आलो मी हितगूज कराया

आदरणीय अण्णा ,

 

आज ५ जानेवारी २०१८…… तुम्हाला जाऊन आज बरोबर ३६ वर्षं झाली ! एका गोष्टीचं मला नवल वाटतं की तुम्हि स्वरांचे जादुगार म्हणून १२ जानेवारी १९१८ ला जन्म घेऊन आयुष्याच्या पटावरुन Exit पण घेताना बरोबर ७ दिवस आधी घेतलीत — हा निव्वळ योगायोग की भैरवीत ठरवून सात दिवसरुपी सात सूर कमीच लावलेत ?

 

आणि म्हणून तुमच्यावर लेख लिहिताना मी ठरवल की ७ लेख लिहायचे , पण मग गोंधळलो की रामचंद्र नरहर चितळकर ऊर्फ सी.रामचंद्र या थोर संगीतकाराचं जन्मशताब्दि वर्ष जे १२ जानेवारी २०१८ ला बरोब्बर शतक पूर्ण करेल त्यादिवशी किंवा आदल्या दिवशी मी समारोप कसा करणार लेखमालेचा ? आणि मग मार्ग सापडला…..अख्खं आयुष्य फिल्मी दुनियेतील वाटावं असं काढणार्‍या तुमच्यासारख्या कलाकाराचा कर्तृत्वपट आपण FLASHBACK या पद्धतीनेच उलगडून दाखवायला हवा , नव्हे , कॅलेंडरप्रमाणे तुम्हीच तसं करायला आम्हाला भाग पाडलंय….. मग सुरुवात करतो अण्णा — आशीर्वाद द्या की तुम्हि जसं कुणालाही न दुखावता आयुष्य जगलात तशीच ही लेखमालाही कुणाला न दुखावता पूर्ण व्हावी! …..

 

…..अण्णा, अमेरिका आणि इंग्लंडचा दौरा करुन तुम्हि भारतात परतलात आणि काही दिवसांनी आजारी पडलात.मोरारजींच्या काळात दारूबंदी असल्याने तुमची एक सांकेतिक भाषा होती ज्यात दूध हा शब्द असायचा.

 

तुमच्या कुठल्याहि गाण्याचं रेकाॅर्डिंग संपल्यावर तुम्हि म्हणायचात , “दुधाचा रतीब काय म्हणतोय ? आज कुणाची टर्न आहे?” आणि मग तुमची दुधाची बाटली आल्यावर मैफिल मध्यरात्रीपर्यंत यथेच्छ रंगायची.त्या मैफिलितले तुमचे सहकलाकार केरसी लाॅर्ड तुमच्या अखेरच्या आजारपणात तुम्हाला भेटायला आले होते.तेंव्हाहि तुमची मिश्किल वृत्ती तुमची साथ करतंच होती! ग्लास उंचावून तुम्हि केरसीला म्हणालात , ” आओ आओ केरसी , आज सचमुच मैं दूधही पी रहा हूँ ! Come and join me… ”

 

५ जानेवारी १९८२ ….. तुम्हि अखेरचा श्वास घेतलात आणि तुमच्या पश्चात् पण मरणांतराणी वैराणी या श्लोकाला धाब्यावर बसवून तुमच्या हितशत्रूंनी तुम्हि गेल्याची बातमी पण क्रश केली ! तुमच्या अंत्ययात्रेला हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच माणसं होती.पण अण्णा , तुमच्यासारख्या रगेल आणि रंगेल व दिलखुलास कलावंताने आयुष्यभर जिवंत असताना इतकी कोट्यावधी माणसं जोडली की आपल्यापश्चात् किती जण शेवटच्या स्थानकात सोडायला आले होते याने काय मोठासा फरक पडणार होता ? एरवी माझ्यासारखा एक य:कश्चित् कानसेन उदय गंगाधर सप्रे पण आज तुम्हि गेल्यावर ३६ वर्षांनी हा लेख लिहितोय म्हणजेच आजहि त्याला त्या यात्रेत आपण जाऊ न शकल्याची अश्वत्थाम्यासारखी ठुसठुसती जखम शोकविव्हल करत असणारंच ना!

 

अण्णा , तुमच्या वक्तृत्व आणि विद्वत्तेचा एक प्रसंग सांगतो आणि आजचा हा Flashback थांबवतो…..

 

सन १९६२ ….. कधीकाळी एकेका दिवशी ५—५ गाणी रेकाॅर्ड केलेले तुम्हि , या अख्ख्या वर्षात एकहि पिक्चर केलं नव्हतंत.चीनच्या आक्रमणाची जखम ताजी होती.युद्धाची गाणी फिल्म साप्ताहिकात यायला लागलेली.नेहेमीच्या साहित्यातील रुचीने तुम्हि साप्ताहिकं चाळत असता एक गीत हेरलं होतंत.७ डिसेंबर १९६२ : समरसंगीत नावाचा कार्यक्रम होता.सचिनदेव बर्मन ,

 

शंकर—जयकिशन , नौशाद आणि तुम्हि असे ४ संगीतकार हा कार्यक्रम करणार होतात.तुम्हि वगळता सगळ्यांची गाणी त्यावर्षी चलतीत होती.आणि पैसा मोजून आलेल्यांच्या मनोरंजनाचा कार्यक्रम असल्याने देशभक्तिपर गीतांनी ते होणार नाहि याची त्यांना खात्री होती ( ? ). तुमच्याकडे एकहि चित्रपट नसल्याने ” आज अन्ना कौनसा गाना देगा ? ” असं कुत्सित हास्य चेहेर्‍यावर मिरवत ते वावरत होते.शंकर—जयकिशनची पाठराखण करंत एका गाण्यावर राज कपूर बॅगपाईप घेऊन स्टेजवर धागडधिंगा घालून गेलेला ! नौशादसाठी दिलीपकुमार व बर्मनदांसाठी बिमल राॅय सारखे दिग्गज स्टेजशोभा वाढवून गेलेले.तुम्हाला ठरवून शेवटचा क्रम दिलेला. आशा पारेखने तुमची ओळख करुन दिली ….. अगदी बुळचट ओळख ….. पण त्यांना व लोकांना अजून तुमचं वक्तृत्व आणि प्रसंगावधान ( आणि अर्थातंच संगीतकौशल्य ! ) हे माहित नव्हतं….. तुम्हि स्टेजवर आलात.डझनभर वाद्य , अर्धा डझन समूहगायक….. कुत्सित हास्ये करत काही ओठांच्या कडा कानाला भिडलेल्या ….. आणि माईक समोर ओढत तुम्हि म्हणालात , ” आशाबाई अभी मेरी पहचान कराके चली गईं । आजका कार्यक्रम समरसंगीत का है और अबतक आपनें ईश्क और प्यारके गाने सुनें! (हशा आणि टाळ्या….. कुत्सित हास्ये एकदम रोडावलेली….. एरंडेल प्यायल्यासारखे चेहेरे झालेले!) दोस्तों , मैं तो यार तीनों गाने देशभक्तिकेही देनेवाला हूँ , तो सुनिये….” असं म्हणंत अण्णा , तुम्हि २ गाणी महेंद्र कपूरकडून म्हणवून घेतलीत : तलाक मधील तुमच्याच संगीतातील संभलके रहना अपने घरमें छुपे हुए गद्दारोंसे आणि दुसरं जागृती मधील कवी प्रदीपचं *साबरमती के संत* जे मूळ चालीत बांधलं होतं हेमंतकुमारनी व जे तुम्ही पूर्णपणे चाल बदलून पेश केलंत महेंद्र कपूरद्वारा!

यानंतरचं ते साप्ताहिकातील गाणं होतं :

वाह रे चाऊ एन लाई, तुझको शरम न आईभूल गया क्या अपना वादा, हिंदीचिनी भाई भाई

तू है चिन, तो हम प्राचिनकिसी बातमें कम नहीं, बात मान जा नेहरूजी कीक्यूँ रे अकल गवाई? , वाह रे…..

 

आधी तुम्ही ऐकवलेल्या या शब्दांना तुम्ही अशा काही विडंबन व उपहासात्मक शैलीत ऐकवलंत की श्रोत्यांमधे हास्याच्या लाटाच आल्या! आणि मग तुम्हि ” राॅक—अँड—रोल ” शैलीत बांधलेलं गाणं तुमच्या आवाजात सुरु केलंत! एनाॅक डॅनियल्स अॅकाॅर्डियन व मनोहारी ट्रंपेटवर भरधाव सुटलेले , तुमचं हे—हूँ—हो चं रिधम् व कोरसच्या टाळ्या ! तमाम पब्लिकला अजय गोगावलेनं म्हटल्याप्रमाणे  येड लागलं येड लागलं रं असं झालेलं…..

 

गाणं संपल्यावर पहिल्या रांगेतील सफेद चुणीदार व काळी अचकन् घातलेले दस्तुरखुद्द भाई  ऊर्फ पु.ल.देशपांडे धावत मंचाकडे आले व अण्णा , ते तुम्हाला म्हणाले , ” राम , पुन्हा म्हण ते गाणं आणि श्रोत्यांनाही म्हणायला लाव ! ”

 

त्या रात्री अण्णा , तुम्हि ३—३ वेळा वन्स मोअर घेतलात ! हजारो श्रोते घरी जाताना तुमच्या चालीतंच गुणगुणंत गेले. बर्मनदा आधीच निघून गेले होते. उरलेल्या ” त्या ” लोकांची व त्यांच्या चमच्यांची मनं खट्टू झाली होती ! फिल्मलाईनबाहेर फेकल्या गेलेल्या तुम्हाला श्रोत्यांनी दिग्विजयी घोषित केलं होतं !

 

आणि हा प्रसंग लिहिताना आलेले आनंदाश्रू आणि गहिवराने माझ्या ओठी मात्र अण्णा , एका अण्णांनी गायलेले दुसर्‍या अण्णा जोशींचे नीळकंठ अभ्यंकरांच्या संगीतातील भक्तिरसाने ओथंबलेले शब्द आले आहेत ….

 

आलो मी हितगूज कराया ,  जाऊ नको रे विठू

पळभर थांब जरा रे विठू , विठू रे…..

 

तुमचा वेडा व निस्सीम चाहता ,

उदय गंगाधर सप्रे म — ठाणे

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *