शांती अंखडीत राहो… जगाचा भेद लयाला जावो ।।

राष्ट्र संत तुकडोजी महाराज राष्ट्र उभारणीच्या कार्यात स्वतःला वाहून घेतले होते. लहानपणापासूनच त्यांना ईश्वरभक्तीची पण आवड होती. भक्तीच्या माध्यमातून , मानवतेच्या दृष्टीकोनातून त्यांनी राष्ट्रभक्तीचे धडे समाजात रुजविली .

माझ्या वडिलांनी संत तुकडोजी महाराजांची कांही भजनं डायरीत लिहून ठेवलेली आहेत.  आमच्याकडे श्रावण मासात एक महिना पूर्ण भजन करायचो.  त्यात  सर्व संतांची भजनं असायची.  चालीवर म्हणायचो.    ते दिवसच वेगळे होते. सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक/सर्वधर्मीय प्राथनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला. आज 30 एप्रिल , श्री संत तुकडोजी महाराजांची जयंती .   या निमित्ताने त्यांचं एक भजन आठवलं.  त्यांच्या या भजनातून मानवता धर्म आपल्या मनातून निर्माण व्हावयास पाहिजे. जात धर्म पंथ विरहित आणि एकमेकांच्या धर्माबद्दल आदर असावा द्वेषाचा लवलेशही नसावा .निसर्गनिर्मित वृत्ती म्हणजे निर्मळ प्रफुल्लित चित्तवृत्ती असावी या सगळ्या गोष्टी आपल्यात असल्या तर आपल्या देशाला

अखण्ड शांती लाभेल आणि असेच निरंतर असावे अशी मागणी श्री संत तुकडोजी महाराज आपल्या भजनातून भगवंताच्या चरणी करतात.

 

शांती अंखडीत राहो

जगाचा भेद लयाला जावो  ।।

खलनिंदक हे निर्मळ होऊनी ।

द्वेषपणाचा लेश न राहूनी   ।

सकल प्रभूगुण गावो     ।।

जगाचा भेद लयाला जावो …1

मानव धर्म मनाने लाभो  ।

निसर्गमय वृत्ती हरी शोभो।

अखिल जगा सुख होवो  ।।

जगाचा भेद लयाला जावो  ..2

पंथ मतांतर दूर रहावे  ।

तत्वज्ञान सर्वांतरी यावे ।

देवसमानची राहो   ।।

जगाचा भेद लयाला जावो …3

तुकड्यादास म्हणेही आशा ।

पुरवावी अमुची जगदीशा  ।

झणी उदयाला येवो  ।।

जगाचा भेद लयाला जावो..4

 

ज्या वयात बालसुलभ गोष्टी कराव्या त्या वयात त्यांनी ग्रामोद्धार राष्ट्रविकास समाजपरिवर्तन स्वातंत्र्य चळवळीत सहभाग विश्व हेच आपले कुटुंब थोडक्यात विश्व मानवत्वाची संकल्पना उरी बाळगून समर्पित असे जीवन तुकडोजी महाराज जगले.

त्यांच्या जयंतीनिमित्य श्री संत तुकडोजी महाराजांना विनम्र अभिवादन!!!

त्यांच्या कार्याची ओळख ही आजच्या काळाची गरज आहे.

 

“जनी हासती काय मला जन हे ,

ही लाज मनी तिळमात्र नको ।।

कार्य करा प्रभूला स्मरुनी ।

निःस्वार्थ पणे  प्रियता धरूनी  …

 

हे विश्वमकान खरे अपुले समजोनी  करी मग जीवदया …

मग वानो कुणी निंदोही कुणी ।

अभिमान मनी तिळमात्र नको।।

त्यांच्या भजनातल्या ओळी!!. खरंच कोणीही नतमस्तक  व्हावं

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *