इतिहासातून इतिहास घडवा…

उद्योजक मित्रांनो,

आपण खरोखरच अतिशय भाग्यशाली आहोत की आपण या पवित्र मातीत जन्म घेतला. आपल्या या मातीला अतिशय वैभवशाली आणि दैदीप्यमान इतिहास लाभलेला आहे. या ओठांनी चुंबूंन घ्यावी हजारदा ही माती, अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी… हे म्हणणं खरोखरच वावगं ठरू नये, इतका जबरदस्त वारसा या मातीचा आहे.

हीच ती माती जिथे एका महत्त्वकांक्षी सरदारच्या मुलाने अत्यंत कोवळया वयात आपल्या वडिलांचं स्वप्न आपलं स्वप्न बनवलं आणि 4 लाख कोटी इतकं वार्षिक उत्पन्न असलेलं, 260000 हजारांची फ़ौज, 50000 उच्च प्रतीचे घोड़े, आरमार उभरुन त्यात 640 लढावू नौका आणि 30 मोठी गलबते आणि 100 मैल समुद्रकिनाऱ्यावर आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं. पुणे आणि सुपे या छोट्याश्या जहागिरीचं रूपांतर, दक्षिणेपर्यंत पसरलेल्या साम्राज्यात केले. 12 देशांशी व्यापार सुरु केला…आणि हे सर्व अवघ्या 30 ते 35 वर्षांत!

मित्रांनो,  आपल्याला उद्योजकतेचे धड़े घेण्यासाठी कुठे बाहेर जाण्याची गरज नाही. ते महाराजांच्या इतिहासात भरभरुन आहेत.

महाराजांकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे आणि ते मी माझ्या ‘मला शिवाजी व्हायचंय!’ या प्रसिद्ध पुस्तकात मांडलेलं आहे. इथे या लेखामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मी नमूद करीत आहे आणि मला खात्री आहे की यांचा अवलंब उद्योगत झाला तर प्रगती निश्चित!

 

चारित्र्य:
आपल्या प्रत्येकाला माहित आहे कि महाराजांच्या काळात प्रत्येक मावळा स्वराज्यासाठी जीव द्यायला तयार होता. असं का होतं? माणूस एखाद्या गोष्टीसाठी जीव द्यायला केव्हा तयार होतो. ध्येय असेल तर? हो नक्कीच. ध्येय तर असावंच लागतं परंतु जर त्या ध्येयाला चारित्र्यवान नेत्याची जोड मिळाली तर आणि तरच एखाद्या गोष्टीसाठी जीवापाड झटण्याची ताकद निर्माण होते… आणि स्वराज्याला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा चारित्र्यवान नेता मिळाला होता आणि महाराजांचे चारित्र्य स्वराज्याचं चारित्र्य बनलं होतं. याच चारित्र्याच्या बळावर शून्यातून निर्माण झालेलं मराठा साम्राज्य १७३ वर्षे नुसतं टिकलंच नाही तर सुमारे ७०% भारत मराठ्यांच्या अधिपत्याखाली आला. चारीत्र्यामध्ये हि प्रचंड ताकद असते.

एखाद्या संस्थेचं चारित्र्य हे तिच्या संस्थापकाच्या चारित्र्याची सावली असते. एखादा उद्योग किती विस्तारावा आणि किती काळ टिकावा हे सर्वस्वी त्या संस्थेच्या नितिमत्तेवर अवलंबून असते. संस्थेचं चांगलं चारित्र्य हे त्या संस्थेचं भवितव्य ठरवत असतं.

उदाहरणार्थ, संस्थेचा हेतू फक्त नफा कमवणं असेल. तर फक्त नफा कमवण्यासाठी ती कोणत्याही टोकाला जाऊ शकते. ग्राहकाच्या गरजा न ओळखता आपल्याकडे जे उत्पादित होईल ते ग्राहकाच्या माथी मारण्याचा प्रयत्न करते. पण एक गोष्ट लक्षात ठेवयला हवी की ग्राहकांची फसवणूक तुम्ही वारंवार करू शकत नाही. एकदा आपली फसवणूक होत आहे हे ग्राहकांच्या लक्षात आल की तो तुमच्याकडे पाठ फिरवेल आणि याच कारणाने अशी संस्था जास्त काळ टिकाव धरु शकत नाही. जी संस्था ग्रहकाभिमुख असते, ग्राहकांचं समाधान आणि सेवेवर सतत भर देते, आपल्या संस्थेत काम करणाऱ्या व्यक्तींच्या विकासाचा सातत्याने विचार करते, कोणाचीही फसवणूक किंवा लुबड़वणुक करत नाही. ती संस्था बाजारात दीर्घ काळ तग धरु शकते.

 

लक्षात ठेवा, ‘नीती चांगली असेल तर गती प्राप्त होईल, नाहीतर अधोगती निश्चित!

वचनबद्धता
महाराजांनी स्वराज्यातील जनतेला, त्यांच्या सैन्याला आणि आपल्या मित्र राज्यांना दिलेली आश्वासने नेहमीच पार पाडली. त्यांनी बोलण्यापेक्षा कर्तृत्त्वावर भर दिला आणि त्यांनी दाखवलेल्या परिणामांमुळे लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास बळावत गेला.

लोकांचा विश्वास तुम्ही फक्त बोलून जिंकू शकत नाही तर तुमच्या बोलण्याला कर्तुत्वाची जोड़ हवी. तुम्ही तुमच्या ग्राहकांना आश्वासने देवून कदाचित तुमची सेवा किंवा उत्पादन विकालही परंतु ग्राहकांचा विश्वास हे दिलेली अश्वासने पूर्ण करुनच जिंकता येवू शकतो. हीच गोष्ट तुमच्या संस्थेत काम करणाऱ्या लोकांची! त्याना दिलेली आश्वासने जर पूर्ण केलीत तरच तुम्ही त्यांचा विश्वास संपादन करू शकता आणि ते दीर्घ काळ तुम्हाला साथ देवु शकतात.

‘बोले तैसा चाले’ या वृत्तीचा व्यवसायात अवलंब करणं अत्यंत गरजेचं आहे. ग्राहकांचा आणि तुमच्या कर्मचाऱ्यांचा विश्वास हा तुमच्या यशस्वी उद्योगाचा पाया आहे.

 

विस्तार:
महाराजांनी त्यांच्या अल्प कारकिर्दीत साधलेली अद्वितीय प्रगती मी सुरुवातीला नमूद केलेलीच आहे. महाराजांना दीर्घकाळ टिकणारं साम्राज्य उभं करायचं होतं आणि त्यासाठी वर्षांमागून वर्षे नेत्रदीपक प्रगती ते साधत गेले. महाराजांची हीच प्रगती पाहून आदिलशाहीचे ७०० पठाण, मुघलांची हजारोची घोडदळ, पूर्वप्रस्थापित शाह्यांच्या नोकऱ्या सोडून स्वराज्यात काम करण्यासाठी आले.  इतकेच नव्हे तर काही इंग्रज, पोर्तुगीज देखील स्वराज्यात नोकरी करत होते.

तुमची प्रगती लोकांना दिसली की लोक तुमच्यासोबत तसेच तुमच्याकडे काम करण्यासाठी, तुमच्याकडून वस्तू किंवा सेवा विकत घेण्यासाठी उत्सुक होतात.

‘विस्तारा नाहीतर मरा’ ही सद्य बाजारपेठेची परिस्थिती आहे. त्यामुळे संस्थेचा मानसिक आणि भौतिक विकास हा अत्यंत गरजेचा असतो. हा विकास खालील तीन पद्धतीने साधता येवू शकतो.

 

बदलांना आलिंगन:
आपल्या भोवतालचं जग झपट्यान बदलत आहे. प्रत्येक मिनिटाला इथे नवा शोध लागत आहे आणि आज घेतलेली वस्तु पुढच्या दहा दिवसांत कालबाह्य (out dated) होत आहे. जर या बदलत्या जगात टिकायचे असेल, प्रगती साधायची असेल तर तुम्हाला पुढे येणाऱ्या बदलांचा अभ्यास करुन त्यांना सामोरे जाण्याची तयारी दाखवायला हवी. लोकांची मानसिकता, तंत्रज्ञान, सरकारच्या निती, जागतिक बाजारपेठ यामध्ये होणाऱ्या बदलांवर आपले बारीक़ लक्ष असेल आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी लागणारी कौशल्ये आत्मसात करू शकलो आणि साधनसंपत्ती आपण उभी करू शकलो तर नक्कीच हे बदल प्रगतीसाठी पोषक ठरू शकतात.

 

ऑरगॅनिक ग्रोथ:
आपला उद्योग विस्तार करण्यासाठी एखाद्या नव्या ठिकाणी जाऊन संशोधन करुन, लागणारी आर्थिक गरज उभी करुन, मनुष्यबळ उभं करुन, संपूर्ण ढाचा उभा करणं हा विस्तार म्हणजे ऑरगॅनिक ग्रोथ.

परंतू ऑरगॅनिक ग्रोथ तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमच्याकडे आर्थिक पाठबळ मोठ्या प्रमाणावर असेल. जर आपली आर्थिक बाजू सक्षम नसेल तर त्याला दूसरा पर्याय म्हणजे इनऑरगॅनिक ग्रोथ.

 

इनऑरगॅनिक ग्रोथ:
एखाद्या नव्या ठिकाणी जावून तिथे पूर्वप्रस्थापित संस्थेशी संघटन करुन आपला उद्योग चालू करणं याला इनऑरगॅनिक ग्रोथ म्हणतात. या प्रकारामधे एकूण आर्थिक गरज ही फारच कमी असते. सुरुवतीच्या काळात उद्योजक या प्रकारचा अवलंब करु शकतात.

मित्रांनो, वाढण ही काळाची गरज आहे आणि उद्योगजगतात फार काळ टिकायचे असेल तर वाढावेच लागेल.

आरमारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला जंजिरा किल्ला प्रयत्नांची पराकाष्टा करूनही जिंकता येत नाही हे लक्षात आल्यावर  त्यावर  विसंबून न राहता;  सिंधुदुर्ग, खांदेरी,  उंदेरी यांसारखे नवे जलदुर्ग बांधणं हे उदाहरण ऑरगॅनिक ग्रोथचे आहे.

दक्षिण स्वारीमध्ये जिंजी किल्ला प्राप्त करून त्याची डागडुजी करून त्याचं रुपांतर अभेद्य किल्ल्यामध्ये करणं हे उदाहरण आहे इनऑरगॅनिक ग्रोथचे आहे.

 

कंधो से मिलते है कंधे, कदमो से कदम मिलते है:
मित्रांनो आजच्या या स्पर्धात्मक जगात टिकाव लागणं हे बऱ्याच उद्योग समुहांना कठीण जात आहे. याचं कारण म्हणजे स्पर्धक हा आपला शत्रू असण्याची भावना.

जर स्पर्धकालाच आपला सखा बनवता आल तर प्रगती अत्यंत वेगाने साधता येवू शकते. आजचा काळ एकत्रित पुढे जाण्याचा आहे. एकमेकांच्या मानेवर पाय देवून आपण यशाची ऊंची गाठू शकत नाही.  त्यामुळे संघटीत होऊन, एकमेकांना सहकार्य करून, एकत्रित आपण विस्तारू शकतो.

एक साधे उदाहरण घ्या. तुम्ही एखाद्या मारवाड्याच्या हार्डवेयरच्या दुकानात गेलात आणि एखादी वस्तू मागितली आणि समझा ती त्याच्या दुकानात उपलब्ध नसेल तर तो तुम्हाला त्याच्याकडे ती वस्तू नाही असे सांगणार नाही. ‘बाजूमे गोडाऊन है, वहां से मंगवाता हू” असं म्हणून मुलाला आजूबाजूच्या दुसऱ्या हार्डवेयरच्या दुकानात पाठवेल (तेदेखील मारवाड्याचं) आणि तिथून ती वस्तू आणून तो तुम्हाला विकेल. तो दुसरा हार्डवेयरवाला मारवाडी हा विचार करत नाही कि तो माझा स्पर्धक आहे, त्याला मी वस्तू का देवू? कारण साहजिकच आधीच्या दुकानदाराचा ग्राहक तिथे वस्तू मिळत नाही म्हटल्यावर याच्याच दुकानात जाणार, नाही का? परंतू इथे तो स्पर्धेची भावना मनात ठेवत नाही. याच सहकार्यामुळे हे मारवाडी उत्तम उद्योग करू शकतात. दुर्दैवाने सहकार्याची ही भावना आपल्या मराठी उद्योजकांमध्ये कमी दिसते.

उद्योगात मोठं नाव कमवण्यासाठी आणि हवी ती प्रगती साधण्यासाठी एकमेकांना सहकार्य करा. एकत्रित येवून मोठ-मोठाले प्रकल्प पार पाडा, एकत्रित जगा आणि एकत्रित प्रगती साधा.

महाराजांनी वेळोवेळी आदिलशाही, मुघलशाही, इंग्रज, पोर्तुगीजांशी तह केले. कुतुबशाहीशी कायम मैत्रीचे संबंध केले. शत्रूंशी ते शत्रूप्रमाणे वागले, परंतू मित्रांना दगा देण्याचं इतिहासात एकही उदाहरण नाही. उत्तरेकडून स्वराज्यात रुजू होण्याची इच्छा ठेवून आलेल्या छत्रसाल बुंदेला या राजपूत राजाला उत्तरेतच मुघालांविरुद्ध आपलं राज्य स्थापित करण्यासाठी प्रेरित करून परत पाठवलं आणि त्यासाठी जी मदत लागेल ती करण्याची तयारी दर्शवली. यातून शिवाजी महाराजांची सहकार्य, एकत्रित काम करणं आणि एकत्रित संवर्धन करण्याची वृत्ती स्पष्ट होते.

महाराजांविषयी सांगण्यासारखं, लिहिण्यासारखं आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखं पुष्कळ आहे. हा कधीही न संपणारा विषय आहे. तरीही त्यांच्या विषयी काही महत्त्वाची शिकवण मी या लेखात नमूद केलेली आहे. शिवाजी महाराजांविषयी अभिमान हा आपल्या रक्तातच आहे परंतू तो तेव्हाच सार्थकी लागेल जेव्हा आपण त्यांच्या इतिहासातून शिकून, त्याचा आपल्या वर्तमानात वापर करून, आपल उज्ज्वल भविष्य घडवू. आपलं उद्योगरुपी स्वराज्य स्थापन करू.

 

“टाकून काळाची कात

चढवूया आज साज नवा

का वाट उद्या परवाची

आयुष्य बदलणारा निर्णय आज हवा.”

 

विनोद अनंत मेस्त्री

लेखक, प्रशिक्षक, प्रेरणादायी वक्ता

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *