति असते.

( आंतरराष्ट्रीय प्रावसासाठी Immigration आवश्यक असते.)

 

Security check –

या ठिकाणी सुरक्षा रक्षकांकडून (CISF) प्रवाशांची व हैंड बॅग ची तपासणी केली जाते. तपासणी झाल्यावर बोर्डिंग कार्ड वर सिक्योरिटी चेक चा शिक्का दिला जातो.

(विमानप्रवासात हैंड बॅग मधून कोणत्या वस्तू घेऊन जाण्यास निषिद्ध असतात त्याची माहिती एयरलाइन च्या संकेतस्थळावरुन जाणून घेणे आवश्यक असते.कोणतीही liquid समान नेता येत नाही)

 

Boarding Gate –

हा शेवटचा टप्पा. एयरलाइन अधिकाऱ्यांनी  बोर्डिंग कार्ड तपासले आणि काका काकू आपल्या पहिल्या वहिल्या विमान प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी विमनाच्या दिशेने मार्गस्थ झाले.

विमानप्रवासाबद्दल माहिती मिळावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न.

 

धन्यवाद

नितीन म्हाडगुत

CURATIVE PETITION

There is no word like – curative petition in any  legislative law books.

We all know Supreme Court is apex court of the country so what to do if you are not happy with order of Supreme Court of India  .   This question was answered by Supreme Court  by giving the term Curative petition . It was coined in the case of Rupa Ashok Hurra vs. Ashok Hurra and Anr.  There was a question on which whether the aggrieved person is entitled to have relief against the final judgement or order of the Supreme Court after the dismissal of the review petition.

The Supreme Court had held that the order is mainly used to prevent the misuse of its process and to cure gross failure of justice. It is necessary to reconsider the judgments in terms of the inherent powers. In this purpose, the Court has given the term as a “curative” petition.

For a Curative petition, the petitioner is needed to specify the grounds mentioned which is taken in the review petition filed earlier and it must be dismissed by circulation. It will be certified by a senior advocate. The Curative petition is distributed over three senior most judges and to the judges who had given the impugned judgement. There will be no time limit for filing the Curative petition.

To get the curative petitions, the court has laid down different specific conditions. There is a need of requirements for accepting the curative petitions. Some of the requirements are:

The petitioner needs to develop a genuine violation of principles of natural justice and judgement that adversely affected him.

  1. The petition must be contained with the grounds mentioned which had taken in the review petition and will be dismissed during circulation.
  2. The curative petition must constitute a certification by the senior lawyer for fulfilling the requirements.
  3. The petition will be sent to the three senior most judges and judges who passed the judgement affecting the petition.

Judiciary tried to ensure justice for all , it take at most caution to give fair chance to the aggrieved parties to  redeem . We must appreciate , even Supreme Court think there is a possibility of error in considering legal provisions in a particular case and that way it goes out of the codified law and provide opportunity to aggrieved party by way of Curative petition .

Judicial system thrives to ensure justice for all , it is based on principle – no innocent shall be punished .

Irony is , the appeal provisions which are made to ensure justice by eliminating error of law committed by the lower court is causing delay in disposal of cases .

. As we all know justice delayed is justice denied .  Judicial system alone can’t be held responsible for pending cases and delay in disposal of cases . It is duty of advocates and Litigants not to misuse the due process of law to delay case.

 

Adv. Uma Wagle

मूड रिचार्जर – शाळा

लहान लहान मुलांच्या मोठ्ठया मोठ्ठ्या मनात

आकांक्षांचं पीfक ऊरी , वारं भरल्या कानांत !

त्रास देणारा शेजारचा मित्र पण जवळचा वाटतो

आवडणारी मुलगी लांब असून जवळची वाटते !

कडीच्या डब्यातली एकाच साजुक तूप-साखरेची पोळी

“गोल्ड्-स्पॉट्”च्या वॉटर बॅग मधील पाण्याची चव शिळी !

“मस्तीखोर” म्हणून उभी पट्टी तळहातावर मारणार्‍या बाई

मधल्या सुट्टीत भरवायच्या त्यांच्या डब्यातली पोळी !

तूप-साखर गेली आणि आता “ब्रेड्-बटर आलं

पण लहान मुलांच्या मनात मात्र तेच भावविश्व ओलं !

फक्त …..चुकलं की सर्वांसमोर ओरडणार्‍या “बाई”

आणि सुधारावं म्हणून मारणारे “सर” आता दिसत नाहित !

चार भिंतींच्या वर्गांत बसतात हल्ली काही तास “शाळार्थी”

आपुलकी नसलेल्या शाळात हल्ली “विद्यार्थी” दिसत नाहित !

मुलं तशीच आहेत , अभ्यासक्रम तेव्हढा बदललांय

शिक्षकांचा “रोल” मात्र त्यांनी पालकांकडे ढकललाय !

तरी पण मुलांना आवडणारं ते दुसरं एक घर आहे

आपापल्या शाळेनं केलेलं त्यांच्या मनांत घर आहे !

कारण हात उगारणारे सर किंवा बाई आता कदाचित नसतील , पण

वर्गातल्या मुलाला लागलं म्हणून रडणारे एखादे तरी वर्गशिक्षक असतील !

मस्ती केली की ओणवं उभं करणारे सर दिसतीलच कशाला?

“दमलं असेल पोरगं !” म्हणून पाणी देणार्‍या शिपायाची सर कशाला?

एकही विषय न शिकवणारे असतील शाळेचे मुख्याध्यापक

आणि वर्गात फिरून शिकवण्याची दृष्टी नाही आता व्यापक !

नाममात्र अस्तित्व घेऊन गल्ली बोळांत हल्ली उभ्या आहेत इमारती

‘कळलें नाही तर “क्लास”मधे विचारा’ या शिक्षकांच्या इशारती !

तरी पण आवडते सगळ्याच मुलांना शाळा

सोडा वॉटर सर्-बाई अन् चीर पडलेला फळा !

कारण चुकार फटीतून झिरपत असतं जसं पावसाचं पाणी,

तसा फुलवत असतो एखादा शिक्षक,एखादा शिपाई ….हा मळा !

© उदय गंगाधर सप्रेम—ठाणे

आयुर्वेद- समजुती व गैरसमजूती – भाग 1

 

आयुर्वेद म्हणजे काय हे जाणून घेण्यापूर्वी आपण आधी त्याच्याशी मैत्री करूया . आयुर्वेद म्हणलं की सर्वात आधी डोक्यात विषय येतो तो म्हणजे पथ्य . आणि पथ्य म्हणलं की लगेच आपल्या अंगावर काटा येतो. कुठल्याही आईला असं कधी वाटेल का, की आपल्या बाळाने चुकीचे खावे चुकीचे वागावे  …… मुळीच नाही… कारण प्रत्येक आईला आपल्या बाळाचं फक्त कल्याण व्हावं असंच वाटत… असंच काहिस आपल्या आयुर्वेदाचं सुद्धा आहे. म्हणूनचआयुर्वेदात पथ्य अपथ्य ही संकल्पना आहे.

आयुर्वेद या शास्त्राचा उद्देशच हा आहे की , “स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम्… आतुरस्य विकारप्रशमनंच । ” (संदर्भ : चरक सूत्रस्थान ३०/ २६ )

म्हणजे मुळात तुम्ही निरोगी असाल स्वस्थ असाल तर आजारी पडू नये याची काळजी घेणे व रोगी असाल तर तुम्हाला व्याधी तून मुक्त करणे……  केवळ हाच मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून या शास्त्राची निर्मिती झाली . आयुर्वेदातील पथ्य अपथ्य या संकल्पनेविषयी सर्वाधिक गैरसमजुती आणि भीती असल्यामुळे या विषयात सर्वप्रथम हात घातला . एकादा का ही भीती गेली , की आपोआप हे शास्त्र आपले वाटू लागेल . आपण अगदी सोपे आणि व्यवहारातील काही उदाहरणांनी हे समजून घेऊ या .

आपण जे खातो; ज्या प्रकारचा आहार घेतो त्या प्रकारचेच शरीरात भाव निर्माण होत असतात जसे; रोज दूध पिणारे बाळ जो पर्यंत त्याला काही शारीरिक व्याधी होत नाहीत तोपर्यंत केवळ हसते खेळते .  उगीच कुणाला मारणे ओरडणे चिडणे हे भाव मूळात त्याच्यात निर्माणच होत नाहीत; तेच रोज अतिशय तिखट तेलकट खाणारी माणसे ही सर्वाधिक कोपीष्ट असतात . आणि तेच रोज शिळे सडके अन्न खाणारी माणसे ही निद्राळू, रोगी असतात . हिच अनुक्रमे सात्विक राजासिक व तामसिक आहाराची उदाहरणे होय. आपल्या सर्वांन्ना आवडणारे चीज हे तिसऱ्या प्रकारातच मोडते बरं का!  आपल्याला कशा स्वरूपाचे आयुष्य जगायचय हे आपल्यालाच ठरवायचय आणि हे जर आपल्या खाण्यापिण्यावर अवलंबून असेल तर निरोगी रहाण्यासाठी ह्यात आपण नक्कीच बदल करू शकतो . नाही का? ह्यालाच पथ्य म्हणतात .

पथ्ये सति गदार्तस्य किम् औषध निषेवणैः।

या श्लोकात पथ्या चे महत्व सांगताना लेखक म्हणतो, पथ्य हेच रोगी व्यक्ति चे औषध आहे नियमित पथ्य पालन करणा-या व्यक्ति ला तर औषधाची सुद्धा गरज नाही…

कारण जर आपण खाताना किंवा वागताना चुकलो नाही तर मग आपले शरीर सुद्धा आजाराच्या दिशेला वाट चुकत नाही…

मला वाटत आता तरी पथ्य म्हणलं, की नक्कीच आपल्या भुवया उंचावणार नाहीत.

 ” आयुर्वेद जगा आणि निरोगी रहा“! 

डॉ .गौरी सहस्रबुद्धे – साबळे ( एम्.डी.- आयु)

पालकत्व रिचार्जर

तुम्हांला काय वाटतं?

गेल्या महिन्यात घडलेला प्रसंग. कार्यक्रम आटपून नाशिकहून ट्रेनने येत हाेते. समाेर साताठ वर्षांचा एक मुलगा आईसाेबत प्रवास करत हाेता.  आईच्या कानाशी लागून खाण्यापिण्याच्या त्याच्या काही ना काही डिमांड्स सतत  चालू हाेत्या. आई त्याला हवं ते देत हाेती. त्याचे लाड करत हाेती. विणकाम चालू असताना त्याच्याकडे अधूनमधून माझं लक्ष जात हाेतं.

काय झालं कुणास ठाऊक, पाेरगं अचानक बिथरलं. मी चमकून पाहिलं. ताे आईला दम देत हाेता

“नही दाेगी ताे मैं गाडी के नीचे कूद जाऊँगा!”

आईने पडतं घेतलं, पर्स उघडून त्याच्यासमाेर शंभरच्या काही नाेटा धरल्या. हपापल्यासारख्या त्याने त्या नाेटा ताब्यात घेतल्या.

माझ्या काळजाचे ठाेके चुकले!हातातल्या विणकामाचे टाके उलटसुलट पडून क्षणात गुंता झाला!

मनातला गुंताही वाढत गेला. मुलापेक्षा आईचं समुपदेशन करण्याची गरज मला तीव्रतेने भासली. तिच्याशी समजुतीचं  काही बाेलावं असं फार मनात आलं, पण ती उतरायच्या तयारीला लागली हाेती.

या विषयावर पालकांसाठी आणि वि्द्यार्थ्यांसाठी शाळेने मुद्दाम सेमिनार घेतले पाहिजेत, असं प्रकर्षाने वाटलं. पालकांनी मुलांच्या अयोग्य  मागण्यांना नकार द्यायला हवा. उठसूट त्यांचे हट्ट पुरवू नयेत. मागितलं की मिळतंं, मिळालंच पाहिजे ही वृत्ती त्यामुळे बळावते.

त्याचा परिणाम–दुष्परिणाम असा होतोे की, आई अभ्यासासाठी रागावली, ट्रीपला जाऊ दिलं नाही, अशा कुठल्याही बाबतीतला नकार ही मुलं पचवू शकत नाहीत. परीक्षेतलं, प्रेमातलं  कुठलंही अपयश असाे, टाेकाची अविचारी पातळी ती गाठतात. नकार, अपयश सहन करणं, त्यावर मात करून यश मिळवणं ही कुवत त्यांच्यात निर्माण होत नाही. आईवडिलांचं आपल्यासाठी खस्ता खाणं, घरची परिस्थिती, किंवा प्रतिष्ठा ह्याची त्यांना पर्वा वाटत नाही. दुस-याच्या त्यागभावनेची कदर नाही आणि आपण  त्याग करण्याचं मनातसुद्धा येत नाही.

ह्याला पुष्कळ अंशी पालक जबाबदार ठरतात.’आम्हाला नाही मिळालं, आमची ऐपत आहे, मुलांना त्यांच्या नशिबाने मिळतंय तर करू द्या त्यांना एन्जॉय!’ ही पालकांची भूमिका मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला मारक ठरते.

समुपदेशन शेजा-यापाजा-यांनी केलेलं चालत नाही. दुस-या कुणी शहाणपणाचे, समजुतीचे बाेल ऐकवलेलं पुष्कळदा तरुण पिढीला आणि लहानांनाही रुचत नाही. म्हणून सेमिनार्सची गरज वाटते. साेनाराने कान टोचलेले बरे असतात. तुम्हांला काय वाटतं?

 

डॉ. अनुपमा उजगिरे

(सुप्रसिद्ध लेखिका)

ज्ञान रिचार्जर

 

काल रविवार असल्याकारणाने मी जरा निवांत दुकानामध्ये  होतो. तेव्हा संजय गोविलकर मला भेटायला आले. संजयजी आल्यानंतर आमच्या कोणत्या ना कोणत्या विषयावर चर्चा होतच असतात. काल ‘चांदी’ या विषयी गप्पा मारत असतांना मला मागील वर्षी त्यांनी चांदीची उरळी खरेदी करत असतांनाचा प्रसंग आठवला. त्यांनी काही गिफ्ट आलेल्या चांदीच्या मूर्ती आणि चांदीची नाणी व वरचे पैसे देवून उरळी खरेदी करत होते.मी नेहमीप्रमाणे चांदीच्या मूर्ती तपासून बघितल्या असता त्यामध्ये लोखंडाचे रॉड निघाले आणि coin गरम करून बघितले असता त्यातील काही coin हे तांब्याचे निघाले. माझ्यासाठी हा एक नित्याचाच प्रकार होता पण संजयजींसाठी तो एक नवीन अविश्वसनीय आणि धक्कादायक प्रकार होता. त्या नंतर त्यांना मी सांगितले कि मुंबईमध्ये आता पर्यंत मी ज्या काही जुन्या चांदीच्या मुर्त्या बदलण्यासाठी आले त्या सर्वांमध्ये लोखंडाचे किंवा तांब्याचे रॉड निघाले आहेत.

घरातील देव देवतांच्या मुर्त्या म्हटले कि भावनेचा प्रश्न. मला ही ती मूर्ती कट करतांना वाईट वाटते पण व्यवसाय म्हटले कि ते करावेच लागते. फक्त वाईट एव्हढेच वाटते कि काही लोक हे आपल्या भावनेशी खेळतात. तसंही बघितलं तर देव हा सर्वांच्या मनामध्ये असतो पण तरीही आपण त्याची मूर्तीच्या स्वरूपामध्ये पूजा करत असतो. कारण त्यामुळे आपणास positive एनर्जी मिळत असते.

म्हणून चांदीची मूर्ती घेतांना त्या दुकानाची बाजारातील विश्वासहर्ता सर्वात महत्वाची.

चांदीच्या दागिन्यांची शुद्धता ९२% आणि ९६% असते. प्रत्येक दुकानामध्ये  सोने-चांदीची शुद्धता तपासण्यासाठी “कॅरोटोमीटरची”  सोय असते त्याचाही वापर आपण करू शकतो.

 

धन्यवाद!

संतोष गोडसे

PNG JEWELLER’S

शाखा व्यवस्थापक, प्रभादेवी, मुंबई.

मूड रिचार्जर – असे प्रसवले गीत

मंडळी , सप्रेम नमस्कार !

आज मी तुम्हाला ५७ वर्षं मागे नेतोय….. : साल १९६० : या वर्षी एकूण ३१८ चित्रपट प्रदर्शित झाले — ११८ हिंदी , १५ मराठी , ६४ तामिळ , ५४ तेलगू , ३६ बंगाली व ३१ इतर भाषीय. या ११८ हिंदी चित्रपटातील एका चित्रपटातील एका गाण्याची हि हकिगत…..

चित्रपटात हमीर‘ रागावर आधारीत एक शास्त्रीय संगीताचा संपूर्ण बाज असलेलं गाणं होतं.नायकाने निव्वळ या एकमेव गाण्यासाठी सतारवादनाचं शिक्षण घेतलेलं. गाण्यातील तीन कडवी झाल्यावर इंटरल्यूडसाठी ( दोन अंतऱ्यातील अंतर ) संगीतकाराने पडद्यावरील एका आचरट विनोदी माणसाच्या तोंडी असलेल्या विनोदी ( भासणार्‍या पण गायला अत्यंत कठीण! ) तानांसाठी खास उस्ताद नियाज़ अहमद खाँसाहेबांना आमंत्रित केलेलं ! पडद्यावर गाण्यावर नृत्य दाखवलेलं ! नायक , नाचणारी अभिनेत्री , विनोदी अभिनेता , गीतकार , संगीतकार आणि गायक : एकजात सगळे मुसलमान ! गाण्याचे बोल हिंदू देवतेशी संबंधित व गाणं संपूर्णपणे शास्त्रीय संगीतावर आधारीत ! गाण्यासह चित्रपटाचं काम पूर्ण झालं.आणि…..

फिल्म संकलनाच्या वेळेस दिग्दर्शकाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली ! गाण्यांमुळे सिनेमा हिट होण्याच्या काळात , रागदारीवरील ह्या नृत्याची साथ असलेल्या गाण्याच्या वेळीच लोक धुम्रपानाला वा नैसर्गिक विधींसाठी हाॅलबाहेर गेले तर ? झालं….. ते गाणंच कापून टाकण्याचा निर्णय दिग्दर्शकांनी घेतला! हे कळताच जीव ओतून गाणं गायलेला गायक दिग्दर्शकाकडे जाऊन म्हणाला, “असं करु नका! मला या गाण्याचं मानधनहि देऊ नका!हे गाणं जर लोकांना आवडलं नाहि तर नंतर ते चित्रपटातून काढून टाका! पण गाणं लोकांना आवडलं तर नंतर मला गाण्याचं मानधन द्या !

गायकाची पत मोठी असणारा काळ तो_ ! दिग्दर्शकांनी गायकाचं म्हणणं मान्य केलं. चित्रपट रिलीज् झाला, गाण्यासकट तूफान चालला! गाणं प्रेक्षकांची प्रचंड दाद मिळवून गेलं ! दिग्दर्शकांनी गायकाला फोन करुन मानधन घेऊन जायला सांगितलं.गायकाने मानधन मिळाल्याचं सांगताच दिग्दर्शकांनी विचारलं , “माझ्याखेरीज तुला मानधन कुणी देणं अशक्य, मग हे कसं काय?” यावर गायकाने उत्तर दिलं , “माझं गाणं लोकांना आवडलं यातंच माझं मानधन मला मिळाल्यासारखं आहे! मला वेगळं मानधन नकोय! या गाण्याचं सगळं श्रेय संगीतकार XXX यांचं आहे!”

दिग्दर्शकांनी हि हकिगत संगीतकार XXX यांना सांगताच तो संगीतकार म्हणाला , “यांत माझं फारसं श्रेय नाहि! हि किमया राग हमीरची आणि गायकाची!आणि या गायकाची तारीफ मी नाचीज़ काय करणार? परवरदिगारने त्याच्या रूहमधेच असे स्वर दिलेत की तो कुठल्याहि गाण्याचं सोनंच करतो!”

 

मंडळी , खूप वेळ रहस्यमय बोललो…..आता रहस्य उलगडून सांगतो :

आजपासून बरोबर ५७ वर्षांपूर्वी म्हणजेच ४ नोव्हेंबर १९६० ला रिलीझ झालेला तो चित्रपट म्हणजे  डाॅ.व्हि.एन्.सिन्हा निर्मित कोहिनूर

दिग्दर्शक : ‘एस्.यू.सन्नी

कलाकार : नायक — युसूफ खान ऊर्फ दिलीपकुमार , विनोदी नट : मोहम्मद उमर मुक्री / मुकरी, नर्तिका : झेबुन्निसा ऊर्फ कुमकुम

गीतकार : शकील बदायुनी

संगीतकार : नौशाद अली

गायक : मोहमद रफी

आणि ते अजरामर गीत म्हणजे :मधुबनमें राधिका नाचे रे

कोहिनूरसाठी सर्वोत्कृष्ट नायक म्हणून दिलीपकुमार ला फिल्मफेअर अॅवाॅर्ड मिळालं, पण मोगलआझम् ( ज्याला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं फिल्मफेअर अॅवाॅर्ड मिळालं) चं व कोहिनूरचं अप्रतिम संगीत देऊनहि सर्वोत्कृष्ट संगीत अॅवाॅर्ड मिळालं शंकर जयकिशनला — दिल अपना प्रीत पराईसाठी, मोहमद रफीला सर्वोत्कृष्ट गायक व शकील बदायुनीला सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून चौदहवीका चाँद या गीतासाठी फिल्मफेअर अॅवाॅर्ड मिळालं!

पण कुठलंहि अॅवॉर्ड न मिळवलेली मधुबनातली नाचणारी राधिका कुमकुम व संगीतकार नौशादची मुरलिया आज ५७ वर्षं ह्रृदयाच्या प्रत्येक कप्प्यात विराजमान आहे !

कळावे,

आपला विनम्र ,

उदय गंगाधर सप्रेठाणे